“प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्याची प्रतिष्ठा जपणे महत्वाचे आहे. महाविद्यालयातील प्रत्येक घटकाच्या वर्तनात विद्यार्थ्याबद्दल आस्था व स्नेह असणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षणाबरोबरच त्याचे आकलन, त्याचा दृष्टिकोन, त्याची पार्श्वभूमी असे सांस्कृतिक भांडवल असते. त्यामुळे विद्यार्थ्याकडे काळजीपूर्वक बघणे आवश्यक असते. त्याला महाविद्यालयाकडून मिळणारे मार्गदर्शन आणि पाठबळ अतिशय महत्वाचे असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची महाविद्यालये ही जबाबदारी निश्चितच पार पाडतील याचा विश्वास आहे,” असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. एन.एस. उमराणी यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बांधण्यात आलेल्या नवीन अमृत महोत्सवी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते.

या वेळी व्यासपीठावर ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व मा. प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. जी.आर. धनवडे उपस्थित होते.

डॉ. उमराणी पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील या नव्या इमारतीचे उद्घाटन करताना शिक्षक आणि प्रकुलगुरू अशा दोन्ही भूमिकेतून मला खूप आनंद होत आहे. ‘ऑक्स्फर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ख्याती असलेल्या पुणे शहरात ‘मएसो’ ने शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून टोलेजंग काम केले आहे. मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्राचार्य या नात्याने त्या कामात योगदान देण्याची संधी मला मिळाली याचे मला भान आहे. या प्रांगणात काम करताना जसा आनंद मिळाला तसाच आनंद आज मला होतो आहे. या नव्या प्रतिभासंपन्न वास्तूत कर्तबगार नागरीक, शिक्षक, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते घडतील. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि जागतिक दर्जाचे नागरिक घडवणे हे नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे. सर्वोत्तम महाविद्यालयाचे पारितोषिक, नॅकचे मूल्यांकन आणि स्वायत्ततेच्या दिशेने होणारा प्रवास यामुळे महाविद्यालयाची ही जबाबदारी आणखी वाढते. विद्यार्थ्याच्या  प्रवेशापासून त्याला पदवी परीक्षेची गुणपत्रिका देण्यापर्यंत महाविद्यालयाने त्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणात देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे विद्यार्थी घडवणारा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर हे देखील या धोरणाचे एक वैशिष्ट्य आहे. शिक्षणावरील खर्चाबाबत जोपर्यंत जागरूकता निर्माण होणार नाही तोपर्यंत शिक्षणाच्या दर्जाबाबतही सजगता निर्माण होणार नाही. संगीत, कला, योग, आयुर्वेद अशा आपल्या पारंपारिक विषयांचा समावेश करण्यात आल्याने आपण आता मुक्त शिक्षणाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना आपले ध्येय साधण्यासाठी आपल्या सोयीनुसार शिक्षण घेता येणार आहे.”

‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “कोरोनानंतरच्या काळातील शिक्षणाचा विचार करताना सिंहावलोकन करण्याची आवश्यकता आहे. घरांमध्ये अडकून पडल्यामुळे मुलांची मानसिक कुचंबणा झाली आहे. महाविद्यालये सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हाताळायचे याचा विचार आत्ताच केला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नागरिक घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यात प्रत्येक जण महत्वाचा आहे. नव्या कल्पना, सृजनशील दृष्टिकोन समोर ठेवून हे काम केले पाहिजे.”

मएसो आबासाहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात नव्या इमारतीच्या बांधकामाची गरज विशद करून महाविद्यालयाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन तर डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या

इमारतीची सफर घडवणारी लघुचित्रफित पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे आज (शुक्रवार, दि. २० ऑगस्ट २०२१) उद्घाटन करण्यात आले. गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मा. सी. जे. पाठक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडच्या मनुष्यबळ आणि प्रशासन विभागाचे अध्यक्ष डॉ. विहार राखुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळ सदस्य व शाला समितीच्या अध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक हे उपस्थित होते.

शाळेच्या सुमारे ८० वर्ष जुन्या असलेल्या इमारतीचे नूतनीकरण गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने करण्यात आले आहे. शाळेतील शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे वीजेच्या खर्चात बचत होणार आहे. मुळातच भव्य आणि प्रशस्त असलेल्या शाळेच्या या इमारतीचे नूतनीकरण केल्यामुळे तेथील हवेशीर, स्वच्छ, सुंदर वातावरणाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदात आणि उत्साहात भर पडणार आहे. शासनाने शाळेच्या इमारतीला ‘हेरिटेज वास्तू’चा दर्जा दिला आहे. नूतनीकरण झालेल्या शाळेच्या या इमारतीमुळे पुणे शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर पडली आहे.

या प्रसंगी बोलताना मा. सी. जे. पाठक म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी सर्वांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. संस्था आणि संस्थेच्या शाळांमधील शिक्षक अतिशय कष्टपूर्वक त्याच दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळेच कला, क्रीडा, वैचारिक प्रगल्भता अशा सर्व अंगांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास झालेला दिसून येतो. त्यामुळेच शाळेला नांवलौकिक मिळाला आहे. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने प्रवास करताना त्यांची गाठ पडते आणि सहजपणे आपुलकीची भावना निर्माण होते, ते आवर्जून शाळेची चौकशी करतात. अशा या गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या शाळेला आणि संस्थेला कै.आबासाहेब गरवारे आणि कै. विमलाबाई गरवारे यांनी आर्थिक सहकार्य केले होते. आबासाहेब गरवारे यांचे बालपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांनी सुरवातीला लहान-मोठी कामे केली पण त्यांचे व्हिजन मोठे होते. त्यामुळे तंत्रज्ञान, कच्चामाल आणि पैशाचा अभाव असताना देखील त्यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योग आपल्या देशात आणि पर्यायाने महाराष्ट्रात आणले. सामान्य माणसांतले असामान्यत्व पुढे आणण्यासाठी त्यांनी विविध संस्थांना मदत केली. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव मा. शशिकांत गरवारे हे देखील त्या सर्व संस्थांना मदत करत आहेत. आबासाहेब आणि विमलाबाई गरवारे यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करत गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गरवारे परिवार विविध विधायक कामे करत आहे. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या नूतनीकरणासाठी आर्थिक सहयोग करण्यात आला असून संस्थेने केलेला शाळेचा कायापालट पाहून त्यांनी संस्थेला धन्यवाद दिले आहेत.

‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शशिकांत गरवारे यांना शाळेबद्दल जी आपुलकी आहे ती, त्यांनी दिलेल्या आर्थिक सहयोगा इतकीच मोलाची आहे. हेरिटेज वास्तूसाठी असलेले सर्व निकष पाळून शाळेच्या इमारतीचे अतिशय सुंदर नूतनीकरण झाले आहे. शाळेबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेतूनच अनेक माजी विद्यार्थी शाळेला विविध प्रकारे सहकार्य करत असतात. त्यातूनच शाळेचे ‘सुबोधवाणी’ हे वेब रेडिओ केंद्र सुरु झाले आहे, शाळेत इलेक्ट्रॉनिक क्लासरुम तयार झाल्या आहेत. शाळेबरोबर असलेली नाळ जीवनात कायम राहाते. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे, ते आनंददायी व्हावे यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सक्षम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांनी अभ्यासक्रम, वर्गातील शिक्षण याच्यापलीकडे जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. आज देशात उद्योजक तयार होण्याची गरज आहे, त्यासाठी रोलमॉडेल म्हणून सर्वांनी आबासाहेब गरवारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या आणि शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणामागील भूमिका विशद केली.

शाळेतील शिक्षिका सौ. पद्मा पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र. ल.गावडे यांचे रविवार, दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी दु:खद निधन झाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, जनता सहकारी बॅंक, पुणे आणि नगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:०० वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या श्रद्धांजली सभेत ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्यासाठी लिंक …
https://zoom.us/j/93612023115?pwd=U0R1VHdFMGZ5eFBSVHdXSkpuTnBEUT09

Meeting ID: 936 1202 3115
Passcode: 425225

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इ.१२ वी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी घवघवीत यश मिळवले आहे. संस्थेच्या सर्व शाळांचा एकत्रित निकाल ९९.९२ टक्के लागला आहे.
संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

पुणे, २ ऑगस्ट : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांचे काल रात्री उशीरा पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. गावडे यांनी अनेक शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक संस्थांच्या कार्यात पदाधिकारी, मार्गदर्शक, हितचिंतक व देणगीदार म्हणून अमूल्य योगदान दिले आहे.

प्रा. डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे यांचा जन्म २० जून १९२४ रोजी नेवासे येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण अहमदनगरमधील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. १९५० मध्ये ते बी.टी. झाले. पुणे विद्यापीठातून मराठी व संस्कृत हे विषय घेऊन ते १९५२ मध्ये एम.ए. आणि १९५६ मध्ये एम.एड झाले.

‘सावरकर : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर १९६८ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. संपादन केली होती. त्यासाठी त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला पुणे विद्यापीठातर्फे उत्कृष्ट प्रबंधाबद्दल ‘न. चि. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ मिळाले होते. तसेच, १९७१ – ७२ मध्ये या ग्रंथास महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला होता. ‘मराठी-वाङ्मय’ हा त्यांचा अध्यापनाचा विषय होता.  स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद तसेच ज्ञानेश्वरी हे त्यांच्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे विषय होते आणि त्यावर ते व्याख्याने देखील देत असत.

प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांनी १९४६ ते १९८२ या प्रदीर्घ कालखंडात अध्यापक, मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. १९६३ ते १९८२ या काळात त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६९ ते ८२ ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे कला व शास्त्र महाविद्यालयात आणि १९६८ ते ७२ या काळात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी अध्यापन केले.

डॉ. प्र. ल. गावडे यांचे शैक्षणिक प्रशासन सेवेतील कार्यही प्रदीर्घ आणि मौल्यवान आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये सहाय्यक सचिव, सचिव आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. संस्थेच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी मएसो मुलांचे विद्यालयातील (पूर्वीची भावे स्कूल) सभागृहाचे ‘गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृह’ असे नामकरण करण्यात आले. तसेच मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहा’ चे उद्घाटन डॉ.गावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सन २०१७ मध्ये ‘मएसो’च्या १५८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला डॉ. गावडे सर वयाच्या ९४ व्या वर्षी अंथरुणावरून न उठण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला बाजूला ठेऊन आपल्या सुहृदांना भेटण्यासाठी व्हीलचेअरवरून आले होते. त्यांच्याशी संवाद साधताना अनेकजण आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांच्यासमोर अक्षरशः नतमस्तक झाले होते.

शालेय शिक्षण, विद्यार्थ्यांसाठीच्या ‘साहित्यविहार’, ‘कथाकौस्तुभ’ या पुस्तकांचे संपादन तर ‘शालेय मराठी व्याकरण’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इ. ९ वी, ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषेच्या  पाठ्यपुस्तकांचे सहसंपादन देखील त्यांनी केले होते.

डॉ. प्र. ल. गावडे यांना विविध सन्माननीय पुरस्कार मिळालेले आहेत. ‘आदर्श शिक्षक – राज्य पुरस्कार’ (१९७६), ‘उत्कृष्ट साहित्य समीक्षेबद्दल ‘पु. भा. भावे स्मृति समितीचा’ पुरस्कार (१९९७), ‘सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल अ‍ॅड. डी. आर. नगरकर पुरस्कार’, ‘शैक्षणिक कार्याबद्दल राजा मंत्री पुरस्कार’, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे कृतज्ञता पुरस्कार’ (१९९८) आणि ‘विचार प्राथमिक शिक्षणाचा’ या पुस्तकास म. सा. परिषदेचे ‘ना. गो. चाफेकर पारितोषिक’ (१९९८) अशा विविध पुरस्कारांनी डॉ. प्र. ल. गावडे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या १३ व्या पदवीप्रदान समारंभात शनिवार, दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी डॉ. गावडे यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते  डी.लिट्. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यापीठाच्या ६९ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करून डॉ. गावडे यांचा सन्मान केला.

डॉ. प्र. ल. गावडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्या वेळी ‘अमृतसंचय’ हा ‘डॉ. प्र. ल. गावडे अमृतमहोत्सव गौरव ग्रंथ’ प्रकाशित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवर्य प्रा. डॉ. प्र.ल.गावडे यांना विनम्र श्रद्धांजली!

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पेरुगेट भावे स्कूलचे (आताची म.ए.सो. मुलांचे विद्यालय) माजी विद्यार्थी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बळवंतराव मोरेश्वरराव उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांनी आज वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत (इ.१० वी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Virtual unveiling of Rani Lakshmi Bai Statue located at RLMSS at the hands of Chief of the Army Staff of the Indian Army General Manoj Mukund Narwane on 13th July, 2021

 

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयातील विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात उपलब्ध करून देत जबाबदार, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी घडवण्याचे काम संस्था करत आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनी आज देशाच्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील अशाच पद्धतीने शाळेच्या माजी विद्यार्थिनी लक्षणीय कामगिरी बजावत आहेत, हे शाळेसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे,” अशा शब्दात देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शाळेच्या कामगिरीचे कौतुक केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित समारंभात शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि पुण्यातल्या NCC ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या महामात्र डॉ. मानसी भाटे आणि चित्रा नगरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते हे उपस्थित होते.

मएसो ऑटोरीअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलद्वारे करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या की, मुलींसाठी सैनिकी शाळा चालवत असल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानायला हवेत. संस्थेने अतिशय सुंदर शाळा उभी केली आहे. यापूर्वीदेखील या शाळेच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आले होते. शाळेला असलेले राणी लक्ष्मीबाई यांचे नावच प्रेरणादायी आहे. सैनिकांचा गणवेश आणि त्यांची शिस्त बघूनच मी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी आपण एक मुलगी आहोत असा विचार न करता आपल्यातील स्त्री शक्ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्ये कणखरपणा आणि एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्याला एखादी गोष्ट जमेल का? असा विचार करण्याची गरज नाही. कठीण परिस्थितीवर आपल्या अनुभवाच्या आधारे मात करायला शिकता आले पाहिजे. प्रश्न निर्माण होतील तेव्हा खचून न जाता शाळेने दिलेले संस्कार आठवा आणि अडचणींचे संधी रुपांतर करा.”

राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC च्या वायूदलाचे युनिट शाळेत नव्याने सुरू झाले आहे. पुण्यातल्या NCC ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या हस्ते यावेळी शाळेला NCC चा ध्वज प्रदान करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी तो स्वीकारला. ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन आर.एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

 

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या स्थापनेमागील महिला सक्षमीकरणाची भूमिका विशद केली.
डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन तर अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची आणखी एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने दि. ७ जुलै २०२१ रोजी २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण करण्याचा कार्यक्रम मंगळवार, दि. १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मयूर कॉलनीमधील मएसो ऑडिटोरीअम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC हे आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्धाटन व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM (Deputy Chief of Integrated Defence Staff (Medical)) व ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) हे या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभाचे प्रक्षेपण फेसबुक आणि ‘मएसो’च्या युट्यूब चॅनेलद्वारे करण्यात येणार आहे.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आभासी पद्धतीने या समारंभात सहभागी होता येणार आहे …

https://www.youtube.com/watch?v=2taN2FqpvEM

https://www.facebook.com/100973985597451/posts/101884895506360/

ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच NCC चा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी होणार आहे.

छायाचित्रात (डावीकडून) शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते, सैनिकी शाळेच्या शाला समिती अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’ चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या समारंभाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे आणि सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे यांनी ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते उपस्थित होते.

“सभ्य आणि समर्थ समाजनिर्मितीसाठी महिलांचे सक्षमीकरण अतिशय महत्वाचे ठरते, म्हणूनच महिलांचे शिक्षण व सक्षमीकरणासाठी ‘मएसो’ सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. आजमितीस सुमारे २० हजार विद्यार्थिनी संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आज देशाच्या सशस्त्र सेनादलांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थिनींनी जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे,” अशी माहिती आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.

“शाळेतील स्वावलंबी जीवनशैली, नियमितपणा, शिस्त, संस्कार, विविध उपक्रमांमुळी विस्तारणारा दृष्टिकोन या सर्वांचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थिनींवर होतो. त्यामुळे त्यांच्यात अन्य शाळांमधील विद्यार्थिनींच्या तुलनेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि प्रशिक्षणाच्या जोरावर आमच्या सैनिकी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींनी सशस्त्र सेनादलांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अन्य क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे डॉ. मेहेंदळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“शाळेतील शिक्षण व प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींची बौद्धिक, मानसिक आणि शारिरीक जडणघडण अतिशय उत्तमरितीने होते. त्यामुळेच त्या सशस्त्र सैन्यदलांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परिक्षांप्रमाणे अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. शाळेतील विद्यार्थिनींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले तर त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल,” असे शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने इ. स. १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. गेल्या १६० वर्षात संस्थेने शिशु शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत व त्यापुढे जाऊन संशोधनापर्यंत आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षणापासून कौशल्यविकास अभ्यासक्रमांपर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७० शाखांमधून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील अनेक उपक्रम हे समाजातील विविध घटकांच्या गरजा आणि काळानुरूप निर्माण झालेल्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहेत.

पुणे, दि. २१ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या योग सप्ताहाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून सांघिक ऑनलाईन योगासनांद्वारे आज करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळातील सर्व बंधने पाळून ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम मएसो ऑडिटोरीअम येथे पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फेसबुक व वेबसाईटद्वारे करण्यात आले. पुणे शहराबरोबरच संस्थेच्या  कासारआंबोली, सासवड, बारामती, शिरवळ, नगर, पनवेल, बेलापूर, कळंबोली, लोटे-घाणेखुंट येथील विविध शाखांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्चमारी आणि हितचिंतक अशा सुमारे २५ हजार जण त्यात सहभागी झाले होते. त्यांनी योग प्रात्यक्षिकाचे अनुसरण करत यावेळी सूर्यनमस्कारासह १५ योगासने केली. या प्रसंगी ‘योगाचे महत्व’या विषयी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. अभय माटे यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, मएसो संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगाभ्यास करताना संस्थेचे मान्यवर पदाधिकारी.

श्री. मनोज साळी, श्री. जयसिंग जगताप आणि सौ. सुष्मिता नांदे यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. त्यांचासमवेत संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही योगाभ्यास केला. त्याचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश आपटे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. अभय माटे. या वेळी व्यासपीठावर उपस्थित (डावीकडून) ‘मएसो’च्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. अभय माटे म्हणाले की, “योग हा शद्ब युज या संस्कृत धातू पासून तयार झाला आहे आणि युज याचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि चैतन्य यांना जोडण्याचे काम योग करतो. योगाच्या सरावाने व्यक्तीच्या कर्मात कुशलता येते. ‘योग: कर्म सुकौशलम्’ ही उक्ती साध्य होते. एखाद्या तांब्यामध्ये असलेले सगळे पाणी न सांडता भांड्यामध्ये ओतणे हे कौशल्याचे रोजच्या जीवनातील साधे उदाहरण आहे. कौशल्यामुळे कोणतेही काम करणे सहज शक्य होते. जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी पतंजली ऋषिंनी अष्टांग योग सांगितला आहे. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा समावेश आहे. व्यक्ती आणि समाज यांच्यातील हितसंबंध राखणे म्हणजे यम त्यासाठी अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्य, अपरिग्रह असे पाच भाग आहेत. वैयक्तीक जीवन चांगले राखण्यासाठी शरीर आणि मनाची शुद्धता, स्वाध्याय, ईश्वरभक्तीचा अवलंब करण्यास सांगितले आहे. आसन ही केवळ शारिरीक क्रिया नाही तर शरीर आणि मनाची लवचिकता साधण्यासाठी आसनांची योजना केली गेली आहे. आपला श्वास आणि उत्च्छ्वास यांचे नियमन करण्यासाठी प्राणायाम उपयोगी ठरतो, त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे शक्य होते आणि आपल्या अंतरंगात जाण्याचा मार्ग सुकर होतो. आपल्या चित्ताला बांधून ठेवणारे धारणा-ध्यान-समाधी यांची योजना अष्टांग योगात आहे. कारण उपलब्ध पर्यायातून निवड करण्याचे कार्य बुद्धी करते परंतू त्याचा नेमकेपणाने उपयोगात आणते ते चित्त. याचप्रमाणे विपर्याय, विकल्प आणि निद्रा यांचा यामध्ये समावेश आहे. निद्रेमुळे चित्ताला विश्रांती मिळते. या सर्व वृत्तींवर ताबा योगामुळेच मिळवता येतो आणि त्यातूनच मोक्ष किंवा कैवल्यप्राप्ती होते. या चित्तवृत्तींमुळेच शिक्षण मिळत असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने योग सप्ताहाचे आयोजन केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो.”

मा. विजय भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “ज्ञानसंवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व लक्षात घेऊन संस्थेने क्रीडावर्धिनीची स्थापना केली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करणारी ‘मएसो’ ही एकमेव संस्था आहे. निष्णात प्रशिक्षकांकडून दर्जेदार प्रशिक्षणाची सोय संस्थेमध्ये आहे. योग सप्ताहाचे आयोजन हा देखील एक असाच महत्वपूर्ण उपक्रम आहे. कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एक महत्वाचा उपचार आहे आणि त्यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे, हे लक्षात घेऊन आजपासून योगसप्ताह आयोजित करण्यात आला आहे.”

