महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ येथे दि. २७,२८ व २९ नोव्हेंबर २०२४ असे तीन दिवस ‘रंगवेध’ हे चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’च्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमधील इ. १ ली ते इ. १२ वी तील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी चित्रे पाठवली होती. त्यातील निवडक ३५० चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ही माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष व एम.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि ‘म.ए.सो. कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी आज (सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४) पत्रकारांशी संवाद साधताना दिली दिली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी, ‘रंगवेध’ प्रदर्शनाचे समन्वयक अनिल म्हस्के, कलाशिक्षक गोपाळ खंडाळे, पर्यवेक्षिका सौ. सुजाता टेकाडे उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द शिल्पकार श्री. प्रमोद जी कांबळे यांच्या हस्ते बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ . ३० वाजता होणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता होणार आहे. प्रसिध्द व्यंगचित्रकार श्री. चारुहास पंडित या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तसेच म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती राहणार आहे.
हे चित्रकला प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शिरवळ ग्रामस्थ, पालक आणि कला रसिकांसाठी खुले असेल. शिरवळ आणि परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत हे प्रदर्शन बघता येणार आहे.
या दोन दिवसात सुंदर हस्ताक्षर, अक्षर लेखन, टाकावूतून टिकाऊ, कागदकाम, स्थिर चित्र, स्मरण चित्र अशा विविध विषयांवरील प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. मएसोच्या शाळांमधील कलाशिक्षक उमेश पवार, राजगौरी जगताप, माधुरी जगताप, नयना दिनकर हे विद्यार्थ्यांना या कला प्रकारातील विविध कौशल्ये उलगडून दाखवणार आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ कार्यरत आहे. मनातील कल्पनांना मूर्तरूप देण्याचे प्रभावी साधन म्हणजे चित्रकला! म्हणूनच ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ तर्फे दरवर्षी ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांना व्यासपीठ मिळवून देण्यात येते. या पूर्वी पुणे, बारामती, पनवेल येथे संस्थेच्या शाळांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ च्या माध्यमातून ‘रंगवेध’ प्रमाणेच दरवर्षी गायनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वरवेध’ आणि विविध स्वरुपाच्या वाद्यवादनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘तालवेध’ या स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने २०२३ सालापर्यंत क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे ध्येय निश्चित केले होते, आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये या संकल्पाचा उल्लेखदेखील करण्यात आला होते. मात्र, संस्था २०२४ मध्येच क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास सिद्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेने आता अधिक मोठे ध्येय बाळगले पाहिजे,” अशी अपेक्षा संस्थेचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज (मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर २०२४) व्यक्त केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६४ व्या वर्धापनदिनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे संस्थेच्या कार्याची दिशा स्पष्ट करताना म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थापकांनी संस्थेची स्थापना केली, तो वारसा आपण पुढे नेत आहोत ही आनंद आणि अभिमानाची बाब आहे. १६४ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने नेहमीच कालानुरूप बदल केले आहेत. संस्थेच्या नवीन नियामक मंडळाने वर्षाच्या सुरवातीलाच एक चिंतन बैठक घेऊन त्यामध्ये काही संकल्प केले, ते पूर्ण करण्यासाठी निश्चित योजना, उपक्रम आखण्यात आली आणि त्यादृष्टीने आज आपण समाधानकारक प्रगती केली आहे. आगामी वर्षात आपल्या संस्थेचे लॉ कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल. संस्थेने क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. समाजातील सर्व घटकांना आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देताना निधीची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यादृष्टीने प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी कृतज्ञता निधी संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या संस्थेचे कार्य आता जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील सुरू झाले आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार करत असताना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामामुळे समाधान देखील मिळते. समाजावर शिक्षणाचा परिणाम झाली की समाजाचा शिक्षणावर परिणाम झाला याचे भान बाळगले पाहिजे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी अधिक कृतिशील होण्याची गरज आहे. देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्ये देखील सांगितली आहेत. सभ्य आणि सुसंस्कृत विद्यार्थी म्हणजेच पर्यायाने समाज घडविण्यासाठी आपण प्रत्येकाने नागरी शिष्टाचार, पर्यावरणाचे संरक्षण, कुटुंबाचे प्रबोधन, कोणाच्या मनात न्यूनगंड, वेगळेपणाची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आणि समाजातील सर्वांना सामावून घेणे ही पंचसूत्री व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. संस्थेच्या विविध शाखांमधून शिकणाऱ्या चाळीस हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत आपण पोहोचविले पाहिजेत.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि मएसो सिनिअर कॉलेज यांच्या वतीने गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यातील संगम पुलाजवळील गुन्हे अन्वेषण विभागाच्या आवारात असलेल्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे मा. सदस्य श्री. विजय भालेराव, श्री. अजय पुरोहित, मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.









जग्वार, मिराज – २०००, सुखोई – ३०, तेजस, राफेल अशी नावं ऐकली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. सैन्यदलांची प्रात्यक्षिके आणि त्यांचे विविध माध्यमातून होणारे प्रसारण, चित्रपट आणि व्हिडीओ गेम्स, क्वचित प्रसंगी दूरवर आकाशात होणारे दर्शन एवढाच तो काय आपला या लढाऊ विमानांशी येणारा संबंध. त्याचा प्रत्यक्ष थरार अनुभवण्याची संधी फारच दुर्मिळ. या लढाऊ विमानांच्या मॉडेलची प्रात्यक्षिके आपल्याला काही प्रमाणात का होईना त्या थराराचा अनुभव देऊन जातात, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ‘दुधाची तहान ताकावर …’ अशी भावना निर्माण करत ही प्रात्यक्षिके आपल्या मनात लढाऊ विमानांबद्दलची उत्सुकता ताणून जातात. ड्रोनच्या रुपाने झालेल्या क्रांतीमुळे आता तर वैमानिकाशिवाय विमान ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे.
