“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या बोधवाक्याला अनुसरून गेल्या १६० वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. विद्यार्थी घडविताना संस्थेच्या सर्व घटकांमध्ये आत्मीयता निर्माण झाली आहे, म्हणूनच विशाल स्वरुपाचा ‘मएसो परिवार’ आकाराला आला आहे. १६० वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीनंतर आता पुढील वाटचाल करताना संस्थेने नाविन्याचा विचार केला पाहिजे. शौर्य, सांस्कृतिक पाया आणि ज्ञानाधिष्टित शिक्षणाचा विचार केला पाहिजे. आजपर्यंत आपल्या देशात केवळ पाश्चिमात्य संकल्पनेवर काम होत राहिले, आता आपल्या देशासाठी आवश्यक शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित असलेले योगदान संस्था निश्चितच देईल,” असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज व्यक्त केला.

संस्थेच्या १६० व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. अभय क्षीरसागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. एन.एस. उमराणी व संस्थेचे हितचिंतक, देणगीदार व संस्थेचे माजी विद्यार्थी, ‘सावली’ संस्थेचे संस्थापक मा. श्री. वसंत ठकार व त्यांचे सहकारी तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत करताना संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे म्हणाले की, संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांच्या ऑनलाईन व्याख्यानांचा लाभ सर्वांना मिळाला. या व्याख्यानांमुळे संस्थेच्या कार्याची माहिती देशपातळीवर पोहोचण्यास मोठी मदत झाली. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याला मिळालेली प्रसिद्धी उत्साहवर्धक आहे.

संस्थेचे एक हितचिंतक, देणगीदार व संस्थेचे माजी विद्यार्थी, ‘सावली’ संस्थेचे संस्थापक मा. श्री. वसंत ठकार यांनी यावेळी संस्थेला भरघोस निधी दिला. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कामाचा विस्तार फार मोठा असला तरी त्यात एकोपा आहे. त्यामुळेच मी परत एकदा संस्थेशी जोडला गेलो. संस्थेचे अध्यक्ष भूषणजी गोखले आजदेखील नवीन विषय शिकण्याचा संकल्प करत आहेत यावरून शिक्षण कधीच संपत नसते, ते निरंतर चालूच राहाते हे स्पष्ट होते. आजकाल आपल्या पालकांची विचारपूस देखील न करण्याच्या काळात १६० वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना करणाऱ्या संस्थापकांचे स्मरण आणि अभिवादन करत आहे, हे विशेष आहे.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या भाषणात म्हणाले की, संस्थेने भविष्याकडे वाटचाल करताना आता ‘Good Education & Good Governance’ चा अंगीकार केला पाहिजे. १६० वर्षांपूर्वी १०x १० फूट आकाराच्या खोलीत मराठी विषयाच्या वर्गाच्या रुपाने सुरू झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा विस्तार ७० पेक्षा अधिक शाखा आणि असंख्य विषय शिकवण्यापर्यंत झाला आहे. या सर्व कार्याच्या इतिहास लेखनाचे काम साडेतीन वर्षांपूर्वी सुरू झाले आणि आज ते पूर्णत्वास गेले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. एन.एस. उमराणी यांनी विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “आपल्या संस्थापकांच्या विचारसरणीच्या आधारे दैदिप्यमान आणि वैभवशाली वाटचाल करणाऱ्या या संस्थेचा एक भाग असल्याचा खूप अभिमान वाटतो. मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्राचार्य म्हणून काम करताना महाविद्यालयाला शैक्षणिक आणि वैचारिक उंची देण्याचा प्रयत्न केला. उद्योग जगताशी समन्वय साधला. त्यातून वाणिज्य विषयक शिक्षणाचे मॉडेल निर्माण झाले. केवळ नोकरी आणि व्यवसायासाठी उपयोगी शिक्षण न देता जीवनाची उंची वाढवण्यासाठी संस्थेने केलेल्या परिश्रमाची फळे आज दिसत आहेत.”

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांनी या प्रसंगी बोलताना, शेतीच्या तंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज व्यक्त केली. कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टींचे महत्त्व लक्षात आले. आपल्या देशातील ७० टक्के लोकसंख्या आजही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीच्या तंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित होते. संस्थेच्या संस्थापकांनी स्वदेशी शिक्षण, स्वावलंबी आणि देशप्रेमाने भारलेला समाज निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांचे हे हेतू आजदेखील तितकेच संयुक्तिक आहेत, असे ते म्हणाले.

संस्थेचे माजी सचिव मा. प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील निवृत्त अधिकारी श्री. वामन शेंड्ये यांनी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेला निधी दिला.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अवघ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, अभिजात कलांची खाण आणि विद्येचे माहेरघर असलेल्या आपल्या पुण्यनगरीमध्ये, तिचा विशेषपणा जपण्यात आणि तो वाढविण्यात गेली, दीडशे वर्षांहूनही अधिक कालावधी शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था म्हणजेच महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी येत्या १९ नोव्हेंबरला १६० वर्षे पूर्ण करीत आहे. मी स्वतः इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, मराठी माध्यम शाळेतून तर इयत्ता पाचवी ते दहावीचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्याच सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतून पूर्ण केले आहे. इ. दहावीची दुसरी सहामाही खूपच भावनाशील होती. इ. ११ वी व १२ वी चे शिक्षण मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेतले. आयुष्यातले ते फुलपंखी दिवस आजही जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात आणि आपण जे काही आहोत त्याची मुळे किती खोलवर आपल्याला शाळेतून मिळालेल्या संस्कारांमध्ये आहेत याची जाणीव होते.

मला आठवतंय, मी १९७५ साली सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये प्रवेश घ्यायला आले त्या वेळेस हॉलमध्ये असलेल्या १९६१ च्या पूररेषेच्या पातळीची आठवण करून देणाऱ्या खुण-रेषेने माझं लक्ष वेधलं आणि त्यानंतरही शाळा सुस्थितीत असल्याचं आश्चर्य आणि अशा शाळेमध्ये प्रवेश घेत आहोत याचा आत्मीय अभिमान माझ्या बालमनाला त्यावेळी कमालीचा जाणवत होता. शाळेचं ग्रंथालय उत्तमोत्तम ग्रंथ संपदेने नटलेलं होतंच, शिवाय सुसज्ज प्रयोगशाळेमध्ये मुक्त विहार करावयाची मुभाही होती. एकत्र शिक्षण असल्यामुळे आम्हा मुला-मुलींमध्ये मार्क्स मिळविण्यासाठी कायम निकोप स्पर्धा असायची.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले आहे …

“विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी

न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे जी” 

शाळेमध्ये अशी विद्या आणि संस्कार रुजविण्यासाठी ज्या ऋषितुल्य शिक्षक वृन्दाचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि अनमोल सहवास लाभला तो आम्हा विद्यार्थ्यांसाठी अतुलनीय ठेवाच आहे. आमचे अत्रे सर सुंदर अक्षरात संपूर्ण फळ्याचा वापर करायचे. त्यांच्या स्पष्ट आणि करारी आवाजात ज्या पद्धतीने ते इतिहास शिकवायचे त्यातील प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे रहायचे. संस्कृत भाषेची आणि विषयाची अवीट गोडी मेधा ओक बाईंकडून मिळाली, तर विज्ञानाचे केळकर सर दैनंदिन जीवनातले सोपे प्रयोग करायला शिकवायचे. त्यामुळे विज्ञान विषयही आवडायचा. शाळेमध्ये खेळालाही तितकेच महत्व होते. एके वर्षी तर काही अपरिहार्य कारणामुळे शाळेचा वार्षिक स्नेहसमारंभ अचानक रद्द झाला, त्यावेळी गुरुवर्य प्र. ल. गावडे सरांनी अतिशय संयमाने ज्या पद्धतीने आणि कौशल्याने ती परिस्थिती हाताळली त्यावरून अशा कठीण परिस्थितीमध्ये कशाप्रकारे निर्णय घ्यावेत याचा परिपाठच आम्हा विद्यार्थ्यांना मिळाला. मी आठवीत असताना शिक्षकांचा दीर्घकाळ संप सुरु होता, परंतू  संपानंतर जेव्हा शाळा सुरु झाली तेव्हा सर्व शिक्षकांनी शाळेव्यतिरिक्त थांबून संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होवू दिले नाही. त्यावेळेस मात्र माझा अत्यंत आवडता विषय ‘बागकाम’ मात्र करता आले नाही. अशा अनेक आठवणी आहेत त्या मंतरलेल्या दिवसांच्या ज्याने उर भरून येतो, मन भूतकाळात रमून जाते.

मी पुण्याची महापौर झाल्यानंतर शाळेतल्या माझ्या १९८० च्या बॅचने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने माझं कौतुक केलं. त्या समारंभाला माझे सर्व मित्र-मैत्रिणी आणि मला शिकविणारे जवळपास सर्वच शिक्षकवृंद उपस्थित होते. आम्हा सर्वाना अत्यंत आदरणीय असणाऱ्या गुरुवर्य गावडे सरांनी त्या वेळेच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या मित्र-मैत्रिणींनी, माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या शाळेने दिलेल्या या कौतुकाच्या थापेमुळे आणि माझ्यावर व्यक्त केलेल्या विश्वासामुळे मी अधिक उत्साहाने व जोमाने काम सुरु केले. माझ्या आयुष्यातला तो अतिशय आनंदाचा आणि महत्वपूर्ण दिवस होता. जेव्हा-जेव्हा मला निराश झाल्यासारखं वाटतं त्या वेळेस ज्यांच्या पुस्तकांचा मला आधार असतो त्यांनी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे,

“It is a shame to dream small, even when we have  the potential to do something great and noteworthy.”