७ व्या योगदिनाच्या शुभेच्छा देताना संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “योगाचा अवलंब केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ होत आहे. त्यामुळे आज जगभरातील शंभर देशांमध्ये योगदिन साजरा केला जात आहे. प्रत्यक्षात रोजच योगाभ्यास केला पाहिजे.”

मा. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राही भालेराव यांनी केले. सरस्वती वंदना आणि शांतीमंत्र अपूर्वा साने यांनी सादर केला.

म.ए.सो. क्रीडावर्धिनी आयोजित योग सप्ताहाच्या उद्घाटनानिमित्त आंतरराष्ट्रीय योगदिनी म्हणजेच सोमवार, दि. २१ जून २०२१ रोजी सकाळी ७.३० वाजता सांघिक ऑनलाईन योगासने आयोजित करण्यात आली आहेत.

या प्रसंगी ‘योगाचे महत्व’ या विषयावर योग प्रशिक्षक मा. अभय माटे (अध्यक्ष, जनता सहकारी बँक) मार्गदर्शन करणार आहेत.

खालील लिंकद्वारे या उपक्रमात सहभागी व्हावे.

https://www.facebook.com/mespune

https://www.youtube.com/c/MaharashtraEducationSocietyPuneofficial

🕉️ *Be With Yoga, Be At Home* 🕉️

आंतरराष्ट्रीय योगदिनी आयोजित सांघिक ऑनलाईन योगासनांमध्ये समाविष्ट असलेल्या योगासनाची स्वतंत्र क्लिप …

०. शरीर संचालन – https://youtu.be/9la8BMmeGMo
००. सूर्यनमस्कार – https://youtu.be/ERFddbsW_uU
१. ताडासन – https://youtu.be/R38VGav6mFg
२. अर्धचक्रासन – https://youtu.be/jGE6DNbiMzg
३. वक्रासन – https://youtu.be/NfbLFRAhROc
४. शशकासन – https://youtu.be/8AcgraKw33M
५. उत्तानपादासन – https://youtu.be/SOQBaZynE6Y
६. पवनमुक्तासन – https://youtu.be/EgRM0GwZ49c
७. शलभासन – https://youtu.be/x6YY16purAA
८. शलभासन – १ : उजव्या पायाने – https://youtu.be/2RAP5Ym6EYI
९. भुजंगासन – https://youtu.be/u-I_l9EaMow
१०. मकरासन – https://youtu.be/SxDjcJegtuY
११. कपालभाती – https://youtu.be/yO8Vo8EQmPw
१२. अनुलोम-विलोम – https://youtu.be/m_eTYy8D3F0
१३. भ्रामरी – https://youtu.be/WqbgGgFOdPw
१४. ओंकार – https://youtu.be/YVFoNWucTes

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या वतीने म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळा, मयूर कॉलनी येथे सोमवार, दि. २४ मे २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू झाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते लसीकरणासाठी आलेल्या पहिल्या नागरिकाला कूपन देऊन लसीकरणाची सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य व म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ते २०३०-३१ या दहा वर्षांच्या कालावधीसाठी हा स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयाला स्वायत्तता देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार या संबंधातील पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शुक्रवार, दि. १४ मे २०२१ रोजी महाविद्यालयाला मिळाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अग्रगण्य वाणिज्य महाविद्यालयांपैकी एक असलेल्या म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एम.कॉम., बी.बी.ए., बी.बी.ए. (सी.ए.), बी.बी.ए. (आय.बी.) असे अभ्यासक्रम येथे चालविले जातात. कॉमर्स विषयातील संशोधन केंद्रही येथे आहे. उद्योजकता विकास केंद्र, प्लेसमेंट सेल, कॉमर्स लॅब हे या महाविद्यालयाचे वैशिष्टयपूर्ण उपक्रम आहेत. राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधिस्विकृती परिषद म्हणजेच ‘नॅक’तर्फे करण्यात आलेल्या तिसऱ्या फेरीच्या मुल्यांकनात महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार देखील मिळाला आहे. ह्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी जगभरात आपल्या कर्तृत्वाने महाविद्यालयाबरोबरच संस्थेचे व देशाचेही नाव उज्ज्वल करत आहेत आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी जगदीश राजाराम मालखरे यांचे आज संध्याकाळी कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
१९९५ पासून त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात विविध पदांवर काम केले.
मूळचे सोलापूरचे असलेले मालखरे १९८४ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. त्यानंतर १९८७ ते १९९२ पर्यंत त्यांनी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. या काळात नाशिक शहर, नाशिक विभाग आणि मध्य मुंबईचे संघटन मंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांच्याकडे परिषदेचे प्रदेश कार्यालय मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. अभिनव आणि धाडसी कार्यक्रमांची आखणी करून ते यशस्वीपणे पार पाडणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. ते उत्तम गीत गायक होते. शांत स्वभावाच्या मालखरे यांचे अनेकांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.
संस्थेतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य आणि जुन्या पिढीतील बांधकाम व्यावसायिक अनंत नारायण तथा दादा गोगटे यांचे काल रात्री कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी हे त्यांचे जावई आहेत.

गोगटे हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या नियामक परिषदेचे व पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे माजी सदस्य होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह तसेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आज (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात ४ विद्यार्थिनी आणि १३ विद्यार्थी अशा एकूण १७ जणांनी रक्तदान केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, नियामक मंडळाचे सदस्य व इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ देत आहेत.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने रक्तदानासाठीचे सर्व निकष पूर्ण करू शकणाऱ्या जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

छायाचित्रात (डावीकडून) – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संतोष देशपांडे.

कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि म.ए.सो  कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आज (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) संयुक्तपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या शिबिरात महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी या वेळी रक्तदान केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता आचार्य, महाविद्यालयाचे उपप्राचार्य सीए (डॉ.) सुदाम धोंगटे पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ देत आहेत.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने रक्तदानासाठीचे सर्व निकष पूर्ण करू शकणाऱ्या जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

छायाचित्रात (डावीकडून) – म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य सीए (डॉ.) सुदाम धोंगटे पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता आचार्य, मएसोच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले.

 

पुणे, दि. १९ : कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने आज (सोमवार, दि. १९ एप्रिल २०२१) महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी.बी. बुचडे, डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक वाणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नितीन आडे, युथ रेडक्रॉसचे प्रा. प्रवीण दुसाने, राष्ट्रीय छात्रसेनेच्या भूदल विभाग प्रमुख प्रा. प्रवीण दुसाने, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नौदल विभागाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश शेलार, महाविद्यालयाचे प्रबंधक किसन साबळे यांचा शिबिराच्या आयोजनात विशेष सहभाग होता.

महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी या वेळी रक्तदान केले.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे अशी माहिती डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. शैलजा पारगांवकर यांनी या वेळी दिली.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने वरील सर्व सूचनांचे पालन करून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि म.ए.सो  कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय यांनी संयुक्तपणे उद्या (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. म. ए. सो. गरवारे कॉलेज असेंब्ली हॉलमध्ये सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत हे शिबिर होणार आहे.

कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसमध्ये देखील उद्या (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

गुढीपाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सतीश कुलकर्णी व सामंत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या रामायणावर आधारित दिनदर्शिका आणि बालगोपाळांसाठीच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन आज (मंगळवार, दि. १३ एप्रिल २०२१) करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उद्योजक मा. सतीश कुलकर्णी, सुमित्र माडगूळकर, रवींद्र खरे आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे यावेळी उपस्थित होते.

या ध्वनिचित्रफितीचे संहिता लेखन सौ. प्राजक्ता माडगूळकर यांनी केले असून निवेदन कु. पलोमा माडगूळकर यांनी केले आहे. रवींद्र खरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अमेय घाटपांडे आणि मंथन टन्नू यांनी तांत्रिक बाजू सांभाळली असून या ध्वनिचित्रफितीचे ध्वनीमुद्रण म.ए.सो. स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे.

प्रभू रामचंद्रांचे आदर्श जीवन कायम नजरेसमोर राहावे या हेतून ही दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार करण्यात आली असून हा प्रकल्प दोन महिन्यात साकारण्यात आल्याचे इंजि. सुधीर गाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मा. सतीश कुलकर्णी यावेळी म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील किन्हई या आमच्या गावी १९३५ च्या सुमारास माडगूळकर कुटूंब राहात होते. गावातील राम मंदिरातच ग.दि. माडगूळकर यांना गीत रामायणची प्रेरणा मिळाली असावी. अध्योद्धेचे राममंदिर, राम, महाराष्ट्र, आमचे गाव, ग.दि.माडगूळकर, गीत रामायण हे सगळं कसे जुळवून आणता येईल याचा गेल्या चार वर्षांपासून विचार सुरू होता. रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्रे उपलब्ध होत नसल्याने हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता मात्र सुधीर गाडे यांच्यामुळे कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राकडून ही चित्रे उपलब्ध झाली आणि प्रकल्प साकारला. या कामी माडगूळकर कुटुंबाची देखील मदत मिळाली.  रामायणातून आपण बरेच काही शिकू शकतो. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे काय? हे जगभरातील लोकांनी समजून घेतले पाहिजे. रामायण आणि महाभारतातून अनेक गोष्टी शिकाया मिळतात. पुत्रमोहाने कोणती परिस्थिती ओढवते? हे रामायणात कैकेयी आणि भरत तसेच महाभारतात धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्यावरून दिसते. जे आपले नाही ते बळजबरीने आपण मिळवले तर त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात हे आपल्याला रावणाने केलेले सीतेचे अपहरण आणि कौरवांनी कपटाने बळकावलेले पांडवांचे राज्य या उदाहरणांवरून दिसून येते. भारतात आजही या गोष्टी लागू पडतात.”

ग.दि. माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले, “ज्यांना वाचता येत नाही किंवा मराठी भाषा कळत नाही अशा ३ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी रामायणावरील दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार केल्याबद्दल आणि त्यात माडगूळकर कुटुंबीयांना सहभागी करून घेतल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानतो. पुढच्या पिढीपर्यंत हे सर्व पोहोचावे हा त्यामागील उद्देश आहे. याच उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यात गदिमांचे स्मारक उभे राहात आहे. त्यातील एक दालन गीत रामायणासाठी राखीव असेल. अयोद्धेतील राममंदिराची एक तरी भिंत गदिमांच्या गीत रामायणाने भरलेली नक्कीच असेल.”

