कथुआ येथे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी म.ए.सो.चे प्रयत्न

जम्मू-काश्मीर मधील कथुआ या जिल्ह्यात, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने शैक्षणिक विकासासाठी काही पावले उचलली आहेत. ददवाडा तालुक्यातील फिंतर या गावी ‘बाल गोविंद माध्यमिक इंग्रजी विद्यालय, ददवाडा’ या शाळेसाठी म.ए.सो. गेली ५ वर्षे काम करत आहे. जम्मू-काश्मीरसारख्या कायमच अशांतता असलेल्या परिसरातील होतकरू व जिद्दीने काही करून दाखविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना, तसेच तेथील नागरिकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राष्ट्रीय शिक्षणा’च्या ध्येयाने सुरु झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने यशस्वी प्रयत्न केले आहेत.

सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या कामाची सुरुवात सन २०१३ साली विविध संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांनी केलेल्या काश्मीर दौऱ्याने झाली होती. ‘जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्रा’च्या वतीने आयोजित केलेल्या या शैक्षणिक दौऱ्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा पुण्यातील काही नामवंत संस्था सहभागी झाल्या होत्या. म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर हेही त्यावेळी दौऱ्यात सहभागी झाले होते, त्यावेळी तेथील शाळांची पाहणी करून तेथे कोणत्या सोयी-सुविधा पुरविणे अपेक्षित आहे, कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण, कौशल्य तेथील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना देणे गरजेचे आहे या सर्व गोष्टींचे अभ्यासपूर्ण विश्लेषण त्याचवेळी करण्यात आले होते. त्यानुसार आवश्यक त्या गोष्टींची माहिती घेऊन ‘बाल गोविंद’ प्रशालेला मदत करण्याचे, व विकासाच्या नव्या वाटा त्यांच्यापुढे खुल्या करण्याचे संस्थेने निश्चित केले होते.

आपली संस्था त्यानंतरची ५ वर्षे या शाळेशी संपर्कात होती, अनेक उपक्रम तेथे एकत्रितपणे राबवीत होती. त्यानंतर दि. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी म.ए.सो.च्या काही पदाधिकाऱ्यांनी फिंतर या गावी भेट दिली. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे, संस्थेचे आजीव सदस्य श्री. विनय चाटी, ‘आयएमसीसी’मधील प्रा. रवींद्र वैद्य यांनी संस्थेच्या वतीने ‘बाल गोविंद माध्यमिक इंग्रजी विद्यालय, ददवाडा’ येथे संगणक कक्ष तयार करून दिला व या संगणक कक्षाला ‘आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संगणक कक्ष’ असे नाव देण्यात आले. या संगणक कक्षामुळे आता तेथील विद्यार्थी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण घेऊ शकत आहेत व कालसुसंगत असे तंत्रशिक्षण आत्मसात करत आहेत.

दि. १५ मे ते २५ मे २०१८ या कालावधीत संस्थेच्या विविध शाळांतील काही शिक्षक व संस्थेच्या व्यक्तिमत्त्व विकास केंद्राचे प्रशासकीय कर्मचारी अशा ७ जणींच्या गटाने फिंतर येथे ‘बाल गोविंद’ शाळेला भेट दिली. या भेटीत तेथील शिक्षकांना अद्ययावत अशा अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देणे, इंगजी भाषा चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांची दिशा देणे, तसेच व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य, निरनिराळे शैक्षणिक उपक्रम याबाबत मार्गदर्शन करणे अशी विविधांगी मदत संस्थेच्या प्रतिनिधींनी केली. यातील पुढच्या टप्प्यात, दि. १ जून ते ३० जून या कालावधीत ‘बाल गोविंद’ प्रशालेतून ७ विद्यार्थिनी, ३ शिक्षिका व १ शिक्षक पुण्यात आले होते. त्यापैकी ७ विद्यार्थिनी आपल्या संस्थेच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी आल्या होत्या. शाळेच्या नियमित उपक्रमांमध्ये सामाविष्ट असलेले रायफल शूटींग, धनुर्विद्या, रोप क्लाइम्बिंग अशा निरनिराळ्या साहसी क्रीडा प्रकारांचे त्यांनी प्रशिक्षण घेतले. तसेच पुण्यातील सरस्वती निवास येथे मएसो शिक्षण प्रबोधिनीत ३ शिक्षिकांना नवोदित अध्यापन पद्धती, संस्थेच्या शाळांमध्ये वापरात असलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक तंत्रपद्धती, प्रशासकीय कामकाज इत्यादी माहिती दिली गेली. त्याचबरोबर ‘बाल गोविंद’ शाळेतील एका शिक्षकाला त्यांच्या ईच्छेनुसार व्यक्तिमत्त्व विकास, समुपदेशन याबद्दलचे प्रशिक्षण देण्यात आले.

संस्थेच्या या पाठबळामुळे विपरित परिस्थितीतही शिक्षण क्षेत्रात झोकून देऊन काम करू पाहणाऱ्या फिंतरमधील सर्व मंडळींचा आत्मविश्वास वाढला असणार यात शंकाच नाही.