खऱ्या अर्थाने माझ्या शाळेने व ‘मएसो’च्या प्रत्येक एककाने माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमता आणि सुप्त गुण ओळखून फक्त मोठी स्वप्नेच पहायला शिकवली नाहीत तर ती स्वप्ने पूर्ण करायला, उंच भरारी घ्यायला आमच्या पंखातही  बळ दिले. त्यामुळेच मानसशास्त्रातून एम. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता मी जर्मन भाषेचे शिक्षण घेतले, पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आणि एम.बी. ए. ची पदवीही मिळवली. “हाती घ्याल ते तडीस न्या” हा माझ्या गुरुजनांनी दिलेला वसा जपताना आणि जगताना राजकारणात प्रवेश केला आणि अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावली याचं समाधान वाटतं. खास महिला सक्षमीकरणासाठी ११२ कोटी रुपयांचं बजेट उपलब्ध करून दिलं.

आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारलेल्या ज्ञानवृक्षाच्या छायेत हजारो विद्यार्थी ‘केजी टू पीजी’ शिक्षण घेत आहेत आणि विश्वसंचारी झेप घेत आहेत. खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी, सुसंस्कृत, समाजाभिमुख, सुजाण नागरिक निर्माण करणाऱ्या आणि आपले ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीला दैदिप्यमान अशा निरंतर वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

“शिक्षण हा समाजाचा कणा आहे, त्यामुळे भारतकेंद्रीत शिक्षण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे देशातील भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होईल. हे धोरण आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे आहे. देशाने एकमुखाने या धोरणाचे स्वागत केले आणि त्यातील वैशिष्ट्यांमुळे  जगातील अनेक देशांनी त्यांचे शिक्षण धोरण ठरविण्यासाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर २०२०) डॉ. पोखरियाल यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

डॉ. पोखरियाल आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील. १६० वर्षापूर्वी स्वदेशी शिक्षणाचे महत्व ओळखून देशप्रेम आणि समर्पण भावनेतून शिक्षण संस्था सुरू करणे ही घटनाच विलक्षण आहे. राष्ट्रीय शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या या संस्थेत तयार झालेले विद्यार्थी ज्या-ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले.

पाश्चिमात्य विचारसरणी जगाकडे बाजार म्हणून बघते आपण मात्र संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो. त्यामुळे आपली भावना जगाच्या कल्याणाची असते. या आपल्या शिकवणुकीमुळे आज जग अचंबित झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे मुल्याधिष्ठीत शिक्षणावर भर देणारे व्यापक आणि संपूर्ण परिवर्त घडवून आणणारे धोरण आहे. ते तयार करत असताना समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करण्यात आला. सर्वांची मते विचारात घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षण धोरण सरकारने नाही तर समाजाने तयार केलेले आहे. व्यक्ती आपल्या मातृभाषेतूनच अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे या धोरणात

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यावर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील २२ प्रादेशिक भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्याने शिकावी असा आग्रह आहे. त्यामुळे भाषांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हे करत असताना इंग्रजी भाषेला कोणत्याही प्रकारे विरोध करण्यात आलेला नाही. जपान, जर्मनी, इस्राईल या देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, परिणामी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात या देशांनी विकास साधला आहे.

दीर्घ कालावधीनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण तयार झाल्याची चर्चा होते. प्रत्यक्षात लॉर्ड मॅकॉलेने देशातील समृद्ध शिक्षण परंपरा, भाषा आणि संस्कृति उद्धवस्त करण्यासाठी १५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जीवनमूल्यांवर आधारलेले हे पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. ते सर्वसमावेशक आणि प्रभावी आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची शिकवण माणूस घडवणारी आहे, माणसाचे मशिन बनवणारी नाही. लॉर्ड मॅकॉले नव्या शिक्षण पद्धतीच्या आधारे जेव्हा देशाच्या संस्कृतीवर आघात करत होता, त्याच कालखंडात राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यक्त झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच सहयोग देईल.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आभारप्रदर्शन तर डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

                 डॉ. श्यामा घोणसे

१९ नोव्हेंबर २०२० ला ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षपूर्ती साजरी करत आहे. साध्या सोप्या भाषेत बोलायचे तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे ने महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला अखंडपणे १६० वर्षे आपले अमूल्य योगदान दिलेले आहे. संस्था म्हणून विचार करता हा कालखंड तेजस्वी हिऱ्याला बावन्नकशी सोन्याचे कोंदण लाभावे असा लखलखित, देदीप्यमान असला तरी, कसल्याही सत्ता-संपत्ती-धनदांडगेपणा यांचा वरदहस्त नसल्यामुळे, कसोटी पाहणारा होता.

वामन प्रभाकर भावे, लक्ष्‍मण नरहर इंदापूरकर यांच्यासारखे शिक्षणातून राष्ट्रीय वृत्तीचा जागर करणारे शिक्षक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतीला शिक्षणाची जोड देणारे द्रष्टे सचिव, खजिनदार आणि वैयक्तिक विकासाच्या ध्यासाला समाजहिताची, राष्ट्रीय अस्मितेची जोड देणारा सुजाण पालकवर्ग या त्रिसूत्रीतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची गंगोत्री उगम पावली. त्यामुळेच परकीय सत्तेच्या रोषाचा, लाभालाभाचा विचार न करता ‘मएसो’च्या या ज्ञानगंगोत्रीने आज “केजी टू पीजी” आणि सेवाभावी वैद्यकीय शिक्षणाबरोबरच पत्रकारिता, व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करीत नवीन पिढीला आत्मनिर्भर बनविणारे विविध  अभ्यासक्रम शिकविणाऱ्या ७७ शाखांइतका पल्ला गाठलेला आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या विविध क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने योगदान देत   विशाल रूप धारण केले.                                            .

विविध शाखा विस्तारलेल्या ‘मएसो’चे “क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे” हे बोधवाक्य!

‘मएसो’चा इतिहास खूप मोठा आहे. या प्रवासात चढ-उतार, वाटा, वळणे खूप आहेत. प्राध्यापक म्हणून, आजीव सदस्य, नियामक मंडळ सदस्य आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० वर्षांच्या इतिहासातील आजीव सदस्य मंडळाची पहिली महिला अध्यक्ष म्हणून माझ्या संस्थेबद्दल भरभरून बोलण्यासारखेही खूप आहे. माझा आणि संस्थेचा ऋणानुबंध जवळपास तीन तपांहून अधिक आहे.

शिक्षणाचे होणारे बाजारीकरण, या क्षेत्रात होणारे काही स्तुत्य तर काही काळजीमग्न करणारे बदल, ज्ञानाची विस्तारलेली क्षेत्रे आणि विद्यार्थी-शिक्षकांचे तुटत चाललेले नाते, पालकांचा अनाठाई हस्तक्षेप, बदलती शैक्षणिक धोरणे या सगळ्यांची गेली किमान चाळीस वर्षे मी साक्षी आहे, त्याची घटक आहे. या पार्श्वभूमीवर गेली १६० वर्षे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अक्षुण्ण प्रवास करु शकली; त्याची कारणमीमांसा करीत असताना काही गोष्टी नमूद करायलाच हव्यात. आपापल्या क्षेत्रात नामांकित असूनही संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने, निरलसपणे योगदान देणारे संचालक मंडळ, प्रयोगशील शिक्षक आणि या प्रयोगातही त्यांचे विद्यार्थ्यांशी असणारे आत्मीय नाते, समर्पण वृत्तीचे शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि स्वागतशील, सहकार्य करणारे पालक यांची प्रदीर्घ परंपरा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला लाभलेली आहे. “शिक्षण विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही”, सामाजिक समरसतेचा प्रयोग करीत असताना शिक्षण हे प्रभावी साधन आहे याचे भान आणि जाण असलेले द्रष्टे क्रियावंत मएसोला आरंभापासूनच लाभले. त्यामुळेच त्यावेळची सासवड, बारामतीसारखी छोटी गावे असतील,वैद्यकीय शिक्षणाच्यादृष्ट्या, वैद्यकीय सुविधेच्यादृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या लोटे घाणेखुंटसारख्या दुर्लक्षित भागात, महानगरातल्या माथाडी कामगारबहुल आव्हानात्मक उपनगरात, ‘मएसो’ पोहोचली. स्त्री शिक्षण हा आरंभापासूनच ‘मएसो’च्या ध्येयधोरणातील भाग असल्यामुळे इथे मुलींची संख्याही अधिक आहे. शिक्षणाला आत्मसामर्थ्य-संपन्नतेची जोड देणारी महाराष्ट्रातील मुलींची पहिली सैनिकी शाळा काढण्याचा प्रयोगही इथेच रुजला, बहरला आहे.

हे सारे, यासारखे सारे जे आहे ते, नोंद घेण्यासारखे आहेच. पण यापेक्षाही अधिक महत्त्वाचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने अनेक पिढ्यांशी नाते जोडलेले आहे. म्हणूनच, आजोबा-आजी ते नातवंडे ‘मएसो’चेच विद्यार्थी असल्याचे पिढीजात चित्र दिसते. आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वसंपन्न, मुद्रांकित असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच आपले दररोजचे साधे परंतु सदाचारसंपन्न जीवन जगणारे, प्रतिकूलतेतही आपल्या घासातला घास समाजासाठी  देणारे, चारित्र्यसंपन्न  विद्यार्थी/नागरिक घडविण्याचे कार्यही ‘मएसो’ने केलेले आहे. त्यामुळेच एअरपोर्टवर भेटणारा एखादा रुबाबदार अधिकारी मी ‘मएसो’चा आहे, हे ज्या आत्मीयतेने सांगतो; त्याच आत्मीयतेने,अभिमानाने सांगणारे रिक्षावाले काका सहजपणे भेटतात. कडक सॅल्यूट ठोकत मी ‘मएसो’ची आहे सांगणारी महिला अधिकारी असेल किंवा एखाद्या प्रदर्शनात जिच्या कलाकुसरीचे कौतुक करावे ती व्यावसायिक भगिनी ‘मएसो’ची असते आणि भाजीचा हिशेब चोखपणे देणारी,आत्मियतेने भाजीची पिशवी गाडीत ठेवणारी मैत्रिणी “मी ‘मएसो’ची” असे सांगते तेव्हा कळते मित्रमैत्रीणींनो की, माझी मएसो कशी, कुठे-कुठे, किती प्रभावीपणे रूजली आहे. जेव्हा ‘मएसो’च्या एखाद्या शाखेचे म्हणजे शाळेचे किंवा काॕलेजचे नाव घेतले जाते, तेव्हा मूळ प्रवाह किंवा प्रभाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचाच असतो.

