विविध कलांच्या एकात्मिक शिक्षणाची गरज – कुलगुरू डॉ. करमळकर

पुणे, दि. ३ – “आपला देश विविधतेने नटलेला असून देशात अनेकविध कलाप्रकार अस्तित्वात आहेत. या सर्व कलांचे एकात्मिक शिक्षण देण्याची गरज असून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स त्यादृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडेल. संस्थेने लावलेल्या या रोपट्याचा भविष्यात निश्चितच वटवृक्ष होईल आणि देशाबरोबरच जगासाठी कार्य करणारे विद्यार्थी येथे घडतील,” असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि मएसो सिनिअर कॉलेज या दोन महाविद्यालयांचे उद्धाटन कुलगुरुंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोथरुडमधील मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरिअममध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. करमळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “पं. भीमसेन जोशी यांच्या प्रेरणेतून विद्यापीठात गुरुकुल पद्धतीने विविध कलांचे शिक्षण देणाऱ्या ललित कला केंद्राची सुरुवात झाली. आता गोव्याच्या धर्तीवर अनुभवजन्य शिक्षण देणारी कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची गरज असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी संधी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. नव्या शैक्षणिक धोरणात स्वैच्छिक शिक्षणाचा (Liberal Education) समावेश करण्यात येणार असून त्यात ललित कलांचा (Performing Arts) अंतर्भाव करण्यात आला आहे. पुणे शहर हे विद्येबरोबरच कलांचे माहेरघर असून कलांच्या शिक्षणासाठी पुण्यातल्या प्रतिभावंतांना सहभागी करून घेतले पाहिजे. कलेच्या शिक्षणामुळे चारित्र्यसंपन्न पिढी घडण्यास मदत होते आणि त्यांचा उपयोग देश संपन्न होण्यासाठी होतो. आता केवळ नोकरी देणारे शिक्षण न देता विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशाला कला, संस्कृती, योग, आयुर्वेद याची फार मोठी परंपरा आहे. या परंपरेचे केवळ गुणगान करत न बसता त्याचा एकत्रितपणे विचार करून जगभर त्याचे मार्केटिंग केले पाहिजे. रोजगार निर्मितीबरोबरच आनंददेखील मिळेल अशा दृष्टीने या सर्व विषयाकडे बघण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करत असतानाच नावीन्याचाही पुरस्कार केला पाहिजे. विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून भौतिक शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षण देण्याचीदेखील आवश्यकता आहे.”

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेल्या नव्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध कलांचे शिक्षण मिळेल आणि त्यांना नवी दिशा मिळेल. पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे, शहरात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटसारख्या संस्थांबरोबरच आय.सी.सी.आर. चे क्षेत्रीय कार्यालयदेखील आहे. अशा संस्थाबरोबर सहकार्य करण्याची शक्यता पडताळून बघितली पाहिजे. हवाई वाहतूक, पर्यटन अशा विषयांसाठी एम.बी.ए. चे अभ्यासक्रम चालविले पाहिजेत. शिक्षण व्यवस्थेत क्रेडिट सिस्टीम आणण्याचा विचार स्तुत्य आहे. आपल्याकडे आता प्रत्येक कामाकडे आदराने बघितले जाते, हा बदल खूप चांगला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला शाबासकी ही दिलीच पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी केले तर संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

डॉ. मानसी भाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाची सुरवात अबोली थत्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नृत्याद्वारे केलेल्या गणेश वंदनेने झाली. सुखदा दीक्षित यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.