“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज आहे. भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी आज केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२०) मा. गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.
मयूर कॉलनीत असलेल्या मएसो ऑडियोरिअममध्ये कोविड -१९ महामारीच्या संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
मा. गडकरी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर याद्रष्ट्या व्यक्तींनी देश पारतंत्र्यात असताना स्वदेशी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन देशातील भावी पिढीवर संस्कार करून स्वावलंबी, संपन्न, समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा १६० वर्षांचा इतिहास हा पिढी घडवण्याचा इतिहास आहे.
लहान विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे आणि त्याला एक आदर्श माणूस बनवणे हे समाजासाठी आवश्यक असते. ज्ञान ही अतिशय प्रभावी शक्ती आहे. ज्ञानाच्या आधारे संपत्तीची निर्मिती करणे आवश्यक असल्याने आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान मिळवून आपल्या देशाला जगात नाव मिळवून दिले आहे. पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे. पुण्यातील लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, याचे कारण पुण्यातील शिक्षणसंस्था. पुण्यातील शिक्षण संस्थांनी सुसंस्कारित आणि चांगल्या पिढ्या घडविल्या आहेत. पुण्यात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती राहातात. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची गुणवत्तादेखील वाढली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण मिळणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, सृजन, उद्योजकता, शास्त्र, तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वच क्षेत्रात ज्ञान मिळविण्याची गरज आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. एक मोठी शक्ती एवढ्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, कुटुंब पद्धती, शिक्षण पद्धती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहे. संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विश्वकल्याणाचा विचार देणारी भारतीय संस्कृती आणि इतिहास, परंपरा यांचे हेच वैशिष्ट्य आहे की, आपल्या संस्कार पद्धतीमुळे आदर्श नागरिक देखील घडतात. यामध्ये ‘मएसो’ सारख्या शिक्षण संस्थांचा फार मोठा वारसा आहे.
आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, त्याचप्रमाणे फार मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात असलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे, मात्र तशी महत्त्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवित्र विचाराने, निस्पृह, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची गती कमी आहे, ही खेदाची बाब आहे. चांगल्या माणसाचा चांगुलपणा समाजात जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच समाज बदलेल. त्यामुळे निस्पृह भावनेने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करणे, त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे आणि एका चांगल्या समाजातून एक चांगले राष्ट्र निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जीवननिष्ठा आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणेच अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी त्यांच्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत ज्ञानयोगी तयार करताना, त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करताना, संस्काराद्वारे त्यांच्यातील माणूसपण जोपासून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राष्ट्रीय पुनर्निमाणात योगदान देत राहील याचा मला विश्वास आहे.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ज्ञानातून मिळणारी शक्ती विकसित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्यविकास इ. माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.