…तर मग आपण आज एकमेकांना शुभेच्छा देऊयात…

आपण एकशे साठ वर्षांचे झालो…१६१ व्या वर्षात प्रवेश केला आहे…

मनःपूर्वक शुभेच्छा आणि

“हो ‘मएसो’… तू आमच्या श्वासात, ध्यासात आणि स्वप्नातही आहेस…

तुझ्यामुळेच आम्ही आहोत, तुझ्यामुळेच आम्ही आहोत, सदैव तुझ्याबरोबरच राहण्याचा आशीर्वाद तू आम्हांला दे!”

  • डॉ. श्यामा घोणसे

“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज आहे. भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी आज केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२०) मा. गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

मयूर कॉलनीत असलेल्या मएसो ऑडियोरिअममध्ये कोविड -१९ महामारीच्या संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

मा. गडकरी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर याद्रष्ट्या व्यक्तींनी देश पारतंत्र्यात असताना स्वदेशी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन देशातील भावी पिढीवर संस्कार करून स्वावलंबी, संपन्न, समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा १६० वर्षांचा इतिहास हा पिढी घडवण्याचा इतिहास आहे.

लहान विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे आणि त्याला एक आदर्श माणूस बनवणे हे समाजासाठी आवश्यक असते. ज्ञान ही अतिशय प्रभावी शक्ती आहे. ज्ञानाच्या आधारे संपत्तीची निर्मिती करणे आवश्यक असल्याने आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान मिळवून आपल्या देशाला जगात नाव मिळवून दिले आहे. पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे. पुण्यातील लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, याचे कारण पुण्यातील शिक्षणसंस्था. पुण्यातील शिक्षण संस्थांनी सुसंस्कारित आणि चांगल्या पिढ्या घडविल्या आहेत. पुण्यात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती राहातात. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची गुणवत्तादेखील वाढली आहे.  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण मिळणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, सृजन, उद्योजकता, शास्त्र, तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वच क्षेत्रात ज्ञान मिळविण्याची गरज आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. एक मोठी शक्ती एवढ्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, कुटुंब पद्धती, शिक्षण पद्धती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहे. संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विश्वकल्याणाचा विचार देणारी भारतीय संस्कृती आणि इतिहास, परंपरा यांचे हेच वैशिष्ट्य आहे की, आपल्या संस्कार पद्धतीमुळे आदर्श नागरिक देखील घडतात. यामध्ये ‘मएसो’ सारख्या शिक्षण संस्थांचा फार मोठा वारसा आहे.

आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, त्याचप्रमाणे फार मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात असलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे, मात्र तशी महत्त्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवित्र विचाराने, निस्पृह, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची गती कमी आहे, ही खेदाची बाब आहे. चांगल्या माणसाचा चांगुलपणा समाजात जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच समाज बदलेल. त्यामुळे निस्पृह भावनेने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करणे, त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे आणि एका चांगल्या समाजातून एक चांगले राष्ट्र निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जीवननिष्ठा आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणेच अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी त्यांच्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत ज्ञानयोगी तयार करताना, त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करताना, संस्काराद्वारे त्यांच्यातील माणूसपण जोपासून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राष्ट्रीय पुनर्निमाणात योगदान देत राहील याचा मला विश्वास आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ज्ञानातून मिळणारी शक्ती विकसित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्यविकास इ. माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी येत्या १९ नोव्हेंबर २०२० रोजी १६० वर्ष पूर्ण करत आहे. संस्थेच्या या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांचे व्याख्यान मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री मा. श्री. रमेश जी पोखरियाल ‘निशंक’ यांचे व्याख्यान बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४.४५ वाजता होणार आहे.

सध्या कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ही दोन्ही व्याख्याने ऑनलाईन माध्यमातून होणार आहेत.

कोथरूडमध्ये मयूर कॉलनीत असलेल्या एमईएस ऑडिटोरीअम येथे मान्यवर निमंत्रितांच्या मर्यादित उपस्थितीत व सरकारी नियमांचे पालन करून ही ऑनलाईन व्याख्याने होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या ‘ध्यासपंथे चालता …’ या ग्रंथाचे प्रकाशन शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात आज (दि. १२ नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी ही माहिती दिली.

यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव सुधीर गाडे उपस्थित होते.

या ऑनलाईन व्याख्यानांमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक आहेत …  https://www.facebook.com/mespune  किंवा  https://www.youtube.com/c/MaharashtraEducationSocietyPuneofficial

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे विख्यात उद्योजक डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना आज सोमवार, दि.२ नोव्हेंबर २०२० रोजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते डॉ. आबासाहेब गरवारे आणि सौ. विमलाबाई गरवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी म.ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य आणि गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी मा. श्री. सुनील सुतावणे, शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, म.ए.सो. चे साहाय्यक सचिव व शालेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, म.ए.सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रामदास अभंग, पर्यवेक्षक श्री.किसन यादव, माजी मुख्याध्यापक श्री.अविनाश वाघमारे आणि प्रशालेचे शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.
मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे तसेच म.ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य व गरवारे ट्रस्टचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. सुनील सुतावणे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
तसेच महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे, म.ए.सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर, वरिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा आगाशे व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षिका श्रीमती स्मिता कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘करिअर वेबिनार’चे आयोजन
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालय, गरवारे काॅलेज ऑफ काॅमर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  अँड करिअर कोर्सेस या ‘मएसो’च्या घटकसंस्थांच्यावतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर वेबिनार’चे आयोजन करण्यात आले आहे. बारावीचा हा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर विविध क्षेत्रे विद्यार्थ्यांना खुणावत असतात, त्यापैकी नेमके काय निवडावे, हा प्रश्नही असतो. ‘स्कोप’ कशात असेल, याचीही पडताळणी सुरू असते. अशा वेळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन कामी येते आणि हे मार्गदर्शन घरबसल्या मिळणार आहे. दि. २३ जुलै ते ३१ जुलै दरम्यान होणाऱ्या या वेबिनारमध्ये…नक्की नोंदणी करा.
डॉ भरत व्हनकटे

पुणे, दि. २७ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधानता आणि प्रतिबंधात्मक योजना हेच दोन उपाय आहेत. सूर्यप्रकाशात कोरोनाचा विषाणू थोडा क्षीण होतो. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे सकाळी फिरायला जाणे शक्य नाही. त्यामुळे ‘डी’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्याची गरज आहे. कोरोना बंदिस्त वातावरणात सहजपणे पसरतो, पण जिथे खेळती हवा आहे अशा ठिकाणी त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत नाही. चंडीगडसारख्या शहरांमध्ये हे दिसून आले आहे. प्रत्येकाने हलकासा किंवा झेपेल इतका व्यायाम केला पाहिजे कारण त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याचा फायदा होत असल्याचे सिद्ध झाले आहे. प्राणायामाबरोबरच विशिष्ट पद्धतीने केलेली जलनेती असे उपाय आपण सहजपणे करु शकतो असे प्रतिपादन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी आज केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांनी आयोजित केलेल्या ‘विनिंग स्ट्रॅटेजिज इन कोविड वॉर’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात डॉ. केळकर बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले(निवृत्त), मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट हे सहभागी झाले होते. ‘मएसो’ च्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर बुकलेट’चे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील (पूर्वीचे जिमखाना भावे स्कूल) इतिहास विषयाचे निवृत्त शिक्षक ना.वा. अत्रे यांचे कालच निधन झाले. त्यांना कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली.

डॉ. केळकर आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, कोरोना हा अतिशय सूक्ष्म विषाणू असल्याने तो दिसत नाही. त्याच्या प्रसारचा अंदाज बांधता येत नसल्याने तो रोखता येत नाही. डोळे, नाक आणि तोंडातूनच कोरोनाचा शरीरात प्रवेश होतो. शरीरात गेल्यावर त्याच्या अनेक प्रतिकृती निर्माण होतात आणि धोका निर्माण होते. त्यामुळे तोंडावर मास्क लावणे अनिमार्य आहे. सुती कापडाचा मास्क वापरणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्जिकल मास्क किंवा एन ९५ मास्क वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे.

