“धागा शौर्याचा, राखी अभिमानाची”

आज रात्री झी २४ तास वृत्तवाहिनीवर ८ वाजताचे बातमीपत्रामध्ये बघायला विसरू नका …

“धागा शौर्याचा, राखी अभिमानाची”

सैनिकांसाठी झी २४ तास या वृत्तवाहिनीने “धागा शौर्याचा, राखी अभिमानाची” हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सैनिकांना पत्र पाठवून त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेली आपुलकी, आदराची भावना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. म.ए.सो.बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेत आज (बुधवार, दि. २४ जुलै २०१९) या उपक्रमाचा शुभारंभ झाला. शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक लाखमोलाची संधी होती. ह्या उपक्रमाचा महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. उद्याच्या भारतासाठी आणि उज्ज्वल भविष्य असणाऱ्या या मुलांना समाजाभिमुख बनविण्यासाठी असे उपक्रम फारच उपयुक्त ठरत असतात.

“जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान
तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केव्हढीशी शान”

इंदिरा संतांच्या या ओळी सैनिकांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय समर्पक आहेत. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन असा दुग्धशर्करा योग जुळून आल्यामुळे यावर्षी स्वातंत्र्यदिनी सैनिकांना राखीसोबत कृतज्ञता पत्र पाठवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे, झी २४ तासचे मुख्य संपादक श्री.विजयजी कुवळेकर व संस्थेचे सचिव डॉ.भरत व्हनकटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड देण्यात आली आणि त्यांनी त्यावर सैनिकांना उत्स्फुर्तपणे पत्र लिहिले. जमा करण्यात आलेल्या या सर्व पत्रांची पेटी सैनिकांना देण्यासाठी सुपूर्द करण्यात आली.

अतिशय प्रेरणादायी वातावरणात आणि प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

आज रात्री झी २४ तास वृत्तवाहिनीवर ८ वाजताच्या बातमीपत्रामध्ये या कार्यक्रमाची सविस्तर बातमी दाखविण्यात येणार आहे.