“व्यंगचित्रामध्ये कमीतकमी रेषांचा वापर करून विविध भावभावना व्यक्त करता येतात, निरिक्षणातून व्यंगचित्रातील विविध व्यक्तिमत्व साकारता येतात. त्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनातील चित्रे बघत असताना लहान वयातील विद्यार्थ्यांची एकाग्रता लक्षात येत होती, आपल्या आवडत्या विषयात एकाग्रता साधणे सहज होते, म्हणूनच आपली आवड कोणती याचा शोध घेत राहिले पाहिजे आणि त्याची प्रेरणा या चित्रकला प्रदर्शनातून मिळत आहे. प्रत्येक व्यक्तीची सौंदर्यदृष्टी विकसित होत जाईल तसे आपला देशातील वातावरण सुधारत जाईल, त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची कलेची आवड जोपासावी,” अशा शद्बात ख्यातनाम व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी जीवनातील कलेचे महत्व अधोरेखित केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘म.ए.सो. कलावर्धिनी’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शन आणि स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या प्रसंगी म.ए.सो. कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, म.ए.सो. कलावर्धिनीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या महामात्र सौ. प्रणिता जोगळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल मिरासदार आणि अजय पुरोहित या वेळी आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी आपले विचार मांडताना प्रदीप नाईक म्हणाले की, चित्रांमधून विद्यार्थ्यांचे विचार व्यक्त होतात, विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून सामाजिक समस्यांबद्दल संदेश दिला आहे. त्यामुळे प्रदर्शनातील चित्रे बघून देशाच्या भावी पिढीबद्दल आशा वाढीला लागली आहे. संस्थेच्या विविध शाखांमध्ये उत्तम चित्रकार आहेत हे दिसून आले आहे. चित्रकलेने मानवी जीवन व्यापले आहे. खाद्यपदार्थ तयार करणे, कपडे शिवणे, घराचे बांधकाम अशा सर्वच बाबतीत चित्रकला अनुभवायला मिळते. प्रमाणबद्धता, लयबद्धता, रंग हेच तर मानवी जीवन आहे. विद्यार्थ्यांनी चित्रकलेची साधना वाढवून जीवनात आनंद मिळवावा आणि एक चांगला माणूस म्हणून स्वतःला घडवावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, कलेची मांडणी करणे हा एक संस्कार आहे. प्रदर्शनातील चित्रांमधून म.ए.सो. चा संस्कार दिसून येत आहे, एकाही विद्यार्थ्याचे चित्र विचित्र नाही. मात्र, चित्रांच्या विषयामध्ये विविधता आहे. त्यातून शाळेतील कलाशिक्षकांची प्रेरणा आणि त्यांनी घेतलेले परिश्रम दिसून येत आहे. कला ही बहुआयामी असते, प्रत्येक चित्र हे प्रेरणादायी असते, ती प्रेरणा या प्रदर्शनामुळे जनमानसात पोहोचेल.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. इ. १ ली ते ४ थी च्या गटात म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली या शाळेतील इ. ३ री मधील विद्यार्थिनी माही आबासाहेब लवटे हिने काढलेल्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला. इ. ५ वी ते ७ वी गटात म. ए. सो. इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ या शाळेतील इ. ७ वी तील विद्यार्थिनी आर्या अमोल नवले हिने तर इ. ८ वी ते १० वी च्या गटात म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेतील इ. ९ वी तील विद्यार्थी श्रवण मोहन अकार्शे याने प्रथम क्रमांक मिळविला. इ. ११ वी ते १२ वी या गटात म.ए.सो. आबासाहेब गरवारे ज्युनिअर कॉलेजमधील इ. ११ वी चा विद्यार्थी अभिनव संभाजी लांडे याच्या चित्राल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या चित्रांचे परीक्षण विश्वास निकम आणि संदेश पवार या कला शिक्षकांनी केले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. स्वाती जोशी यांनी तर सूत्रसंचालन कलाशिक्षक गोपाळ खंडाळे यांनी केले.

या प्रदर्शनात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील शाळांमधील इ. १ ते १२ तील विद्यार्थ्यांनी चितारलेली निवडक तीनशे चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुक्त चित्र, निसर्ग चित्र, मधुबनी, गोंद, राजपूत अशा विविध शैलीतील चित्रांचा समावेश आहे.

शिरवळ ग्रामस्थ, पालक व कला रसिकांसाठी हे प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

 

“अन्न, वस्त्र व निवारा याप्रमाणे माणसांच्या जीवनात कलेचे स्थान देखील महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार लपलेला असतो, कला आत्मसात करण्यासाठी एकाग्रता महत्वाची असते, सातत्याने प्रयत्न केले तर कला साधता येते. त्यामुळे शालेय वयातच कलेचे संस्कार होणे गरजेचे असते. कलेचा संस्कार झालेला माणूस एक चांगला नागरिक होते, त्यातूनच सभ्य समाज निर्माण होतो. म्हणूनच, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांवर म.ए.सो. कलावर्धिनीच्या माध्यमातून होत असलेला कलेचा संस्कार महत्वाचा आहे,” अशा शद्बात ख्यातनाम शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आज (बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०२४) कलेचे महत्व अधोरेखित केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ या शाळेत म.ए.सो. कलावर्धिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिल्पकार कांबळे बोलत होते. त्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, म.ए.सो. कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, शाळेच्या महामात्र सौ. प्रणिता जोगळेकर, म.ए.सो. कलावर्धिनीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव सुधीर भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रदर्शनात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील शाळांमधील इ. १ ते १२ तील विद्यार्थ्यांनी चितारलेली निवडक तीनशे चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मधुबनी, गोंद, राजपूत अशा विविध शैलीतील चित्रांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कला शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने मात्र यापूर्वीच कलाशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. शाळांमध्ये कलाशिक्षक नसले तरी कलेचा संस्कार व्हावा, विद्यार्थ्यांना कला आत्मसात व्हावी यासाठी म.ए.सो. कलावर्धिनीच्या माध्यमातून गायन, वादन, नृत्य अशा विविध कलाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी संस्थेच्या प्रत्येक शाळेमध्ये एक आर्टवॉल उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रंगवेध’ या चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाप्रमाणेच ‘स्वरवेध’ आणि ‘तालवेध’ या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यामाध्यमातून केवळ शिक्षकच नाहीत तर शाळेच्या परिसरातील कलाकार देखील शाळेशी जोडले जातात. ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असून यापूर्वी पुणे, बारामती व पनवेल येथील शाळांमध्ये ते आयोजित करण्यात आले होते. शिरवळमध्ये आयोजित करण्यात आलेले ग्रामीण भागातील हे पहिलेच प्रदर्शन आहे.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रणिता जोगळेकर यांनी तर पार्थ रावळ यांनी सूत्रसंचालन केले.

हे प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शिरवळ ग्रामस्थ, पालक व कला रसिकांसाठी खुले राहणार आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ येथे दि. २७,२८ व २९ नोव्हेंबर २०२४ असे तीन दिवस ‘रंगवेध’ हे चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’च्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमधील इ. १ ली ते इ. १२ वी तील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी चित्रे पाठवली होती. त्यातील निवडक ३५० चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ही माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष व एम.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि ‘म.ए.सो. कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी आज (सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४) पत्रकारांशी संवाद साधताना दिली दिली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी, ‘रंगवेध’ प्रदर्शनाचे समन्वयक अनिल म्हस्के, कलाशिक्षक गोपाळ खंडाळे, पर्यवेक्षिका सौ. सुजाता टेकाडे उपस्थित होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द शिल्पकार श्री. प्रमोद जी कांबळे यांच्या हस्ते बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ . ३० वाजता होणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता होणार आहे. प्रसिध्द व्यंगचित्रकार श्री. चारुहास पंडित या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री.  प्रदीप नाईक या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तसेच म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री.  बाबासाहेब शिंदे यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती राहणार आहे.

हे चित्रकला प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शिरवळ ग्रामस्थ, पालक आणि कला रसिकांसाठी खुले असेल. शिरवळ आणि परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत हे प्रदर्शन बघता येणार आहे.

