‘रंगवेध’ चित्रकला प्रदर्शनातून विस्तारते कल्पनांचे क्षितिज : डॉ. माधवी मेहेंदळे
“कला ही सर्वांना जोडते. मनातील भाव चित्रांच्या माध्यमातून प्रकट करता येतात, कल्पना स्वातंत्र्याला वाव मिळाल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ‘रंगवेध’सारख्या चित्रकला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे क्षितिज विस्तारत असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण देखील होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी रेखाटलेली सामाजिक संदेश देणारी, पर्यावरण विषयक मांडणी असणारी चित्रे देखील या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळत आहेत. ‘मएसो’च्या शाळांमध्ये असलेली ‘मएसो कलावर्धिनी आर्ट वॉल’ चित्रकलेविषयी मोलाचे योगदान देत आहे,” असे मत ज्येष्ठ नेत्र शल्यविशारद व चित्रकार डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’ तर्फे आयोजित तीन दिवसीय ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनाचे डॉ. मेहेंदळे यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६) करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते. संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. ‘मएसो कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या महामात्र सौ. चित्रा नगरकर, कमांडंट एव्हीएन विंग कमांडर म. यज्ञरामन, पर्यवेक्षक व प्रदर्शनाचे समन्वयक संदीप पवार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कासारआंबोली येथे म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांपैकी निवडक चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
समारंभाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला असते, एक शिल्प दडलेले असते. त्याला वाव देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून रंगवेध, स्वरवेध, तालवेध इ. उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. ‘रंगवेध’च्या भव्य कलादालनात सुमारे ३०० निवडक चित्रांचे प्रदर्शन साकारण्यात आले आहे.
सौ. आनंदी पाटील म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलांना चालना देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येकाने एक तरी कला जोपासली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ‘रंगवेध’ या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, ‘मएसो कलावर्धिनी’ चित्रकला विषयक नवनवीन कल्पना राबवून विद्यार्थ्याच्या चित्रांचे एक उच्च दर्जाचे कलादालन उभारते हीच एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण कल्पना आहे. आपण पुन्हा एकदा चित्र काढायला शिकत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
‘मएसो कलावर्धिनी’चे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन तर चित्रकला शिक्षिका सौ. यशोदिनी कुलकर्णी यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.
तीन दिवसांच्या या प्रदर्शनात सुलेखन, फेस पेंटिंग, शिल्पकला इत्यादी विषयावर विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. ‘रंगवेध’ दि. २९ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.




















महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. ही धक्कादायक घटना सर्वांनाच शोकमग्न करणारी आहे. अजित पवार हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो हायस्कूल, बारामती म्हणजेच सध्याची मएसो ग.भि. देशपांडे विद्यालय या शाळेचे माजी विद्यार्थी होते. १९६८ ते १९७४ या कालावधीत त्यांनी या शाळेत शिक्षण घेतले.






प्रमुख पाहुणे मा. श्री. विनोद सहाय आपल्या भाषणात म्हणाले की, एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश परकीय आक्रमणांमुळे काही शतके गुलामगिरीत होता. आता २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दीष्ट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसोमर ठेवले आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिकांची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे. १४० कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेला देश विकसित होणे याचाच अर्थ जगाचा विकास होणे आहे. ही केवळ देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी नाही. आपण प्रत्येकाने त्याचे नेतृत्व केले पाहिजे कारण सामान्य माणसांच्या प्रयत्नानेच देश मोठा होते. त्यासाठी जीवनात प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. राष्ट्र सर्वप्रथम, त्यानंतर संघटना आणि त्यानंतर व्यक्ती हा प्राधान्यक्रम निश्चित केला तर विकसित भारताचे ध्येय साध्य होईल.


एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ए. एन. एम. जी. एन. एम. आणि बी.एससी. (नर्सिंग) च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ सोमवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर व ज्येष्ठ उद्योगपती मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे होते.