ध्वनिचित्रफितीचे पार्श्वसंगीतकार रवींद्र खरे म्हणाले की, “वाल्मिकी रामायण हा कलात्मकतेने मांडलेला इतिहास आहे. कलात्मकतेमुळे इतिहास दीर्घकाळ टिकतो आणि सर्वदूर त्याचा प्रसार देखील होतो. राजकारण आणि राज्यव्यवहार यांची प्रभू रामचंद्रांनी कायम केलेली प्रथा व पद्धत जगातील सर्वात आदर्श होती. त्यामुळेच त्यांच्यानंतर २५०० वर्षे म्हणजे महाभारत घडेपर्यंत ती टिकून होती, हेच रामाचे मोठेपण आहे. रामभक्तीच्या भावनेच्या भरात रामायणाचा इतिहास मागे पडू नये. लहानपणी अचूकतेचा व ध्येयनिष्ठेचा संस्कार, कुमारवयात चिकित्सा व कुतूहल आणि मोठेपणी वास्तवाचा शोध घेण्यासाठी रामायण वाचले पाहिजे. रामायण हा इतिहास आहे कारण वाल्मिकींनी रामाच्या ८३ पिढ्यांची नावे त्यात दिली आहे. तरूण पिढीने नगररचना, आरोग्यचिकित्सा, भूगोल, तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रांचे ज्ञान अशी विविध पैलूंनी रामायणाचा अभ्यास केला पाहिजे.”

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “रामायणावरील दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे लहानपणी झालेले संस्कार कायम टिकून राहतात. रामायण आणि महाभारत हे खूप मोठे विषय आहेत, त्यांचा खूप अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. राम हा सहनशील होता आणि सहनशीलतेचा कडेलोट झाला तेव्हा कृष्ण उभा राहिला. रामायण आणि महाभारत या केवळ कथा नाहीत. त्यातील अनेक मूल्ये जीवनात आचरणात आणण्यासारखी आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. सुधीर गाडे यांनी केले.

 

“भारतापासून वेगळे झाल्यानंतर पाकिस्तानने बांगला देशात केवळ लूटमार, अत्याचार आणि नरसंहार केला. बांगला संस्कृती आणि भाषा यावर अतिक्रमण केले. बलुचिस्तानातदेखील पाकिस्तानने असाच नरसंहार केला आहे. पाकिस्तानच्या या कारवाया बघून जॉर्डनच्या राजाने आपल्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला निमंत्रण दिले आणि त्या देशातील पॅलेस्टिनी नागरिकांचा संहार केला. क्रूरपणा हा पाकिस्तानचा स्थायीभावच आहे. दुसरीकडे बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुक्ती वाहिनीला मदत करण्यासाठी तब्बल तीन लाख भारतीय सैनिक बांगला देशात उतरले होते. मात्र सहा महिन्याच्या काळात भारतीय सैनिकांनी तिथल्या नागरिकांवर कोणतेही अत्याचार केले नाहीत. त्यामुळे भारतीय सैनिकांचे हे संस्कार आणि संस्कृतीला माझा सलाम आहे,” असे बांगला देश मुक्ती संग्रामात भाग घेतेलेले बांगला देशच्या लष्करातील निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर आज (बुधवार, दि. २४ मार्च २०२१) येथे म्हणाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘द हिस्ट्री अनफोल्डिंग’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. बांगला देशचे मुंबईतील उप-उच्चायुक्त मा. मोहम्मद लुत्फोर रहमान तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे या वेळी उपस्थित होते.

१९७१ साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आठवण कायम ठेवण्यासाठी १६ डिसेंबर हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असलेल्या व्याख्यानमालेतील हे व्याख्यान होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता (निवृत्त) होते. बांगला देशातील ‘बीर उत्तम’ हा नागरी सन्मान मिळालेले मा. शहाबुद्दीन अहमद आणि लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर हे ढाका येथून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांचा भारत सरकारने या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांना बांगला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानले जाणारे ‘स्वाधीनता पदक’ आणि ‘बीर प्रोतिक’ या पुरस्कारांनी या पूर्वीच गौरविण्यात आले आहे.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, “तेराशे किलोमीटर अंतर आणि सांस्कृतिक दुरावा असलेले दोन प्रदेश मिळून एक देश कसा काय निर्माण होऊ शकतो? हा प्रश्नच होता. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत शेख मुजीब-उर-रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगने प्रचंड विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी संसदेचे अधिवेशन ढाका येथे घेण्याची त्यांची मागणीदेखील जनरल याह्याखान यांनी फेटाळून लावली होती. बांगला देशच्या मुक्तीसाठी लढताना भारतीय सैन्यातील १७-१८ वर्ष वयाचे सैनिक धारातीर्थी पडले. त्यांचे हे हौतात्म्य विसरता येणार नाही. भारत आणि बांगला देशातील संबंध रक्त आणि परिश्रमाने जोडलेले आहेत. नवीन पिढीला त्याची माहिती करून देण्याची गरज आहे. १९७१ च्या मुक्ती संग्रामाचे ऋण हे पैशाने फेडता येण्यासारखे नाहीत, दोन्ही देशांमधील संबंध, संपर्क, संवाद आणि समन्वय वाढवून त्यातून उतराई होता येईल.”

शहाबुद्दीन अहमद म्हणाले की, “आत्मसन्मान राखण्यासाठी आणि लोकशाही पद्धतीने जीवन जगण्यासाठी बांगला देशची निर्मिती झाली आहे. भारतातून वेगळे झाल्यापासूनच पश्चिम पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांनी पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनतेवर अन्याय आणि अत्याचार सुरू केले होते. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये मी वैमानिक म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी एकूण ३०० वैमानिक होते, त्यापैकी केवळ ३० वैमानिक पूर्व पाकिस्तानातील होते. लष्कर आणि नोकरशाहीत देखील असाच दुजाभाव केला जात होता. वंगबंधू शेख मुजीब-उर-रहमान यांच्या प्रेरणेने मी पूर्व पाकिस्तानात परतलो. मी नागरी सेवेतील वैमानिक होतो परंतू बांगला देश मुक्ती संग्रामाच्या वेळी मी लढाऊ वैमानिक झालो. तेव्हा बांगला देशाकडे केवळ चार विमाने होती आणि त्यातील एक विमान जोधपूरच्या महाराजांनी दिले होते.  चार विमाने आणि नऊ वैमानिकांच्या बळावर २८ सप्टेंबर १९७१ रोजी बांगला देशच्या हवाई दलाची स्थापना झाली. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन चंदनसिंग यांनी आम्हाला १५ दिवस प्रशिक्षण दिले आणि १४ रॉकेट घेऊन आम्ही हेलिकॉप्टरने ढाका आणि चितगांव येथील पाकिस्तानी फौजांवर हवाई हल्ला केला. त्यानंतर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युद्धाची अधिकृत घोषणा केली आणि भारतीय हवाई दल या युद्धात उतरले. भारताने केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही.”

मोहम्मद लुत्फोर रहमान आपल्या भाषणात म्हणाले की, “वंगबंधू शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताद्बी वर्षातच भारताने त्यांना ‘गांधी शांती पुरस्कार’ जाहीर केला आहे, त्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो. शेख मुजीब-उर-रहमान यांचे नाव कधीही विसरता येणार नाही कारण त्यांनी बांगला देश जगाच्या नकाशावर आणला. बांगला देशाच्या स्वातंत्र्य युद्धाला जगाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. बंगाली जनतेच्या अस्मितेची जाणीव त्यांना लहानपणापासूनच होती. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी चळवळींमध्ये कधीच तडजोड केली नाही. बंगाली लोकांच्या हक्काचा, त्यांचे भविष्य घडविणारा देश मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. बांगला देशाच्या स्वातंत्र्य युद्धामुळे भारत आणि बांगला देश यांच्यात निर्माण झालेले भावबंध कधीही न संपणारे आहेत, त्यातूनच दोन्ही देशांमधील सहकार्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातूनच दोन्ही देशांमधील सीमा प्रश्नावर तोडगा निघू शकला. आता दोन्ही देश उत्तम पद्धतीने शेजारधर्म पाळत आहेत. भारताकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीबरोबरच होणारा पायभूत सुविधांचा विकास, दोन्ही देशातील बंदरे-जलमार्ग-रस्ते यांची जोडणी, उर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांमुळे रास्त दरात उपलब्ध होणारी वीज अशी अनेक उदाहरणे आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी दहशतवादाच्या विरोधात कंबर कसल्यामुळे मूलतत्ववादी आणि दहशतवादी कारवाया संपुष्टात आल्या आहेत. परस्परांच्या हितासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करून विकास साधत आहेत.”

लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध म्हणजे लोकशाहीने लष्करशाहीवर, मानवतेने क्रौर्यावर आणि जुलुमशाहीवर मुक्ततेने मिळवलेला विजय आहे. बांगला देशातील भारतीय सैन्याच्या संस्कारी वर्तनातून दिलेला मानवतेचा संदेश, मुक्तीवाहिनीने युद्धभूमीवर दिलेला प्रामाणिकपणाचा परिचय, १३ दिवसात पूर्व पाकिस्तानातील जनतेला मिळालेली मुक्ती, ३ हजारांच्या भारतीय फौजेसमोर शरण आलेले ३० हजार पाकिस्तानी सैनिक म्हणजे बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध आहे. बांगला देशी जनतेच्या वेदना आणि व्यथा समजून घेण्यास जगात कोणालाच वेळ नव्हता. जेव्हा दोन लोकशाही देश एकत्र येतात तेव्हा त्यांना कोणीच रोखू शकत नाही.”

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सौ. लीना चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