या दोन दिवसात सुंदर हस्ताक्षर, अक्षर लेखन, टाकावूतून टिकाऊ, कागदकाम, स्थिर चित्र, स्मरण चित्र अशा विविध विषयांवरील प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. मएसोच्या शाळांमधील कलाशिक्षक उमेश पवार, राजगौरी जगताप, माधुरी जगताप, नयना दिनकर हे विद्यार्थ्यांना या कला प्रकारातील विविध कौशल्ये उलगडून दाखवणार आहेत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ कार्यरत आहे. मनातील कल्पनांना मूर्तरूप देण्याचे प्रभावी साधन म्हणजे चित्रकला! म्हणूनच ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ तर्फे दरवर्षी ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांना व्यासपीठ मिळवून देण्यात येते. या पूर्वी पुणे, बारामती, पनवेल येथे संस्थेच्या शाळांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ च्या माध्यमातून ‘रंगवेध’ प्रमाणेच दरवर्षी गायनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वरवेध’ आणि विविध स्वरुपाच्या वाद्यवादनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘तालवेध’ या स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने २०२३ सालापर्यंत क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे ध्येय निश्चित केले होते, आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये या संकल्पाचा उल्लेखदेखील करण्यात आला होते. मात्र, संस्था २०२४ मध्येच क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास सिद्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेने आता अधिक मोठे ध्येय बाळगले पाहिजे,” अशी अपेक्षा संस्थेचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज (मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर २०२४) व्यक्त केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६४ व्या वर्धापनदिनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, संस्थेचे माजी सचिव श्री. आर. व्ही. कुलकर्णी, संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) पुढे म्हणाले की, कार्याच्या विस्तारासाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांशी करार करणे, संस्थेच्या सर्व महाविद्यालयांनी ‘नॅक सर्टिफिकेशन’ मिळवणे, शाखांच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करणे, कौशल्य आणि नवसर्जनाला प्रोत्साहन देणे या दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपल्या १६४ वर्षांच्या वाटचालीत शिक्षण आणि संस्कार यांच्या माध्यमातून सक्षम पिढ्या घडविल्या आहेत. सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे संस्थेच्या कार्याची दिशा स्पष्ट करताना म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थापकांनी संस्थेची स्थापना केली, तो वारसा आपण पुढे नेत आहोत ही आनंद आणि अभिमानाची बाब आहे. १६४ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने नेहमीच कालानुरूप बदल केले आहेत. संस्थेच्या नवीन नियामक मंडळाने वर्षाच्या सुरवातीलाच एक चिंतन बैठक घेऊन त्यामध्ये काही संकल्प केले, ते पूर्ण करण्यासाठी निश्चित योजना, उपक्रम आखण्यात आली आणि त्यादृष्टीने आज आपण समाधानकारक प्रगती केली आहे. आगामी वर्षात आपल्या संस्थेचे लॉ कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल. संस्थेने क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. समाजातील सर्व घटकांना आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देताना निधीची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यादृष्टीने प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी कृतज्ञता निधी संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या संस्थेचे कार्य आता जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील सुरू झाले आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार करत असताना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामामुळे समाधान देखील मिळते. समाजावर शिक्षणाचा परिणाम झाली की समाजाचा शिक्षणावर परिणाम झाला याचे भान बाळगले पाहिजे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी अधिक कृतिशील होण्याची गरज आहे. देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्ये देखील सांगितली आहेत. सभ्य आणि सुसंस्कृत विद्यार्थी म्हणजेच पर्यायाने समाज घडविण्यासाठी आपण प्रत्येकाने नागरी शिष्टाचार, पर्यावरणाचे संरक्षण, कुटुंबाचे प्रबोधन, कोणाच्या मनात न्यूनगंड, वेगळेपणाची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आणि समाजातील सर्वांना सामावून घेणे ही पंचसूत्री व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. संस्थेच्या विविध शाखांमधून शिकणाऱ्या चाळीस हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत आपण पोहोचविले पाहिजेत.
संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संस्थेचा १६४ वा वर्धापनदिन साजरा करताना आनंद वाटतो आहे. संस्थेचे वय वाढणे म्हणजे अनुभवाचे संचित जमा होणे. संस्थेच्या कार्याचा विस्तार होत असताना सकस, बुद्धिमान नेतृत्व निर्माण होणे आवश्यक असते, त्याकडे लक्ष द्यावे लागेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत असली तरी आपल्या समाजाची स्थिती ठीक नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मानवी मनाचे परिवर्तन आवश्यक आहे, त्यासाठी अध्यात्म आणि संतांची शिकवण आपल्याला सहाय्यभूत ठरते. सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आपण याचा विचार केला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले यांनी केले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि मएसो सिनिअर कॉलेज यांच्या वतीने गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यातील संगम पुलाजवळील गुन्हे अन्वेषण विभागाच्या आवारात असलेल्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.
इ. स. १८७९ मध्ये अटक झाल्यानंतर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यात संगम पुलाजवळील जिल्हा न्यायालयात (सध्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रांगणात) राजद्रोहाचा खटला चालू असताना न्यायालयीन कोठडीत (सध्याचे रेकॉर्ड रूम) ठेवण्यात आले व त्यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगण्यास एडन येथील कारागृहात पाठवण्यात आले. १७ फेब्रुवारी १८८३ मध्ये अमानुष छळामुळे एडनच्या तुरुंगात त्यांना स्वर्गवास प्राप्त झाला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक असलेले आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी इ. स. १८७४ मध्ये पूना नेटीव इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. त्यांनी पुढे संस्थेची जबाबदारी श्री. वामन प्रभाकर भावे व श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्याकडे सोपवून, देशसेवेसाठी स्वतःला समर्पित केले.
स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा त्याग व अपूर्व योगदानाच्या स्मरणार्थ, त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याची संकल्पना मएसो च्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील यांनी मांडली होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख श्री. अविनाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मएसो सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी स्मारकाची स्वच्छता करून ते फुलांनी सजावले होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे मा. सदस्य श्री. विजय भालेराव, श्री. अजय पुरोहित, मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
या प्रसंगी फडके स्नेहवर्धिनी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. दिगंबर गोपाळ फडके व श्री. दत्तात्रय वामन फडके, तसेच कार्यकारिणी सदस्य श्री. चंद्रकांत दत्तात्रय फडके, श्री. चंद्रकांत प्रभाकर फडके, सौ. सुलभा लिमये-फडके व श्री. लिमये आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. तुषार दोषी (भा. प्र. से.), पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे, व सौ. दीपाली आढाव, पोलीस निरीक्षक, तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ. या वेळी छायाचित्रात (डावीकडून) श्री. बाबासाहेब शिंदे, श्री. सुधीर भोसले, श्री. विजय भालेराव, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्रीमती मंजुषा दुर्वे, श्रीमती सायली देशमुख व श्री. अजय पुरोहित

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वाढीव मजल्याचे बांधकाम आणि पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज (रविवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४) करण्यात आले. या प्रसंगी खा. मोहोळ यांनी मूल्य आणि संस्कार यांची जपणूक करणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था अधिक सक्षम आणि विकसित होण्याची आवश्यकता बोलून दाखविली. तर, राजकीय प्रभाव आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री खा. मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला आगामी पाच वर्षात मोठ्याप्रमाणावर सहकार्य करतील अशी अपेक्षा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागांच्या मुख्याध्यापिका श्रीमती आदिती कुलकर्णी, श्रीमती मंजुषा दुर्वे व श्रीमती सायली देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ. या वेळी छायाचित्रात (डावीकडून) श्री. विजय भालेराव, श्री. बाबासाहेब शिंदे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्री. प्रदीपजी नाईक, डॉ. अतुल कुलकर्णी. मागील बाजूस (डावीकडून) श्रीमती मंजुषा दुर्वे, श्रीमती आदिती कुलकर्णी, श्रीमती सायली देशमुख

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री खा. मोहोळ म्हणाले की, “देशभरात पुणे शहराचे महत्व आहे. महाराष्ट्राची  सांस्कृतिक राजधानी, आयटी हब, राहण्यासाठी सर्वोत्तम शहर अशा विविध कारणांमुळे पुण्याची वेगळी ओळख आहे. त्याचबरोबर शिक्षणाचे माहेरघर असल्याने देश -विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. शिक्षण क्षेत्रामध्ये पुणे शहराला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा मोलाचा वाटा आहे. अशा या संस्थेच्या भावे स्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. १६३ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने ज्ञानदानाची अविरत परंपरा कायम ठेवली आहे. सातत्याने होणाऱ्या बदलांना प्रतिसाद देत संस्था नवीन गोष्टींचा स्वीकार करत आली आहे. अशा संस्थेशी आपण जोडले गेलेलो आहोत याचा आनंद, अभिमान वाटतो. गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या वाटचालींलदर्भात सातत्याने माहिती मिळत राहिली आहे. संस्थेच्या वाढीसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी निश्चित कृती आराखडा तयार करावा लागेल. शिक्षण क्षेत्रात मूल्य आणि संस्कार यांची जपणूक करणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था अधिक सक्षम आणि विकसित झाली पाहिजे, या संस्थेचा एक घटक म्हणून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य मी करीन.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “ मयूर कॉलनीतील मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे आवार हे आदर्श कॅम्पस आहे. संस्थेच्या प्रस्तावित इंजिनिअरिंग कॉलेजच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार असून संस्थेला लॉ कॉलेजसाठीची मान्यता मिळाली आहे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर ही ओळख निर्माण करून देण्यात संस्था अग्रस्थानी राहिली आहे. परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या पाठबळावर चालवली जाणारी संस्था आहे. त्यामुळे संस्थेच्या काही मर्यादा आहेत. सध्याच्या काळात व्यापारी दृष्टीकोनातून चालवल्या जाणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध असतो आणि त्यांची कॅम्पस प्रचंड मोठ्या आकाराची असतात. ‘मएसो’ सारख्या संस्था या बाबतीत मागे पडतात. केंद्रीय मंत्री खा. मुरलीधर मोहोळ यांनी आपला राजकीय प्रभाव आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला आगामी पाच वर्षात मोठ्याप्रमाणावर सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यातूनच भविष्यातील पन्नास वर्षे संस्था सक्षमपणे काम करू शकेल.”

शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव यांनी आपल्या भाषणात शाळेच्या कार्याची माहिती दिली. शाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून मूल्यवर्धन, उपक्रमावर आधारित शिक्षण यामाध्यमातून देशाचा सक्षम नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “संस्थेने आपल्या विस्ताराबरोबरच शिक्षण आणि संस्कार यावर कायमच भर दिला आहे. संस्थेच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटी करण्याचा उल्लेख आहे. त्यानुसार आपण आता क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या उंबरठ्यावर उभे आहोत.”

 

 

 

 

 

गरवारे कॉलेजमधील संगणक प्रयोगशाळेचे मा. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

खासदार निधीतून उभारणी

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) मधील संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. ५ ऑक्टोबर २०२४) करण्यात आले. मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. मा. श्री. जावडेकर यांनी या वेळी शिक्षणातील नवीन संधी, नवीन तंत्रज्ञान, वर्तमानकाळातील घडामोडी या विषयी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.

याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, महाविद्यालयाच्या विकास समितीचे मा. अध्यक्ष सीए राहुल मिरासदार, प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, संस्थेच्या निमायक मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, महाविद्यालयातील प्राध्यापक आदी  मान्यवर उपस्थित होते. मा. श्री. जावडेकर यांचे महाविद्यालयातील १९७१ च्या बॅचचे सहाध्यायी या वेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

या वेळी बोलताना मा. श्री. जावडेकर म्हणाले, “नाविन्याला, संशोधनाला प्रोत्साहन देणारे शिक्षण आणि अभ्यासविषयांच्या निवडीतील लवचिकता ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आवडीच्या विषयांचे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, यासंबंधात होत असलेल्या नकारात्मक चर्चेत अर्थ नाही. भारतात संगणक आले तेव्हा बहुतेकांनी त्याला विरोध केला. पण आज आपण त्या क्षेत्रात खूप प्रगती केली असून मोबाईल फोनचे उत्पादन करणारा भारत हा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांच्या किंमतीपेक्षा तंत्रज्ञानातील संशोधनाचे मूल्य अधिक असते. महाविद्यालयीन शिक्षणात आपल्या आवडीचे विषय निवडण्याची परवानगी आता विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे एकाच वेळी दोन अभ्यासशाखांची पदवी मिळवणे शक्य झाले आहे. ‘स्वयं’च्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत. काही कारणाने शिक्षणात खंड पडला तरी दोन वर्षांच्या आत शिक्षण पुन्हा सुरू करता येते. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि झोकून देऊन मनासारखे शिक्षण घ्यावे.”

महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ‘बस नं. १५३२’ या पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकेतील विद्यार्थी कलाकार आणि पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘मिस पुणे’ किताब मिळालेली विद्यार्थिनी सुहानी नांदगुडे यांचा सत्कार  मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी साहित्य चर्चा मंडळ, वक्तृत्व, संगीत, कलामंडळ, हस्तलिखित पाक्षिक ‘निनाद’ अशा उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा. श्री. बाबासाहेब शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही कोणाही एका व्यक्तीच्या मालकीची संस्था नसून माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शिक्षकांनी चालवलेली संस्था आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व परवडणारे शिक्षण देण्यासाठी संस्था माजी विद्यार्थी आणि संस्थेचे हितचिंतक यांच्या माध्यमातून निधी जमा करून पायाभूत सुविधा निर्माण करते. मा. श्री. प्रकाश जावडेकर हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी दिलेल्या निधीतून ही संगणक प्रयोगशाळा उभी राहिली आहे. भविष्यातदेखील ते संस्थेला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाशी जोडले जाण्याचे तसेच आर्थिक स्वरुपात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांना केले.

प्राचार्य डॉ. देसर्डा यांनी आभारप्रदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा केला जातो. योग हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेचा समावेश आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक सुदृढता आणि मानसिक संतुलन साधता येते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. वर्षभर योगाभ्यास करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

मएसो भावे प्राथमिक शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुक्त हालचाली घेण्यात आल्या. इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. तसेच ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, भुजंगासन, पद्मासन इ. आसने विद्यार्थ्यांनी करुन दाखविली आणि मनोरे सादर केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी रोज सूर्यनमस्कार घालण्याचा व योगासने करण्याचा संकल्प केला.

मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये इ. १२ वी मधील सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. क्रीडा शिक्षक श्री. सुनील तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन इत्यादी विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. त्यांनी आसनांचे प्रात्यक्षिक योग्य पद्धतीने कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना योगाचे तंत्र समजून घेण्यास मदत झाली. तसेच शिक्षणाच्या परिपूर्णतेसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व त्यांना पटवून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योगाभ्यासाला आपल्या आयुष्यामध्ये नियमित भाग बनवण्याचा निर्धार केला.

बारामतीमधील मएसो कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक विद्यालयात तीन हजार विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी एकाच वेळी सामूहिक योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. विद्यालयातील योगशिक्षक श्री. दादासाहेब शिंदे यांनी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, पद्मासन, बद्धकोनासन, वज्रासन, शशांकासन, कपालभाती, शुद्धीकरण क्रिया, भ्रामरी प्राणायाम, ओमकार, सूर्यनमस्कार यांची सामुहिक प्रात्यक्षिके करून घेतली. प्रात्यक्षिकांचे विवेचन क्रीडाशिक्षक श्री. अनिल गावडे यांनी केले.

मएसो रेणावीकर माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरमधील विद्याधाम या संस्थेतील योगशिक्षक श्री. संजय सुरसे व योगशिक्षिका सौ. स्वाती सोनसळे हे उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम केला. शाळेतील सर्व शिक्षकांनी योगाभ्यासात सहभाग घेतला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये अशाचप्रकारे उत्साहाच्या वातावरणात आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांनी इ. १0 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

खालील तक्त्यामध्ये प्रत्येक शाखेच्या निकालाच्या टक्केवारीचा तपशील दिला आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांनी इ. १२ वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

खालील तक्त्यामध्ये प्रत्येक शाखेच्या निकालाच्या टक्केवारीचा तपशील दिला आहे. 

सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा! 

मएसो मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) चे आहेत माजी विद्यार्थी
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख (ATS Chief) सदानंद दाते यांची आज (बुधवार, दि. २७ मार्च २०२४) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
नवीन नियुक्तीबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे सदानंद दाते यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
सदानंद दाते हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आहेत.  मएसो मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) मधून १९८२ साली ते इ. १० वी ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
भारतीय पोलीस सेवेतील १९९० च्या तुकडीचे अधिकारी असललेल्या दाते यांनी मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. केंद्रातही सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर त्यांनी काम केले आहे.

जग्वार, मिराज – २०००, सुखोई – ३०, तेजस, राफेल अशी नावं ऐकली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. सैन्यदलांची प्रात्यक्षिके आणि त्यांचे विविध माध्यमातून होणारे प्रसारण, चित्रपट आणि व्हिडीओ गेम्स, क्वचित प्रसंगी दूरवर आकाशात होणारे दर्शन एवढाच तो काय आपला या लढाऊ विमानांशी येणारा संबंध. त्याचा प्रत्यक्ष थरार अनुभवण्याची संधी फारच दुर्मिळ. या लढाऊ विमानांच्या मॉडेलची प्रात्यक्षिके आपल्याला काही प्रमाणात का होईना त्या थराराचा अनुभव देऊन जातात, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ‘दुधाची तहान ताकावर …’ अशी भावना निर्माण करत ही प्रात्यक्षिके आपल्या मनात लढाऊ विमानांबद्दलची उत्सुकता ताणून जातात. ड्रोनच्या रुपाने झालेल्या क्रांतीमुळे आता तर वैमानिकाशिवाय विमान ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे.

सैन्यदलात दाखल होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी तर असा ‘एरो मॉडेलिंग शो’ म्हणजे त्यांच्या आकांक्षांना मिळणारे खतपाणीच! त्यासाठीच पिरंगुटनजिक कासारआंबोली येथे असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत अलिकडेच ‘एरो मॉडेलिंग शो’ आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे,  उपाध्यक्षा आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते. पिरंगुट परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना देखील या वेळी मुद्दामहून बोलविण्यात आले होते.

सदानंद काळे व अथर्व काळे यांनी विविध विमानांच्या मॉडेलच्या माध्यमातून ही प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये भारतीय वायुदलाकडे असलेल्या सुखोई – ३०, तेजस, राफेल इत्यादी विविध लढाऊ विमानांच्या मॉडेलबरोबरच उडणारा गरुड, मासा, उडती तबकडी, बॅनरसह पुष्पवृष्टी करणारे विमान यांचा देखील समावेश होता.

देशाच्या राजधानीत या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्यदलातील महिलांच्या लक्षणीय  सहभागामुळे “हाय जोश” मध्ये असलेल्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींना ही रोमहर्षक प्रात्यक्षिके बघून “गगन ठेंगणेच” वाटायला लागले होते. अशा वातावरणात “इच्छाशक्ती पुढे सर्व अडथळे हार मानतात, त्यामुळे आयुष्यात कधीही हार मानू नका.” हा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि पॅराऑलिंपियन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी दिलेला संदेश विद्यार्थिनींसाठी मोलाचा ठरला.

“युद्धामध्ये पायलट विरहित विमानांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एरो मॉडेलिंगचे शिक्षण घेऊन आजच्या पिढीने सैन्यातील ही नवीन संधी ओळखावी आणि आपल्या भारत देशाच्या सेवेसाठी आपले योगदान द्यावे,” अशा शद्बात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थिनींच्या मनावर कोरले गेले.

 

 

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, नाटककार, कथाकार, कांदबरीकार आणि समिक्षक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कुसुमाग्रज यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. त्यामुळे मातृभाषेचा गौरव करण्यासाठी व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिनवादन करण्यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समजावून  सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, स्त्री साक्षरतेचे महत्व पटवून देणारे सावित्रीबाई फुले आणि म. ज्योतिबा फुले, ताराबाई मोडक तसेच मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक वि. वा.शिरवाडकर तथा कवि कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, कवयित्री शांता शेळके  यांच्या व्यक्तीरेखा विद्यार्थ्यांनी या प्रसंगी सादर केल्या. या कार्यक्रमाला म.ए. सो. भावे प्राथमिक शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. वृषाली ठकार आणि आदर्श शिक्षिका मा. सौ. दीपाली कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. सौ. दीपाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना खूप छान गोष्ट सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन नृत्यगीते सादर केली. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

कळंबोली येथील एम. ई. एस. पब्लिक स्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिना’चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.   महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सांगितले. ह्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी समुहगीते सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मराठी दिवसाचे महत्त्व सांगितले. अशाप्रकारे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ अनुवादिका श्रीमती उमा कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘माझा प्रवास’ (भाषांतर ते अनुवाद) हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

*****************************************************************************************************

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाराव्या ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या बेसबॉल खेळाडू कु. रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. १९ जानेवारी २०२४) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे होते.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, संस्थेचे सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी आणि मा. राजीव देशपांडे , मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्था समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे या देखील या वेळी उपस्थित होत्या. ही स्पर्धा दि. १९ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.

जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या क्रीडा ज्योतीचे स्वागत प्रमुख पाहुण्या रेश्मा पुणेकर यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

“विद्यार्थ्यांनी स्वतःचे आरोग्य व्यवस्थित ठेवले पाहिजे. बंद खोलीतील खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा. खेळातून आरोग्य तर सुधारतेच पण मन, मेंदू आणि मनगटाचा विकास होतो. खेळाच्या माध्यमातून देखील चांगले करीअर करण्याच्या संधी असतात,” असे विचार मा. कु. रेश्मा पुणेकर यांनी मांडले.

“इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणात ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धा भरवून ‘मएसो’ ने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात वेळ वाया न घालवता त्याकडे पाठ फिरवून मैदानावर यावे,” असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना केले.

या स्पर्धेत सात जिल्ह्यांतील ‘मएसो’ च्या प्राथमिक शाळा तसेच बारामती शहर व परिसरातील सतरा प्राथमिक शाळांमधील बाराशे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सूर्यनमस्कार, डॉजबॉल, गोल खो-खो, लंगडी या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. प्रतिस्पर्ध्यांना बाद करण्याची जिद्द आणि नजरेतली भेदकता, हातात न मावणारा बॉल सांभाळत नेमका वेध घेताना लावलेला जोर, पाठलाग करणाऱ्या खेळाडूला चपळाईने चकवा देत दिलेला खोs आणि क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्सुकता अशा चैतन्यमयी वातावरणात लहानग्यांनी ‘मएसो क्रीडा करंडक स्पर्धे’तील मैदाने दणाणून गेली. लहानग्या खेळाडूंच्या आवेशपूर्ण चढायांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सत्रातील सामने आज रंगले. अनेक सामने अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचेही झाले.

स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, मएसो क्रीडावर्धिनीचे सदस्य, शाला समितीचे सदस्य, शाळेच्या सल्लागार समितीचे सदस्य, माजी शिक्षक, पालकवृंद, सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विजय भालेराव यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शंकर घोडे यांनी तर आभार प्रदर्शन मा. सुधीर भोसले यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्याना’त मुंबईस्थित ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ (फिन्स) या संस्थेचे सेक्रेटरी जनरल मा. डॉ. शेषाद्री चारी यांनी ‘बिगिनिंग ऑफ न्यू कालचक्र : इन लाईट ऑफ अॅन इंटरनॅशनल सिनॅरीओ’ या विषयावर मांडलेले विचार

 

मा. डॉ. शेषाद्री चारी यांच्या व्याख्यानाची महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी …

 

मा. डॉ. शेषाद्री चारी यांच्या व्याख्यानाची दै. सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी …

कोणत्याही साधनांशिवाय केलेले सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार, संगीताच्या तालावर केलेल्या सामुहिक कृतींमधून नजरेत भरणारी लयबद्धता, परस्पर समन्वय आणि सांघिक भावनेचे होणारे दर्शन, गंभीर मंत्रोच्चारासह घातलेले सूर्यनमस्कार आणि केलेली योगासने, सळसळत्या वयाला साद घालणाऱ्या उडत्या लयीच्या गाण्यांवरील एरोबिक्सची, संयम आणि सांघिकतेची जाणीव करून देणारे मनोरे, एरोबिक्स पॉम्पॉमवर थिरकणारी अल्लड पावले, ढोल-ताशाच्या तालावर खेळली गेलेली लेझीम अन् झांजा आणि शिवकन्यांचा जोशपूर्ण अविष्कार दाखविणारी शिववंदना बघून उपस्थितांची मने भारावून गेली होती, मनात नवी पिढी आणि भविष्यातील भारताबद्दलचा अभिमान भरून पावला होता. निमित्त होते, ‘युवा चेतना दिन’कार्यक्रमाचे!
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध क्रीडा प्रात्यक्षिके बघून सर्वचजण भारावून गेले.
म.ए.सो. तर्फे दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘युवा चेतना दिन’ साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या कार्यक्रमाला म.ए.सो.च्या माजी विद्यार्थिनी व आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे – साखरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक हे होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य व म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव आणि संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
म. ए. सो. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (दि. १२ जानेवारी २०२४) हा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्नेहल शिंदे – साखरे म्हणाल्या, “शालेय वयातच आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न सुरू करा. सातत्याने प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते, कठोर परिश्रमांना पर्याय नसतो, अपयश आले तरी पाठ न फिरवता मेहनत केली तर त्याचे फळ मिळतेच. मला करावा लागलेला संघर्ष आणि मिळालेले यश यांची किंमत मला खेळामुळेच समजली. सोशल मिडियात अडकून पडलात तर आपले अनमोल जीवन व्यर्थ जाईल आणि विकतचे दुखणे मागे लागेल.”
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. प्रदीप नाईक म्हणाले की, आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोघांची जयंती आहे. संकल्पाची शक्ती या दोघांच्या जीवन चरित्रातून आपल्याला कळते. या दोघांचे जीवन सर्वांसाठी आदर्श आहे. त्याआधारे समाजजीवनात चेतना निर्माण केली पाहिजे.
ज्ञानोपासना आणि बलोपासना यांची आवश्यकता लक्षात घेऊन म.ए.सो. युवा चेतना दिन साजरा करत आली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींना जीवनात महत्त्व द्यावे,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विजय भालेराव यांनी केले. ते म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांप्रमाणे अनेक वीर घडवले, त्यांना सशक्त बनवले, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केली. स्वामी विवेकानंदांनी स्तासमुद्रापार आपला देश आणि आपली संस्कृती यांचा झेंडा फडकावला अशा कर्त्वृत्ववान महापुरुषांच्या देशात आपला जन्म झाला आहे त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. हेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेली १६३ वर्ष कार्य करणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आपण घटक आहोत. खेळाच्या माध्यमातून व्यायामाची आवड निर्माण व्हावी तसेच सशक्त आणि धैर्यवान विद्यार्थी घडावेत यासाठी म.ए.सो. क्रीडावर्धिनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसज्ज क्रीडांगण, खेळांची साधने आणि प्रशिक्षणांची व्यवस्था करण्यात आली आहे. पारंपारिक तसेच आधुनिक क्रीडा प्रकारातील उत्तम खेळाडू घडावेत यासाठी क्रीडा शिक्षकांप्रमाणेच क्रीडा तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मएसो क्रीडा करंडक स्पर्धा, शाळा व महाविद्यालयांमध्ये ओपन जिमची उभारणी असे विविध उपक्रम म.ए.सो. क्रीडावर्धिनी राबवत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेहा कुलकर्णी यांनी तर प्रात्यक्षिकांचे सूत्रसंचालन सौ. अर्चना लडकत यांनी केले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

निसर्ग नृत्य, स्कार्फ नृत्य, पाँम-पाँम नृत्य, टाळ नृत्य, टिपरी नृत्य, लेझीम असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून विद्यार्थ्यांनी ‘युवा चेतना दिन’च्या कार्यक्रमात उपस्थितांची मने जिंकली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे म. ए. सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी खेळ व शारीरिक प्रात्याक्षिके सादर करतात. यावर्षी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवी मुंबईमधील नवीन पनवेल, कळंबोली आणि बेलापूर या तीनही ठिकाणच्या विद्यालयांचा ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रम शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता कळंबोलीतील म. ए. सो. ज्ञानमंदिर व म. ए. सो. पब्लिक स्कूल या विद्यालयांच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू मा. नामदेव बडरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. आनंद लेले, डॉ. गोविद कुलकर्णी, डॉ. रविकांत झिरमिटे, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे मा. नामदेव बडरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी म. ए. सो. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व मएसो गीत सादर केले.

मा. सुधीर भोसले यांनी म. ए. सो. च्या शाळांमध्ये क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

विद्यार्थ्यांनी आपले शरीर सुदृढ ठेवावे आणि त्यासाठी दररोज व्यायाम करावा, बलोपासना करावी असा सल्ला मा. नामदेव बडरे यांनी मनोगत व्यक्त करताना दिला. तसेच संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि संस्थेचे नाव जगभर पसरावे यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात मा. बाबासाहेब शिंदे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.

ऑलिम्पिक खेळाडू आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त मा. ललिता बाबर यांनी युवा चेतना दिनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास म. ए. सो. चे हितचिंतक, निमंत्रित, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. कविता जगे यांनी केले.

शाळेचे महामात्र डॉ. रविकांत झिरमिटे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता म. ए. सो. ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘वंदे मातरम्’ने झाली.

संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

“संपूर्ण महाराष्ट्रात ८ ते १० लाख विद्यार्थी स्पर्धा परिक्षांची तयार करतात, त्यापैकी दीड ते दोन लाख विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यात येतात. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर अधिकारी तयार होतात. सरकारी व्यवस्थेतून परिवर्तन घडवता येते. त्यामागे सेवेची भावना असणे महत्वाचे असते. केवळ जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिने स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करू नये. सध्या या स्पर्धा परिक्षांबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे, परंतू या परिक्षांच्या तयारीतून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनाचे व्यापारीकरण न करता चांगले अधिकारी घडवण्याच्या हेतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र चालवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशा शद्बात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी संस्थेची भूमिका मांडली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व ज्ञानदीप अॅकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे मार्गदर्शन केंद्र चालवण्यात येणार आहे. त्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मा. बाबासाहेब शिंदे बोलत होते.

या वेळी प्रमुख वक्ते मा. निहाल राजश्री प्रमोद कोरे, ज्ञानदीप अॅकॅडमीचे संचालक मा. महेश शिंदे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागातील माजी अधिकारी मा. चंद्रकांत निनाळे व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार, दि. १३ जानेवारी २०२४ रोजी हा कार्यक्रम झाला.

