महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री. अभय क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. मा. अभय क्षीरसागर हे व्यवसायाने सनदी लेखापाल आहेत. ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे ते गेली १० वर्षे सदस्य असून संस्थेच्या विविध समित्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच संस्थेला व संस्थेच्या विविध शाखांना त्यांचे अर्थविषयक मार्गदर्शन लाभत आहे.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

GB-VC-Kshirsagar

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील ‘सर्क्युलर बिल्डिंग’च्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमीपूजन व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे उपप्राचार्या डाॅ. सुनिता भागवत, डाॅ. सोनावणे, प्रबंधक किसन साबळे उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सुधारित बोधचिन्हाचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके उपस्थित होते.

गरवारे वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे यांनी केले. ‘बोधचिन्हांना संस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्व असते. त्यावरुनच संस्थेची ओळख ठरते. उद्दीष्ट्ये समजतात. सशस्त्र सेनांमध्येही बोधचिन्ह अतिशय मानाने सांगितले जाते,’ असे विचार एअरमार्शल गोखले यांनी व्यक्त केले. नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळाच्या सदस्य, तसेच गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डाॅ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या बोधचिन्हाचा इतिहास आणि नव्या बोधचिन्हाची संकल्पना या विषयी माहिती दिली.

newlogo-inauguration

मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता, पुणे ४ या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय खर्चासाठीच्या निधी संकलनासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दि. १९ एप्रिल २०१९ रोजी मयूर कॉलनीतील मएसो सभागृहात ‘कलासंयुज’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) उपस्थित होते. यावेळी शाला समितीच्या अध्यक्ष मा. आनंदीताई पाटील, महामात्र प्रा. सुधीर भोसले, मुख्याध्यापक भाऊ बडदे व सर्व शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. माधुरी आपटे (नृत्य), सुरमणि सानिया पाटणकर (गायन), मृणाल भोंगले (चित्रकला) आणि नितीन महाबळेश्वरकर (गायन) या कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

19th-Apr-2019

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यावर क्रीडा संस्कार व्हावा या उद्देशाने म.ए.सो. क्रीडावर्धिनीतर्फे शनिवार, दि. १३ एप्रिल २०१९ ते मंगळवार, दि. ३० एप्रिल २०१९ या कालावधीत संस्थेच्या पुण्यातील शाळांबरोबरच शिरवळ, बारामती, सासवड, अहमदनगर, कळंबोली येथील शाळांमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये लंगडी, कबड्डी, मल्लखांब, खो-खो, नेमबाजी, थ्रो-बॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल. स्केटींग इत्यादी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारच्या शिबिराचे हे सलग दहावे वर्ष आहे. संस्थेच्या विविध शाखांमधील १२४९ विद्यार्थी या उन्हाळी शिबिरात सहभागी झाले आहेत.

10th-Apr-2019

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामतीमधील मएसो कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अहमदनगरमधील मएसो रेणावीकर माध्यमिक शाळा या दोन शाळांना केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून ‘अटल टिंकरींग लॅब’ मंजूर झाल्या आहेत. 

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा आणि त्यांच्यात विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, जेणे करून देशामध्ये तंत्रज्ञानात्मक सर्जनशीलतेचे वातावरण आणि संस्कृती विकसित व्हावी, हा ‘अटल टिंकरींग लॅब’चा प्रमुख उद्देश आहे. 

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि सासवडमधील मएसो वाघीरे विद्यालय या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या तीन शाळांमध्ये यापूर्वीच ‘अटल टिंकरींग लॅब’ कार्यरत आहेत.