कोरोनाच्या प्रसाराचा केंद्रबिंदू सातत्याने बदलत आहे. सुरवातीला तो चीनमधील वुहान हे शहर होते. इटली या देशातील मिलान या शहरांचे शहरात मोठ्या प्रमाणात वुहानमधील नागरिक राहात असल्याने कोरोनाचा केंद्रबिंदू मिलान शहर झाले. त्यानंतर इटली- अमेरिका-इंग्लंड असा त्याचा प्रसार झाला. गेल्या मार्च महिन्यात संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीची जाणीव झाली. त्यानंतर कोरोना महामारी ब्राझिल या देशात पोहोचली आणि आता भारतात फार मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण समोर येत असल्याचे आपण अनुभवत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक देशाने परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या क्षमतेप्रमाणे रणनीती आखली. त्यामुळे प्रत्येक देशात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थिती वेगवेगळी आहे. आपल्या देशातील नागरिकांमध्ये असलेला शिक्षण आणि शिस्तीचा अभाव लक्षात घेता भारताने स्वीकारलेला लॉकडाऊनचा मार्ग अतिशय चपखल ठरला. या काळात आपण देशातील आरोग्य यंत्रणेत मोठी सुधारणा करु शकलो. कोरोनाच्या विषाणूबाबत अद्याप जगाला संपूर्ण आणि नेमके ज्ञान मिळालेले नाही. त्यामुळे त्यावरचा नेमका उपायदेखील अद्याप मिळू शकलेला नाही.

डॉ. केळकर यांनी यावेळी जिज्ञासूंनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन देखील केले.

डॉ. माधव भट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय करून दिला.

पुणे, दि. १२ – प्रत्यक्ष वर्गात दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीला पर्याय नाही. ऑनलाईन शिक्षण ही सध्याच्या आपतकालीन परिस्थितीतील व्यवस्था आहे. त्याद्वारे यावर्षीचा शंभर टक्के पूर्ण करण्याचा संस्थांचा प्रयत्न आहे. ज्यांच्यापर्यंत ऑनलाईन व्यवस्था पोहोचू शकत नाही त्यांना नजिकच्या भविष्यात प्रत्यक्ष शिकवण्याची सोय केली जाईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अतिंम वर्षाच्या परीक्षा न घेतल्यास या विद्यार्थ्यांना भवितव्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. कोरोना महामारीमुळे शैक्षणिक संस्थांचे आर्थिक गणितही बिघडणार आहे. खर्चाची बाजू सातत्याने वाढत आहे आणि उत्पन्नावर चोहोबाजूंनी मर्यादा येत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आर्थिक सहाय्य दिल्याशिवाय यापुढे शिक्षण संस्थांना आपला डोलारा सांभाळणे यापुढे शक्य नाही. त्यामुळे सरकारने शिक्षण आणि शिक्षण क्षेत्र वाचवावे अशी मागणी पुण्यातील आघाडीच्या चार शिक्षण संस्थांनी आज एकत्रितपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजन गोऱ्हे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी या संदर्भात संस्थांची भूमिका मांडली.

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वा. सावरकर सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधीर गाडे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य केशव वझे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले हे देखील उपस्थित होते.

या वेळी मांडण्यात आलेले मुद्दे ….
कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या जगाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात भयंकर महामारीने जीवनाची सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. स्वाभाविकपणे शिक्षण क्षेत्राला देखील अभूतपूर्व परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. जीवनाचे चक्र मूळ पदावर आणण्यासाठी शासनातर्फे अनेक स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. आर्थिक, औद्योगिक, शेती, सेवा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांना संजीवनी देण्यासाठी सरकारकडून होत असलेले प्रयत्न लक्षणीय आहेत. परंतू, शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्राकडे आवश्यक तितक्या गंभीरपणे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पुण्यातील नामवंत आणि शंभर-दीडशे वर्षांपेक्षा जास्त शैक्षणिक परंपरा असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी या चार शिक्षण संस्था यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधत आहेत.

सद्यस्थितीत शिक्षण संस्थांच्या दृष्टीने काही विषय ऐरणीवर आले आहेत, ज्याबाबत तातडीने विचारविनिमय होऊन निर्णय होणे आवश्यक आहे. ते म्हणजे…

१. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात अशी या चारही संस्थांची स्पष्ट भूमिका आहे. परीक्षा न घेता पूर्वप्राप्त गुणांची सरासरी काढून निकाल लागल्यास विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठात प्रवेश घेताना गुणवत्तेच्या निकषांचा विचार करता या विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अशाप्रकारे पदवी देण्यात आली तर भविष्यात संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल. ‘कोरोना बॅच’ असा शिक्का या विद्यार्थ्यांवर बसेल. कोणतीच कंपनी व आस्थापने त्यांना नोकरी देण्यास धजावणार नाहीत.

२. अनुदानित शाळा व महाविद्यालयांना केवळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान दिले जाते. परंतू, इमारत भाडे व देखभाल खर्च, मालमत्ता कर, वीजेचे बिल, शैक्षणिक साहित्य, उपकरणांचा खर्च, दूरध्वनीचे बिल व इतर बाबींसाठी देय असलेले वेतनेतर अनुदान शासनाकडून वेळेत प्राप्त होत नाही. या पेक्षाही दुर्दैवाची बाब म्हणजे या शाळांना सरकार गॅस, वीज, पाणी आणि मालमत्ता कर यांच्या बिलाबाबत कोणतीही सवलत देत नाही. हा सर्व खर्च सांभाळताना सर्वच संस्थांना तारेवरची मोठी कसरत करावी लागते आहे. शासनाकडून शाळा व महाविद्यालयांना वेतनेतर अनुदानापोटी मिळणारा निधी वेळेवर मिळत नाही. तसेच सध्या ५ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदानाचे परिगणन केले जाते. त्यामुळे देय असलेली रक्कम एकतर तोकडी आहे आणि ती सुद्धा मिळत नाही. त्यामुळे सरकारने सदर निधी वाढीव स्वरुपाने व वेळेवर उपलब्ध करून द्यावा. शासनाने मोफत व सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा (RTE) लागू केला आहे. मात्र, शासनाकडून त्यापोटी देय असलेला निधी शिक्षण संस्थांना पूर्ण स्वरुपात व वेळेवर प्राप्त होत नाही. समाजकल्याण खात्याकडून मिळणारे शिष्यवृत्ती अनुदान, वेतनेतर अनुदान, RTE यांचे कित्येक कोटी रुपयांचे अनुदान सरकारकडून येणे बाकी आहे. या सर्व बाबींचा अतिशय अनिष्ट परिणाम शाळा व महाविद्यालयांच्या दैनंदिन शैक्षणिक कामावर होत आहे.

३. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांचे पूर्ण इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये रुपांतर करण्याचा विकल्प मराठी शाळांना देण्याबाबत सरकारी स्तरावर सुरू असलेला विचार अतिशय दुर्दैवी आहे. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले जावे असे जगभरातील शिक्षण तज्ञांनी, वैज्ञानिकांनी वारंवार सुचवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेतून प्राथमिक शिक्षण हवे हे तर्कसुसंगत आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी नवनवीन संकल्पना सहजपणे समजावून घेऊ शकतो, सहजपणे स्वत:ला व्यक्त करू शकतो हाच आजवरचा अनुभव आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण नाकारणे हे त्यांच्या स्वाभाविक प्रगतीच्या आड येणारे आहे. तसेच मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन होण्याच्या दृष्टीने शिक्षणाचे माध्यम मराठी असणे अतिशय आवश्यक आहे. त्याद्वारेच मराठी भाषेतील कला, ज्ञान, तत्वज्ञान यांचे संचित पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित होईल. या बाबी लक्षात घेता पूर्ण इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करणे मराठी भाषेच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखे होईल असे आमचे मत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न होत असताना शाळांमधील शिक्षण पूर्ण इंग्रजी माध्यमातून सुरू करण्याचा विकल्प देण्याचा विचार पुढे येणे हे अनाकलनीय आहे. संत ज्ञानेश्वरांनी “माझा मराठाचि बोलु कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके” असे आत्मविश्वासपूर्वक उद्गार काढले आहेत आणि मराठी माध्यमातून शिकलेल्या अनेक महान व्यक्तींनी देशात आणि जगात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अशा महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिकण्याची संधी नाकारणे योग्य नाही. शासनाने हा विचार सोडून देऊन मराठी शाळांना परत एकदा उर्जितावस्था कशी आणता येईल यासाठी आमच्यासारख्या शंभरपेक्षा जास्त वर्षांची शैक्षणिक ऐतिहासिक परंपरा असलेल्या संस्थांना शासनाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

४. ई-लर्निंगसाठीच्या सुविधा तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी येणारा खर्च मोठा असून तो विद्यार्थ्यांच्या शुल्कातून वसूल करता येणारा नसल्याने त्याचा बोजा शिक्षण संस्थांवरच पडणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात वापरले जाणारे संगणक, इंटरनेटची कनेक्टिव्हीटी, इंटरनेटचा कमी वेग, व्हर्चुअल क्लासरूममध्ये प्रयोगशाळेप्रमाणे प्रात्यक्षिक करता येणार नसल्याने ई-लर्निंगमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करावी लागणार आहे. लॉकडाऊनच्या काळात संस्थांनी ऑनलाईन विविध उपक्रम राबवले आहेत. उदा. ऑनलाईन अध्यापन, शिक्षक प्रशिक्षण इ. यासाठीच्या खर्चाचा भार शिक्षण संस्थाच उचलत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळांमध्ये नव्याने काही पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या सॅनिटायझेशनसारख्या उपाययोजनांवर दीर्घकाळ मोठा खर्च करत राहावा लागणार आहे. सॅनिटायझेशन करून घेण्यासाठी सध्या १ रुपये प्रती चौरस फूट असा दररोजचा खर्च आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या विस्तीर्ण आवारांचा विचार करता हा खर्च प्रचंड आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद करणे हे शिक्षण संस्थांसमोरील मोठे आव्हान आहे.