या प्रसंगी बोलताना मा. निहाल कोरे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांसाठी दीर्घकाळ कराव्या लागणाऱ्या तयारीमुळे वय हातून निसटते असा भ्रम निर्माण केला जातो परंतू, स्पर्धा परिक्षांची तयारी ही आपण आपल्यामध्ये केलेली गुंतवणुक आहे, त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र परिवर्तन होते. इतरांच्या दृष्टीने जेव्हा यशाची किंवा ध्येय गाठण्याची आशा मावळते तेव्हा आपल्याकडे ठाम विश्वास असायला हवा. स्वतःशीच संघर्ष करायचा असतो, त्यामुळे आपण स्थितप्रज्ञ असायला हवे. ध्येयप्राप्तीसाठी प्रतिकूल परिस्थितीत देखील सोईसुविधांची फिकीर न करता कष्ट करण्याची मानसिकता आवश्यक आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी नाकारण्यातली ताकद खूप मोठी असते. तारूण्य, त्याग, तपश्चर्या आणि संघर्ष यातून भव्य-दिव्य घडेल याची खात्री बाळगा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मा. महेश शिंदे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांची तयारी नेमकी कशी करावी? याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या केंद्रामध्ये मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट ध्येय नसते. अस्तित्वाच्या संघर्षातूनच जीवनमान सुधारण्याचे ध्येय नजरेसमोर येते. आपण नेमके काय करत आहोत हे कळणे आवश्यक असते. सातत्याने केलेल्या प्रयत्नातूनच यश मिळते. त्यादृष्टीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहयोगाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दर आठवड्याला एका तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महागड्या कोचिंग क्लासमध्ये केले जाणारे मार्गदर्शन येथे सवलतीत मिळणार आहे. त्यामध्ये क्षमता विस्तारावर भर दिला जाणार आहे.

डॉ. विलास उगले यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक केले. स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्राथमिक स्तरापासून अभ्यासाची मजबूत पायाभरणी होणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थेची तपशीलात माहिती असावी लागते. या गोष्टी लक्षात घेऊन संस्थेने ज्ञानदीप अॅकॅडमीच्या सहकार्याने मार्गदर्शनाची व्यवस्था निर्माण केली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

डॉ. किशोर देसर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला.

डॉ. शोभा करेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्रा. किसन कुमरे यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत गौरव कार्यक्रमात बोलताना राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर. याप्रसंगी उपस्थित (डावीकडून) डॉ. अतुल कुलकर्णी, मा. बाबासाहेब शिंदे, मा. प्रदीप नाईक व मा. सौ. आनंदी पाटील

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पीएच्. डी. प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत संस्थेचे पदाधिकारी (छायाचित्रात डावीकडून बसलेले) डॉ. राजीव हजिरनीस, सी.ए. राहुल मिरासदार, डॉ. अतुल कुलकर्णी, मा. बाबासाहेब शिंदे, मा. प्रदीप नाईक, प्रमुख पाहुणे मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सौ. आनंदी पाटील, श्री. सुधीर भोसले, डॉ. आनंद लेले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या आपल्या देशासाठी आगामी २५ वर्षे अत्यंत महत्वाची आहेत. विकसनशील देशाचे रुपांतर विकसित देशामध्ये करायची धुरा देशातील तरूण पिढीवर आहे. देशाच्या अमृतकाळात तरूण वर्गाला उद्यमी करण्यासाठी शिक्षण व्यवस्था त्यांच्यामध्ये शिक्षणाबरोबरच कौशल्यक्षमता कशी रुजवते यावर विकसित देश निर्माण होणे अवलंबून आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा बदल घडविणारे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण भविष्यातील भारतासाठी यशस्वी करणे आवश्यक आहे, ” असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व  पीएच्.डी. प्राप्त केलेल्या ४२  गुणवंत विद्यार्थी आणि    शिक्षकांचा गौरव समारंभ आज (सोमवार, दि. ८  जानेवारी २०२४) आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी डॉ. देवळाणकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत  होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा मा. सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी होते.

डॉ. देवळाणकर पुढे म्हणाले की, दरवर्षी १२ ते १३ लाख विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामुळे सुमारे १२ अब्ज डॉलर इतका पैसा देशाबाहेर जातो. ही बाब आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी देशाबाहेर जात असल्याने आपल्या देशातील शिक्षणात दर्जात्मक सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता होती. ती पूर्ण करण्यासाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२४ – २५ वर्षात देशात लागू करण्यात येणार असून ते सक्तीचे करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना विषय निवडीत लवचिकता आणि स्वातंत्र्य मिळणार आहे. मूळ विषयाचे शिक्षण ६० टक्के आणि आवडीच्या विषयांचे शिक्षण ४० टक्के असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे वर्गातील मिळणारे शिक्षण आणि बाजारातील गरज यातील तफावत दूर होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवनात फार मोठे परिवर्तन होणार आहे. शिक्षक व प्राध्यापकांना देखील या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र, त्यांनी भविष्यातील भारतासाठी हा त्रास सहन करावा असे आवाहन डॉ. देवळाणकर यांनी या वेळी केले.

मा. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रास्ताविकात नव्या शैक्षणिक धोरणानुसार, मातृभाषेतून शिक्षण आणि कौशल्य विकसन याला संस्था प्राधान्य देत असून शाळा सक्षम करण्यात येत असल्याचे सांगितले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या वाढत्या प्रभावात देखील संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळा उत्तम प्रकारे टिकून आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संस्था अनुदानित शाळांमध्ये देखील संस्था पगारावर चांगले शिक्षक नियुक्त करत आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी घडत असल्याचे दिसून येत आहे असे ते म्हणाले.

मा. प्रदीप नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, देशात होणाऱ्या विकासामुळे देशातील लोकसंख्येची गुणवत्ता वाढत आहे आणि महासत्तेच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीसाठी  ते आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देवकी बुचे यांनी केले.

डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

 

पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना १२० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आज (गुरुवार, दि. २१ डिसेंबर २०२३) आदरांजली अर्पण करण्यात आली. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे व गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. तसेच महाविद्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.

या प्रसंगी मएसोच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, उपप्राचार्य डॉ. विनायक पवार, प्राध्यापक सी. ए. डॉ. सुदाम घोंगटेपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यानिमित्ताने मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मएसो आबासाहेब गरवारे कला व विज्ञान महाविद्यालय आणि मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. रामदास भगत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांनी भुषविले.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर पद्‌मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रुपये दहा हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मएसो च्या वतीने रुपये दहा हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

प्रमुख पाहुणे मा. श्री. रामदास भगत यांनी आपल्या भाषणात पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या व्यावसायिक व सामाजिक यशोगाथेबद्दल उपस्थितांना माहिती दिली. श्री. आबासाहेब गरवारे यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि कोणतीही साधने हाती नसताना स्वतःच्या सामर्थ्यावर मोठे उद्योगविश्व उभे केले, हिमतीने व्यवसाय करण्याची जिद्द दाखवली व ती तडीस नेली, विद्यार्थ्यांनी देखील असाच आदर्श ठेवावा असे ते म्हणाले.

मा. श्री. बाबासाहेब शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना म्हणाले, “सध्या विद्यार्थ्यांकडे वेगवेगळी साधने, मार्गदर्शन करणारे शिक्षक उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन शिक्षणानंतर उद्योजकतेकडे वळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. या देशाला नोकरी मागणाऱ्यांची नाही, तर नोकरी देणाऱ्या तरुणांची गरज आहे, हे लक्षात ठेवून त्यांनी आपले ध्येय गाठायला हवे”.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सी. ए. डॉ. सुदाम घोंगटेपाटील यांनी तर सूत्रसंचालन डॉ. जयश्री पवार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. प्रतिक कांचन यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती स्नेहल चौकटे यांनी केले.

या कार्यक्रमापूर्वी मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील सौ. विमलाबाई गरवारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. अजय पुरोहित यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक आर.डी. भारमळ, उपमुख्याध्यापक श्री. संजय जाधव उपस्थित होते.

 