“देशाला स्वातंत्र्य मिळतानाच निर्माण झालेल्या पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात कधीच एकात्मभाव निर्माण झाला नाही. १६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम पाकिस्तानची संस्कृती पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनतेने स्वीकारली नाही. उर्दू ही देशाची राष्ट्रभाषा म्हणून देखील बंगाली जनतेला मान्य नव्हती कारण त्यांना फक्त बंगाली भाषाच येत होती. त्यामुळे फार मोठी हिंसक निदर्शने झाली आणि अखेर बंगाली भाषेलादेखील राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा लागला. अशा अनेक घटना घडल्याने बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाची बीजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना झालेल्या फाळणीत रोवली गेली असे म्हणता येईल,” असे प्रतिपादन ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) यांनी आज (सोमवार, दि. १५ मार्च २०२१) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विजय दिवस ७१ – एक दृष्टीक्षेप’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल बी.टी. पंडित (निवृत्त) होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ब्रिगेडिअर अजित आपटे (निवृत्त) आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाजन पुढे म्हणाले की, “श्रीनगरजवळील हजरतबल येथील मशिदीमधून प्रेषित महमंद यांचे पवित्र अवशेष डिसेंबर १९६३ मध्ये चोरी झाले. त्यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान पूर्व पाकिस्तानात ढाका येथे होते. त्यांनी या घटनेसाठी भारताला दोषी ठरवले. परिणामी जानेवारी १९६४ मध्ये पूर्व पाकिस्तानात फार मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला, बंगाली हिंदूंना लक्ष्य केले गेले आणि त्यामध्ये प्रामुख्याने उच्चशिक्षित बंगाली हिंदू होते. १९६९ मध्ये पाकिस्तानातील आर्थिक, सामाजिक स्थिती कमालीची खालावली. ती परिस्थिती हाताळता न आल्यामुळे अयुब खान यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख याह्या खान यांच्याकडे सचत्ता सोपवली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मुजीब-उर-रहमान यांच्या अवामी लीग या पक्षाला प्रांतिक आणि राष्ट्रीय स्तरावर बहुमत मिळाले. मुजीब-उर-रहमान यांनी पूर्व पाकिस्तानला स्वायत्तता आणि बंगाली लोकांच्या हाती सत्ता देण्याची मागणी केली. मात्र लष्करी सत्तेने त्यांच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या. बंगाली मुस्लिमांनी मार्च १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानातील पश्चिम पाकिस्ताने समर्थक असलेल्या बिहारी मुस्लिमांचे हत्याकांड केले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल टिका खान यांनी पूर्व पाकिस्तानात कारवाई केली. मुजीब-उर-रहमान यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पश्चिम पाकिस्तानात तुरूंगात डांबण्यात आले. याविरोधात तेथे मुक्तीवाहिनीची स्थापना झाली. भारताने त्याला पाठबळ दिले. दरम्यानच्या काळात पूर्व पाकिस्तानातून सुमारे 1 कोटी शरणार्थी भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये आश्रयाला आले होते. त्यामुळे या राज्यांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. या संबंधात भारत सरकारने आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हा प्रश्न उपस्थित केला मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अखेर भारताने प्रत्यक्ष युद्धाचा निर्णय घेतला. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून एक नवा देश निर्माण झाला. या युद्धामुळे पूर्व पाकिस्तानचे संरक्षण हे पश्चिम पाकिस्तानच्या हातात आहे ही समजूत खोटी ठरली. भारतीय फौजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे ९३ हजार युद्धकैदी बनले. त्यांना माणुसकीची बागणूक दिली, कारण ती आपली संस्कृती आहे. त्यांना भारताने नंतरच्या काळात मुक्त केले परंतु त्याबदल्यात भारताच्या पदरात काहीच पडले नाही. पाकिस्तानच्या ताब्यात आजदेखील भारतीय युद्धकैदी आहेत मात्र पाकिस्तान ते मान्य करत नाही. बांगलादेशच्या या स्वातंत्र्य युद्धात रशियाने भारताला पाठिंबा दिला, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आपला नकाराधिकार वापरला. रशियाच्या या भूमिकेमुळे चीनला शह बसला आणि तो पाकिस्तानच्या मदतीला आला नाही.”

ब्रिगेडिअर अजित आपटे (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात सांगितले, “ बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध १४ दिवस सुरू होते असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात ते ९० दिवस सुरू होते. १९७१ सालच्या डिसेंबर महिन्यात अधिकृतपणे ते सुरू झाले परंतु सप्टेंबर महिन्यातच खऱ्या अर्थाने त्याची सुरवात झाली होती. भारतीय लष्कराने बांगलादेश मुक्ती वाहिनीला मदत करून युद्धाची पूर्वतयारी केली होती. पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर यंत्रणा आणि मुक्ती वाहिनीतील हस्तकांकडून भारतीय लष्कराच्या ठाण्यांची माहिती मिळत होती. त्याआधारे त्यांचे हवाईदल या ठाण्यांवर हल्ला करत होते. मात्र, आमच्या तुकडीने अतिशय कौशल्याने पाकिस्तानची दोन विमाने पाडली आणि त्यांच्या वैमानिकांना ताब्यात घेतले. भारताच्या  लष्कर, हवाईदल आणि नौदल या तिन्ही अंगांचा उत्तम समन्वय या युद्धात होता. तसेच आक्रमणाची व्यूहरचना बिनचूक होती आणि त्याची अमलबजावणीदेखील तितकीच अचूक पद्धतीने झाली.”

आपल्या अध्यक्षीय भाषणात लेफ्टनंट जनरल बी.टी. पंडित (निवृत्त) म्हणाले, संपूर्ण देशाने एकत्रितपणे हे युद्ध लढाल्याचे सांगितले. राजकीय नेतृत्वाचा कणखरपणा, जगभरातून मिळवलेला पाठिंबा, सैन्यदलांना नोकरशाहीने केलेले सहकार्य हे त्याचे महत्वाचे पैलू आहेत. हे युद्ध पाकिस्तानच्या भूमीवरच लढायचे, त्यांना आपल्या सीमेच्या आत येण्याची संधी द्यायची नाही आणि जम्मू-काश्मीरशी संपर्क अखंड राहील याची पूर्णपणे खबरदारी घ्यायची ही ध्येय त्यावेळी डोळ्यासमोर होती. मुक्तीवाहिनीची फार मोठी मदत झाली, पण भारतीय जनतेने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे सैन्यदलांचे आत्मिक बळ प्रचंड वाढले होते. पाकिस्तानला संपवण्याची भावना प्रत्येक सैनिकात निर्माण झाली होती, त्यामुळेच फार मोठा, निर्णायक आणि ऐतिहासिक विजय भारताला मिळाला.”

कार्यक्रमाच्या सुरवातील एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, युद्धात मिळालेल्या विजयातूनही शिकायला मिळते, ते कळावे म्हणून विजयी योद्ध्यांप्रमाणेच तेव्हा युद्धकैदी झालेल्यांनाही या व्याख्यानमालेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सौ. लीना चांदोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीदिनी आज संस्थेच्या मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. बाबासाहेब शिंदे व अॅड. सागर नेवसे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. विनय चाटी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर यांनी आद्यक्रांतिवीरांच्या प्रतिमेला फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना श्रद्धांजली वाहिली.

“कागदावर आखलेली सीमारेषा, शस्त्र-सामुग्रीचा प्रचंड अभाव, चुकीची युद्धनीती, हवाई दलाचा वापर न करण्याचा निर्णय, चीनवर ठेवलेला अनाठायी विश्वास आणि अपरिपक्व राजकीय नेतृत्व यामुळे भारताला 1962 साली चीनविरुद्धच्या युद्धात पराभव स्वीकारावा लागला. सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे, युद्धातील पराभवाला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांचे पुनर्वसन आणि नोकरशाहीला मिळालेले अभय यामुळे देशातील जनमानसाचे खच्चीकरण झाले. राजकीय नेतृत्वाला संरक्षण दलांचे कळालेले महत्व, सैन्य दलांमधील भरती आणि देशाचा संरक्षण खर्च यांत झालेली वाढ ही या युद्धाची फलनिष्पती आहे,” असे प्रतिपादन मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘भारत-चीन युद्ध – 1962’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडीअर रघुनाथ जठार (निवृत्त) हे होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

1971 साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आठवण कायम ठेवण्यासाठी 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी त्याला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतीय सैन्याच्या पराक्रमाची माहिती समाजाला व्हावी

या हेतूने वर्ष भर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यातील दुसरे व्याख्यान आज आयोजित करण्यात आले होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान झाले. ‘मएसो’चे फेसबुक पेज आणि यूट्युब चॅनलद्वारे त्याचे थेट प्रसारण करण्यात आले.

 

“1914 सालच्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या एका गुप्त बैठकीत कागदावरील नकाशावर   भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेली मॅकमोहन सीमा रेषा आखली गेली. ब्रिटीशकालीन सर्व करार चीनने नाकारले. 1954 सालपर्यंत चीन सीमेबाबत भारताची भूमिका संभ्रमित होती. पुढे तिबेट हा चीनचा भूभाग असल्याचे भारताने मान्य केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘पंचशील’ धोरण स्वीकारले. चीन भारतावर आक्रमण करणार नाही असा अनाठायी विश्वास भारताने बाळगला. पंडित नेहरूंनी सीमारेषेसंदर्भातील एक चूक चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ ऐन लाय यांच्या लक्षात आणूनही दिली होती. परंतू, त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. 1960 सालापर्यंत चार हजार किलोमीटर लांब असलेल्या चीन सीमेवर आसाम रायफल्सची तैनाती होती. तेव्हा सीमाभागात भारताने रस्तेदेखील बांधलेले नव्हते. 1961 सालच्या ऑक्टोबर महिन्यात लेह ते चुशूल हा रस्ता झाला आणि त्यानंतर जानेवारी 1962 मध्ये बोडिला ते तवांग हा रस्ता बांधण्यात आला. चीनच्या युद्धनीतीचे जाणकार असलेले लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांनी तवांग ते हुलियांग हा रस्ता बांधण्याचा आग्रह धरला होता मात्र तत्कालिन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी तो मान्य केला नाही. चीन भारतावर आक्रमण करणार नाही अशी खात्रीच राजकीय नेतृत्वाला वाटत होती. त्यामुळेच चीनच्या सीमेवरील लहान असलेल्या ठाण्यांवर अतिशय कमी संख्येने सैन्य तैनात करण्यात आले होते. एकूण 36 ठाण्यांवर आपल्या फक्त दोन बटालियन तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतीय सैन्याची ताकद विखुरली गेली. 22 चीनी सैनिकांच्या तुलनेत केवळ तीन सैनिक सीमेवर तैनात होते. चीनने त्यांची ठाणी वाढवल्यानंतर भारताने देखील ठाणी वाढवली आणि त्यामुळे भारतीय सैन्य अधिकच कमकुवत झाले. एका ठाण्यावर केवळ 11 सैनिक तैनात होते. त्यातच भारतीय सैनिकांकडे शस्त्रे, दारूगोळा, साधनसामुग्री यांचा प्रचंड अभाव होता, राजकीय नेतृत्वाने त्यांना स्वतःच्या हिमतीवर लढण्यासाठी सोडून दिले होते. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धात युरोपात अतुलनीय पराक्रम जागवणारी भारतीय सैनिकांची एक सबंध तुकडीच चीनविरूद्धच्या युद्धात गारद झाली. या युद्धात भारताचे 1383 सैनिक धारातिर्थी पडले तर 1696 सैनिक बेपत्ता झाले. अमेरिका आणि इंग्लंडने या काळात भारताला पाठिंबा दिला. अमेरिकेने शस्त्रे देण्याची तयारी दाखवली. भारतीय सेनानींचा विरोध डावलून पर्वतरांगांमधील युद्धासाठी उपयोगी नसलेली शस्त्रे भारताने अमेरिकेकडून खरेदी केली. या युद्धातील भीषण अनुभवांमुळे काही सैन्याधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले. युद्धकाळात पायउतार व्हावे लागलेल्या कृष्ण मेनन यांची देशाच्या संरक्षण मंत्री पदी पुन्हा वर्णी लावण्यात आली, देशातील नोकरशाहीला या सर्व घडामोडींची कोणतीच झळ बसली नाही. मात्र, या युद्धामुळे संरक्षण दलांची आवश्यकताच नाही अशी धारणा करून घेतलेल्या राजकीय नेतृत्वाला संरक्षण दलांचे महत्व लक्षात आले. त्यातूनच सैन्यात मोठ्या संख्येने भरती सुरू झाली आणि संरक्षण खर्चावरील तरतूदीत वाढ झाली, हीच या युद्धाची फलनिष्पती म्हणता येईल,” असे पित्रे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, 62 साली झालेल्या चीनविरूद्धच्या युद्धाची आठवण आपल्या कोणालाच आवडत नाही. या युद्धामुळे शेजारी देशांबाबत वाटणारा विश्वास भारताने गमावला.

