जगातील सर्वोत्तम शिक्षण मराठीतून देण्याचा सरकारचा प्रयत्न

“जगभरातील सर्वोत्तम शिक्षण मराठी माध्यमातून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल आणि अशा शिक्षणाच्या बळावर तो खेड्यात किंवा जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी तो उत्तम काम करु शकेल,” अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आज येथे दिली. सोळंकी हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील सर्व शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षा (इ. १०वी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१२वी) यामध्ये प्रथम आलेल्या ३५ गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, किशोर पंप्स प्रा. लि. चे कार्यकारी संचालक किशोर देसाई, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. कर्वे रस्त्यावरील म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. मएसो ज्ञानवर्धिनीतर्फे यावर्षीपासून इ. ६ वी तील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तिकेचे प्रकाशन विशाल सोळंकी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. “आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी ज्याप्रमाणे देशात क्रांतीची मशाल पेटवली, त्याचप्रमाणे देशात आता नव्या शैक्षणिक क्रांतीची सुरवात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करू शकेल,” असा विश्वास सोळंकी यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याचे काम शाळा करते. आता मात्र तुम्हाला स्वतःचा प्रवास स्वतःच करायचा आहे. त्यामुळे स्वतःसा ओळखायला शिका. जीवनात आपल्याला काय करायचे आहे ते आत्ताच ठरवा, त्यातूनच समाधान मिळेल आणि कामाचा आनंद मिळवू शकाल. जिद्द असलेल्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाला नियती नेहमीच साथ देते. आपला प्रत्येक विद्यार्थी यशस्वी आणि चांगला नागरीक कसा होईल यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कायमच प्रयत्नशील राहिली आहे. संस्थेने तुम्हाला आत्तापर्यंत सर्वकाही दिले आहे आता संस्थेला तुमचा अभिमान वाटेल असे काम करून दाखवा.” किशोर देसाई आपल्या भाषणात म्हणाले, “ जगात आपली कोणत्यातरी एका कौशल्यासाठी ओळख असणे गरजेचे आहे, परंतू एका विषयात प्रावीण्य मिळाले म्हणून थांबणे योग्य ठरणार नाही. शालेय-महाविद्यालयीन जीवनात जास्तीत जास्त अनुभव घेतला पाहिजे, त्यातून संवेदनशीलता वाढते. संवेदनशीलता वाढण्यासाठी मातृभाषेतून शिकण्याचीही आवश्यकता आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आपल्या शिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षक घडवित आहे ही बाब कौतुकास्पद आहे कारण ज्या संस्थांना शिक्षकाचे महत्व कळते त्या संस्थेचे विद्यार्थी खूप मोठे होतात. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षमाबाबत निर्णय घेत असताना आपल्या देशात आता खूप संधी आहेत याचे भान बाळगणे आवश्यक आहे. सर्वच कंपन्या संशोधनाच्या कामासाठी फार मोठी गुंतवणूक करत असल्याने भविष्यात शास्त्रज्ञांची फार मोठी गरज लागणार आहे. आज आपल्या देशात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे, परंतू शारीरिक कष्ट करावे लागणाऱ्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे, ही गंभीर बाब आहे. जीवनात न्याय, निती आणि धर्माने वागून यश मिळवता येते त्यामुळे काहीही करून मोठे होण्याची मनोवृत्ती निर्माण होऊ देवू नका. समाजासाठी केलेले काम हे परमेश्वरासाठी केलेले काम असते त्यातून मनःशांती मिळते आणि समाजात चांगुलपणाही मिळतो.” गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने मानस गाडगीळ आणि आकांक्षा बुटाला या विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कार्याचा विस्तार आणि त्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. गोविंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *