“परिस्थिती आपल्याला शिकवत असते, पण आपण त्यातून काय शिकतो हे महत्वाचे आहे. केवळ अभ्यासातच हुशार असून चालणार नाही. अभ्यासात हुशार नसतानाही अनेकजण जीवनात यशस्वी होतात. सौ. विमलाबाई गरवारे यांनी कायम भविष्याचा वेध घेतला. महाराष्ट्रातील मुले-मुली हुशार आहेत, परंतू ती स्वतःला व्यक्त करण्यात आणि सादरीकरणात कमी पडत असल्याने त्यांची हुशारी दिसून येत नाही. त्यामुळे बोलायला शिका, त्यातूनच आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सापडत जातात. प्रत्येकाने अवांतर वाचन केले पाहिजे, मनःशांती, तणावमुक्ती आणि आनंद मिळवण्यासाठी कलागुण जोपासले पाहिजेत,” असा सल्ला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील सुतावणे यांनी माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवंतांना दिला. 

सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जन्मदिनानिमित्त माध्यमिक शालांत परिक्षेत (इ. १० वी) उल्लेखनीय यश मिळवलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा शनिवार, दि. १४ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. विमलाबाई गरवारे यांच्या शाळेतील अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, शाळेचे महामात्र सुधीर गाडे, मुख्याध्यापक अविनाश वाघमारे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा गायकवाड व शाळेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

माध्यमिक शालांत परिक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळवलेला चिन्मय उदय दामले (९५.६० टक्के), दुसरा क्रमांक मिळवलेली गौरी नंदकुमार कोंडे (९२.६० टक्के) तसेच विभागून तिसरा क्रमांक मिळवलेल्या नेहा विनोद बाफना आणि अंकिता दिनेश पाटील (प्रत्येकी ९२.४०टक्के) या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गरवारे ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी पांच हजार रुपयांचे पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन कौतुक करण्यात आले. 

कु. नेहा विनोद बाफना या विद्यार्थिनीने प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत मांडले. 

अबोली साने आणि आर्या पळशीकर या विद्यार्थिनींनी सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. 

शाळेचे महामात्र सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “प्रत्येकाची परिस्थिती भिन्न असते. परंतू दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची, समाजाला देण्याची परंपरा आपल्या देशात आहे. सौ. विमलाबाई आणि आबासाहेब गरवारे हे दांपत्य त्याचेच उदाहरण आहे. नोकरीचा विचारही न करता व्यवसायात मानाने उभे राहण्यासाठी सौ. विमलाबाईंनी आबासाहेबांना पूर्णपणे पाठिंबा दिला. आपल्या मुलांना व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळेतच घातले. त्यासाठी मुलांना परदेशातही पाठवले. लग्न होऊन एकत्र कुटुंबात गेल्यानंतर त्यांनी कुटुंब उत्तम प्रकारे सांभाळले परंतु भविष्याचा विचार करून त्यांनी आपल्या मुलांमधील भावबंध घट्ट करत स्वतंत्र संसार थाटायला लावला. नरसेवा हीच नारायण सेवा ही शिकवण आचरणात आणून त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांच्या जीवनातून मिळणारी ही शिकवण आजच्या विद्यार्थिनींनी आचरणात आणली पाहिजे आणि हीच सौ. विमलाबाई गरवारे यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका अर्चना लडकत यांनी केले.

 

 

Scroll to Top
Skip to content