चीनविरुद्धच्या युद्धात लडाखमध्ये तैनात असलेल्या ब्रिगेडीअर रघुनाथ जठार (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लडाखमधील परिस्थिती विशद केली. ते म्हणाले “चीनने भारताच्या सीमावर्ती भागात फार पूर्वीपासूनच रस्तेबांधणी केलेली आहे. भारताने लडाखमध्ये डरबूक-श्योक-दौलतबेग ओल्डी हा रस्ता बांधायला सुरवात केल्याने चीन अस्वस्थ झाला. दौलतबेग ओल्डी हे या भागातील मोक्याचे ठिकाण असून तिथून काराकोरम परिसरावर नियंत्रण मिळवता येते. रेझिंग्ला भागात चीनच्या सैन्याला थोपवताना शस्त्रास्त्रांच्या अभावामुळे 126 पैकी 114 सैनिक धारातिर्थी पडले. वझिरीस्तानातील धुमश्चक्री वगळता भारतीय सैन्याचा इतका दारूण पराभव कधीच झाला नव्हता. भारतीय सैनिकांनी अशा परिस्थितीत देखील चीनच्या सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी केली. युद्ध संपल्यानंतर तीन महिन्यानंतर भारतीय सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले तेव्हा ते बर्फात गोठलेले होते पण प्रत्येक सैनिक लढाईच्याच पवित्र्यात होता असे लक्षात आले.”

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सौ. अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

“भारतीय सैन्य 1947-48 मध्ये पाकिस्तानविरूद्ध झालेल्या युद्धात अतिशय धाडसाने लढले त्यामुळेच काश्मीर आज भारतात आहे. लडाख आणि लेहसारख्या भागात फौजांनी केलेल्या पराक्रमाची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही” असे मत ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘पहिले भारत-पाकिस्तान युद्ध 1947-48’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी अशोक गोखले हे होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘पहिले भारत-पाकिस्तान युद्ध 1947-48’ या विषयावर व्याख्यान देताना ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

1971 साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आठवण कायम ठेवण्यासाठी 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी त्याला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतीय सैन्याच्या पराक्रमाची माहिती समाजाला व्हावी या हेतूने वर्षभर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यातील पहिले व्याख्यान आज आयोजित करण्यात आले होते.

“पाकिस्तानी फौजांनी भारतावर आक्रमण करण्यासाठी त्यांच्या प्रदेशातील पश्तून आदिवासी टोळ्यांचा वापर केला. भारतीय सीमेवर पुरेशी गस्त नसल्याने या टोळ्या थेट श्रीनगरपर्यंत घुसू शकल्या. त्यानंतर काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांनी काश्मीरच्या भारतातील विलिनीकरण करारावर स्वाक्षरी केली. याच काळात लडाखमध्ये लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या फौजांनी कोणत्याही मदतीशिवाय 6 महिने लढा दिला. परंतु त्यांच्या या पराक्रमाची फारशी दखल घेतली गेली नाही. त्याचप्रमाणे लेहमध्ये एअर कमोडोर मेहरसिंग आणि फ्लाईट लेफ्टनंट एस.डी. सिंग यांच्या सोबतीने जनरल थिमय्या स्वतः वायू दलाच्या पहिल्या विमानातून उतरले, त्यामुळे सैन्याचे मनोबल वाढले. जेव्हा पाकिस्तानातील आदिवासी टोळ्यांच्या हे लक्षात आले की आपल्याला आता भारतीय सैन्याला तोंड द्यावे लागणार आहे, तेव्हा त्यांनी काढता पाय घेतला आणि त्यानंतर पाकिस्तानी सैन्य समोर आले. विशेष म्हणजे या युद्धात स्थानिक नागरिकांचा आपल्या सैन्याला खूप पाठिंबा होता आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर माहिती सैनिकांना मिळत होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी अशोक गोखले. छायाचित्रात (डावीकडून) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त).

आपल्या अध्यक्षीय भाषणात अशोक गोखले म्हणाले, “बांगला देशचे युद्ध हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. भारतीय सैन्याचा पराक्रम, धाडस, त्याग यांची इतिहासात ठळकपणे नोंद झाली पाहिजे. 1947-48 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात घटना कशा घडत गेल्या, त्याचे सूत्रधार कोण, त्यांचे कर्तृत्व आणि कृती यांचा मागोवा घेतला जाईल. पण प्रत्यक्षात असे दिसून येत होते की, 1945 साली दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांना भारतातून बाहेर पडण्याची घाई झाली होती कारण, त्यांची आर्थिक स्थिती ढासळली होती तसेच त्यांना भारतीय सैनिकांच्या बंडाची भीति होती आणि स्वातंत्र्य लढा मजबूत होत चालला होता. ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे स्थान डळमळीत झाले नसते तर स्वातंत्र्य मिळताना भारतातील परिस्थिती चांगली राहिली असती आणि झालेली मनुष्यहानी टळली असती. भारतासंबंधातील धोरणे जोपर्यंत पाकिस्तानचे सैन्य ठरवत राहिल तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंधात सुधारणा होणार नाहीत.”

व्याख्यानानंतर मान्यवरांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातील एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सौ. अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी गुरुवार, दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी त्यांचे स्वागत केले.

या वेळी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, “आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या संस्थेत आल्याचा मला खूप आनंद वाटतो आहे. शिक्षण आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार करणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत.”

संस्थेचे सचिव मा. डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. विजय भालेराव, मा. सौ. आनंदीताई पाटील, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. डॉ. अतुल कुलकर्णी, मा. श्री. विनय चाटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री श्री. शंकर गायकर, श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानाचे प्रांत प्रमुख श्री. संजय मुद्राळे, प्रांत सहप्रमुख श्री. मिलिंद देशपांडे, पुणे महानगर प्रमुख श्री. महेश पोहनेरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. मा. सुधीर गाडे यांनी यावेळी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

 

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या बोधवाक्याला अनुसरून गेल्या १६० वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. विद्यार्थी घडविताना संस्थेच्या सर्व घटकांमध्ये आत्मीयता निर्माण झाली आहे, म्हणूनच विशाल स्वरुपाचा ‘मएसो परिवार’ आकाराला आला आहे. १६० वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीनंतर आता पुढील वाटचाल करताना संस्थेने नाविन्याचा विचार केला पाहिजे. शौर्य, सांस्कृतिक पाया आणि ज्ञानाधिष्टित शिक्षणाचा विचार केला पाहिजे. आजपर्यंत आपल्या देशात केवळ पाश्चिमात्य संकल्पनेवर काम होत राहिले, आता आपल्या देशासाठी आवश्यक शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित असलेले योगदान संस्था निश्चितच देईल,” असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज व्यक्त केला.

संस्थेच्या १६० व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. अभय क्षीरसागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. एन.एस. उमराणी व संस्थेचे हितचिंतक, देणगीदार व संस्थेचे माजी विद्यार्थी, ‘सावली’ संस्थेचे संस्थापक मा. श्री. वसंत ठकार व त्यांचे सहकारी तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत करताना संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे म्हणाले की, संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांच्या ऑनलाईन व्याख्यानांचा लाभ सर्वांना मिळाला. या व्याख्यानांमुळे संस्थेच्या कार्याची माहिती देशपातळीवर पोहोचण्यास मोठी मदत झाली. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याला मिळालेली प्रसिद्धी उत्साहवर्धक आहे.

संस्थेचे एक हितचिंतक, देणगीदार व संस्थेचे माजी विद्यार्थी, ‘सावली’ संस्थेचे संस्थापक मा. श्री. वसंत ठकार यांनी यावेळी संस्थेला भरघोस निधी दिला. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कामाचा विस्तार फार मोठा असला तरी त्यात एकोपा आहे. त्यामुळेच मी परत एकदा संस्थेशी जोडला गेलो. संस्थेचे अध्यक्ष भूषणजी गोखले आजदेखील नवीन विषय शिकण्याचा संकल्प करत आहेत यावरून शिक्षण कधीच संपत नसते, ते निरंतर चालूच राहाते हे स्पष्ट होते. आजकाल आपल्या पालकांची विचारपूस देखील न करण्याच्या काळात १६० वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना करणाऱ्या संस्थापकांचे स्मरण आणि अभिवादन करत आहे, हे विशेष आहे.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या भाषणात म्हणाले की, संस्थेने भविष्याकडे वाटचाल करताना आता ‘Good Education & Good Governance’ चा अंगीकार केला पाहिजे. १६० वर्षांपूर्वी १०x १० फूट आकाराच्या खोलीत मराठी विषयाच्या वर्गाच्या रुपाने सुरू झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा विस्तार ७० पेक्षा अधिक शाखा आणि असंख्य विषय शिकवण्यापर्यंत झाला आहे. या सर्व कार्याच्या इतिहास लेखनाचे काम साडेतीन वर्षांपूर्वी सुरू झाले आणि आज ते पूर्णत्वास गेले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. एन.एस. उमराणी यांनी विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “आपल्या संस्थापकांच्या विचारसरणीच्या आधारे दैदिप्यमान आणि वैभवशाली वाटचाल करणाऱ्या या संस्थेचा एक भाग असल्याचा खूप अभिमान वाटतो. मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्राचार्य म्हणून काम करताना महाविद्यालयाला शैक्षणिक आणि वैचारिक उंची देण्याचा प्रयत्न केला. उद्योग जगताशी समन्वय साधला. त्यातून वाणिज्य विषयक शिक्षणाचे मॉडेल निर्माण झाले. केवळ नोकरी आणि व्यवसायासाठी उपयोगी शिक्षण न देता जीवनाची उंची वाढवण्यासाठी संस्थेने केलेल्या परिश्रमाची फळे आज दिसत आहेत.”

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांनी या प्रसंगी बोलताना, शेतीच्या तंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज व्यक्त केली. कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टींचे महत्त्व लक्षात आले. आपल्या देशातील ७० टक्के लोकसंख्या आजही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीच्या तंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित होते. संस्थेच्या संस्थापकांनी स्वदेशी शिक्षण, स्वावलंबी आणि देशप्रेमाने भारलेला समाज निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांचे हे हेतू आजदेखील तितकेच संयुक्तिक आहेत, असे ते म्हणाले.

संस्थेचे माजी सचिव मा. प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील निवृत्त अधिकारी श्री. वामन शेंड्ये यांनी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेला निधी दिला.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अवघ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, अभिजात कलांची खाण आणि विद्येचे माहेरघर असलेल्या आपल्या पुण्यनगरीमध्ये, तिचा विशेषपणा जपण्यात आणि तो वाढविण्यात गेली, दीडशे वर्षांहूनही अधिक कालावधी शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था म्हणजेच महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी येत्या १९ नोव्हेंबरला १६० वर्षे पूर्ण करीत आहे. मी स्वतः इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, मराठी माध्यम शाळेतून तर इयत्ता पाचवी ते दहावीचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्याच सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतून पूर्ण केले आहे. इ. दहावीची दुसरी सहामाही खूपच भावनाशील होती. इ. ११ वी व १२ वी चे शिक्षण मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेतले. आयुष्यातले ते फुलपंखी दिवस आजही जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात आणि आपण जे काही आहोत त्याची मुळे किती खोलवर आपल्याला शाळेतून मिळालेल्या संस्कारांमध्ये आहेत याची जाणीव होते.

मला आठवतंय, मी १९७५ साली सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये प्रवेश घ्यायला आले त्या वेळेस हॉलमध्ये असलेल्या १९६१ च्या पूररेषेच्या पातळीची आठवण करून देणाऱ्या खुण-रेषेने माझं लक्ष वेधलं आणि त्यानंतरही शाळा सुस्थितीत असल्याचं आश्चर्य आणि अशा शाळेमध्ये प्रवेश घेत आहोत याचा आत्मीय अभिमान माझ्या बालमनाला त्यावेळी कमालीचा जाणवत होता. शाळेचं ग्रंथालय उत्तमोत्तम ग्रंथ संपदेने नटलेलं होतंच, शिवाय सुसज्ज प्रयोगशाळेमध्ये मुक्त विहार करावयाची मुभाही होती. एकत्र शिक्षण असल्यामुळे आम्हा मुला-मुलींमध्ये मार्क्स मिळविण्यासाठी कायम निकोप स्पर्धा असायची.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले आहे …

“विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी

न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे जी” 

शाळेमध्ये अशी विद्या आणि संस्कार रुजविण्यासाठी ज्या ऋषितुल्य शिक्षक वृन्दाचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि अनमोल सहवास लाभला तो आम्हा विद्यार्थ्यांसाठी अतुलनीय ठेवाच आहे. आमचे अत्रे सर सुंदर अक्षरात संपूर्ण फळ्याचा वापर करायचे. त्यांच्या स्पष्ट आणि करारी आवाजात ज्या पद्धतीने ते इतिहास शिकवायचे त्यातील प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे रहायचे. संस्कृत भाषेची आणि विषयाची अवीट गोडी मेधा ओक बाईंकडून मिळाली, तर विज्ञानाचे केळकर सर दैनंदिन जीवनातले सोपे प्रयोग करायला शिकवायचे. त्यामुळे विज्ञान विषयही आवडायचा. शाळेमध्ये खेळालाही तितकेच महत्व होते. एके वर्षी तर काही अपरिहार्य कारणामुळे शाळेचा वार्षिक स्नेहसमारंभ अचानक रद्द झाला, त्यावेळी गुरुवर्य प्र. ल. गावडे सरांनी अतिशय संयमाने ज्या पद्धतीने आणि कौशल्याने ती परिस्थिती हाताळली त्यावरून अशा कठीण परिस्थितीमध्ये कशाप्रकारे निर्णय घ्यावेत याचा परिपाठच आम्हा विद्यार्थ्यांना मिळाला. मी आठवीत असताना शिक्षकांचा दीर्घकाळ संप सुरु होता, परंतू  संपानंतर जेव्हा शाळा सुरु झाली तेव्हा सर्व शिक्षकांनी शाळेव्यतिरिक्त थांबून संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होवू दिले नाही. त्यावेळेस मात्र माझा अत्यंत आवडता विषय ‘बागकाम’ मात्र करता आले नाही. अशा अनेक आठवणी आहेत त्या मंतरलेल्या दिवसांच्या ज्याने उर भरून येतो, मन भूतकाळात रमून जाते.

मी पुण्याची महापौर झाल्यानंतर शाळेतल्या माझ्या १९८० च्या बॅचने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने माझं कौतुक केलं. त्या समारंभाला माझे सर्व मित्र-मैत्रिणी आणि मला शिकविणारे जवळपास सर्वच शिक्षकवृंद उपस्थित होते. आम्हा सर्वाना अत्यंत आदरणीय असणाऱ्या गुरुवर्य गावडे सरांनी त्या वेळेच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या मित्र-मैत्रिणींनी, माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या शाळेने दिलेल्या या कौतुकाच्या थापेमुळे आणि माझ्यावर व्यक्त केलेल्या विश्वासामुळे मी अधिक उत्साहाने व जोमाने काम सुरु केले. माझ्या आयुष्यातला तो अतिशय आनंदाचा आणि महत्वपूर्ण दिवस होता. जेव्हा-जेव्हा मला निराश झाल्यासारखं वाटतं त्या वेळेस ज्यांच्या पुस्तकांचा मला आधार असतो त्यांनी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे,

“It is a shame to dream small, even when we have  the potential to do something great and noteworthy.”

खऱ्या अर्थाने माझ्या शाळेने व ‘मएसो’च्या प्रत्येक एककाने माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमता आणि सुप्त गुण ओळखून फक्त मोठी स्वप्नेच पहायला शिकवली नाहीत तर ती स्वप्ने पूर्ण करायला, उंच भरारी घ्यायला आमच्या पंखातही  बळ दिले. त्यामुळेच मानसशास्त्रातून एम. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता मी जर्मन भाषेचे शिक्षण घेतले, पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आणि एम.बी. ए. ची पदवीही मिळवली. “हाती घ्याल ते तडीस न्या” हा माझ्या गुरुजनांनी दिलेला वसा जपताना आणि जगताना राजकारणात प्रवेश केला आणि अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावली याचं समाधान वाटतं. खास महिला सक्षमीकरणासाठी ११२ कोटी रुपयांचं बजेट उपलब्ध करून दिलं.

आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारलेल्या ज्ञानवृक्षाच्या छायेत हजारो विद्यार्थी ‘केजी टू पीजी’ शिक्षण घेत आहेत आणि विश्वसंचारी झेप घेत आहेत. खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी, सुसंस्कृत, समाजाभिमुख, सुजाण नागरिक निर्माण करणाऱ्या आणि आपले ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीला दैदिप्यमान अशा निरंतर वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

“शिक्षण हा समाजाचा कणा आहे, त्यामुळे भारतकेंद्रीत शिक्षण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे देशातील भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होईल. हे धोरण आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे आहे. देशाने एकमुखाने या धोरणाचे स्वागत केले आणि त्यातील वैशिष्ट्यांमुळे  जगातील अनेक देशांनी त्यांचे शिक्षण धोरण ठरविण्यासाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर २०२०) डॉ. पोखरियाल यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

डॉ. पोखरियाल आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील. १६० वर्षापूर्वी स्वदेशी शिक्षणाचे महत्व ओळखून देशप्रेम आणि समर्पण भावनेतून शिक्षण संस्था सुरू करणे ही घटनाच विलक्षण आहे. राष्ट्रीय शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या या संस्थेत तयार झालेले विद्यार्थी ज्या-ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले.

पाश्चिमात्य विचारसरणी जगाकडे बाजार म्हणून बघते आपण मात्र संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो. त्यामुळे आपली भावना जगाच्या कल्याणाची असते. या आपल्या शिकवणुकीमुळे आज जग अचंबित झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे मुल्याधिष्ठीत शिक्षणावर भर देणारे व्यापक आणि संपूर्ण परिवर्त घडवून आणणारे धोरण आहे. ते तयार करत असताना समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करण्यात आला. सर्वांची मते विचारात घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षण धोरण सरकारने नाही तर समाजाने तयार केलेले आहे. व्यक्ती आपल्या मातृभाषेतूनच अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे या धोरणात

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यावर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील २२ प्रादेशिक भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्याने शिकावी असा आग्रह आहे. त्यामुळे भाषांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हे करत असताना इंग्रजी भाषेला कोणत्याही प्रकारे विरोध करण्यात आलेला नाही. जपान, जर्मनी, इस्राईल या देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, परिणामी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात या देशांनी विकास साधला आहे.

दीर्घ कालावधीनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण तयार झाल्याची चर्चा होते. प्रत्यक्षात लॉर्ड मॅकॉलेने देशातील समृद्ध शिक्षण परंपरा, भाषा आणि संस्कृति उद्धवस्त करण्यासाठी १५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जीवनमूल्यांवर आधारलेले हे पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. ते सर्वसमावेशक आणि प्रभावी आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची शिकवण माणूस घडवणारी आहे, माणसाचे मशिन बनवणारी नाही. लॉर्ड मॅकॉले नव्या शिक्षण पद्धतीच्या आधारे जेव्हा देशाच्या संस्कृतीवर आघात करत होता, त्याच कालखंडात राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यक्त झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच सहयोग देईल.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आभारप्रदर्शन तर डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

                 डॉ. श्यामा घोणसे

१९ नोव्हेंबर २०२० ला ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षपूर्ती साजरी करत आहे. साध्या सोप्या भाषेत बोलायचे तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे ने महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला अखंडपणे १६० वर्षे आपले अमूल्य योगदान दिलेले आहे. संस्था म्हणून विचार करता हा कालखंड तेजस्वी हिऱ्याला बावन्नकशी सोन्याचे कोंदण लाभावे असा लखलखित, देदीप्यमान असला तरी, कसल्याही सत्ता-संपत्ती-धनदांडगेपणा यांचा वरदहस्त नसल्यामुळे, कसोटी पाहणारा होता.

वामन प्रभाकर भावे, लक्ष्‍मण नरहर इंदापूरकर यांच्यासारखे शिक्षणातून राष्ट्रीय वृत्तीचा जागर करणारे शिक्षक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतीला शिक्षणाची जोड देणारे द्रष्टे सचिव, खजिनदार आणि वैयक्तिक विकासाच्या ध्यासाला समाजहिताची, राष्ट्रीय अस्मितेची जोड देणारा सुजाण पालकवर्ग या त्रिसूत्रीतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची गंगोत्री उगम पावली. त्यामुळेच परकीय सत्तेच्या रोषाचा, लाभालाभाचा विचार न करता ‘मएसो’च्या या ज्ञानगंगोत्रीने आज “केजी टू पीजी” आणि सेवाभावी वैद्यकीय शिक्षणाबरोबरच पत्रकारिता, व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करीत नवीन पिढीला आत्मनिर्भर बनविणारे विविध  अभ्यासक्रम शिकविणाऱ्या ७७ शाखांइतका पल्ला गाठलेला आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या विविध क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने योगदान देत   विशाल रूप धारण केले.                                            .

विविध शाखा विस्तारलेल्या ‘मएसो’चे “क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे” हे बोधवाक्य!

