Month: December 2018

आपल्या विद्यालयाचा २० वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा गुरुवार, दि.२७ डिसेंबर २०१८ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘जागर जाणिवांचा ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात सादर करण्यात आला. 

भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. 

या वेळी शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ. सौ. अर्चना कुडतरकर आणि शाळेचे महामात्र डॉ.अतुल कुलकर्णी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते. हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. 

र्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी केले.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या पाच छात्रांची यावर्षी राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी निवड झाली आहे. ऐश्वर्या खैरनार, आसावरी तानवडे, रितीका जाधव, मंगेश गोळे आणि आकाश थोपटे हे ते छात्र आहेत. एन.सी.सी. च्या पुणेस्थित २ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.पी.एस. मौर्य तसेच कर्नल एस. नारायनील आणि कॅप्टन संदीप नवले यांचे या छात्रांना विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. गेल्या सलग सात वर्षांपासून या महाविद्यालयातील छात्रांची राजधानीतील संचलनासाठी निवड होत असून २०१३ पासून १६ छात्रांनी राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
या वर्षी निवड झालेली ऐश्वर्या खैरनार ही छात्रा मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची माजी विद्यार्थिनी आहे.

 

पद्मभूषण आबासाहेब गरवारे यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मएसो आबासाहेब गरवारे कॉलेज आणि मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन्ही महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार, दि. २१ डिसेंबर २०१८ रोजी मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास यशस्वी मराठी उद्योगिनी व ‘पूर्णब्रह्म’ या सर्वात मोठ्या मराठमोळ्या हॉटेल शृंखलेच्या संचालिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर ‘पूर्णब्रह्म’ च्या जागतिक प्रमुख वृषाली शिरसाव या देखील उपस्थित होत्या. याप्रसंगी दोन्ही महाविद्यालयातील वर्ष २०१७-२०१८ मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा सौ. कठाळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. “कशालाही न घाबरता सचोटीने आणि आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुनिश्चित वाटचाल” हा यशाचा मूलमंत्र सौ. कठाळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी अतिशय रंजक शैलीत, प्रभावीपणे केलेले अनुभवकथनाने सर्व श्रोते भारावून गेले. 

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे दरवर्षी कै. आबासाहेब गरवारे यांचा जयंतीदिन ‘उद्योजकता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यानिमित्त दोन दिवसीय राज्यस्तरीय बिझनेस फेयर (उद्योग मेळावा) आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन सौ. कठाळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात, महाविद्यालयांत गेल्या १६ वर्षांपासून उद्योजकता विकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. गीता आचार्य यांच्या प्रयत्नांचा गौरव केला तसेच मूल्याधिष्ठित शिक्षणातून सकस समाज निर्मितीसाठी म.ए. सो. सारख्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.बी. बुचडे यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थचे सचिव व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी तसेच गरवारे ट्रस्टतर्फे मा. श्री. सुनील सुतावणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजकता विकास केंद्रप्रमुख डॉ. अर्चना जोशी यांनी तर आभार प्रदर्शन कॉमर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. भूषण राठोड यांनी केले.


 

मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीयर कोर्सेसचे (आयएमसीसी) संचालक म्हणून डॉ. संतोष देशपांडे यांची पुणे विद्यापीठाच्या निवड समितीने निवड केली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात डॉ. देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. 

डॉ. देशपांडे हे आत्तापर्यंत आयएमसीसीचे प्रभारी संचालक म्हणून काम पहात होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत.

किर्लोस्कर फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलला प्रादेशिक भाषा माध्यमाच्या शाळांच्या गटात प्रथम क्रमांक तर इंग्रजी भाषा माध्यम शाळा गटात बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलला द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समितीच्या सदस्यपदी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समितीच्या सदस्यपदी आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य-सचिवपदी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. श्यामाताई घोणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकत्याच या समित्या पुनर्गठित केल्या असून पुढील तीन वर्षांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षि शाहू या महापुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी स्वतंत्र समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांच्या माध्यमातून या महापुरुषांशी संबंधित सर्व अप्रकाशित साहित्य, लेखन आणि संशोधनाचे काम तसेच अनुवाद, संपादन आणि प्रकाशन अशी कामे करण्यात येतात. या ग्रथांना महाराष्ट्राबरोबरच देशात आणि परदेशात मोठी मागणी आहे. 