“नाटकाच्या माध्यमातून विविध विषय, प्रश्न हाताळले जात असतात, त्यातून त्या विषयाचे विविध पैलू समोर येतात आणि विचारांना चालना मिळते. नाट्यमहोत्सवात सादर होणाऱ्या विविध नाटकांमुळे विचारांच्या आदान-प्रदानाची संधी मिळते. ‘मएसो’चा हा नाट्यमहोत्सव महाविद्यालयांमधील सर्वच घटकांसाठी उपयुक्त ठरेल. नाटकाचा संबंध व्यक्तिमत्वाच्या विकासाशी आहे. रंगभूमीवर केलेल्या कामामुळेच आज मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून व्यासपीठावर दिग्गज व्यक्तींच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली,” अशा शद्बात ‘मएसो’चे माजी विद्यार्थी आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीचे लेखक -दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नाट्यकलेचे महत्व अधोरेखित केले. ‘मएसो नाट्यमहोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६३ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने प्रथमच ‘मएसो नाट्यमहोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन लांजेकर यांच्या हस्ते नाट्यप्रयोगाची घंटा वाजवून करण्यात आले. संस्थेच्या पाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध नाट्य स्पर्धांमध्ये सादर केलेल्या पाच एकांकिका या महोत्सवात सादर करण्यात आल्या.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळाचे सदस्य या महोत्सवाला आवर्जून उपस्थित होते.
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व मएसो भावे प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी उमेश कुलकर्णी यांनी शाळेतच नाटकाची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. “शाळेतील भावे बाई दरवर्षी नाटक बसवण्यासाठी प्रेरित करायच्या. दरवेळेला नव्याने काहीतरी शिकायला मिळायचे, तो प्रवास अजूनही सुरू आहे. कला ही चांगलं जगायला शिकवते. नाटकातून स्वतःचा आणि जगाचा शोध घेण्याची वृत्ती तयार होते, त्याचबरोबर पडणारे प्रश्न आणि येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळते. सध्याचा काळ हा असंख्य घडामोडींचा काळ आहे. इतिहास, वर्तमान आणि भविष्याची सरमिसळ केली जात आहे. ते समजून घेण्यासाठी नाटक हे सर्वात साधे व सोपे माध्यम आहे. कला ही माणसाला मुक्तपणे व्यक्त व्हायला शिकवते, नाटकाच्या माध्यमातून आपण आपले मत अधिक ठोसपणे मांडू या आणि सगळ्यांना तसे करण्यास शिकवू या,” असे ते यावेळी म्हणाले.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, जीवनात प्रत्येकालाच अभिनय करावा लागतो. सैन्यदलातील अधिकारी म्हणून आम्हाला देखील अभिनय करावा लागतो. आनंद किंवा दुःख व्यक्त करता येत नाही, भावनांना बांध घालावा लागतो. मनावर संयम ठेवून नाटक बघणे हा देखील तसाच प्रकार आहे.
मएसो ऑडिटोरियममध्ये दि. २४ व २५ नोव्हेंबर असे दोन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनप्रसंगी सर्व एकांकिकांचे लेखक व दिग्दर्शक तसेच ‘मएसो’चे माजी विद्यार्थी असलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नचिकेत पूर्णपात्रे व स्मिता शेवाळे या कलावंतानी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहून नवोदित कलाकारांचा उत्साह वाढविला.
या नाट्य महोत्सवात मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ने योगेश सोमण लिखित व रश्मी देव दिग्दर्शित ‘कॅन्टीन’ ही एकांकिका, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सने सुधा देशपांडे व समृद्धी कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित ‘रेडिओ’, मएसो सिनियर कॉलेजने समृद्धी पाटणकर लिखित व ओम चव्हाण दिग्दर्शित ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘उदगार, पुणे’ व मएसोच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रवीण विठ्ठल तरडे लिखित व अनिरुद्ध अनिल दिंडोरकर दिग्दर्शित ‘वंशावळ’ तर एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसने अथर्व आनंद जोशी व ओम नितीन चव्हाण लिखित व दिग्दर्शित ‘जीना इसिका नाम है!’ या एकांकिका सादर केल्या.
नाट्य रसिकांनी विद्यार्थ्यांच्या या कलाकृतींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“काळ आणि परिस्थिती बदलत राहते पण शिक्षण आणि संस्कार ही मूळ तत्वे कायम राहतात, त्यांची गरज कायम असते त्यामुळे ती विसरून चालणार नाही. संस्कारक्षम शिक्षक असल्याशिवाय सक्षम विद्यार्थी घडत नाहीत, चांगले शिक्षक निर्माण करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. शिक्षण संस्थांनी आपली जबाबदारी ओळखून शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणे आवश्यक आहे. व्हीजन डॉक्युमेंट तयार करून त्यानुसार वाटचाल करणे आणि त्याचा कालबद्ध आढावा घेत राहणे हे संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज (रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३) संस्थेच्या १६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.

संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर, मा. विजय भालेराव, डॉ. विवेक कानडे, सीए राहुल मिरासदार, डॉ. राजीव हजिरनीस, मा. अजय पुरोहित, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे मा. अध्यक्ष डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व संस्थेचे माजी सचिव डॉ. भरत व्हनकटे, आजीव सदस्य मंडळाच्या सदस्या डॉ. मानसी भाटे व डॉ. नेहा देशपांडे, संस्थेचे माजी सचिव प्रा. र.वि. कुलकर्णी व प्रा. वि.ना. शुक्ल, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे तसेच संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव मा. सुधीर भोसले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारीवृंद देखील यावेळी उपस्थित होता.

संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला केलेल्या प्रास्ताविकात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले परंतू संस्थेच्या संस्थापकांनी ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली, ते मूळ उद्देश कायम राखत गेल्या १६३ वर्षात संस्थेने यशस्वी वाटलाच केल्याचे सांगितले. हीच परंपरा यापुढील काळात देखील कायम राखली जाईल असा विश्वास व्यक्त केला.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे या वेळी बोलताना म्हणाले की, “ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला आज १६३ वर्ष पूर्ण होत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी व्यक्तीच्या जीवनात एक वर्ष कमी होते, परंतू संस्थेच्या वाटचालीत एक वर्ष वाढणे ही चांगली घटना असते. संस्थेचे कार्य वाढणे, त्याचा विस्तार होणे, संस्था बहरणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असते. संस्थेच्या वाटचालीत अनेकांचे योगदान आहे. संस्थेच्या नव्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने संस्थेच्या कार्याला अधिक गती देता येईल. दूरगामी विचार करून संस्थेच्या १७५ व्या वर्षी संस्थेच्या शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७५ हजारांवर पोहोचेल यादृष्टीने प्रयत्न करू या. त्यासाठी सर्वांनीच झोकून देऊन काम केले तर संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान दिल्याचे समाधान सर्वांनाच मिळेल.”

संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक यांनी आपल्या भाषणात, विद्यार्थ्यांना घडवणारे संस्कारक्षम आणि सक्षम शिक्षक मिळणे हे फार मोठे आव्हान असून असे शिक्षक घडवणे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या प्रदीर्घ परंपरा असलेल्या संस्थेचे कर्तव्य आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करू या. विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे डॉक्टर, इंजिनिअर व्हावे असे वाटते, त्याचप्रमाणे शिक्षक व्हावे असे वाटले पाहिजे असे संस्कार करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.

संस्थेचे सचिव मा. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थेच्या प्रत्येक घटकाचे संस्थेच्या कार्यात योगदान, संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न, आगामी पाच वर्षांचे नियोजन त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी संघ अर्थात ‘MAA’ च्या कार्याला गती देण्यासाठीचे नियोजन यादृष्टीने काम सुरू असल्याचे सांगितले. संस्थेच्या आजीव सदस्य मंडळातील ५० टक्के सदस्य संस्थेचेच माजी विद्यार्थी आहेत आणि ही आनंदाची बाब असल्याचे या वेळी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या संस्थेच्या संस्थापकांच्या भित्तीचित्रावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

“शिक्षणामुळे चरितार्थाची सोय होते पण संगीतामुळे मिळणारा आनंद जीवन समृद्ध करतो. संगीतामुळे चित्तवृत्ती एकवटल्या जात असल्याने चित्तशुद्धी होते. परिणामी  गुन्हेगारी वृत्तीला आळा बसतो, संगीताचा समाजमनावर होणारा हा फार मोठा परिणाम आहे, ” असे प्रतिपादन तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेच्या नूतनीकृत सभागृहाचे उद्धाटन आज (गुरूवार, दि. ९ नोव्हेंबर २०२३) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पं. तळवलकर बोलत होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक  यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे आणि संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “नमन नटवरा विस्मयकारा…” या नांदीनंतर पं. तळवलकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

“सभागृहामध्ये सादर केलेल्या कार्यक्रमामुळे कलाकाराला अनुभवाची शिदोरी मिळते, त्या आठवणी त्याला प्रेरणा देणाऱ्या असतात, त्यातून कलाकार घडत असतो. मएसो भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहाशी माझे ऋणानुबंध आहेत. माझे गुरू पं. पंढरीनाथ नागेशकर यांचे कार्यक्रम देखील या सभागृहात झाले आहेत. त्यामुळे नूतनीकरण झालेल्या या सभागृहाचे उद्धाटन माझ्या हस्ते होत आहे याचे मला अप्रूप आणि अभिमान वाटतो आहे,” असे तालयोगी पं. सुरेश तळवलकर यावेळी म्हणाले.

मा. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रास्ताविकात शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या सभागृहाच्या नूतनीकरणामागील भूमिका मांडली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “सैन्यदलांच्या परेडमध्ये देखील एक संगीत असते, त्यातील बीट बिघडले तर परेडची शान कमी होते. संगीतामुळे गुन्हेगारी कमी होते हा पंडितजींनी मांडलेला विचार अतिशय महत्वाचा आहे. शांतता मिळविण्यासाठी सगळेचजण संगीताकडे वळतात.”

या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या आजी व माजी विद्यार्थिनींनी कथक नृत्यशैलीत गणेश वंदना सादर केली. त्यानंतर कॉलेजमधील प्रा. रश्मी देव, प्रा. अरुंधती कामठे व ऋषिकेश कर्दोडे यांनी दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निवडक लेखांचे अभिवाचन केले. प्रा. केदार केळकर आणि ऐश्वर्या कडेकर यांनी रागमाला सादर केली. तसेच मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी भावगीते सादर केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आणि आय.आय.टी., कानपूरमध्ये केमिकल इंजिनिअरींग विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. योगेश जोशी यांना विज्ञान क्षेत्रात अतिशय मानाची समजली जाणारी जे. सी. बोस राष्ट्रीय पाठ्यवृत्ती मिळाली आहे. केमिकल इंजिनिअरींगच्या क्षेत्रात प्रा. योगेश जोशी यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव या पाठ्यवृत्तीमुळे झाला आहे.

भारत सरकारच्या काऊन्सिल ऑफ सायंटिफीक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या शांती स्वरुप भटनागर पारितोषिकाने सन्मानित असलेल्या, वैज्ञानिक शिक्षण संस्थेच्या सभासद असलेल्या आणि विज्ञान क्षेत्रात असामान्य कर्तृत्व सिद्ध केलेल्या कार्यरत शास्त्रज्ञाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेल्या सायन्स अँड इंजिनिअरींग रिसर्च बोर्ड या संस्थेतर्फे ही पाठ्यवृत्ती दिली जाते.

