‘प्रस्थापित क्षेत्रांपेक्षा वेगळ्या क्षेत्राचा विचार करा’

पुणे, दि. १९ – “आजच्या विद्यार्थ्यांसमोर निश्चित ध्येय आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला बरेच काही नवीन घडते आहे. आता चाकोरीबद्ध विचार करण्याचे दिवस संपले आहेत, त्यामुळे जीवनात प्रस्थापित क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्राचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी नवीन क्षेत्र विकसित करण्याचादेखील विचार केला पाहिजे, आपल्या क्षमता आजमावून बघितल्या पाहिजेत. आपल्याला मनापासून जे आवडते तेच करा, ते करत असताना कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडू नका,” असा सल्ला कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे क्षेत्रिय आयुक्त अतुल कोतकर यांनी आज विद्यार्थ्यांना दिला.

मार्च २०१९ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्चमाध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. इ. १० वी, इ. १२ वी आणि ज्ञानवर्धिनी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या ‘मएसो’च्या ४० विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा समारंभ पार पडला.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे सदस्य ॲड. धनंजय खुर्जेकर, संस्थेचे साहाय्यक सचिव सुधीर गाडे, सचिव डॉ. भरत व्हनकटे व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे तसेच आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर या समारंभाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजीव सहस्रबुद्धे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी काय शिकायचे आहे हे ठरवत असताना जीवनाचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात आपल्या पालकांप्रमाणेच, शाळेचे आणि संस्थेचे नाव मोठे करावे अशी संस्थेची अपेक्षा असते, शिक्षक व प्राध्यापक त्यादृष्टीने कष्ट घेत असतात आणि संस्था आवश्यक असलेल्या विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत असते. संस्थेच्या उज्ज्वल कार्याचा परिचय सर्वांना व्हावा हादेखील हेतू गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभामागे असतो.

डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने पायल संतोष पिसे, साक्षी संभाजी जाधव, अरबाज रियाज शेख, वैष्णवी गिरीश जोशी, जान्हवी शिरीष पानसे या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “स्वतःचे वेगळेपण सिद्ध करता येईल असा मार्ग विद्यार्थ्यांनी निवडला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय स्पष्ट आहे, त्यामुळे ते स्वप्न राहणार नाही यासाठी सर्वजण नक्कीच प्रयत्न करतील यात शंका नाही. जीवनात गुरुंचे महत्व खूप आहे कारण त्यांच्याकडून कायमच प्रेरणा आणि आशीर्वाद मिळतात. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा कारण त्यात काम केले तर प्रगतीच होते. आपल्या शारिरीक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या. स्वतःची प्रतिमा निर्माण करा आणि आपले पालक, शाळा, संस्था यांचे नाव मोठे करा, त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा! ”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीलिमा व्यवहारे यांनी तर आभार प्रदर्शन सुधीर गाडे यांनी केले.