५. शुल्क वाढ न करणे आणि शुल्क वसुली या बाबत शासनाने दिलेले निर्देश हे शिक्षण संस्थांच्या आर्थिक नियोजनावर घाला घालणारे आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, पायाभूत सुविधांवर होणारा नित्याचा असलेल्या अपरिहार्य खर्च हा जमा होणाऱ्या शुल्कामधूनच भागवावा लागत असल्याने या साठीचा निधी उभा करणे हा शिक्षण संस्थांसमोरील या पुढील काळातील एक अतिशय जटील प्रश्न असणार आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणावर विपरित परिणाम होऊ नये यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाय योजना आणि अखंडित शिक्षणासाठी ई-लर्निंगची सुविधा यासाठी नव्याने कराव्या लागणाऱ्या खर्चाची तोंडमिळवणी शुल्कातूनच करावी लागणार असल्याने संस्थांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
तसेच, शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला दिलेल्या स्थगितीमुळे शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आमच्यासारख्या संस्था शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक संस्था पगारावर करतात. त्याचादेखील आर्थिक भार सदर शिक्षण संस्था उचलत आहेत.

६. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाय योजनांचे पालन विद्यार्थ्यांकडून पूर्णपणे प्रत्यक्षात केले जाण्याची शक्यता वाटत नाही. विद्यार्थी वाहतूक हा देखील या काळातील एक अतिशय चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन शासनाने सर्व बाबींचा साकल्याने विचार करून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत घाई न करता योग्य तो निर्णय घ्यावा.

७. अलीकडच्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार आणि माननीय शिक्षणाधिकारी, पुणे यांच्या परिपत्रकानुसार, पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोणत्याही प्रकारची शुल्क वाढ करू नये, तसेच शक्य झाल्यास त्या शुल्कामध्ये कशाप्रकारे कपात करता येईल हे पहावे, या प्रकारचा आदेश दिला आहे.

सध्याच्या कोविड-१९ महामारीमुळे ज्याप्रमाणे इतर क्षेत्रांना फटका बसलेला आहे, त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांना देखील फटका बसलेला आहे. सध्याच्या सामाजिक आणि इतरही बाबींचा अभ्यास करून आणि शैक्षणिक संस्थांची सामाजिक जबाबदारी आणि दायित्व लक्षात घेऊन, शैक्षणिक संस्था यावर्षी प्रस्तावित असलेली शुल्कवाढही न करण्याचा विचार नक्कीच करत आहेत.

तथापि, शाळा कधीही सुरू झाल्या तरी आस्थापनांची देखभाल व दुरुस्ती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षाकर्मी, स्वच्छता कर्मचारी व इतर सर्वांना वर्षभर पगार द्यावाच लागतो. तसेच वीज, पाणी, दूरध्वनी, मालमत्ता कर इत्यादींचा खर्च वर्षभर सरकारकडून कोणतीही सवलत न मिळता करावा लागतो. त्याबरोबरच ऑनलाईन शिकविण्यासाठी सुद्धा सध्या खर्च करावा लागत आहे आणि संस्था हा खर्च करत आहेत. तसेच वेतनेतर अनुदानही अगदीच तुटपुंजे असते आणि तेही वेळेवर मिळत नाही. सध्याच्या महामारीमुळे प्रवेशावर होणाऱ्या परिणामामुळे शैक्षणिक संस्थांचे आर्थिक गणितही बिघडणार आहे. थोडक्यात, खर्चाची बाजू सातत्याने वाढत आहे आणि उत्पन्नावर चोहोबाजूंनी मर्यादा येत आहेत, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करणे कोणत्याही शैक्षणिक संस्थांना परवडण्यासारखे नाही.

अनपेक्षितपणे विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना शिक्षण संस्थांची आर्थिक घडी पूर्णपणे कोलमडत चालली आहे. त्यामुळे शासनाने अन्य क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्राचा प्राधान्याने विचार करून शिक्षण संस्थांच्या समोरील समस्यांवर कायमस्वरुपी आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात अशी आमची आग्रहाची मागणी आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना (डावीकडून) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजन गोऱ्हे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे.

The roots of the rich Indian classical form of dance hold a long legacy and we at MES have always been proud of inheriting the legacy. MES College Of Performing Arts presents a unique initiative to interact with the best from the field of Performing Arts..

Our Chief Mentor Shri Prasad Vanarase in conversation with Guru Suchetatai Bhide-Chapekar (A internationally acclaimed name in the field of Bharatnatyam) We are privileged to have her as one of our mentors.

Wednesday 20th May, Evening 5 PM 
On our Facebook Page:   https://facebook.com/events/s/in-conversation-with-suchetata/1463001607244431/?ti=cl

To know more about the courses offered call us on 9011090715 or e-mail: enquiry.bpa@mespune.in

The International Relations Department of MES Garware College of Commerce, Pune, is inviting you for a free webinar on ‘Study Abroad Opportunities in MES GCC’.
Do you want get an International Degree?
Do you want to Save Substantial Cost on International Education?
If Yes, then you are the right person to take part in this Webinar!!!
Join and know all the details, specifically meant for your International Career Path.

Get the following information and get your queries sorted out in the Webinar.
– Why International education?
– How to get an International UG/ PG degree?
– How to choose the best International University ?
– Which countries should we look at?
– What will be the cost of Education?
– Which courses are the best abroad?
– What is the eligibility?
– How to prepare for the IELTS/GMAT/.TOEFL tests? and lot of other queries.

Meet and interact with our alumni live from International locations!
Registration link – https://forms.gle/VgV9kFdLH23v29nB9

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने कला क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी’ या विषयावर एप्रिल – मे महिन्यांमध्ये मान्यवर कलावंतांच्या मार्गदर्शनपर ऑनलाईन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत आमच्या महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रसाद वनारसे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आजीव मंडळाचे सदस्य श्री. गोविंद कुलकर्णी यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

ऑनलाईन मुलाखत बघण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या. त्यासाठीची लिंक आहे…
https://www.facebook.com/events/234652710964216/

शुक्रवार, दि. १५  मे  रोजी संध्याकाळी ५:०० वाजता

आमच्या इतर कोर्सेस बद्दल अधिक माहिती साठी संपर्क करा : +९१ ९०११०९०७१५ किंवा ई-मेल करा : enquiry.bpa@mespune.in

मएसो कॉलेज ऑफ परफार्मिंग आर्ट्सच्या वतीने कला क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात येत
आहेत. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सचिव डॉ. भरत व्हनकटे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रसाद वनारसे. मंगळवार, दिनांक ५ मे रोजी संध्याकाळी ५:०० वाजता होणाऱ्या या मुलाखतीत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या फेसबुक पेजला भेट द्या. त्यासाठीची लिंक आहे… 

https://facebook.com/events/s/shri-prasad-vanarase-in-conver/890721618365163/?ti=cl

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘कोरोना’वर मात करण्यासाठीचे विविध उपाय रेखाचित्रांच्या माध्यमातून सांगणारी ध्वनिचित्रफित …

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयीन वसतिगृह संचलित विलगीकरण केंद्र

जगावर ओढवलेल्या कोरोना या आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हिरिरीने पुढे आली आहे. संस्थेकडून विविध पद्धतीने मदत कार्य सुरू आहे. त्यापैकी संस्थेच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहामध्ये सुरू असलेल्या विलगीकरण केंद्राची ही माहिती…

मार्च महिन्यामध्ये मा. जिल्हाधिकारी, पुणे यांनी आदेश दिल्यानुसार सरकारच्या वतीने विलगीकरण केंद्रासाठी वसतिगृह अधिगृहित करण्यात आले. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आपापल्या गावी गेलेले असल्याने कमीतकमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वसतिगृहातील आवश्यक त्या व्यवस्था सुरू होत्या.

ज्या वस्त्यांमध्ये कोरोना विषाणूचा तीव्र संसर्ग आहे अशा वस्त्यांमध्ये डॉक्टरांच्या टीमने जाऊन घरोघरी वैद्यकीय सर्वेक्षण करण्याची योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांच्यावतीने करण्यात आली. सर्वेक्षणासाठी जाणारे डॉक्टर आणि त्यांचे मदतनीस स्वयंसेवक यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात दि. २७ एप्रिल २०२० पासून करण्याचे ठरले. याबाबत जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्था कशा करायच्या याचे नियोजन केले गेले. यामध्ये छोट्या-मोठ्या अडचणी आल्या.

सर्वात पहिली अडचण होती ती म्हणजे विद्यार्थी तातडीने आपापल्या गावी गेल्याने त्यांनी खोल्यांना कुलुपे लावली होती व वसतिगृहाकडे या कुलपांच्या चाव्या नव्हत्या. ज्या खोल्या विलगीकरणासाठी वापरण्यात येण्याचे नियोजन करण्यात आले त्या सर्व खोल्यांमधील विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क करून त्यांना कल्पना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोल्यांचे कुलूप तोडण्यास संमती दिली. वसतिगृह सेवकांनी कुलुपे तोडून व्यवस्था करण्यास सुरुवात केली. मर्यादित सेवकांच्या आधारावर हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यात आले. तसेच राहणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक अशा गोष्टींची जुळवाजुळव करण्यात आली.

निवासाची व्यवस्था मार्गी लागल्यानंतर दुसरी आवश्यकता होती ती भोजन व्यवस्थेची. वसतिगृहाचे भोजन कंत्राटदार व त्यांचे सर्व कर्मचारी पुण्याबाहेर गेल्याने मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. वसतिगृह कंत्राटदाराच्या संमतीने भोजनालयातील आवश्यक तो किराणामाल घेण्यात आला. महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचारी उपलब्ध आहेत हे लक्षात आल्यावर कॅन्टीनच्या कंत्राटदाराशी चहा, नाश्ता, जेवण इत्यादी करून देण्याबाबत बोलणे करण्यात आले. कॅन्टीन कंत्राटदाराने दोन मे पर्यंत भोजन व्यवस्था केली. त्यानंतर जनकल्याण समिती आणि रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात येत आहे. आताची गरज ओळखून भोजन व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या जोडीने संघाची यंत्रणा कार्यरत झाल्याने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समन्वय ठेवून आवश्यक त्या व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या. चार व्यक्तींपासून सुरुवात करून आता या विलगीकरण केंद्रात जवळपास ५० व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. साधारण १० मे पर्यंत हे केंद्र चालेल असा अंदाज आहे.