व्यक्तिगत पाठ्यवृत्ती म्हणून प्रति महिना २५ हजार रुपये, संशोधन अनुदान म्हणून पाच वर्षांपर्यंत प्रतिवर्ष १५ लाख रुपये पाठ्यवृत्तीधारकाला तसेच अतिरिक्त खर्चासाठी यजमान संस्थेला एक लाख रूपये देण्यात येतात. पाठ्यवृत्ती काळातील संशोधन कार्याचे कठोर मूल्यमापन करून पाठ्यवृत्तीचा कालावधी दर पाच वर्षांसाठी वाढविण्यात येऊ शकतो. तसेच पाठ्यवृत्तीधारकाच्या ६८ व्या वर्षापर्यंत यजमान संस्था त्याला पाठ्यवृत्ती देऊ शकते.

डॉ. योगेश जोशी अनेक पुरस्कारांचे मानकरी असून २०१५ मध्ये त्यांना ‘सीएसआयआर’तर्फे शांती स्वरुप भटनागर पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. २०१८ साली त्यांना आय.आय. टी., कानपूरतर्फे डिस्टिन्क्विश टिचर्स अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

शांती स्वरुप भटनागर पारितोषिक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दि. २२ मार्च २०१६ रोजी ‘मएसो’चे माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री डॉ. अरुण फिरोदिया यांच्या हस्ते प्रा. योगेश जोशी यांच्या सत्कार करण्यात आला होता.

डॉ. योगेश जोशी हे मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता आणि मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला या शाखांचे माजी विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ. योगेश जोशी यांचे हार्दिक अभिनंदन!

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मा. बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी मा. सौ. आनंदी पाटील यांची आज ( मंगळवार, दि. १२ सप्टेंबर २०२३) निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या सचिवपदी मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांची तर सहाय्यक सचिवपदी मा. सुधीर भोसले यांची निवड करण्यात आली.

मा. बाबासाहेब शिंदे हे व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते असून सौ. आनंदी पाटील या उद्योजिका आहेत. मा. डॉ. अतुल कुलकर्णी आणि मा. सुधीर भोसले मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कार्यरत असून अनुक्रमे शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स हे त्यांचे विषय आहेत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष म्हणून एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची तर उपाध्यक्ष म्हणून मा. प्रदीप नाईक यांची संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फेरनिवड करण्यात आली आहे.

 

संस्थेच्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून मा. देवदत्त भिशीकर, मा. विजय भालेराव, मा. अॅड. सागर नेवसे, मा. डॉ. विवेक कानडे, सीए मा. राहुल मिरासदार, मा. डॉ. राजीव हजरनीस, मा. अजय पुरोहित यांची निवड झाली आहे.

वर्ष २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी ही निवड आहे.

माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभात बोलताना मा. डॉ. अनुराधा ओक. या वेळी व्यासपीठावर उपस्थित (डावीकडून) इंजि. सुधीर गाडे, आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), मा. प्रदीप नाईक, डॉ. भरत व्हनकटे.

“आपल्या देशात प्राचीन काळापासून माणूस हा शिक्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. एक चांगला माणूस म्हणून जगाने मला ओळखले पाहिजे अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे यापुढे आपल्याला मूल्यांविषयी तडजोड करून चालणार नाही, वेळप्रसंगी ती विद्यार्थ्यांच्या गळी उतरवावी लागतील. व्यक्तिगत विकास कसा साधायचा हे आपल्याला चांगले समजते परंतू सामुहिक पातळीवर हित कसे साधायचे ते शिकविण्याची गरज आहे. त्याचा अभाव असल्याने आज समुहाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारी माणसे समाजात दिसत नाहीत. शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शहाणपणाचे महत्व यापुढील काळात महत्वाचे ठरणार आहे. ज्ञान मिळविण्याचे अनेक मार्ग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असताना शिक्षकाचे महत्त्व काय आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षक हा समाजाचा कणा आहे कारण चांगली व्यक्ती घडविणारे अदृश्य हात हे शिक्षकाचे असतात. विद्यार्थी निरिक्षणातून शिकत असतात, त्यामुळे शिक्षकांनी आत्मपरिक्षण करणे आणि आपल्यामध्ये अपेक्षित बदल घडवून आणणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे विभागाच्या सचिव मा. डॉ. अनुराधा ओक यांनी आज (सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३) येथे केले.

मार्च २०२३ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये पार पडला, या प्रसंगी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि म.ए.सो. चे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यापीठावर उपस्थित होते.

माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत डॉ. मानसी भाटे, डॉ. संतोष देशपांडे, इंजि. सुधीर गाडे, सीए राहुल मिरासदार, आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, डॉ. अनुराधा ओक, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), मा. प्रदीप नाईक, डॉ. भरत व्हनकटे, सचिन आंबर्डेकर

इ. १० वी च्या परीक्षेत संस्थेच्या शाळांमध्ये प्रथम आलेल्या १७, एखाद्या विषयात शंभर टक्के गुण णिळवलेल्या ४६ विद्यार्थ्यांचा तसेच इ. १२ वी च्या परीक्षेत संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रथम आलेल्या २०, एखाद्या विषयात शंभर टक्के गुण मिळवलेल्या ६ आणि मएसो ज्ञानवर्धिनी परीक्षेत यशस्वी ठरलेले १२ अशा एकूण १०१ विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रथमेश कडलग, सौम्या दंडगव्हार, प्रतिक्षा पवार, रमा इटकीकर आणि प्रशांत सावंत या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, जीवनात यशाची शिखरे गाठण्यासाठी सातत्याने परिश्रम करावे लागतात. एखादा विषय समजून घेतला तर त्याविषयाची गोडी लागते त्याचप्रमाणे स्वतःला ओळखता आले, तर आपल्यात सुधारणा घडवून आणणे सहज शक्य होते.

म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन तर शिक्षिका दिपाली बधे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

“आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना करताना आखलेल्या ध्येयधोरणांनुसार शाळा वाटचाल करीत आहे. संस्थेच्या सर्वच शाखांप्रमाणे फडके विद्यालयात देखील विद्यार्थी घडवण्याचे कार्य समर्थपणे सुरू आहे. विद्यालयाच्या या कामात  संस्थेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांना आज केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आज (शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३) विद्यालयाच्या कै. पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मा. आनंदी पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाला सनोफी हेल्थकेअर या कंपनीत सिनिअर सायंटिफिक राईटर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मानसी कुलकर्णी – दाते व मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मृण्मयी खांबेटे या माजी विद्यार्थिनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या शालासमितीचे अध्यक्ष मा. श्री. देवदत्त भिशीकर, शालासमितीचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी, माध्यमिक विभाग – मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण, माध्यमिक विभाग – इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, प्राथमिक विभाग – मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मानसी कुलकर्णी या प्रसंगी बोलता म्हणाल्या की मराठी माध्यमात शिकल्याचा अभिमान वाटतो आणि संशोधन कार्यात कधीही त्यामुळे अडसर आला नाही. ॲड. मृण्मयी खांबेटे यांनी आपल्या मनोगतातून, आत्मविश्वासाने भविष्यात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत केले.

“१८६० साली सुरू झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा कार्यविस्तार फडके  विद्यालयाच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात उत्तमपणे होत आहे. विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध विद्यालयाशी अधिक दृढ होतील यासाठी विद्यालयाने प्रयत्न करावेत,” असे आवाहन मा. देवदत्त भिशीकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संवाद साधताना मा. डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले, “ २५ वर्षांपूर्वी विद्यालयाने सुरू केलेला हा प्रवास अनेक अनुभवांनी समृद्ध आहे, असंख्य व्यक्तींचे त्यात योगदान आहे. भविष्यात देखील ज्ञानदानाचे हे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहील.”

या कार्यक्रमात विद्यालयाचे ध्येय अधोरेखित करणाऱ्या ‘लोगो’ चे प्रकाशन करण्यात आले. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून मुष्टीधान्य उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी संकलित केलेले १ हजार ५०० किलो तांदूळ वनवासी कल्याण आश्रमाला देण्यात आले.

विद्यालयाच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी विद्यालयाचे हितचिंतक, स्नेही, पालक , माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समिता सोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बापट यांनी केले.

पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची सूत्रे डॉ. विलास उगले यांनी आज (शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३) स्वीकारली. या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. ए. पी. कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शरयू साठे, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

डॉ. उगले तीन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी ते सर परशुराम भाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ. उगले यांचे एम. ए., एम. एड., पीएच. डी. असे शिक्षण झाले असून ‘आर्थिक भूगोल’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. “ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील महादेव कोळी समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासाच्या समस्या आणि संभावना” हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांनी अनेक पेपर्स सादर केले आहेत.

डॉ. उगले यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.  सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समितींवर कार्यरत असून यापूर्वी ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व अधिसभेचे सदस्य होते.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी या नात्याने त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला असून त्याबद्दल विद्यापीठाकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

पाणी, नदी स्वच्छता आणि लहान धरणांचे महत्व या विषयांमध्ये ते काम करतात.  त्यांच्या या कामाची दखल घेऊन स्वयंसेवी संस्था आणि केंद्र सरकार यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मएसो गरवारे महाविद्यालायाच्या मैदानावर देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शरयू साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या महाविद्यालय सल्लागार समितीचे मा. अध्यक्ष श्री. देवदत्त भिशीकर, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, मएसो कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. या वेळी महाविद्यालयांचे आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकवृंद, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. उमेश बिबवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मएसो मुलांचे विद्यालयात झालेल्या स्वातंत्रदिन सोहळ्यात शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती शर्मिला जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. त्यानंतर ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमानुसार ‘पंचप्राण शपथ’ सर्वांनी घेतली.
शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. आनंदराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. शाळेचे माजी विद्यार्थी, पालक ध्वजवंदनाच्या या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्य पदाची सूत्रे डॉ. किशोर संपतलाल देसर्डा यांनी आज (मंगळवार, दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी) स्वीकारली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सुलभा पाटोळे यांच्याकडून त्यांनी ही सूत्रे स्वीकारली.

