सासवडमधील म.ए.सो. वाघीरे हायस्कूल या शाळेच्या ‘दुस-या मजल्याच्या पूर्ण झालेल्या बांधकामाचा उद्घाटन समारंभ’ आणि येथील तंत्रशिक्षण विभागाचे ‘स्व. डॉ. सीता कुलकर्णी तंत्र-शिक्षण विभाग’ असे नामकरण हे दोन्ही कार्यक्रम मंगळवार, दिनांक २२ ऑगस्ट २०१७ रोजी अतिशय उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात पार पडले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), स्व. डॉ. सीता कुलकर्णी यांचे चिरंजीव डॉ. श्यामकांत कुलकर्णी, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, वाघीरे हायस्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.बी. कुलकर्णी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाला समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर यांनी केले. ते म्हणाले, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही अग्रगण्य शिक्षण संस्था असून गेल्या 157 वर्षात संस्थेने असंख्य सुसंस्कृत आणि जबाबदार नागरीक घडविले आहेत. आज शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असतानाही संस्थेचे हे ध्येय कायम आहे. ग्रामीण भागात चांगले आणि स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने सासवडमध्ये शाळा सुरु केली. शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी मूलभूत सुविधा आवश्यक असतात. ‘मएसो’च्या सर्वच शाखांमध्ये अशा सुविधा उपलब्ध आहेत. सासवडमधील शाळेच्या प्रांगणात संस्थेने दुसऱ्या मजल्याचे वाढीव बांधकाम पूर्ण करून 7 वर्गखोल्यांची भर घातली आहे. त्यामुळे जागेची अडचण दूर होत आहे. संस्थेने सासवडच्या शाळेतील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे.”
डॉ. श्यामकांत कुलकर्णी हे शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आपल्या मातोश्री स्व. डॉ. सीता कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळेला देणगी दिली आहे. त्यामुळे शाळेच्या तंत्रशिक्षण विभागाचे ‘स्व. डॉ. सीता कुलकर्णी तंत्र-शिक्षण विभाग’ असे नामकरण करण्यात आले. विशेष म्हणजे हे दोघेही जण मएसो वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून आई आणि मुलाने एकाच वेळी म्हणजे सन 1953 मध्ये मॅट्रीकच्या परीक्षेत यश मिळविले होते. या परीक्षेत श्यामकांत कुलकर्णी यांनी शाळेत पहिल्या क्रमांक पटकाविला होता.
आपल्या आठवणींना उजाळा देताना डॉ. श्यामकांत कुलकर्णी म्हणाले की, “माझ्या आईला शिक्षणाची आवड होती. ती याच शाळेत हिंदी विषयाची शिक्षिका होती. तिने आम्हा मुलांना केवळ अभ्यास करायला शिकवले नाही तर लिहीयाचे कसे हे देखील शिकवले. एवढेच नाही तर अगदी रागवायचे कसे आणि भांडायचे कसे हे देखील शिकविले. ती अतिशय स्वाभिमानी होती. शाळा-महाविद्यालयातील अभ्यासक्रम संपला तरी आयुष्यभर शिक्षण चालूच असते. त्यामुळे भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही जीवन-शिक्षणात गुरुच असते.”
स्व. डॉ. सीता कुलकर्णी यांचे जुने सहकारी श्री. रामकृष्ण कदम यांनी देखील आपल्या आठवणी यावेळी सांगितल्या. “पुण्यातील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी सीता कुलकर्णी यांना एम.ए.चा अभ्यास करण्यास मज्जाव केला आणि एम.ए. करावयाचे असेल तर राजीनामा देण्यास सांगितले. सीता कुलकर्णी यांनी दोन मिनिटांमध्ये आपला राजीनामा लिहून मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला. त्यांचा तो स्वाभिमानी बाणा बघून मी अचंबित झालो. त्या क्षणापासून म्हणजे 1962 पासून त्यांचा आदर्श माझ्यासमोर आहे. सीता कुलकर्णी यांच्याकडून मी कायमच शिकत आलो आहे, म्हणूनच आज 80 व्या वर्षीदेखील मी पी.एचडी. चा अभ्यास करीत आहे.”
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “शिक्षण कधीच संपत नाही असे मानणारे विद्यार्थी हाच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वारसा आहे. अनेक आव्हानांना तोंड देत शिक्षण घेतलेल्या एका महिलेच्या स्मरणार्थ शाळेला मिळालेल्या देणगीमुळे भविष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. ‘मएसो’च्या शाखांमध्ये केवळ शिक्षण दिले जात नाही तर तिथे संस्कारही केले जातात. त्यामुळे वाघीरे शाळेतील शिक्षकवर्गावर मोठी जबाबदारी आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांवर केवळ लक्ष ठेवून चालणार नाही तर त्यांना जाणून घेणेदेखील खूपच आवश्यक झाले आहे.” डॉ. श्यामकांत कुलकर्णी यांनी केलेल्या सूचनांचे संस्था तंतोतंत पालन करेल अशी ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली.
संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. कुलकर्णी यांचे नातेवाईक, तसेच शिक्षक व अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.बी. कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. संगीता रिकामे यांनी केले.