नूतनीकृत गुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृहाचे डॉ. राहुल कराड यांच्या हस्ते उद्घाटन

म.ए.सो. मुलांचे विद्यालय (पूर्वीची पेरुगेट भावे स्कूल) या शाळेतील नूतनीकरण केलेल्या गुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृहाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी आणि ‘एमआयटी’चे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्यकारी अध्यक्ष मा. डॉ. राहुल कराड यांच्या हस्ते बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. राहुल कराड यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून सभागृहात व्यासपीठ रचना, आधुनिक ध्वनियंत्रणा, दृकश्राव्य तसेच वातानुकुलन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
या प्रसंगी मएसो च्या नियामक मंडळाचे सदस्य व शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. आर. एस. चिटणीस, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, शाळेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, म.ए.सो. मुलांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले, “देशात मोठ्या संख्येने आज शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असल्यातरी शिक्षणाच्या क्षेत्रात पुण्याचे स्थान अबाधित आहे. पुण्याचा शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक पाया भक्कम आहे. पुण्यातील शिक्षण संस्था वैशिष्ट्यपूर्ण आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी बलस्थाने आहेत. त्यामुळे पुण्यातील शिक्षण संस्थांनी सहयोगात्मक स्पर्धा केली पाहिजे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक विषयांची जाण निर्माण होईल आणि त्यांची सृजनशीलता, रचनात्मक मानसिकता जोपासता येईल.”
मा. श्री. बाबासाहेब शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी सुरु केलेली आणि १६५ वर्षांनी देखील अखंडपणे कार्यरत असलेली एकमेव शिक्षण संस्था आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या रेट्यात संस्थेने मराठी माध्यमाच्या शाळा टिकवून ठेवल्या आहेत. त्यामुळेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुलांना देखील शिक्षण मिळत आहे. या विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. संस्थेचे शिक्षक आणि माजी विद्यार्थी हाच संस्थेचा आधार आहे. माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. राहुल कराड यांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळेच शाळेतील सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम झाले आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शिक्षण संस्थांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचा विचार डॉ. कराड यांनी मांडला आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यासंदर्भात निश्चितच एम.आय.टी. शी सहकार्य करेल.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. दिलीप शेठ यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, संस्थेने कृतज्ञता निधीसाठी केलेल्या आवाहनाला संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामाध्यमातून गेल्या तीन-चार वर्षात सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उभा राहिला. माजी विद्यार्थी आपल्या शाळेसाठी काय करू शकतो? हे प्रत्यक्ष अनुभवाला आले आहे. याशिवाय विविध बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या आणि भर देखील घातली आहे. शाळेच्या इमारतीची डागडुजी व रंगकाम, प्रयोगशाळा अद्ययावत करणे, स्वच्छतागृहातील सुधारणा, मैदानावर आधुनिक प्रकाशयोजना अशी विविध कामे माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झाली आहेत. त्याचबरोबर माजी शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन मिळते आहे. विशेष म्हणजे प्रदीर्घ काळानंतर शाळेचा इ. १० वी च्या परीक्षेचा १००% निकाल लागला आहे. कौशल्यांचे बदलते स्वरुप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. म.ए.सो. मुलांचे विद्यालय ही संस्थेची फ्लॅगशीप शाखा आहे. नजिकच्या भविष्यात शाळा चांगल्या स्वरुपात सर्वांसमोर येईल. शाळेतील शिक्षकवर्ग त्यासाठी प्रयत्नशील आहे.
संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर या प्रसंगी उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. वसावे यांनी आभार प्रदर्शन केले.



















प्रमुख पाहुणे मा. श्री. विनोद सहाय आपल्या भाषणात म्हणाले की, एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश परकीय आक्रमणांमुळे काही शतके गुलामगिरीत होता. आता २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दीष्ट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसोमर ठेवले आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिकांची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे. १४० कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेला देश विकसित होणे याचाच अर्थ जगाचा विकास होणे आहे. ही केवळ देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी नाही. आपण प्रत्येकाने त्याचे नेतृत्व केले पाहिजे कारण सामान्य माणसांच्या प्रयत्नानेच देश मोठा होते. त्यासाठी जीवनात प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. राष्ट्र सर्वप्रथम, त्यानंतर संघटना आणि त्यानंतर व्यक्ती हा प्राधान्यक्रम निश्चित केला तर विकसित भारताचे ध्येय साध्य होईल.
एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ए. एन. एम. जी. एन. एम. आणि बी.एससी. (नर्सिंग) च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ सोमवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर व ज्येष्ठ उद्योगपती मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे होते.











महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्याचे क्रीडा राज्यमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांचा काल (गुरुवार, दि. २९ मे २०२५) सत्कार करण्यात आला. संस्थेचे सहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सचिन आंबर्डेकर यांनी मंत्रीमहोदयांना संस्थेचे बोधचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.





जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय लष्कर, असीम फाऊंडेशन आणि महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चिनार युवा केंद्रात चालवण्यात येणारा पहिला ‘फॅशन डिझाइनिंग स्कील कोर्स’ पूर्ण केलेल्या ४० विद्यार्थिनी आणि महिला प्रशिक्षणार्थींना मंगळवार, दि. ८ एप्रिल २०२५ रोजी प्रमाणपत्र देण्यात आली. वर्षभरात दोन वेळा हा कोर्स आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, ‘मएसो’च्या नियामक मंडळ सदस्य आणि मएसो आयएमसीसीच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. सौ. मानसी भाटे आणि मएसो रेणुका स्वरूप करियर कोर्सेच्या समन्वयक सौ. सारिका वाघ यांच्या हस्ते ही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या वेळी चिनार युवा केंद्राचे मार्गदर्शक मेजर अंकित शर्मा आणि असीम फाऊंडेशनच्या विश्वस्त निरूता किल्लेदार हे देखील उपस्थित होते.






कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे १९५६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असलेले मेजर अरुण फाटक (निवृत्त) उपस्थित होते. शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे, उपमुख्याध्यापक श्री. चंदू गवळे, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये, आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक या वेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी ध्वजाला सलामी देऊन ध्वजप्रतिज्ञा घेतली. प्रमुख पाहुण्यांसह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) पथकांचे निरीक्षण केले. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले गेले. शासनाच्या सूचनेनुसार ‘तंबाखूमुक्त भारत अभियान’अंतर्गत तंबाखूमुक्तीसाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. प्रशालेतील एन.सी.सी.च्या विविध वार्षिक उपक्रमांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना फिरते चषक देऊन मेजर अरुण फाटक (निवृत्त) यांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, एरोबिक्स, पिरॅमिडस, देशभक्तीपर गीतावरील नृत्य, सायलेंट ड्रिल, घोष प्रात्यक्षिक, मल्लखांब प्रात्यक्षिक, लेझीम अशी विविध प्रात्यक्षिके सादर केली.
विभाग तसेच एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाखांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव आणि शाला समितीचे महामात्र सुधीर भोसले होते. म. ए. सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत, म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे, एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर आणि पालक संघाच्या उपाध्यक्षा सोनाली क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. म. ए. सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी घोष, सामूहिक कवायत, गट्टू मल्लखांब, देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य, मल्लखांब अशी विविध गुणवत्ता पूर्ण प्रात्यक्षिके सादर केली. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेले मल्लखांबावरील मानवी मनोरे हे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे सर्वोच्च आकर्षण ठरले.
प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनात म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची माजी विद्यार्थिनी आणि भारतीय वायूदलातील अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख या सुपरन्युमेररी ऑफिसर (Supernumerary officer) म्हणून फ्लाईट लेफ्टनंट नेपो मोईरांगथेम व फ्लाईंग ऑफिसर अभिनव घोष यांच्यासह सहभागी झाल्या होत्या. भारतीय वायूदलातील १४४ अधिकाऱ्यांच्या या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉडर्न लीडर महेंद्र सिंह यांनी केले.
या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात झालेल्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख यांच्या निवडीने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. केवळ मुलींसाठी स्वतंत्र सैनिकी शाळा सुरू करण्याचा संस्थेचा उद्देश सार्थ होत असल्याचे शाळेच्याच माजी विद्यार्थिनींच्या कर्तृत्वातून दिसून येत आहे.
“अन्न, वस्त्र व निवारा याप्रमाणे माणसांच्या जीवनात कलेचे स्थान देखील महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार लपलेला असतो, कला आत्मसात करण्यासाठी एकाग्रता महत्वाची असते, सातत्याने प्रयत्न केले तर कला साधता येते. त्यामुळे शालेय वयातच कलेचे संस्कार होणे गरजेचे असते. कलेचा संस्कार झालेला माणूस एक चांगला नागरिक होते, त्यातूनच सभ्य समाज निर्माण होतो. म्हणूनच, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांवर म.ए.सो. कलावर्धिनीच्या माध्यमातून होत असलेला कलेचा संस्कार महत्वाचा आहे,” अशा शद्बात ख्यातनाम शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आज (बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०२४) कलेचे महत्व अधोरेखित केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ या शाळेत म.ए.सो. कलावर्धिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिल्पकार कांबळे बोलत होते. त्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ येथे दि. २७,२८ व २९ नोव्हेंबर २०२४ असे तीन दिवस ‘रंगवेध’ हे चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’च्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमधील इ. १ ली ते इ. १२ वी तील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी चित्रे पाठवली होती. त्यातील निवडक ३५० चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ही माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष व एम.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि ‘म.ए.सो. कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी आज (सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४) पत्रकारांशी संवाद साधताना दिली दिली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी, ‘रंगवेध’ प्रदर्शनाचे समन्वयक अनिल म्हस्के, कलाशिक्षक गोपाळ खंडाळे, पर्यवेक्षिका सौ. सुजाता टेकाडे उपस्थित होते.
“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने २०२३ सालापर्यंत क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे ध्येय निश्चित केले होते, आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये या संकल्पाचा उल्लेखदेखील करण्यात आला होते. मात्र, संस्था २०२४ मध्येच क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास सिद्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेने आता अधिक मोठे ध्येय बाळगले पाहिजे,” अशी अपेक्षा संस्थेचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज (मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर २०२४) व्यक्त केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६४ व्या वर्धापनदिनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे संस्थेच्या कार्याची दिशा स्पष्ट करताना म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थापकांनी संस्थेची स्थापना केली, तो वारसा आपण पुढे नेत आहोत ही आनंद आणि अभिमानाची बाब आहे. १६४ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने नेहमीच कालानुरूप बदल केले आहेत. संस्थेच्या नवीन नियामक मंडळाने वर्षाच्या सुरवातीलाच एक चिंतन बैठक घेऊन त्यामध्ये काही संकल्प केले, ते पूर्ण करण्यासाठी निश्चित योजना, उपक्रम आखण्यात आली आणि त्यादृष्टीने आज आपण समाधानकारक प्रगती केली आहे. आगामी वर्षात आपल्या संस्थेचे लॉ कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल. संस्थेने क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. समाजातील सर्व घटकांना आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देताना निधीची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यादृष्टीने प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी कृतज्ञता निधी संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या संस्थेचे कार्य आता जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील सुरू झाले आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार करत असताना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामामुळे समाधान देखील मिळते. समाजावर शिक्षणाचा परिणाम झाली की समाजाचा शिक्षणावर परिणाम झाला याचे भान बाळगले पाहिजे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी अधिक कृतिशील होण्याची गरज आहे. देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्ये देखील सांगितली आहेत. सभ्य आणि सुसंस्कृत विद्यार्थी म्हणजेच पर्यायाने समाज घडविण्यासाठी आपण प्रत्येकाने नागरी शिष्टाचार, पर्यावरणाचे संरक्षण, कुटुंबाचे प्रबोधन, कोणाच्या मनात न्यूनगंड, वेगळेपणाची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आणि समाजातील सर्वांना सामावून घेणे ही पंचसूत्री व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. संस्थेच्या विविध शाखांमधून शिकणाऱ्या चाळीस हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत आपण पोहोचविले पाहिजेत.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि मएसो सिनिअर कॉलेज यांच्या वतीने गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यातील संगम पुलाजवळील गुन्हे अन्वेषण विभागाच्या आवारात असलेल्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे मा. सदस्य श्री. विजय भालेराव, श्री. अजय पुरोहित, मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.