“भारताला गुडघे टेकायला लावणे हेच पाकिस्तानचे ध्येय आहे, त्यामुळे सातत्याने अतिरेकी हल्ले घडवून भारताला रक्तबंबाळ करण्याचे त्यांचे धोरण आहे. या अतिरेकी कारवाया पाकिस्तान पुरस्कृत आहेत. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आपण कारवाई करू शकतो हे दाखवून देण्यासाठीच भारताने हवाईहल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील नागरिकांनी एकजूटीने आणि खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. प्रसार माध्यमांनी आपली लक्ष्मणरेषा सांभाळली पाहिजे आणि त्याचबरोबर नागरिकांनी जनमानस अस्वस्थ होईल अशी कोणतीही कृती आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे, आपल्या आसपास काही आक्षेपार्ह घटना घडत असतील तर पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे,” असे प्रतिपादन भारतीय हवाईदलाले माजी उपप्रमुख आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन मंच यांनी ‘पाकिस्तानवरील नियंत्रित हवाईहल्ला आणि भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये हे व्याख्यान झाले. त्यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते. “भारताने शांततेसाठी सर्व प्रयत्न केले परंतु पाकिस्तानने कोणताच प्रतिसाद दिला नाही, कारण पाकिस्तानच्या लष्कराला संवाद साधण्यात कोणताच रस नाही. स्वतंत्र झाल्यानंतर ७० वर्षांपैकी ५० वर्षे पाकिस्तानात लष्कराची सत्ता आहे. जनरल मुहम्मद झिया उल हक यांच्या कार्यकाळापासून पाकिस्तानी दहशतवाद बोकाळला आहे. ५७ इस्लामी देशांचा समावेश असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या संघटनेच्या बैठकांमध्ये वारंवार काश्मीर प्रश्नाचे रडगाणे गात आला आहे. या संघटनेच्या दि. १ व २ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत भारताला सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर पाकिस्तानाने या बैठकीवरच बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडले आहे. त्यामुळे तो आता असे उद्योग करत आहे. भारताने पाकिस्तानला दिलेला व्यापारी कारणांसाठी दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आता काढून घेतला आहे. याशिवाय भारतातून पाकिस्तानात वाहून जाणारे नद्यांचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत आपण पाकिस्तानमधील जनतेला त्रास होऊ नये असाच विचार करत आलो आहोत. पाकिस्तान मात्र कायमच दहशतवादाला प्रोत्साहन देत आला आहे. भारताच्या सीमेजवळ त्याने अतिरेक्यांचे प्रशिक्षण तळ उभारले. भारतीय हवाईदलाने नुकत्याच केलेल्या हल्ल्यात हे तळ उद्ध्वस्त केले आहेत, कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ला केलेला नाही.” “भारत आता देशहितासाठी बचावात्मक नाही तर आग्रही पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. भारतीय सैन्याला संरक्षण दले असे न म्हणता सशस्त्र दले असे म्हटले पाहिजे. त्यातून देशाची मानसिकता घडत असते. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व खूप मोठे आहे. लढाऊ विमाने हवेत असतानाच त्यांच्यात इंधन भरता येते, त्यामुळे या विमानांची कार्यक्षमता वाढते. ५ हजार किलोमीटर अंतर मारक क्षमता असणारे अग्नीसारखे क्षेपणास्त्र आता भारताकडे आहे. याशिवाय इ.स. २०२० पर्यंत भारत हा सरासरी वय २९ असणारा जगातील सर्वात तरुण देश झालेला असेल. ही युवाशक्ती आपल्या देशाची फार मोठी ताकद आहे,” असेही ते यावेळी म्हणाले. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर विविध युद्धांच्या काळात भारताने घेतलेल्या अनेक निर्णयांचा उपापोह एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या व्याख्यानात केला. प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

“कला ही माणसाला निसर्गातील इतर प्रणिमात्रांपासून वेगळी बनवते, कलेमुळेच माणसाचा प्रवास बाह्यरुपाकडून अंतरंगाकडे होतो. आज सर्वत्र मूल्यशिक्षणाबाबत बोलले जात आहे. कला हेच सौंदर्याचे प्रमुख मूल्य आहे. आज व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघितले जाते. पण कलेमुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य बघायला आपण शिकतो. कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यामुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य ओळखायची क्षमता निर्माण होते आणि ती जाणीव आपल्या आचरणात येते, ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना व ज्येष्ठ गुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज (दि. १७ जानेवारी २०१९) झाले. त्यावेळी डॉ. सुचेता भिडे-चापेकर बोलत होत्या. 

मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरीयममध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाच्या सदस्य व मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे तसेच ‘मएसो कलावर्धिनी’तील कला मार्गदर्शक व आघाडीच्या शास्त्रीय गायिका आरती ठाकूर-कुंडलकर, ज्येष्ठ संवादिनी वादक सुयोग कुंडलकर, ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण व रश्मी देव याप्रसंगी उपस्थित होते. 

