म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत आयोजित करण्यात आलेले ‘शौर्य’ साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या पारितोषिक वितरण समारंभाला म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे व महामात्र श्री. सुधीर भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी, शाळेचे उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्याम नांगरे व संदीप पवार या प्रसंगी उपस्थित होते.
प्रा. शैलेश आपटे यांनी आपल्या भाषणात, शौर्य शिबिरातून मुलांनी आपण टी.व्ही. व मोबाईलशिवाय देखील दूर राहू शकतो हे सिद्ध केले आहे. मुलांनी मैदानावर रोज किमान २ तास तरी खेळलेच पाहिजे असे सांगितले. या प्रसंगी सर्व शिबिरार्थींचा प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शिबिरार्थी व त्यांच्या पालकांनी देखील या वेळी मनोगत व्यक्त केले.
लहान वयातच साहसाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्यांच्यात स्वयंशिस्त निर्माण व्हावी यासाठी शौर्य शिबिरात घोडेस्वारी, रायफल शूटिंग, धनुर्विद्या,ऑबस्टॅकल, वॉल क्लायंबिंग, रोप मल्लखांब इ. साहसी क्रीडा प्रकार तसेच शिल्पकला, रांगोळी, वारली पेंटिंग, विविध व्यक्तिमत्व विकसन व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे उपप्रमुख महेश कोतकर यांनी केले तर संदीप पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपाली लडकत यांनी केले.
मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स,पुणे येथे २२ ऑक्टोबर २०१९ पासून होणार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची कार्यशाळा….
“विद्यार्थी दशेत मिळवलेले ज्ञान व अनुभव यांच्या आधारेच आयुष्यात कर्तृत्व सिद्ध करता येते आणि अशाच व्यक्तींना जगात महत्त्व मिळते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेतलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींची संख्या फार मोठी आहे, त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, या गुणवंतांमध्ये आपली गणना व्हावी अशी जिद्द मनाशी बाळगा. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांची ख्याती आज जगभरात आहे. त्यामुळेच १६० व्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या ‘मएसो’चे ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे घोषवाक्य आजही प्रत्यक्ष अनुभवास येते. देशाच्या प्रगतीत ‘मएसो’ निश्चितच योगदान देईल. संस्थेने काळाची गरज ओळखून आता व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर द्यावा,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे प्रभारी तंत्रशिक्षण उपसंचालक मा. प्रा. चंद्रकांत कुंजीर यांनी आज येथे केले.
पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच पीएच्. डी. व एम्.फिल. प्राप्त केलेले गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा गौरव समारंभ आज (दि. ११ ऑक्टोबर) म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. कुंजीर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. यावेळी ८५ गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, “प्राध्यापक हे विद्यार्थ्यांचे आदर्श असतात, त्यामुळे प्राध्यापकच पुढील शिक्षण घेऊन स्वतःची शैक्षणिक उंची वाढवताना दिसतात तेव्हा विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते आणि त्यातून मिळालेल्या यशाचा गौरव होतानाचा क्षण कायमच लक्षात राहातो. भविष्यात जेव्हा मागे वळून बघाल तेव्हा ‘मएसो’ने आपल्याला काय दिले याचे महत्व लक्षात येईल आणि आपण या संस्थेचा एक घटक असल्याचा अभिमान वाटेल. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याबरोबरच संस्थेचे नावदेखील मोठे करण्याचा प्रयत्न करा.”
गौरवार्थींच्या वतीने मएसो नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी सपना देवडे, मएसो आयएमसीसीचा माजी विद्यार्थी आकाश मालपुरे, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पीएच.डी. केलेले डॉ. मकरंद पिंपुटकर आणि याच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अंकुर पटवर्धन यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. डॉ. अंकुर पटवर्धन यांनी महाविद्यालयाचे ७५ वे वर्ष आणि संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष (१६०) याचे औचित्य साधून संस्थेला ५० हजार रुपयांची देणगी दिली.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.
पुणे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये म.ए.सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. २८ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे … कु.संस्कृती माने (ई.पी. प्रथम), कु.सिद्धी काळे (सेबर द्वितीय), कु.भाग्यश्री गांगुर्डे (सेबर तृतीय), कु.अनुष्का राऊत (सेबर तृतीय), चि.रेहान तांबोळी (सेबर प्रथम), चि.प्रणव दळवी (ई.पी. तृतीय)
वरील सर्व विद्यार्थ्यांची अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर व क्रीडा शिक्षिका सौ.कविता भैरट यांनी विद्यार्थांचे कौतुक केले.
