‘शिक्षणाचा पाया पक्का करण्याची गरज’

‘शिक्षणाचा पाया पक्का करण्याची गरज’

“माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज सर्व माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध होत आहे, शिकण्यासाठी पूर्वी कष्ट घ्यावे लागत होते. आता मात्र शिकण्यासाठी कष्ट करण्याची भावना कमी होत चालली आहे, हे योग्य नाही. शालेय जीवनातच शिक्षणाचा पाया पक्का करण्याची गरज असते कारण त्याच्याच जोरावर आयुष्यात यशस्वी होता येते,” असे प्रतिपादन गरवारे पॉलिस्टर लिमिटेडच्या मनुष्यबळ आणि प्रशासन विभागाचे अध्यक्ष डॉ. विहार राखुंडे यांनी आज (रविवार, दि. 14 जुलै 2019) येथे केले. सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. 10 व इ. 12 वी च्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव आणि गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या साहाय्यातून करण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा शुभारंभ डॉ. राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाघमारे, शाळेचे महामात्र आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर गाडे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते. गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी आणि मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील सुतवणे, मएसोच्या नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळातील सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ. राखुंडे म्हणाले की, “परदेशांप्रमाणेच आपल्या देशातही दर्जेदार शिक्षण मिळावे अशी आबासाहेब गरवारे यांची इच्छा होती. त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविले होते. परंतु, समाजातील सर्वांना हे शक्य होणार नाही याची त्यांना जाणीव होती. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतूनच त्यांनी गरवारे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आबासाहेब गरवारे यांच्या विचारांना अनुसरून गरवारे पॉलिस्टर लिमिटेडचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर शशिकांत गरवारे मएसो आणि विविध शैक्षणिक संस्थांना गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने पाठबळ देत आहेत. त्यांच्याच पाठिंब्यामुळे ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या ‘मएसो’ सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाला आज सुरुवात होत आहे.”

इ.12 वी च्या परिक्षेत विज्ञान शाखेत 80 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावलेली मयुरी सुनील बजबळकर, इ.12 वी च्या परिक्षेत वाणिज्य शाखेत 91 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आलेला विशाल विठ्ठल ढाकणे आणि इ. 10 वी च्या परिक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आलेली साक्षी कालिदास सातव या गुणवंतांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात, सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्थापनेला लवकरच 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात, शाळा हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया असल्याने तो मजबूत व्हावा यासाठी शिक्षकांनीही कष्ट घेण्याची गरज असल्याचे सांगितले. शिक्षकांकडे असलेले सर्व ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. मातृभाषेतून शिकल्याने शिक्षणाचा पाया मजबूत होतो. मराठी शाळेत शिकत असल्याचा न्यूनगंड विद्यार्थ्यांनी अजिबात बाळगू नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आबासाहेब गरवारे व सौ. विमलाबाई गरवारे यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनी श्रेया कुलकर्णी हीने सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.

शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाघमारे यांनी आभारप्रदर्शन तर शिक्षिका अर्चना लडकत यांनी सूत्रसंचालन केले.