अक्षय धनगर ‘नंदू मराठे श्री २०१९’ चा मानकरी

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय धनगर हा ‘नंदू मराठे श्री २०१९’ पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या आंतरमहाविद्यालयीन ‘कै. नंदू मराठे शरीरसौष्ठव स्पर्धे’त त्याने हे यश मिळविले आहे. महाविद्यालयाच्या सभागृहात आज (शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०१९) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात पुणे शहर आणि जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांमधील ४२ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे रिजनचे महाव्यवस्थापक सुधीर कुलकर्णी यांच्या हस्ते अक्षय धनगर याला पारितोषिक प्रदान करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रमधील व्यवस्थापक संगीता देसाई यांच्या हस्ते अन्य पुरस्कारप्राप्त स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रा. ए.टी. साठे, प्रा. पी.बी. कामठे, डॉ. अरुण दातार, प्रा. शैलेश आपटे, उल्हास त्रिमल, जयप्रकाश भट, भगवान परदेशी, डॉ. आशा बेंगळे, प्रा. उमेश बिबवे, विशाल भोसले, रोहित इंगवले उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बुचडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे स्पर्धेच्या आयोजन समितीचे सदस्य प्रा. पी.बी. कामठे, सुधीर भोसले व सुनिता चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.