देशाच्या राजधानीत या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्यदलातील महिलांच्या लक्षणीय सहभागामुळे “हाय जोश” मध्ये असलेल्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींना ही रोमहर्षक प्रात्यक्षिके बघून “गगन ठेंगणेच” वाटायला लागले होते. अशा वातावरणात “इच्छाशक्ती पुढे सर्व अडथळे हार मानतात, त्यामुळे आयुष्यात कधीही हार मानू नका.” हा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि पॅराऑलिंपियन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी दिलेला संदेश विद्यार्थिनींसाठी मोलाचा ठरला.
म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, स्त्री साक्षरतेचे महत्व पटवून देणारे सावित्रीबाई फुले आणि म. ज्योतिबा फुले, ताराबाई मोडक तसेच मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक वि. वा.शिरवाडकर तथा कवि कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, कवयित्री शांता शेळके यांच्या व्यक्तीरेखा विद्यार्थ्यांनी या प्रसंगी सादर केल्या. या कार्यक्रमाला म.ए. सो. भावे प्राथमिक शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. वृषाली ठकार आणि आदर्श शिक्षिका मा. सौ. दीपाली कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. सौ. दीपाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना खूप छान गोष्ट सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन नृत्यगीते सादर केली. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
कळंबोली येथील एम. ई. एस. पब्लिक स्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिना’चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सांगितले. ह्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी समुहगीते सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मराठी दिवसाचे महत्त्व सांगितले. अशाप्रकारे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाराव्या ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या बेसबॉल खेळाडू कु. रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. १९ जानेवारी २०२४) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे होते.

कोणत्याही साधनांशिवाय केलेले सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार, संगीताच्या तालावर केलेल्या सामुहिक कृतींमधून नजरेत भरणारी लयबद्धता, परस्पर समन्वय आणि सांघिक भावनेचे होणारे दर्शन, गंभीर मंत्रोच्चारासह घातलेले सूर्यनमस्कार आणि केलेली योगासने, सळसळत्या वयाला साद घालणाऱ्या उडत्या लयीच्या गाण्यांवरील एरोबिक्सची, संयम आणि सांघिकतेची जाणीव करून देणारे मनोरे, एरोबिक्स पॉम्पॉमवर थिरकणारी अल्लड पावले, ढोल-ताशाच्या तालावर खेळली गेलेली लेझीम अन् झांजा आणि शिवकन्यांचा जोशपूर्ण अविष्कार दाखविणारी शिववंदना बघून उपस्थितांची मने भारावून गेली होती, मनात नवी पिढी आणि भविष्यातील भारताबद्दलचा अभिमान भरून पावला होता. निमित्त होते, ‘युवा चेतना दिन’कार्यक्रमाचे!
निसर्ग नृत्य, स्कार्फ नृत्य, पाँम-पाँम नृत्य, टाळ नृत्य, टिपरी नृत्य, लेझीम असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून विद्यार्थ्यांनी ‘युवा चेतना दिन’च्या कार्यक्रमात उपस्थितांची मने जिंकली.
“संपूर्ण महाराष्ट्रात ८ ते १० लाख विद्यार्थी स्पर्धा परिक्षांची तयार करतात, त्यापैकी दीड ते दोन लाख विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यात येतात. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर अधिकारी तयार होतात. सरकारी व्यवस्थेतून परिवर्तन घडवता येते. त्यामागे सेवेची भावना असणे महत्वाचे असते. केवळ जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिने स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करू नये. सध्या या स्पर्धा परिक्षांबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे, परंतू या परिक्षांच्या तयारीतून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनाचे व्यापारीकरण न करता चांगले अधिकारी घडवण्याच्या हेतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र चालवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशा शद्बात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी संस्थेची भूमिका मांडली.
या प्रसंगी बोलताना मा. निहाल कोरे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांसाठी दीर्घकाळ कराव्या लागणाऱ्या तयारीमुळे वय हातून निसटते असा भ्रम निर्माण केला जातो परंतू, स्पर्धा परिक्षांची तयारी ही आपण आपल्यामध्ये केलेली गुंतवणुक आहे, त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र परिवर्तन होते. इतरांच्या दृष्टीने जेव्हा यशाची किंवा ध्येय गाठण्याची आशा मावळते तेव्हा आपल्याकडे ठाम विश्वास असायला हवा. स्वतःशीच संघर्ष करायचा असतो, त्यामुळे आपण स्थितप्रज्ञ असायला हवे. ध्येयप्राप्तीसाठी प्रतिकूल परिस्थितीत देखील सोईसुविधांची फिकीर न करता कष्ट करण्याची मानसिकता आवश्यक आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी नाकारण्यातली ताकद खूप मोठी असते. तारूण्य, त्याग, तपश्चर्या आणि संघर्ष यातून भव्य-दिव्य घडेल याची खात्री बाळगा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मा. बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी मा. सौ. आनंदी पाटील यांची आज ( मंगळवार, दि. १२ सप्टेंबर २०२३) निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या सचिवपदी मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांची तर सहाय्यक सचिवपदी मा. सुधीर भोसले यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी सौ. आनंदी पाटील आणि बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