या नियुक्तीबद्दल प्रा. सुधीर गाडे व डॉ. श्यामाताई घोणसे यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

बारामतीमधील म. ए. सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालयातील विद्यार्थिनी कु. राधिका संजय दराडे हीने विभागीय स्तरावर १७ वर्षे वयोगटासाठीच्या सायक्लिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी कु. राधिकाची निवड झाली आहे. शाळेच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन!

पुणे जिल्हा परिषदेच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुशू स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या खेळाडूंनी विभाग स्तरावर उज्वल कामगिरी बजावली आहे. शाळेतील सात विद्यार्थिनींनी पदके पटकावली आहेत. 

१) धनश्री सुतार – इ. १० ब – सुवर्ण पदक – राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली. 

२) श्वेता डोईफोडे – इ. १० ब – रौप्य पदक 

३) तनया कोऱ्हाळे – इ. ११ अ – रौप्य पदक 

४) दिव्या निखाडे – इ. १२ अ – रौप्य पदक 

५) इशा दलभंजन – इ. १० ब – कांस्य पदक 

६) ऋतुजा घाडगे – इ. १२ अ – कांस्य पदक 

७) रूतिका गोळे – इ. १२ अ – कांस्य पदक 

सर्व खेळाडू तसेच मार्गदर्शक श्री.विक्रम मराठे सर आणि रोहिणी ताई यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन!

क्रीडाभारती पुणे महानगर आयोजित १४ वर्षे वयोगटातील आंतरशालेय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालय बारामती मुलींच्या संघाने अहिल्यादेवी मुलींच्या शाळेस 38- 23 च्या फरकाने अंतिम फेरीत मात करून प्रथम क्रमांक पटकावला.

 

म.ए.सो. रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलमध्ये कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गुरुवार, दि. ६ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ‘परिक्रमा’ नृत्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. 

सुप्रसिद्ध नृत्यांगना सुचेता भिडे – चाफेकर यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्याने त्यांच्या सर्व शिष्यांनी मिळून त्यांना दिलेली गुरुदक्षिणा म्हणजे ‘परिक्रमा’ नृत्यमहोत्सव!

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर होते. म.ए.सो. तर्फे नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर यांचा सत्कार एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा या कार्यकमात सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे , उपाध्यक्ष डॉ. माधवजी भट व आजीव मंडळाच्या सदस्या डॉ. मानसी भाटे हे उपस्थित होते.

 