महाविद्यालय आणि वसतिगृहाच्या परिसरात वर्षभर हजारो विद्यार्थ्यांचा वावर असतो. पण टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर आवारात राहणारे एकमेव कुटुंब आमचे म्हणजे वसतिगृह प्रमुखांचे. सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, सेवक ही मंडळी येऊन-जाऊन करणारी. जणू काही बेटावर राहिल्यासारखेच. यापूर्वी कधीही न अनुभवायला आलेला शुकशुकाट आवारात होता. विलगीकरण केंद्र सुरू होणार याचा आनंद झाला. कारण आता परत माणसांची गजबज सुरू होणार. काळजी तर घेतलीच पाहिजे पण, चिंता मात्र करायची नाही हा विचार करून सर्व गोष्टी मार्गी लावल्या. विविध माध्यमातून माहिती झालेल्या गोष्टींनुसार आवश्यक ती खबरदारी घेऊन सर्व गोष्टी मार्गी लावल्या. वस्त्यात जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे जमले नाही पण सर्वेक्षण करणार्याग लोकांची, स्वयंसेवकांची सोय करण्याची संधी मिळाली याचा आनंद झाला.

कोरोना वॉरियर्स आप लढो
हम आप का भोजन और निवास संभालेंगे…

– सुधीर गाडे, साहाय्यक सचिव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

संगीत, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रांचे आकर्षण असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य संस्थेतून जीवनोपयोगी शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय महत्वाचे आहे. याच अनुषंगाने मएसो कॉलेज ऑफ परफाँर्मिंग आर्ट्समधील मान्यवर अतिथी प्राध्यापक आमच्या फेसबुक पेजवरून प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.

*‘संगीत क्षेत्रातील करिअर आणि संधी’ मार्गदर्शक – सौ. अंजली मालकर (सुप्रसिद्ध गायिका आणि गुरु)*
• दिनांक – ३० एप्रिल २०२०
• वेळ – संध्याकाळी ५ वाजता

आमच्या फेसबुक पेजची लिंक आहे…
https://facebook.com/events/s/live-interactive-session-with-/226843342085820/?ti=as

आमच्या इतर कोर्सेस बद्दल अधिक माहिती साठी संपर्क करा :
भ्रमणध्वनी +९१ ९०११०९०७१५ किंवा
ई-मेल enquiry.bpa@mespune.in.

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रसाद वनारसे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे यांच्याशी फेसबुक पेजवर साधलेला संवाद.

Click here to know more

Students & Teachers of MES Bal Shikshan Mandir English School, Pune spreading the message to fight against CORONA and saluting the true worriores ..

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने कला क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी’ या विषयावर एप्रिल महिन्यामध्ये मान्यवर कलावंतांच्या मार्गदर्शनपर ऑनलाईन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील यशस्वी आणि नामवंत कलाकार तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि काही पदाधिकारी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

या अंतर्गत आमच्या महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रसाद वनारसे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे यांच्याशी संवाद साधणार आहेत. ही ऑनलाईन मुलाखत आपण आमच्या फेसबुक पेजवर शनिवार दि. २५ एप्रिल रोजी संध्याकाळी ६:०० वाजता पाहू शकाल.

Click here to join on Facebook

संगीत, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रांचे आकर्षण असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य संस्थेतून जीवनोपयोगी शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय महत्वाचे आहे.

याच अनुषंगाने मएसो कॉलेज ऑफ परफाँर्मिंग आर्ट्समधील मान्यवर अतिथी प्राध्यापक आमच्या फेसबुक पेजवरून प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.

नृत्य क्षेत्रातील करिअर आणि संधी
मार्गदर्शक – सौ. ऋजुता सोमण
(सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि गुरु)

  • दिनांक – सोमवार, दि. २० एप्रिल २०२०
  • वेळ – संध्याकाळी ७ वाजता

आमच्या इतर कोर्सेसबद्दल अधिक माहिती साठी संपर्क करा :
भ्रमणध्वनी +९१ ९०११०९०७१५ किंवा
ई-मेल enquiry.bpa@mespune.in

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरुप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेसतर्फे साखळी पद्धतीने सलग सहा तास विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी आदरांजली वाहण्यात आली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशभर लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम घेता येणार नसल्याते लक्षात घेऊन इन्स्टिट्यूटमधील सर्व कर्मचाऱ्यांनी सलग सहा तास आपल्या कुटुंबियांसह विविध पुस्तकांचे वाचन ऑनलाईन पद्धतीने करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दि. 14 एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत हा अभिनव उपक्रम घेण्यात आला.

प्रत्येकाने अर्धा तास ठरवून साखळी पद्धतीने हे पुस्तक वाचन केले. वाचन करणाऱ्या व्यक्तीने या काळात आपला मोबाईल बंद करून पूर्ण लक्ष वाचनाकडे दिले. या उपक्रमातूक सकारात्मक उर्जा मिळाल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी वेगळे वाचले असे काहींनी नमूद केले.

इन्स्टिट्यूटमध्ये दर महिन्याला सर्व प्रशिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी ‘करिअर कट्टा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्याअंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, व्यक्तिमत्व विकास केंद्र, पुणे
कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराविषयी आपण सगळेच जगभरातील अनेक बातम्या वाचत , ऐकत आहोत. या बातम्यांमुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. अधूनमधून वाटणारी चिंता, भीती त्रास देऊ शकतात. आपल्या अशा भीती, निराशा, अस्वस्थता समजून घेण्यासाठी आम्ही आहोत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे व्यक्तिमत्व विकास केंद्र या पुढील काळात तुमच्या सोबत असणार आहे. आपल्याला सद्य परिस्थितीत, ताणतणाव अधिक जाणवत असेल, आधाराची गरज वाटत असेल तर आमच्या समुपदेशकांशी आपण मोकळेपणाने संवाद साधू शकता. आमचे फोन नंबर व वेळा सोबत जोडल्या आहेत. कृपया फोन करण्याच्या आधी समुदेशकाच्या वेळा पहा.

ही सेवा मोफत आहे. आपली माहिती पूर्णपणे गोपनीय राहील. ही सेवा उद्या दिनांक ११ एप्रिल २०२० पासून सुरू करण्यात येणार आहे.
१) केतकी कुलकर्णी – +91 8380042076 ( सकाळी १०.३० ते १२.३०)
2) विशाखा जोगदेव – +91 9960394651 (दुपारी ४.०० ते ६.००)
३) सुरेखा नंदे – +91 7767960804 ( दुपारी २.०० ते ५.००)

गिरिजा लिखिते
मुख्य समन्वयक
(8600003188 केवळ समन्वयासाठी)
म. ए. सो. व्यक्तिमत्व विकास केंद्र, पुणे

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व्यक्तिमत्त्व विकास केंद्र
प्रिय म. ए. सो. शिक्षक व पालक,
नमस्कार
कोविड-१९ आणि lockdown एक आगळं वेगळं, स्वप्नातही विचार न केलेल आव्हान…फक्त तुमच्या माझ्या समोर नाही तर संपूर्ण जगासमोर उभं राहिलं आहे. गेले जवळजवळ १०-१२ दिवस आपणं आपल्या घरात आपल्या कुटुंबियांसमवेत आहोत. सुरुवातीचा काळ मजेत, उत्साहात गेला, पण आता हळूहळू कंटाळा येऊ लागला असेल. काय करायचे या वेळेचे? असा प्रश्न उपस्थित होत असेल.
मिळालेल्या या वेळेत काय काय करायचे या करिता उद्यापासून म. ए. सो. व्यक्तिमत्व विकास केंद्र आपल्यासाठी ‘मनोरंजनातून प्रगल्भतेकडे’ या नावाने संदेश पाठवणार‌ आहे. याचा उपयोग तुम्हाला स्वतःसाठी, मुलांच्यासाठी व सर्व कुटुंबीयांसाठी करता येईल. ही एक प्रकारे ‘मनाची व्यायामशाळा’ आहे. मी आपणास विनंती करते की याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा…. धन्यवाद.

गिरिजा लिखिते.
मुख्य समन्वयक
म. ए. सो. व्यक्तिमत्व विकास केंद्र.