‘मएसो कलावर्धिनी’त सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी शास्त्रीय संगीत, संवादिनी (हार्मोनियम), तबला यांचे तसेच सर्व शाळांमधील इ. ६ वी ते इ. ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

संगीत, अभिनय आदी ललित कलांच्या शिक्षणामुळे व्यक्तिमत्वावर अतिशय सकारात्मक आणि दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे कोणत्याही कलेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना केली असल्याचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 

‘मएसो कलावर्धिनी’त तीन महिन्यांच्या अभिनय प्रशिक्षण वर्गात आठवड्यातून दोन दिवस दोन-दोन तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून कलेची आवड जोपासायला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच मदत होईल असे योगेश सोमण यांनी यावेळी सांगितले. 

आरती ठाकूर-कुंडलकर कलेच्या प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगताना म्हणाल्या की, संगीत हे स्वतःच्या आनंदासाठी शिकले पाहिजे. अल्प कालावधीत कलेची तोंडओळख होते आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो. कलेचे रसग्रहण शिकल्यामुळे कलाकाराबरोबरच उत्तम रसिकही घडतात. 

मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी, ‘मएसो कलावर्धिनी’त कालांतराने नृत्य, शिल्प, चित्र आदी कलांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याची माहिती आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात दिली. 

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील शिक्षिका सौ. श्रुती जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आरती ठाकूर-कुंडलकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी तर संजय देशपांडे यांनी तबल्यावर साथ केली.

“ स्वामी विवेकानंद म्हणायचे त्याप्रमाणे आज चारित्र्य घडविणारे शिक्षण हवे आहे, त्यासाठी नैतिक, आध्यात्मिक व मानवी मूल्यांचा समावेश शिक्षणात असण्याची आवश्यकता आहे आणि ही मूल्य आचरणात आणली तर आपला देश निश्चित महान होईल,” असा विश्वास पुण्याच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ आयोजित करण्यात येतो. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (दि. १२ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या वेळी आयर्नमॅन खेळाडू अनिरुद्ध तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडा वर्धिनीचे अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, म.ए.सो. क्रीडा वर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले उपस्थित होते. 

स्वामी श्रीकांतानंद पुढे म्हणाले की, “महान होण्यासाठी आत्मविश्वास, सेवेचा भाव आणि सत्याचे पालन करण्याची वृत्ती यांची आवश्यकता असते. स्वतःवर आणि देवावर विश्वास असेल तर आपण कोणतेही महान कार्य करू शकतो. जे इतरांसाठी जगतात ते खरे जिवंत असतात असे स्वामी विवेकानंद म्हणत. त्यांचे विचार ऐकून भगिनी निवेदितांनी आपले जीवन भारतासाठी समर्पित केले. दुर्दैवाने परकीयांना जे कळते ते आजही आपल्या लक्षात येत नाही. आज आपल्या देशामध्ये खूप जणांना सेवेची गरज आहे. सत्य कोणापुढेही मान तुकवायला तयार नसते, जो समाज सत्याचे पालन करत नाही तो समाज नष्ट होतो. स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर सत्याचीच कास धरली आणि त्याच सत्याने त्यांना महान बनवले. त्यांनी वाणीच्या आधारेच जग जिंकले. आपल्या जीभेवर सरस्वतीचा वास असतो, त्यामुळे आपण बोलण्यातून लोकांची मने जिंकायची असतात, दुखवायची नसतात. त्यासाठी चांगले साहित्य वाचले पाहिजे व चांगला विचार केला पाहिजे. तुमच्यामध्ये सर्व शक्ती विद्यमान आहेत, त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य करू शकता, स्वतःला दुबळे समजू नका असे स्वामी विवेकानंद म्हणत असत आणि हेच यशाचे खरे सूत्र आहे.” 