“ज्या शाळेत घडलो, वाढलो त्या शाळेसाठी खासदार निधी उपलब्ध करून देणे हे मी माझे कर्तव्य समजतो” अशा शब्दात शाळेचे माजी विद्यार्थी आणि राज्यसभेतील खासदार अमरजी साबळे यांनी शाळेबद्दलची कृतजता व्यक्त केली. महाराष्ट् एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन राज्यसभेतील खासदार मा. श्री. अमर साबळे यांच्या हस्ते सोमवार, दि. ३ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत खा. साबळे यांनी दिलेल्या निधीतून शाळेमध्ये ६० संगणक व ७ प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, शाला समितीचे अध्यक्ष व संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य अॅड. धनंजय खुर्जेकर, शाळेचे महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. राजकुमार छाजेड, राजीवजी देशपांडे, समितीचे समन्वयक पी.बी. कुलकर्णी, मुख्याध्यापक विजय सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. “मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्यासाठी संगणकाचा उपयोग करता येऊ शकतो. देशातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत असे म्हटले जाते. त्यामुऴे, तिथे प्राथमिक व मूलभूत गरजा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक उपक्रम आपण हाती घेतला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसल्ला आणि सुविधा त्यांच्या गावांत मिळाव्यात यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे. ही व्यवस्था उभी राहिली तर ती एक क्रांती घडेल. सामाजिक जाणीवेचा हा संस्कार मला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मिळाला. पारंपारिक शिक्षण पद्धती आणि जगातील उत्तमोत्तम शिक्षण पद्धतीचा मेळ घालून संगणकाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. समाजातील विविध समस्या, विसंवाद, ताणतणाव दूर करण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे,” अशी अपेक्षा खा. साबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केली. खा. साबळे १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असून त्यांचे सहाध्यायी तसेच त्यांचे शिक्षक एम.डब्ल्यू. जोशी सर, चावरे सर व झाडबुके सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. धनंजय खुर्जेकर यांनी केले. ते म्हणाले, “ दृकश्राव्य माध्यमामुळे शिक्षण मनावर ठसते, शिकवण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्याचे महत्त्व आहे. खा. साबळे यांनी दिलेल्या निधीमुळे शाळेत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूमची निर्मिती शक्य झाली आहे. मात्र शाळेतील १९७८ सालच्या बॅचनी दिलेली ही देणगी आहे अशीच खा. साबळे यांची भावना आहे, ही विशेष बाब आहे. संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षात ते संस्थेसाठी अधिक योगदान देतील अशी आपण आशा करूया.” आपल्या भाषणात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे म्हणाले की खा. साबळे यांनी स्वखुशीने दिलेल्या निधीतून शाळेत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूम उभी राहिली आहे. त्यांच्या निर्मितीसाठी ते केवळ निधी न देता अतिशय आत्मीयतेने त्यासंबंधात सातत्याने पाठपुरावा करत होते. ‘मएसो’च्या शाळेत होणाऱ्या संस्कारांमुळे घडणाऱ्या व्यक्तिमत्वाचे उदाहरण म्हणजे मा. अमर साबळे हे आहेत. संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवात ते आजपेक्षा अधिक मोठ्या पदावरून सहभागी होतील अशी आशा आपण करूयात. संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “सामाजिक जाणीव असलेला नेता कशा पद्धतीने विचार करतो हे खा. साबळे यांच्या भाषणातून दिसून आले. शिक्षणाच्या क्षेत्रात आज सर्व जागतिक दर्जाच्या आणि आधुनिक सुविधा असल्या पाहिजेत. खा. साबळे यांनी आपल्या शाळेसाठी त्या उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!” १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सौ. माधवी लिमये (शाळेतील श्री. पावसकर सरांची कन्या) यांनी भावना व्यक्त केल्या. धनंजय मेळकुंदे यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक विजय सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

 

म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी भारत विकास परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हैदराबाद येथे रविवार, दि. २ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या अंतिम फेरीत शाळेच्या संघाने हे यश मिळविले आहे. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री मा.आर. के. सिंह, पी. गोपीचंद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

या स्पर्धेत शाळेच्या संघाने हिंदी विभागात “फिर आज भुजाएँ फडक उँठी, हम पर प्रहार करनेवाले चिंता करें अपने प्राणों की…” हे गीत सादर केले. संस्कृत विभागात भारतभूमीची महती सांगणारे “जयतु जननी जन्मभूमी पुण्यभुवनं भारतं…” हे गीत तर लोकगीत विभागात महाराष्ट्रातील कोळी-धनगर गीते व भारुड, गोंधळ यांची शृंखला सादर केली. शाळेच्या विद्यार्थ्यांचे सूर आणि तालबद्ध सांघिक गायन ऐकून सभागृहातील श्रोते भारावून गेले आणि त्यांनी नकळत तालदेखील धरला. 

राष्ट्रीय भारत विकास परिषद या संस्थेतर्फे संस्कृत, हिंदी आणि लोकगीत अशा तीन विभागात जिल्हा, राज्य, प्रांत आणि त्यानंतर राष्ट्रीय अशा चार स्तरांवर ही स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक स्तरावरप्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघाचीच पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. संपूर्ण भारतातून पाच हजार शाळांमधील संघ या स्पर्धेत सहभागी होतात. त्यातून केवळ ७ शाळांच्या संघाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. 

अतिशय स्पर्धात्मक कसोट्यांवर झालेल्या या स्पर्धेत मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विजेतेपद मिळवून स्पर्धेवर शाळेची आणि महाराष्ट्राची मोहोर उमटविली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर व शिक्षिका सौ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळविले आहे.

Click Here For the Video