‘मएसो’चा इतिहास खूप मोठा आहे. या प्रवासात चढ-उतार, वाटा, वळणे खूप आहेत. प्राध्यापक म्हणून, आजीव सदस्य, नियामक मंडळ सदस्य आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० वर्षांच्या इतिहासातील आजीव सदस्य मंडळाची पहिली महिला अध्यक्ष म्हणून माझ्या संस्थेबद्दल भरभरून बोलण्यासारखेही खूप आहे. माझा आणि संस्थेचा ऋणानुबंध जवळपास तीन तपांहून अधिक आहे.

शिक्षणाचे होणारे बाजारीकरण, या क्षेत्रात होणारे काही स्तुत्य तर काही काळजीमग्न करणारे बदल, ज्ञानाची विस्तारलेली क्षेत्रे आणि विद्यार्थी-शिक्षकांचे तुटत चाललेले नाते, पालकांचा अनाठाई हस्तक्षेप, बदलती शैक्षणिक धोरणे या सगळ्यांची गेली किमान चाळीस वर्षे मी साक्षी आहे, त्याची घटक आहे. या पार्श्वभूमीवर गेली १६० वर्षे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अक्षुण्ण प्रवास करु शकली; त्याची कारणमीमांसा करीत असताना काही गोष्टी नमूद करायलाच हव्यात. आपापल्या क्षेत्रात नामांकित असूनही संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने, निरलसपणे योगदान देणारे संचालक मंडळ, प्रयोगशील शिक्षक आणि या प्रयोगातही त्यांचे विद्यार्थ्यांशी असणारे आत्मीय नाते, समर्पण वृत्तीचे शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि स्वागतशील, सहकार्य करणारे पालक यांची प्रदीर्घ परंपरा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला लाभलेली आहे. “शिक्षण विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही”, सामाजिक समरसतेचा प्रयोग करीत असताना शिक्षण हे प्रभावी साधन आहे याचे भान आणि जाण असलेले द्रष्टे क्रियावंत मएसोला आरंभापासूनच लाभले. त्यामुळेच त्यावेळची सासवड, बारामतीसारखी छोटी गावे असतील,वैद्यकीय शिक्षणाच्यादृष्ट्या, वैद्यकीय सुविधेच्यादृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या लोटे घाणेखुंटसारख्या दुर्लक्षित भागात, महानगरातल्या माथाडी कामगारबहुल आव्हानात्मक उपनगरात, ‘मएसो’ पोहोचली. स्त्री शिक्षण हा आरंभापासूनच ‘मएसो’च्या ध्येयधोरणातील भाग असल्यामुळे इथे मुलींची संख्याही अधिक आहे. शिक्षणाला आत्मसामर्थ्य-संपन्नतेची जोड देणारी महाराष्ट्रातील मुलींची पहिली सैनिकी शाळा काढण्याचा प्रयोगही इथेच रुजला, बहरला आहे.

हे सारे, यासारखे सारे जे आहे ते, नोंद घेण्यासारखे आहेच. पण यापेक्षाही अधिक महत्त्वाचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने अनेक पिढ्यांशी नाते जोडलेले आहे. म्हणूनच, आजोबा-आजी ते नातवंडे ‘मएसो’चेच विद्यार्थी असल्याचे पिढीजात चित्र दिसते. आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वसंपन्न, मुद्रांकित असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच आपले दररोजचे साधे परंतु सदाचारसंपन्न जीवन जगणारे, प्रतिकूलतेतही आपल्या घासातला घास समाजासाठी  देणारे, चारित्र्यसंपन्न  विद्यार्थी/नागरिक घडविण्याचे कार्यही ‘मएसो’ने केलेले आहे. त्यामुळेच एअरपोर्टवर भेटणारा एखादा रुबाबदार अधिकारी मी ‘मएसो’चा आहे, हे ज्या आत्मीयतेने सांगतो; त्याच आत्मीयतेने,अभिमानाने सांगणारे रिक्षावाले काका सहजपणे भेटतात. कडक सॅल्यूट ठोकत मी ‘मएसो’ची आहे सांगणारी महिला अधिकारी असेल किंवा एखाद्या प्रदर्शनात जिच्या कलाकुसरीचे कौतुक करावे ती व्यावसायिक भगिनी ‘मएसो’ची असते आणि भाजीचा हिशेब चोखपणे देणारी,आत्मियतेने भाजीची पिशवी गाडीत ठेवणारी मैत्रिणी “मी ‘मएसो’ची” असे सांगते तेव्हा कळते मित्रमैत्रीणींनो की, माझी मएसो कशी, कुठे-कुठे, किती प्रभावीपणे रूजली आहे. जेव्हा ‘मएसो’च्या एखाद्या शाखेचे म्हणजे शाळेचे किंवा काॕलेजचे नाव घेतले जाते, तेव्हा मूळ प्रवाह किंवा प्रभाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचाच असतो.

…तर मग आपण आज एकमेकांना शुभेच्छा देऊयात…

आपण एकशे साठ वर्षांचे झालो…१६१ व्या वर्षात प्रवेश केला आहे…

मनःपूर्वक शुभेच्छा आणि

“हो ‘मएसो’… तू आमच्या श्वासात, ध्यासात आणि स्वप्नातही आहेस…

तुझ्यामुळेच आम्ही आहोत, तुझ्यामुळेच आम्ही आहोत, सदैव तुझ्याबरोबरच राहण्याचा आशीर्वाद तू आम्हांला दे!”

  • डॉ. श्यामा घोणसे

“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज आहे. भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी आज केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२०) मा. गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

मयूर कॉलनीत असलेल्या मएसो ऑडियोरिअममध्ये कोविड -१९ महामारीच्या संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

मा. गडकरी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर याद्रष्ट्या व्यक्तींनी देश पारतंत्र्यात असताना स्वदेशी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन देशातील भावी पिढीवर संस्कार करून स्वावलंबी, संपन्न, समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा १६० वर्षांचा इतिहास हा पिढी घडवण्याचा इतिहास आहे.

लहान विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे आणि त्याला एक आदर्श माणूस बनवणे हे समाजासाठी आवश्यक असते. ज्ञान ही अतिशय प्रभावी शक्ती आहे. ज्ञानाच्या आधारे संपत्तीची निर्मिती करणे आवश्यक असल्याने आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान मिळवून आपल्या देशाला जगात नाव मिळवून दिले आहे. पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे. पुण्यातील लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, याचे कारण पुण्यातील शिक्षणसंस्था. पुण्यातील शिक्षण संस्थांनी सुसंस्कारित आणि चांगल्या पिढ्या घडविल्या आहेत. पुण्यात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती राहातात. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची गुणवत्तादेखील वाढली आहे.  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण मिळणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, सृजन, उद्योजकता, शास्त्र, तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वच क्षेत्रात ज्ञान मिळविण्याची गरज आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. एक मोठी शक्ती एवढ्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, कुटुंब पद्धती, शिक्षण पद्धती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहे. संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विश्वकल्याणाचा विचार देणारी भारतीय संस्कृती आणि इतिहास, परंपरा यांचे हेच वैशिष्ट्य आहे की, आपल्या संस्कार पद्धतीमुळे आदर्श नागरिक देखील घडतात. यामध्ये ‘मएसो’ सारख्या शिक्षण संस्थांचा फार मोठा वारसा आहे.

आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, त्याचप्रमाणे फार मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात असलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे, मात्र तशी महत्त्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवित्र विचाराने, निस्पृह, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची गती कमी आहे, ही खेदाची बाब आहे. चांगल्या माणसाचा चांगुलपणा समाजात जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच समाज बदलेल. त्यामुळे निस्पृह भावनेने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करणे, त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे आणि एका चांगल्या समाजातून एक चांगले राष्ट्र निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जीवननिष्ठा आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणेच अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी त्यांच्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत ज्ञानयोगी तयार करताना, त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करताना, संस्काराद्वारे त्यांच्यातील माणूसपण जोपासून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राष्ट्रीय पुनर्निमाणात योगदान देत राहील याचा मला विश्वास आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ज्ञानातून मिळणारी शक्ती विकसित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्यविकास इ. माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी येत्या १९ नोव्हेंबर २०२० रोजी १६० वर्ष पूर्ण करत आहे. संस्थेच्या या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांचे व्याख्यान मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री मा. श्री. रमेश जी पोखरियाल ‘निशंक’ यांचे व्याख्यान बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४.४५ वाजता होणार आहे.

सध्या कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ही दोन्ही व्याख्याने ऑनलाईन माध्यमातून होणार आहेत.

कोथरूडमध्ये मयूर कॉलनीत असलेल्या एमईएस ऑडिटोरीअम येथे मान्यवर निमंत्रितांच्या मर्यादित उपस्थितीत व सरकारी नियमांचे पालन करून ही ऑनलाईन व्याख्याने होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या ‘ध्यासपंथे चालता …’ या ग्रंथाचे प्रकाशन शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात आज (दि. १२ नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी ही माहिती दिली.

यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव सुधीर गाडे उपस्थित होते.

या ऑनलाईन व्याख्यानांमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक आहेत …  https://www.facebook.com/mespune  किंवा  https://www.youtube.com/c/MaharashtraEducationSocietyPuneofficial

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे विख्यात उद्योजक डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना आज सोमवार, दि.२ नोव्हेंबर २०२० रोजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते डॉ. आबासाहेब गरवारे आणि सौ. विमलाबाई गरवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी म.ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य आणि गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी मा. श्री. सुनील सुतावणे, शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, म.ए.सो. चे साहाय्यक सचिव व शालेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, म.ए.सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रामदास अभंग, पर्यवेक्षक श्री.किसन यादव, माजी मुख्याध्यापक श्री.अविनाश वाघमारे आणि प्रशालेचे शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.
मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे तसेच म.ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य व गरवारे ट्रस्टचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. सुनील सुतावणे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
तसेच महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे, म.ए.सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर, वरिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा आगाशे व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षिका श्रीमती स्मिता कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘करिअर वेबिनार’चे आयोजन
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालय, गरवारे काॅलेज ऑफ काॅमर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  अँड करिअर कोर्सेस या ‘मएसो’च्या घटकसंस्थांच्यावतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर वेबिनार’चे आयोजन करण्यात आले आहे. बारावीचा हा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर विविध क्षेत्रे विद्यार्थ्यांना खुणावत असतात, त्यापैकी नेमके काय निवडावे, हा प्रश्नही असतो. ‘स्कोप’ कशात असेल, याचीही पडताळणी सुरू असते. अशा वेळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन कामी येते आणि हे मार्गदर्शन घरबसल्या मिळणार आहे. दि. २३ जुलै ते ३१ जुलै दरम्यान होणाऱ्या या वेबिनारमध्ये…नक्की नोंदणी करा.
डॉ भरत व्हनकटे

Scroll to Top
Skip to content