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक व “आपलं घर ” संस्थेचे संस्थापक श्री. विजय फळणीकर यांचा म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ. साधना फळणीकर यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्रीमती अरुणा देशमुख, श्रीमती प्रतिभा भट, श्री. नितीन विधाते, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे, श्री.संदीप पवार हे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात श्री. फळणीकर यांनी सांगितले की, “घरची परिस्थिती खूपच प्रतिकूल असल्याने संघर्ष करावा लागला व त्या संघर्षातूनच आपल्याला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा मिळाली व त्यामुळेच ‘आपलं घर’ च्या माध्यमातून समाजाच्या सुख – दुखाशी एकरुप होता आले.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्या डॉ. सुलभा विधाते म्हणाल्या की, श्री. विजय फळणीकर यांचे कार्य एखाद्या दीपस्तंभासारखेच आदर्शवत आहे. या प्रसंगी लेखक श्री. फळणीकर यांनी स्वतः लिहीलेली सामाजिक जाणीवा जागृत करणारी प्रेरणादायी पुस्तके शाळेला भेट दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती दिपाली आंबेकर यांनी केले तर श्री. अनंत कुलकर्णी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक श्री. अद्वैत जगधने व पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी ‘गोडबोले ट्रस्ट’च्या अंतर्गत केले.
दक्षिण कोरियामध्ये झालेल्या नवव्या आशियाई योग विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल मुळशीतील रहिवासी व आंतरराष्ट्रीय योगासनपटू कु. श्रेया शंकर कंधारे हीचा म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्रेया हीची आई सौ. वर्षा कंधारे यांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदुशेठ भोईर, श्री. सुभाष शिंदे, श्री. महादेव काटे, माणचे माजी उपसरपंच श्री. तानाजी पारखी, श्री. सूर्यकांत साखरे, श्री. नितिन विधाते, शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे, श्री. संदीप पवार हे उपस्थित होते.
याप्रसंगी सैनिकी शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधींना प्राचार्या डॉ. सुलभा विधाते व कु. श्रेया कंधारे यांच्या हस्ते रँक देण्यात आली. यानंतर कु. श्रेया हिने सादर केलेल्या योगासनांची प्रात्यक्षिके बघून सर्व विद्यार्थिनी, पालक व शिक्षक अचंबित झाले.
आपल्या मनोगतामध्ये कु्. श्रेया हिने रोजचा ८ ते १० तास सराव, आई-वडिल, शिक्षक, मार्गदर्शक, डॉक्टर यांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी कु. श्रेया हिच्यासारखे खेळाडू आपले आदर्श असले पाहिजेत असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. संदीप पवार व श्री. शाम नांगरे यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय म्हणजे पूर्वीच्या पेरुगेट भावे स्कूलचा २४ सप्टेंबर हा वर्धापनदिन. त्यानिमित्त शाळेत आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेच्या संस्थापकांना अभिवादन करण्यात आले.
शाळेत झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक आर.डी. भारमळ यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या परंपरेची माहिती दिली.
संस्थेच्या मुख्यालयात असलेल्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून संस्थापकांना अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, विजय भालेराव, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव सुधीर गाडे, संस्थेच्या मुख्य कार्यालयातील उपप्रबंधक अजित बागाईतकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
म.ए.सो.बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलने “वैज्ञानिकांशी गप्पागोष्टी” हा उपक्रम आयोजित केला असून देशातील ज्येष्ठ वैज्ञानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आपले अनुभव सांगतानाच ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. या उपक्रमातील तिसरे व्याख्यान पदमविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांचे झाले.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आवर्जून उपस्थित होते. तसेच मोहन मोने व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर हे देखील उपस्थित होते.
डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. मंगला नारळीकर यांच्यासारख्या दिग्गज वैज्ञानिकांना भेटण्याची संधी मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून आपले प्रश्न तयार ठेवले होते. गुरुत्वाकर्षण लहरींचे उपयोजन होऊ शकते का? असल्यास कशाप्रकारे असू शकते? यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. नारळीकर सरांनी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या जगात नेले. मुलांना आव्हानात्मक प्रश्न विचारलेले आवडतात हे नेमके हेरून नारळीकर सरांनी विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडणारे प्रश्न विचारले. त्यामुळे विज्ञानविषयक गप्पा चांगल्याच रंगल्या.
डॉ. मंगला नारळीकर मॅडमना देखील गणितातील अनेक प्रश्नांची उकल विचारली. मोठी माणसे कोणतीही चांगली गोष्ट राखून ठेवत नाहीत याची प्रचितीच जणू या कार्यक्रमात आली. गणितातील विविध अडचणींवर मात करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आपणच शोधायचे असतात त्यातूनच सर्जनशीलता वाढेल हे त्यांनी यावेळी नमूद केले.
“जय जवान, जय किसान आणि आता जय विज्ञान” या उक्तीप्रमाणे काळाची गरज लक्षात घेऊन मुख्याध्यापिका सौ.गीतांजली बोधनकर यांच्या कल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर शिक्षण तज्ञ म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील गोविंद दि. कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मएसो मुलांचे विद्यालय (पेरुगेट भावे स्कूल) मधील शिक्षक अनिल म्हस्के यांची मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अलिकडेच या दोन्ही नियुक्त्या केल्या आहेत.
‘कसबा गणपती’, पुण्याचा मानाचा पहिला गणपती. या गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळे’तील विद्यार्थिनींनी रोप मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
पुण्याच्या मा. महापौर मुक्ता टिळक, पुण्याचे खासदार मा. गिरीश बापट तसेच सैनिकी शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि नगरसेविका सौ. गायत्री खडके यांनी आवर्जून ही प्रात्यक्षिके बघितली.
‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्त्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य व शालासमिती सदस्य श्री. बाबासाहेब शिंदे, प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे, शाला समिती महामात्रा डॉ. मानसी भाटे तसेच प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार तसेच प्रशालेतील शिक्षकगण व पालक रोप मल्लखांबाच्या पथकासमवेत विसर्जन मिरवणुकीत उपस्थित होते.
‘कसबा गणपती’च्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शाळेच्या पथकाला ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे सदस्य अॅडव्होकेट सागर नेवसे यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो क्रीडावर्धिनीतर्फे इ. १ ली ते इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी मएसो क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यात येते.
या स्पर्धेत २०२० सालापासून सांघिक सूर्यनमस्काराचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांना सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेचे स्वरुप व नियमावली यांची माहिती करून देण्यासाठी मएसो क्रीडावर्धिनीतर्फे मंगळवार, दि. १७ सप्टेंबर २०१९ रोजी ‘मएसो’च्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांसाठी सांघिक सूर्यनमस्कार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मएसो मुलांचे विद्यालयातील गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला मएसोच्या प्राथमिक शाळांमधील २८ शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, महामात्र सुधीर भोसले, समन्वयक प्रा. शैलेश आपटे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.
मएसो क्रीडावर्धिनीच्या सल्लागार समितीचे सदस्य व सूर्यनमस्कार मार्गदर्शक मनोज साळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिकांसह सराव करून घेतला.
मएसो बाल शिक्षण मंदिर मराठी शाळेतील शिक्षिका सौ. प्रमिला कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सांगली,कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या घटक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी जमा केलेला सुमारे १५ लाख ५० हजार रुपयांचा निधी आज (सोमवार, दि. ९ सप्टेंबर २०१९) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीकडे सूपूर्द करण्यात आला. ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष गणेश बागदरे यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. यावेळी जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह विनायकराव डंबीर, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे सदस्य देवदत्त भिशीकर, ‘मएसो’चे साहाय्यक सचिव सुधीर गाडे, ‘मएसो’च्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. आनंद लेले, ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, प्रा. शैलेश आपटे, मएसो कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारुशीला बिराजदार तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मा. सहस्रबुद्धे म्हणाले की, “दरवर्षी दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती येत असून पुनर्वसनासाठी जनकल्याण समितीच्या निधी संकलनाला ‘मएसो’ प्रतिसाद देते. यापुढे अशा कारणासाठी निधी संकलनाची वेळ येऊ नये. समितीच्या एखाद्या नव्या प्रकल्पासाठी ‘मएसो’ आवश्यक असलेली सर्व मदत करेल.”
सांगली आणि कोल्हापूर भागातील पूरपरिस्थितीत जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची माहिती देताना मा. डंबीर यांनी सांगितले की, ” पूरात अडकलेल्या सांगलीमधील ५० हजार नागरिकांची तर कोल्हापूरमधील ३८ हजार नागरिकांची तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. २००५ साली या परिसरात आलेल्या पूरासारखी परिस्थिती यावर्षी निर्माण होणार नाही अशी नागरिकांची अटकळ होती, त्यामुळे अनेकजण कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नव्हते. पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या २३५ नागरिकांचे प्राण वाचविण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, जनकल्याण समिती व रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना यश आले. एका तासात एक हजार फूड पॅकेट्स वाटण्यात आली. सांगली व कोल्हापूरमधील ६ हजार ८०० जणांची १४ केंद्रामध्ये आठ दिवस निवाऱ्याची सोय करण्यात आली तसेच एक लाख पूरग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बैठकीत जनकल्याण समितीवर या भागातील आरोग्य व स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर स्थानिक तसेच राज्याच्या विविध भागातून सेवाकार्यासाठी आलेल्या सुमारे १५०० कार्यकर्त्यांनी ८ दिवसात स्वच्छेतेचे काम पूर्ण केले. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर होणाऱ्या आजारांचे प्रमाण अतिशय कमी होते. देशाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला ८५० कार्यकर्त्यांनी एका रुग्णालयात सलग १२ तास स्वच्छता केल्याने ६० खाटांची सुविधा सुरू होऊ शकली. पुनर्वसनाच्या काळात ४७ हजार आपत्तीग्रस्तांवर उपचार करण्यात आले. चारशे गुरांचे जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच एका गावात अडकलेल्या नागरिकांना चार दिवसांनंतर जेवण मिळू शकले. रा.स्व. संघ जनकल्याण समितीने सांगली जिल्ह्यातील चार तालुके व १२ वस्त्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २ तालुक्यांत पुनर्वसनाचे काम करण्याचे ठरविले असून कुरुंदवाडमधील मोडकळीला आलेली शाळा दत्तक घेतली आहे. या कामासाठी जमा झालेला निधी उपयोगात आणण्यात येणार असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीदेखील त्यांचा सामाजिक कृतज्ञता निधी समितीला देणार आहेत.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर गाडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन आंबर्डेकर यांनी केले.