‘नवोन्मेष’ हॅकेथॉन उत्साहात संपन्न
‘नवोन्मेष – २०२६’ ही राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस आणि मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आसाम, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, दिल्ली आणि चंडीगड यांसारख्या राज्यांमधील सुमारे १३०० स्पर्धकांनी त्यात भाग घेतला.

‘नवोन्मेष’चे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, एमईएस मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष व उद्योजक अजय पुरोहित आणि किन्नयशोदा सामाजिक संस्थेच्या संस्थापक सौ. सुमेधा संभाजी लिह्मण यांच्या हस्ते करण्यात आले. किन्नयशोदा सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक यश प्रशांत पाटील यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती.
आरोग्यसेवा, शाश्वत विकास, फिनटेक, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि अॅग्रीटेक अशा विविध क्षेत्रांशी संबंधित नाविन्यपूर्ण प्रकल्प त्यांनी सादर केले. आयसिनर्जी, व्हीफोर्सी, स्किली, ओरॅकल अप्लिकेशन्स, बीएनवाय मेलन आणि मिअरस टेक्नॉलॉजीज यांसारख्या अग्रगण्य संस्थांमधील अनुभवी तज्ज्ञांमार्फत या प्रकल्पांचे संपूर्ण मूल्यमापन करण्यात आले. त्यामुळे स्पर्धकांना त्यांच्या प्रकल्पांची उपयुक्तता आणि परिणामकारकता तसेच त्या संदर्भातील व्यावहारिक दृष्टीकोन समजला.

ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होती, तीन कठोर फेऱ्यांमध्ये ती पार पडली. स्पर्धकांच्या सर्जनशीलतेला, तांत्रिक कौशल्यांना आणि समस्या सोडवण्याच्या त्यांच्या क्षमतेला अधिकाधिक आव्हान देण्यासाठी प्रत्येक फेरीची रचना करण्यात आली होती. अंतिम फेरीत निवडक संघांनी आपल्या अभिनव कल्पना आणि कार्यक्षम प्रोटोटाइप सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पारदर्शक मूल्यमापन पद्धती आणि उद्योग क्षेत्राशी परिपूर्ण सहकार्य यामुळे नवोन्मेष हॅकेथॉनने नवकल्पनांना चालना देणारे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. आरोग्यसेवा, शाश्वतता, फिनटेक, ऑटोमेशन आणि अॅग्रीटेक यांसारख्या विविध क्षेत्रांतील उद्योग-प्रेरित समस्यांची काळजीपूर्वक निवड ही नवोन्मेष ची खासियत असून त्यामुळे या हॅकेथॉनची उपयुक्तता आणि परिणामकारकता ठळकपणे दिसून येते.
‘नवोन्मेष’चा समारोप आयसिनर्जीचे संस्थापक अतुल ठोंबरे, शिक्षणतञ डॉ. अमोल गोजे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय भालेराव तसेच एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
‘नवोन्मेष – २०२६’ हा उपक्रम परिवर्तनशील विचारांना प्रोत्साहन देत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भविष्यकालीन नेतृत्वाची पायाभरणी करणारा ठरला आहे.











महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. ही धक्कादायक घटना सर्वांनाच शोकमग्न करणारी आहे. अजित पवार हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो हायस्कूल, बारामती म्हणजेच सध्याची मएसो ग.भि. देशपांडे विद्यालय या शाळेचे माजी विद्यार्थी होते. १९६८ ते १९७४ या कालावधीत त्यांनी या शाळेत शिक्षण घेतले.






प्रमुख पाहुणे मा. श्री. विनोद सहाय आपल्या भाषणात म्हणाले की, एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश परकीय आक्रमणांमुळे काही शतके गुलामगिरीत होता. आता २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दीष्ट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसोमर ठेवले आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिकांची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे. १४० कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेला देश विकसित होणे याचाच अर्थ जगाचा विकास होणे आहे. ही केवळ देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी नाही. आपण प्रत्येकाने त्याचे नेतृत्व केले पाहिजे कारण सामान्य माणसांच्या प्रयत्नानेच देश मोठा होते. त्यासाठी जीवनात प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. राष्ट्र सर्वप्रथम, त्यानंतर संघटना आणि त्यानंतर व्यक्ती हा प्राधान्यक्रम निश्चित केला तर विकसित भारताचे ध्येय साध्य होईल.


एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ए. एन. एम. जी. एन. एम. आणि बी.एससी. (नर्सिंग) च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ सोमवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर व ज्येष्ठ उद्योगपती मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे होते.













महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्याचे क्रीडा राज्यमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांचा काल (गुरुवार, दि. २९ मे २०२५) सत्कार करण्यात आला. संस्थेचे सहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सचिन आंबर्डेकर यांनी मंत्रीमहोदयांना संस्थेचे बोधचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.





जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय लष्कर, असीम फाऊंडेशन आणि महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चिनार युवा केंद्रात चालवण्यात येणारा पहिला ‘फॅशन डिझाइनिंग स्कील कोर्स’ पूर्ण केलेल्या ४० विद्यार्थिनी आणि महिला प्रशिक्षणार्थींना मंगळवार, दि. ८ एप्रिल २०२५ रोजी प्रमाणपत्र देण्यात आली. वर्षभरात दोन वेळा हा कोर्स आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, ‘मएसो’च्या नियामक मंडळ सदस्य आणि मएसो आयएमसीसीच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. सौ. मानसी भाटे आणि मएसो रेणुका स्वरूप करियर कोर्सेच्या समन्वयक सौ. सारिका वाघ यांच्या हस्ते ही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या वेळी चिनार युवा केंद्राचे मार्गदर्शक मेजर अंकित शर्मा आणि असीम फाऊंडेशनच्या विश्वस्त निरूता किल्लेदार हे देखील उपस्थित होते.