प्रमुख पाहुणे अनिरुद्ध तोडकर आपल्या भाषणात म्हणाले, “मलेशियात झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत मला मिळालेले यश मी भारतीय सेनादलांना समर्पित करतो कारण त्यांनी केलेला त्याग फार मोठा आहे आणि आपण त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही यश मिळवण्यासाठी मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे असते. पालक व शिक्षकांकडून लहानपणापासून होणारे संस्कार आणि शिकवण यातूनच कोणतीही व्यक्ती मानसिकदृष्ट्या सुदृढ होते. माझ्यावर झालेल्या संस्कारातूनच मी कायम काही मूल्य जोपासत आलो आहे, त्यातून माझे विचार तयार झाले आहेत. आपल्या भोवती जेव्हा सकारात्मक व्यक्ती असतात तेव्हा सकारात्मक वृत्ती वाढते. स्पर्धेदरम्यान मनातले सकारात्मक विचार जेव्हा नकारात्मक होऊ लागत तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांच्या आधारे त्यावर मात करता आली. आयर्नमॅन स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या शारिरीक सरावाबरोबरच मनातील सकारात्मक विचारांच्या आधारे मला यश मिळू शकले.” 

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा चेतना दिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शिरवळ, सासवड, बारामती आणि नगर येथील शाळांमधील ५६८ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये योगासने, ढोलपथक, मल्लखांब, अरोबिक्स, लेझिम, मनोरे, वारी, गोफ विणणे, मर्दानी खेळ आदी प्रात्यक्षिकांचा समावेश होता. शालेय विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांमधून उपस्थितांना सांघिक वृत्ती, समन्वय आणि खिलाडूवृत्ती यांचे दर्शन घडले.

आपल्या विद्यालयाचा २० वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा गुरुवार, दि.२७ डिसेंबर २०१८ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘जागर जाणिवांचा ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात सादर करण्यात आला. 

भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. 

या वेळी शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ. सौ. अर्चना कुडतरकर आणि शाळेचे महामात्र डॉ.अतुल कुलकर्णी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते. हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. 

र्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी केले.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या पाच छात्रांची यावर्षी राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी निवड झाली आहे. ऐश्वर्या खैरनार, आसावरी तानवडे, रितीका जाधव, मंगेश गोळे आणि आकाश थोपटे हे ते छात्र आहेत. एन.सी.सी. च्या पुणेस्थित २ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.पी.एस. मौर्य तसेच कर्नल एस. नारायनील आणि कॅप्टन संदीप नवले यांचे या छात्रांना विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. गेल्या सलग सात वर्षांपासून या महाविद्यालयातील छात्रांची राजधानीतील संचलनासाठी निवड होत असून २०१३ पासून १६ छात्रांनी राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
या वर्षी निवड झालेली ऐश्वर्या खैरनार ही छात्रा मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची माजी विद्यार्थिनी आहे.

 

पद्मभूषण आबासाहेब गरवारे यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मएसो आबासाहेब गरवारे कॉलेज आणि मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन्ही महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार, दि. २१ डिसेंबर २०१८ रोजी मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास यशस्वी मराठी उद्योगिनी व ‘पूर्णब्रह्म’ या सर्वात मोठ्या मराठमोळ्या हॉटेल शृंखलेच्या संचालिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर ‘पूर्णब्रह्म’ च्या जागतिक प्रमुख वृषाली शिरसाव या देखील उपस्थित होत्या. याप्रसंगी दोन्ही महाविद्यालयातील वर्ष २०१७-२०१८ मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा सौ. कठाळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. “कशालाही न घाबरता सचोटीने आणि आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुनिश्चित वाटचाल” हा यशाचा मूलमंत्र सौ. कठाळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी अतिशय रंजक शैलीत, प्रभावीपणे केलेले अनुभवकथनाने सर्व श्रोते भारावून गेले. 

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे दरवर्षी कै. आबासाहेब गरवारे यांचा जयंतीदिन ‘उद्योजकता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यानिमित्त दोन दिवसीय राज्यस्तरीय बिझनेस फेयर (उद्योग मेळावा) आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन सौ. कठाळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात, महाविद्यालयांत गेल्या १६ वर्षांपासून उद्योजकता विकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. गीता आचार्य यांच्या प्रयत्नांचा गौरव केला तसेच मूल्याधिष्ठित शिक्षणातून सकस समाज निर्मितीसाठी म.ए. सो. सारख्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.बी. बुचडे यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थचे सचिव व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी तसेच गरवारे ट्रस्टतर्फे मा. श्री. सुनील सुतावणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजकता विकास केंद्रप्रमुख डॉ. अर्चना जोशी यांनी तर आभार प्रदर्शन कॉमर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. भूषण राठोड यांनी केले.