पुणे, दि. ७ : “देश आणि राज्यातील राजकीय नेतृत्वाने केलेली घोर उपेक्षा, ईशान्य भारताबद्दल असलेल्या अज्ञानातून देशाच्या अन्य भागात मिळणारी परकेपणाची वागणूक ते गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने आत्मीयतेच्या भावनेतून वेगाने केलेला विकास हा देशाच्या ईशान्येकडील राज्यांचा प्रवास आहे. तिकडच्या राज्यांची आणि चार शहरांची नावे माहिती करुन घेण्याची तसदीदेखील आपण घेत नाही. चेहरेपट्टी वेगळी असल्याने आपण त्यांना नेपाळी किंवा जपानी समजतो, त्यामुळे ‘माझ्या देशातच मला परके मानतात’ अशी वेदनेची भावना त्यांच्यात निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी ईशान्येकडील राज्यांमधून आलेल्या नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी मैत्री करा, त्यांची विचारपूस करा, त्यांची भाषा शिकून घ्या कारण, त्यामुळे देश अधिक लवकर जोडला जाईल,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने समाजातील विविध मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार तिसरे पुष्प गुंफण्यासाठी ‘माझे ईशान्य भारतातील अनुभव आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर देवधर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानाला फार मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच प्राध्यापक, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

“देशातील अन्य भागाप्रमाणेच भारतीय संस्कृतीची साक्ष देणाऱ्या व पौराणिक संदर्भ असलेल्या अनेक खूणा, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, शिल्पे, कथा, श्रद्धा आणि एवढेच काय अंधश्रद्धा देखील ईशान्येकडील राज्यात आढळतात. ईशान्येकडील राज्यांमधील समस्येचे मूळ भारताच्या फाळणीमध्ये आहे. फाळणीचा सर्वात मोठा फटका या भागाला बसला. पूर्व पाकिस्तान अस्तित्वातच आला नसता तर देशाचा हा संपूर्ण भाग अखंड राहिला असता. फाळणीच्या वेळी इंग्रजांनी संपूर्ण ईशान्य भारत मुस्लिमबहुल असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यात सत्यता नसल्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि आसामचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ बोरदोलाई यांनी महात्मा गांधीजींना पटवून दिले. त्यामुळे इंग्रजांचा डाव फसला. ईशान्येकडील राज्यांबद्दल आणि तिथल्या जनतेबद्दल केंद्रात सत्तेत असलेल्या पुढाऱ्यांना कधीही आत्मीयता नव्हती. त्यामुळेच देशाच्या अखंडतेसाठी झटणाऱ्या बोरदोलाई यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकाचा सन्मान करावा असे त्यांना कधी वाटले नाही. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने १९९९ साली ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला. अरुणाचल प्रदेशात ४५ बोली भाषा आहेत. त्यांची कोणतीही लिपी नाही. या भाषा बोलणाऱ्या सर्वांमध्ये संवादाची समान भाषा असावी म्हणून ७० च्या दशकात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असेलेल के.ए.ए. राजा यांनी हिंदी ही राज्यभाषा म्हणून जाहीर केली. सर्व जनजातींना हिंदी शिकणे सक्तीचे केले. परिणामी अरुणाचल प्रदेशामध्ये आता सर्वजण उत्तम हिंदी बोलतात. संवादाच्या समान भाषेमुळे त्या प्रदेशात देशभक्तीची भावना प्रखर आहे, तिथे दहशतवादाचा प्रश्न निर्माण झाला नाही. ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये मात्र हे घडले नाही. केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले किरण रिजीजू हे याच वातारणात मोठे झाले आहेत. त्यामुळे “अरूणाचल हा भारताचा अविभाज्य भाग नसून अरुणाचल प्रदेश हा भारतच आहे” असे ते अभिमानाने म्हणतात. भारताचा मुख्य भूभाग आणि ईशान्येकडील राज्ये असा कोणताही दुजाभाव नाही. त्यामुळे ‘मुख्य राष्ट्रीय प्रवाह’ ही संकल्पना मान्य करण्यासारखी नाही. ईशान्येकडील राज्ये आणि देशाच्या अन्य भागातील राज्ये यांचा राष्ट्रीय प्रवाह एकच आहे. ईशान्य भारतातील परिस्थितीबद्दल देशात गैरसमज दूर करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम आदी संस्थांनी आपल्या सेवाकार्याच्या माध्यमातून केले. प्रसार माध्यमांमधील एका गटाने मात्र हे गैरसमज वाढवण्याचेच काम केले. अटलबिहारी वाजपेयी सरकारने देशाच्या चारही दिशांना जोडणाऱ्या ‘सुवर्ण चतुष्कोन’ या महामार्ग बांधणीच्या कार्याची सुरुवात आसाममधील सिल्चरपासून केली. आदिवासी विकासासाठी आणि ईशान्य भारतासाठी पहिल्यांदा स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. प्रत्येक केंद्रीय मंत्रालयाने त्यांच्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या १० टक्के रक्कम त्यासाठी देण्याचा नियम केला. नरेंद्र मोदी सरकारने या ‘लूक ईस्ट’ धोरणाचे रुपांतर ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणात केले. त्यामुळे ईशान्य भारतात पायाभूत सुविधांचा विकास फार वेगाने होतो आहे. ‘हायवेज, आयवेज, रोडवेज आणि एअरवेज’ यांच्या विकासामुळे संपर्क प्रचंड वाढला आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील देशांमध्ये निर्यातीची संधी देखील उपलब्ध झाली आहे. ईशान्य भारतातील विद्यार्थी शिक्षणासाठी देशाच्या विविध भागात जातात. या विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने केवळ सहा महिन्यांत बंगळूरुपर्यंत सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी साडेपाच वर्षांच्या काळात तब्बल ४० वेळा ईशान्येतील राज्यांमध्ये एक रात्र राहिले आहेत. सर्व केंद्रीय मंत्र्यांना दर १५ दिवसांनी दौरा करुन या भागाच्या विकासात लक्ष घालण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून असे कधीच घडले नव्हते. केंद्र सरकारच्या या कृतीतून ईशान्य भारताबद्दल असलेली आत्मीयता दिसून येते,” असे देवधर यावेळी म्हणाले.

सुधीर गाडे यांनी सुनील देवधर यांचा परिचय करुन दिला तर डॉ. व्हनकटे यांनी आभार मानले.
डॉ. रवींद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुणे महानगरपालिका आणि स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील एकूण ११ विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, त्यापैकी ६ विद्यार्थिनींनी पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते झाले.

दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अश्वारोहणातील ड्रसाज, शो-जंपिंग आणि जिमखाना इव्हेंटस् अशा तीन प्रकारांत ही स्पर्धा झाली. अकलूज, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, मुंबई आणि पुणे अशा विविध भागांतून ९ संघातील १६० खेळाडू सहभागी झाले होते.

महापौर चषक पुणे राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी उज्वल कामगिरी केली एकूण ११ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.

श्रद्धा वणवे हिने २ सुवर्ण पदके, १ रौप्य पदक तसेच बेस्ट रायडर ट्रॉफी व दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले.

सिद्धी टाकळकर हिने एक सुवर्ण आणि २ कांस्य पदके मिळविली.

राजकुँवर मोहितेने एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली.

मेघना चव्हाणने दोन तर मयुरी पवारने एक सुवर्ण पदक मिळवले.

अनुष्का मस्के हिला एक रौप्य पदक मिळाले.

शाळेतील रसिका देशमुख,ओवी गुरव,श्रावणी बामगुडे,तृषा कटकधोंड आणि साक्षी कारळे या विद्यार्थिनींनी देखील या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.

या विद्यार्थिनींना श्री. गुणेश पुरंदरे आणि श्री. कुणाल सर यांनी मार्गदर्शन केले.

सर्व खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक यांचे अभिनंदन!

पुणे, दि. २४ : “ नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना एकांगी शिक्षणाकडून बहुमुखी शिक्षणाकडे नेणारे आहे. हे धोरण म्हणजे शिक्षण क्षेत्राला नवे वळण देणारा मैलाचा दगड ठरणार आहे. सुमारे ३५ वर्षांनंतर हे नवे धोरण तयार करण्यात आले आहे. देशातील युवा पिढीच्या आकांक्षा आणि त्यांचे हित लक्षात घेऊन, जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असताना, वेगाने बदलत असलेली जागतिक आर्थिक रचना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी यांना तत्परतेने प्रतिसाद देणारे हे धारेण असल्याने त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले पाहिजे,” असे प्रतिपादन प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर आज प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि साहाय्यक सचिव सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या महाविद्यालयांचे आजी-माजी प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आदी शिक्षकवर्ग व प्रशासकीय कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी माहिती देताना प्राचार्य देशपांडे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीबरोबरच त्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक प्रगतीचा देखील विचार नव्या धोरणात करण्यात आला आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज देशातील प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, त्यामुळे यापुढे शिक्षणाच्या संदर्भात व्यापक संख्येचा विचार करावा लागणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण व्यवस्थेत आता ५+३+३+४ या सूत्रानुसार ३ ते ८ वर्षे, ८ ते ११ वर्षे, ११ ते १४ वर्षे आणि १४ ते १८ वर्षे असे चार टप्पे तयार करण्यात येणार आहेत. एका वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थी याचे प्रमाणदेखील नव्या धोरणात निश्चित करण्यात आले आहे.

शालेय प्रशासनाच्या दृष्टिकोनातून देखील नवी रचना तयार करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी नियामक प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून त्याची मान्यता घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या धोरणानुसार बहुशाखीय शिक्षण हे महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षण रचनेचे वैशिष्ट्य आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन हा विद्यापीठाच्या कामाचा मूळ गाभा राहील. त्यामुळे संशोधन, शिक्षण व सर्वसाधारण अभ्यासक्रम अशा विषयांसाठी स्वतंत्र विद्यापीठे अस्तित्वात येणार आहेत. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांऐवजी यापुढे पदवी देण्याचे अधिकार असलेली महाविद्यालये अस्तित्वात येतील अशी नवी रचना या शिक्षण धोरणात समाविष्ट आहे. केंद्र सरकारच्या कायद्याद्वारे ‘नॅशनल रिसर्च फाऊंडेशन’ स्थापन करण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून प्राध्यापक वर्गाला संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून आर्थिक पाठबळदेखील दिले जाईल.

सर्व आव्हानात्मक परिस्थितीत काम करू शकणारे विद्यार्थी घडावेत असे परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण आयोग स्थापन करण्यात येणार आहे. या आयोगाच्या धर्तीवर राज्य सरकारे राज्य शिक्षण आयोग स्थापन करु शकतील. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच देण्यावर नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात भर देण्यात आला आहे. तसेच भाषांच्या शिक्षणासाठी मातृभाषा, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा असे त्रिभाषिय सूत्र तयार करण्यात आले आहे.

शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना इ. १२ वी नंतर ४ वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल, त्यामध्ये विषयांचे वैविध्य असेल. बहुशाखीय शिक्षण देण्यासाठी आय.आय.टी.च्या धर्तीवर ‘इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल एज्युकेशन’ या नावाच्या १० संस्था सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती प्राचार्य देशपांडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन डॉ. आनंद लेले यांनी केले.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत शिक्षणविषयक व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रा. देशपांडे यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन संस्थेचे साहाय्यक सचिव सुधीर गाडे यांनी केले.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांचे व्याख्यान

CPA-Workshop-Sakal Today-P8-20-01-2020

MES-Mohol

MES-Mohol

मएसो क्रीडा करंडकस्पर्धेवर बारामतीच्या
मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेची मोहोर

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेने सलग चौथ्या वर्षी ‘मएसो क्रीडा करंडक’ जिंकत या स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली आहे. शाळेने मुलगे तसेच मुलींच्या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद देखील पटकावले आहे. मएसो क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या दहाव्या वर्षी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षी ही कामगिरी केल्यामुळे शाळेचे खेळाडू आणि क्रीडा शिक्षक यांचे विशेष कौतुक होत आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, नियामक मंडळाच्या सदस्य आनंदीताई पाटील, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव सुधीर गाडे, भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊ बडधे आणि मएसो शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापक रोहिणी फाळके या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीतर्फे मयूर कॉलनीतील मएसो इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर तीन दिवस इ. १ ली ते इ. ४ थी तील विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरिय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिर ही शाळा या स्पर्धेची संयोजक होती.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अहमदनगर, बारामती, सासवड, शिरवळ, पनवेल, कळंबोली, नवी मुंबईतील बेलापूर, सोलापूर आणि पुणे अशा विविध ठिकाणच्या १३ शाळा तसेच पुण्यातील अन्य शिक्षण संस्थांच्या ७ शाळा अशा एकूण २० शाळांमधील १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होते. सांघिक पारितोषिकांबरोबरच प्रत्येक क्रीडा प्रकारातील तीन उत्कृष्ट खेळाडूंना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांना लहानपणापासून खेळाची आवड निर्माण व्हावी व आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने तसेच प्राथमिक शाळांमधील (इ. १ ली ते ४ थी) विद्यार्थ्यांसाठी शासकीय पातळीवर कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात नसल्याने ही उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा वर्धिनीतर्फे सन २०११ पासून ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

स्पर्धेचा निकाल : सांघिक – मुलग्यांचा गट –

लंगडीच्या स्पर्धेत मुलग्यांच्या गटात बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचा संघ विजेता ठरला आहे. सासवडच्या मएसो बाल विकास मंदिर शाळेचा संघ उपविजेता ठरला असून पुण्यातील मएसो भावे प्राथमिक शाळेचा संघांला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

डॉजबॉलच्या स्पर्धेत मुलग्यांच्या गटात शिरवळच्या मएसो इंग्लिश मिडीयम स्कूलचा संघ विजेता तर बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचा संघ उपविजेता ठरला आहे. कळंबोलीच्या मएसो ज्ञान मंदिर शाळेचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.

गोल खो-खोच्या स्पर्धेत कळंबोलीच्या मएसो ज्ञान मंदिर शाळेचा संघ विजेता तर बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचा संघ विजेता ठरला. पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिर शाळेच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सूर्यनमस्कार स्पर्धेत पुण्यातील भावे प्राथमिक शाळेचा संघ विजेता तर कळंबोलीच्या मएसो ज्ञान मंदिर शाळेचा संघ उपविजेता ठरला. बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचा संघाला तिसरा क्रमांक मिळवता आला.

स्पर्धेचा निकाल : सांघिक – मुलींचा गट –

लंगडीच्या स्पर्धेत मुलींच्या गटात बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचा संघ विजेता तर पुण्यातील भावे प्राथमिक शाळेचा संघ उपविजेता ठरला. अहमदनगरच्या मएसो कै. दा.शं. रेणावीकर विद्या मंदिर शाळेचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला.

डॉजबॉलच्या स्पर्धेत मुलींच्या गटात बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचा संघ विजेता तर पुण्यातील भावे प्राथमिक शाळेचा संघ उपविजेता ठरला. कळंबोलीच्या मएसो ज्ञान मंदिर शाळेचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.

गोल खो-खोच्या स्पर्धेत बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचा संघ विजेता तर कळंबोलीच्या मएसो ज्ञान मंदिर शाळेचा संघ उपविजेता ठरला. पुण्यातील भावे प्राथमिक शाळेच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सूर्यनमस्कार स्पर्धेत बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचा संघ विजेता तर पनवेलच्या मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील मराठी विभागाचा संघ उपविजेता ठरला. पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिर शाळेच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

—————————————-

पुणे, दि. १७ : खेळांचे सामने सुरु होण्याची उत्कंठा, क्रीडाज्योतिच्या आगमनाने प्रफुल्लित झालेली मने, वनराजाच्या वेषातील शुभंकराच्या दर्शनाने रोमांचित झालेले खेळाडू आणि तिरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक-पालकांनी केलेला जल्लोश अशा वातावरणात मएसो क्रीडा करंडक स्पर्धेला आज (शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२०) येथे सुरवात झाली. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिर ही शाळा या स्पर्धेची संयोजक आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीतर्फे मयूर कॉलनीतील मएसो इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर इ. १ ली ते इ. ४ थी तील विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरिय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. अर्जुन पुरस्कार विजेते आणि मुष्टियुद्धाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मनोज पिंगळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या सदस्य व शाला समितीच्या अध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव सुधीर गाडे  आणि भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊ बडधे व पूर्वप्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी फाळके यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

अर्जुन पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला खेळाडू शकुंतला खटावकर या वेळी आवर्जून उपस्थित होत्या.

या स्पर्धेत लंगडी, गोल खो-खो, डॉजबॉल व सूर्यनमस्कार या सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये मुले व मुली अशा स्वतंत्र गटात बाद पद्धतीने सामने खेळविण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळचे सत्र हे विद्युत प्रकाशझोतात घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अहमदनगर, बारामती, सासवड, शिरवळ, पनवेल, कळंबोली, नवी मुंबईतील बेलापूर, सोलापूर आणि पुणे अशा विविध ठिकाणच्या १३ शाळा तसेच पुण्यातील अन्य शिक्षण संस्थांच्या ७ शाळा अशा एकूण २० शाळांमधील १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सांघिक पारितोषिकांबरोबरच प्रत्येक क्रीडा प्रकारातील तीन उत्कृष्ट खेळाडूंना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुष्टियुद्धाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मनोज पिंगळे यांनी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सांघिक खेळांबरोबरच ऑलिंपिक स्पर्धेत समावेश असलेल्या वैयक्तिक खेळांच्या प्रशिक्षणाची सोय करावी आणि त्यांच्या स्पर्धांदेखील आयोजित कराव्यात अशी अपेक्षा आपल्या भाषणात व्यक्त केली.

‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “‘मएसो’च्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षात आयोजित होत असलेल्या या स्पर्धेच्या संयोजनाची संधी माझ्या मएसो बाल शिक्षण मंदिर या शाळेला मिळाली आहे याचा मला आनंद वाटतो. पिंगळे यांनी सुचविल्याप्रमाणे वैयक्तिक क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण सुरु करण्याबाबत संस्थेकडून निश्चितपणे विचार केला जाईल.”

विद्यार्थ्यांना लहानपणापासून खेळाची आवड निर्माण व्हावी व आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने तसेच प्राथमिक शाळांमधील (इ. १ ली ते ४ थी) विद्यार्थ्यांसाठी शासकीय पातळीवर कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात नसल्याने ही उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा वर्धिनीतर्फे सन २०११ पासून ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

पुणे, दि. ११ : “आजची युवा पिढी ही अधिक उर्जावान आणि बुद्धिमान आहे. त्यांच्यातल्या उर्जेला रचनात्मक दिशा देण्याची गरज असून त्यांच्या चांगल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी पालकांची आहे.  युवा पिढीत दिसणारी नकारात्मकता दूर करण्याचे काम खेळांच्या माध्यमातूनच होईल. खेळामुळे मिळणारा आत्मविश्वास आणि एकाग्रता यांचा फायदा शिक्षणातील यशासाठीही कारणीभूत ठरतो. जीवनात ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी अथक परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गुणांचे संस्कार खेळांद्वारे होतात. त्यामुळे खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे,” असे आग्रही प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘युवा चेतना दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (शनिवार, दि. ११ जानेवारी २०१९ रोजी) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. निरामय सोल्युशन्सचे संचालक प्रशांत डोंगरे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष अभय क्षीरसागर, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडा वर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, मएसो क्रीडा वर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव सुधीर गाडे उपस्थित होते.

प्रमुख वक्ते प्रशांत डोंगरे यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील विविध घटनांचा आढावा घेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘मएसो’च्या क्रीडा विषयक विविध उपक्रमांची माहिती आणि त्यामागील भूमिका विशद केली.

देशभरातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमात संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी लेझिम, सर्वांगसुंदर व्यायाम, अरोबिक्स, एक हजार विद्यार्थ्यांचे सांघिक गीत गायन, महाराष्ट्रातील विविध सणांच्या संकल्पनेवर आधारित विविध रचना, मर्दानी खेळ अशा विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या क्रीडा कौशल्यांचे कौतुक केले.

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या ‘सावली’ या संस्थेतील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यावेळी उपस्थित होते.

सहाय्यक शिक्षिका कल्याणी जोशी यांनी कार्यक्रमाचे तर प्रा. शैलेश आपटे यांनी प्रात्यक्षिकांचे सूत्रसंचालन केले.

EBSM-Nursery-Sakal-Today-P10-28-Nov-2019

Scroll to Top
Skip to content