‘म.ए.सो. कलावर्धिनी’चे ‘रंगवेध’ चित्रकला प्रदर्शनाचे २७ मार्चपासून आयोजन

पुणे, दि. २३ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ तर्फे तीन दिवसीय ‘रंगवेध’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७, २८ व २९ मार्च २०२६ रोजी कासार आंबोली येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रंगवेध चित्रकला प्रदर्शनाचे हे ५ वे वर्ष आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रसिद्ध नेत्र शल्य विशारद व चित्रकार डॉ. माधवी मेहेंदळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.
मएसोच्या पुणे शहर, कासार आंबोली, सासवड, बारामती, अहिल्यानगर, शिरवळ, कळंबोली, पनवेल व बेलापूर येथे असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली निवडक चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासून मएसो कलावर्धिनीतर्फे चित्रकला, संगीत, नाट्य, नृत्य, शिल्पकला इ. कलाविषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, अशी माहिती मएसो कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती देताना मएसो कलावर्धिनीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले की, सुमारे २५००० हजार विद्यार्थी वर्षभरात या प्रदर्शनासाठी व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, संकल्पचित्र, स्मरणचित्र, वस्तुचित्र अशी विविध स्वरुपाची चित्रे आपल्या आवडीनुसार रेखाटतात. विद्यार्थ्यांनी वर्षभरात काढलेली ही चित्रे शाळेतील ‘मएसो कलावर्धिनी आर्टवॉल’वर प्रदर्शित केली जातात. या चित्रांची शालेय स्तरावर देखील स्पर्धा आयोजित होत असते. त्यातील निवडक चित्रे आंतरशालेय स्तरावर या स्पर्धेसाठी निवडली जातात. त्यातील सुमारे ३५० निवडक चित्रे रंगवेध चित्रकला प्रदर्शनासाठी पाठवली जातात. यावेळी होणाऱ्या स्पर्धेत इ. १ ली ते ४ थी, इ. ५ वी ते ७ वी, इ. ८ वी ते १० वी, इ. ११ वी आणि १२ वी अशा ४ गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी पारितोषिके दिली जातात.
या प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे कला संचालक व सुप्रसिद्ध चित्रकार मा.डॉ. किशोर इंगळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक असतील. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांची यावेळी विशेष उपस्थिती असेल.
हे चित्रकला प्रदर्शन रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वा. पासून दिवसभर सर्व शाळांमधील विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी खुले रहाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम यज्ञरामन्, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, सिनिअर मास्टर संदीप पवार व समन्वयक रविराज थोरात यांनी केले आहे.