डॉ. देसर्डा हे म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे माजी विद्यार्थी असून  एम.ए. (अर्थशास्त्र), एम.ए. (कम्युनिकेशन), एम.एस्स.डब्ल्यू., एम.एस्सी. (सायकॉलॉजी), एम.कॉम., एम.बी.ए., जी.सी.डी. अँड ए., पीएच.डी. असे त्यांचे शिक्षण झाले आहे. यापूर्वी ते वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर होते.

डॉ. देसर्डा यांना अध्यापन, प्रशासन आणि संशोधन क्षेत्रातील २८ वर्षांचा अनुभव असून त्यांचे ३० पेक्षा अधिक पेपर्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत.

सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बघण्यासाठी खुला

प्राचीन भारताच्या संस्कृतीची आणि भौगोलिक व्याप्तीची माहिती देणारा त्रिमिती नकाशा मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. २२ जुलै २०२३) करण्यात आले.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बसविण्यात आलेल्या ‘प्राचीन भारत’ त्रिमिती नकाशाच्या अनावरणप्रसंगी (छायाचित्रात डावीकडून) इंजि. सुधीर गाडे, बाबासाहेब शिंदे, प्रा डॉ. शरयू साठे, आनंदीताई पाटील, प्रदीपजी नाईक, ऋषिकेश राऊत, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, आनंदराव कुलकर्णी, देवदत्त भिशीकर.

म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे आणि संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. धनंजय चंद्रात्रे यांच्या संकल्पनेतून शिल्पकार श्री. ऋषिकेश राऊत यांनी हा त्रिमिती नकाशा साकारला आहे. तो १५ फूट x १० फूट आकाराचा असून प्राचीन भारतातील विद्यापीठे, पर्वतरांगा, नद्या, ज्योतिर्लिंग, चारधाम, शक्तिपीठे, कुंभस्थान इत्यादी ठिकाणे, विविध प्रदेश व गावांची प्राचीन नावे या नकाशामध्ये दाखविण्यात आली आहे. त्यातून प्राचीन काळातील भारताच्या भौगोलिक व सांस्कृतिक वैभवाची ओळख सर्वांना होत आहे.

सर्व शिक्षण संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा नकाशा बघण्यासाठी खुला आहे.

म. ए. सो. चे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अनावरण समारंभाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदी पाटील व मा. उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. शरयू साठे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. धनंजय चंद्रात्रे आणि शिल्पकार श्री. ऋषिकेश राऊत यांच्या या वेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

समारंभाचे प्रास्ताविक करताना आर्कि. राजीव सहस्रबुद्धे म्हणाले की, महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये प्राचीन भारताचा नकाशा बसविण्याचा विचार पुढे आला आणि त्यातून साकार झालेल्या या त्रिमिती नकाशामुळे देशाच्या संपन्न सांस्कृतिक वारशाची ओळख सर्वांना होईल.

या प्रसंगी बोलताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, निसर्गाचे वरदान लाभल्याने आपला देश कृषि आणि सांस्कृतिकदृष्ट्या कायमच समृद्ध राहिला आहे. त्यामुळे आपल्या या सुजलाम सुफलाम देशावर कायमच आक्रमणे होत राहिली. तरी देखील आपण संपूर्ण जगाला संस्कृतीचे दान दिले. त्याच्या पाऊलखूणा आजदेखील जगाच्या विविध भागात आढळतात. देशातील तरूण पिढीला आपल्या देशाचा समृद्ध वारसा आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या वीरांची ओळख करून दिली पाहिजे. स्वातंत्र हे गृहित धरून चालणार नाही त्यामुळे देहाकडून देवाकडे जात असताना आपण आपल्या देशाचे देणे लागतो याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. आपला देश जितकी प्रगती करतो तितकाच मागे देखील येतो. त्यामुळे समाजमन अधिक जागृत करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्राचीन भारताचा हा नकाशा निश्चितच प्रेरणादायी आहे.

शिल्पकार श्री. ऋषिकेश राऊत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्राचीन भारताचे गतवैभव प्रदर्शित करणारा हा त्रिमिती नकाशा साकारण्यासाठी खूप संशोधन केले अनेक ग्रंथांमधून संदर्भ शोधले आणि त्यातून तपशील मिळाले. त्यातून भूगोल आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध लक्षात आला. आपल्या राज्याला महाराष्ट्र का म्हटले जाते याचा संदर्भ पुराणात सापडतो. देशातील अनेक ठिकाणांच्या बाबतीत हेच आढळून येते. काळाच्या ओघात अशा महत्वाच्या गोष्टी आपण विसरलो, परंतू प्राचीन भारत त्रिमिती नकाशातून हे आता सर्वांना समजेल.

समारंभाचे सूत्रसंचालन श्री. पांडुरंग कंद यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दशरथ वाघ यांनी केले.

 

 

पुणे, दि. १९ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (आयएमसीसी) महाविद्यालयाला राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधिस्विकृती परिषद म्हणजेच ‘नॅक’तर्फे करण्यात आलेल्या मुल्यांकनात फर्स्ट सायकलमध्ये ‘अ+’दर्जा मिळाला आहे. हे मानांकन पाच वर्षांसाठी आहे.

‘नॅक’ चा ‘अ+’ दर्जा मिळाल्यामुळे मएसो आयएमसीसीचा एक नवा प्रवास सुरू झाला असून आगामी पाच वर्षांमध्ये इन्स्टिट्यूटला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवायचे आहे अशी भावना इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

कॉम्प्युटर आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ख्यातनाम असलेल्या ‘आयएमसीसी’मध्ये एमसीए, एमबीए, पीएच.डी. आणि डीटीएल हे अभ्यासक्रम शिकवले जात असून सुमारे ६५० विद्यार्थी या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. ८० टक्के प्लेसमेंट हे इन्स्टिट्यूटचे वैशिष्ट्य असून येथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

कोल्हापूरमध्ये महसूल खाते व  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आयोजन

म.ए.सो. व्यक्तिमत्व विकास केंद्र आणि बॅरिस्टर नाथ पै फाऊंडेशनतर्फे कोल्हापूरमधील महसूल खात्यातील सुमारे १०० कर्मचाऱ्यांसाठी दि. ७ जून २०२३ रोजी ‘मनः स्वास्थ्याची गुरूकिल्ली’ ही कार्यशाळा घेण्यात आली. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सुमारे १२० कर्मचाऱ्यांसाठी दि. ८ जून २०२३ रोजी याच विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या दोन्ही कार्यशाळांना चांगला प्रतिसाद मिळाला.

म.ए.सो. व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे यापूर्वी पोलीस, महानगरपालिका शाळेतील शिक्षक, वस्ती विभागातील युवक-युवती यांच्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांनी इ. १२ वी च्या परीक्षेत मिळवलेल्या यशाची एकत्रित तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांची स्वतंत्र माहिती खालीलप्रमाणे …

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐!!!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळांवर मा. कुलगुरूंनी सदस्यांचे नामनिर्देशन केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधील प्राध्यापकांचा समावेश आहे.
संस्थेच्या वतीने या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!

म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली व एम.ई.एस. पब्लिक स्कूल, कळंबोली या शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि म.ए.सो. ज्ञानमंदिर प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आज (शनिवार, दि. २९ एप्रिल २०२३) रोजी सकाळी १०.३० वाजता शाळेच्या प्रांगणात पार पडला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांची विशेष उपस्थिती होती.

शाला समितीचे मा. अध्यक्ष व म. ए. सो.च्या नियामक मंडळाचे सदस्य श्री. देवदत्त भिशीकर, शाला समितीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेचे माजी महामात्र प्रा. वि. ना. शुक्ल, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सविता काजरेकर, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक प्रतिनिधी , विद्यार्थी प्रतिनिधी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक, हितचिंतक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. डॉ. गोविंद कुलकर्णी व त्यांच्या सौभाग्यवती माया कुलकर्णी यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच देवी सरस्वती व संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

मा. श्री. देवदत्त भिशीकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. ते म्हणाले की, भविष्यातील विद्यार्थी संख्येचा अंदाज घेऊन शाळेसाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करण्यासाठी संस्थेने वेळीच पाऊल उचलले आहे आणि संस्था या पुढे देखील अशीच मदत करत राहील.

शाळेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. ‘देखणी ती पाऊले ध्यासपंथी चालतात’ या उक्तीनुसार शाळेमध्ये सन्माननीय पदाधिकाऱ्यांची पावले पडल्यामुळे शाळा विकासाकडे वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१९९७ साली शाळा सुरू झाली आणि तेव्हापासून शाळेचा आलेख वाढताच आहे. शाळेच्या या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणाऱ्या ‘रौप्यधारा’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आर्कि. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छां दिल्या.

मा. प्रदीप नाईक यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अवलंब करत शाळा आणखी प्रगती करेल अशी आशा व्यक्त केली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या प्रसंगी बोलताना म्हणाले की, नवीन विद्यार्थी भरती करणे हा शाळेचा उद्देश नाही तर नवीन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व शिस्त रुजवणे हा उद्देश आहे आणि ही मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे.

आभार प्रदर्शन सौ. प्रियांका फडके यांनी तर सूत्रसंचालन सहा. शिक्षक श्री. दत्तात्रय म्हात्रे यांनी केले.

म.ए.सो. ज्ञानमंदिर शाळेतील गायक वृंदाने सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता झाली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
सादर करत आहे

कथामाला

सादरकर्ते : म. ए.सो.भावे प्राथमिक शाळा, पुणे

🪔🪔🪔🪔🪔🪔

📣कथा- नवनिर्मिती विज्ञानक्षेत्रातील डॉ.महेंद्रलाल सरकार यांचे योगदान

🖌️लेखन-जयंत सहस्त्रबुद्धे

🎤वाचक स्वर- रेणुका महाजन

Scroll to Top
Skip to content