निसर्ग नृत्य, स्कार्फ नृत्य, पाँम-पाँम नृत्य, टाळ नृत्य, टिपरी नृत्य, लेझीम असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून विद्यार्थ्यांनी ‘युवा चेतना दिन’च्या कार्यक्रमात उपस्थितांची मने जिंकली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे म. ए. सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी खेळ व शारीरिक प्रात्याक्षिके सादर करतात. यावर्षी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवी मुंबईमधील नवीन पनवेल, कळंबोली आणि बेलापूर या तीनही ठिकाणच्या विद्यालयांचा ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रम शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता कळंबोलीतील म. ए. सो. ज्ञानमंदिर व म. ए. सो. पब्लिक स्कूल या विद्यालयांच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू मा. नामदेव बडरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. आनंद लेले, डॉ. गोविद कुलकर्णी, डॉ. रविकांत झिरमिटे, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे मा. नामदेव बडरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी म. ए. सो. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व मएसो गीत सादर केले.
मा. सुधीर भोसले यांनी म. ए. सो. च्या शाळांमध्ये क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
विद्यार्थ्यांनी आपले शरीर सुदृढ ठेवावे आणि त्यासाठी दररोज व्यायाम करावा, बलोपासना करावी असा सल्ला मा. नामदेव बडरे यांनी मनोगत व्यक्त करताना दिला. तसेच संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि संस्थेचे नाव जगभर पसरावे यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात मा. बाबासाहेब शिंदे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.
ऑलिम्पिक खेळाडू आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त मा. ललिता बाबर यांनी युवा चेतना दिनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास म. ए. सो. चे हितचिंतक, निमंत्रित, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. कविता जगे यांनी केले.
शाळेचे महामात्र डॉ. रविकांत झिरमिटे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता म. ए. सो. ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘वंदे मातरम्’ने झाली.
संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.