 

मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीयर कोर्सेसचे (आयएमसीसी) संचालक म्हणून डॉ. संतोष देशपांडे यांची पुणे विद्यापीठाच्या निवड समितीने निवड केली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात डॉ. देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. 

डॉ. देशपांडे हे आत्तापर्यंत आयएमसीसीचे प्रभारी संचालक म्हणून काम पहात होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत.

किर्लोस्कर फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलला प्रादेशिक भाषा माध्यमाच्या शाळांच्या गटात प्रथम क्रमांक तर इंग्रजी भाषा माध्यम शाळा गटात बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलला द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समितीच्या सदस्यपदी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समितीच्या सदस्यपदी आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य-सचिवपदी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. श्यामाताई घोणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकत्याच या समित्या पुनर्गठित केल्या असून पुढील तीन वर्षांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षि शाहू या महापुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी स्वतंत्र समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांच्या माध्यमातून या महापुरुषांशी संबंधित सर्व अप्रकाशित साहित्य, लेखन आणि संशोधनाचे काम तसेच अनुवाद, संपादन आणि प्रकाशन अशी कामे करण्यात येतात. या ग्रथांना महाराष्ट्राबरोबरच देशात आणि परदेशात मोठी मागणी आहे. 

या नियुक्तीबद्दल प्रा. सुधीर गाडे व डॉ. श्यामाताई घोणसे यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

बारामतीमधील म. ए. सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालयातील विद्यार्थिनी कु. राधिका संजय दराडे हीने विभागीय स्तरावर १७ वर्षे वयोगटासाठीच्या सायक्लिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी कु. राधिकाची निवड झाली आहे. शाळेच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन!

secondary-school

पुणे जिल्हा परिषदेच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुशू स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या खेळाडूंनी विभाग स्तरावर उज्वल कामगिरी बजावली आहे. शाळेतील सात विद्यार्थिनींनी पदके पटकावली आहेत. 

१) धनश्री सुतार – इ. १० ब – सुवर्ण पदक – राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली. 

२) श्वेता डोईफोडे – इ. १० ब – रौप्य पदक 

३) तनया कोऱ्हाळे – इ. ११ अ – रौप्य पदक 

४) दिव्या निखाडे – इ. १२ अ – रौप्य पदक 

५) इशा दलभंजन – इ. १० ब – कांस्य पदक 

६) ऋतुजा घाडगे – इ. १२ अ – कांस्य पदक 

७) रूतिका गोळे – इ. १२ अ – कांस्य पदक 

सर्व खेळाडू तसेच मार्गदर्शक श्री.विक्रम मराठे सर आणि रोहिणी ताई यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन!

Baramati-Pune-map

क्रीडाभारती पुणे महानगर आयोजित १४ वर्षे वयोगटातील आंतरशालेय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालय बारामती मुलींच्या संघाने अहिल्यादेवी मुलींच्या शाळेस 38- 23 च्या फरकाने अंतिम फेरीत मात करून प्रथम क्रमांक पटकावला.

 

म.ए.सो. रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलमध्ये कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गुरुवार, दि. ६ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ‘परिक्रमा’ नृत्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. 

सुप्रसिद्ध नृत्यांगना सुचेता भिडे – चाफेकर यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्याने त्यांच्या सर्व शिष्यांनी मिळून त्यांना दिलेली गुरुदक्षिणा म्हणजे ‘परिक्रमा’ नृत्यमहोत्सव!

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर होते. म.ए.सो. तर्फे नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर यांचा सत्कार एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा या कार्यकमात सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे , उपाध्यक्ष डॉ. माधवजी भट व आजीव मंडळाच्या सदस्या डॉ. मानसी भाटे हे उपस्थित होते.

 

Scroll to Top
Skip to content