‘स्वरवेध’ लोकगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’तर्फे आयोजित करण्यात आलेली ‘स्वरवेध’ ही लोकगीत गायन स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तालवाद्यांचे तज्ञ कलाकार संतोष मोरे आणि शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या हस्ते पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे होते. ‘मएसो कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, ‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर भोसले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना संतोष मोरे म्हणाले, “लोकगीत गायन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल ‘मएसो’चे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. ही कला मातीतील, लोकांनी जगवलेली, संतांनी भर घातलेली आहे, पालक आणि शिक्षकांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती भावी पिढ्या आत्मसात करत आहे. स्पर्धेत सहभागी झालेले सर्वच विद्यार्थी कलाकार आहेत, कारण स्पर्धा असूनही त्यांच्या मनात कोणाबद्दल इर्षा नव्हती आणि जो मनाने निर्मळ असतो तोच कलावंत असतो. परिक्षक म्हणून आम्ही परिक्षण करत नव्हतो तर तो निखळ आनंद घेत होते. विद्यार्थी कोणत्याही शाळेचा असला तरी शिक्षकांमध्ये दिसलेला मातृवत्सलभाव या स्पर्धेत दिसून आला, हे ‘मएसो’चे वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेच्या रंगमंचाने दिलेला आत्मविश्वास हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे खरे भांडवल आहे.”
शाहीर हेमंतराजे मावळे यांनी, एखादी कला शिकण्याचे आवाहन शिक्षकांना केले. किर्तन हे १० मिनिटांमध्ये सादर करणे शक्य नसल्याने त्यासाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्याची सूचना केली. आपल्या दिव्यंगत्वावर मात करून तसेच स्पर्धाकाळात आलेल्या तात्पुरत्या अडचणींवर मात करून प्रभावी सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना सादरीकरणासंदर्भात विविध सूचना केल्या.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब शिंदे म्हणाले की, आजच्या जागतिकीकरणाच्या काळात आणि नवतंत्रज्ञानाचा उदय होत असताना लोककलांचा विसर पडू नये म्हणूनच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. असे वेगळ्या स्वरुपाचे उपक्रम आयोजित करणे हे ‘मएसो’चे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अवांतर वाचन आणि विविध कलागुणांची आवश्यकता असल्याने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच कलागुणांना महत्व देण्यात आले आहे. जे सहज सादर होते ते लोकगीत. शाहीर, लोककलावंत हे संस्कृतीचे वाहक असतात. लोकगीतांनीच आजपर्यंत पिढ्या घडल्या आहेत आणि संस्कृती प्रवाही राहिली आहे.
समारंभाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ यांनी ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या रंगवेध, तालवेध आणि स्वरवेध या स्पर्धांचा आढावा घेतला. ‘जे जे देखील स्वप्नी, ते ते तैसेचि होतसे’ असे म्हणता येईल अशा पद्धतीने या स्पर्धा उत्तमरित्या पार पडत आहेत असे सांगून ते म्हणाले, “विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळते, त्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि शिक्षक यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत असतात. कलेची साधना करणाऱ्याला पूर्वी वाया गेला असे म्हणत असत, आज मात्र त्याच कलेद्वारे करियर घडू शकते.”
मएसो भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात दि. २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ४ थी), उच्च प्राथमिक (इ. ५ वी ते ७ वी) आणि माध्यमिक (इ. ८ वी ते ११ वी) अशा तीन गटात ६०० विद्यार्थ्यांनी ५८ संघांद्वारे सहभाग घेतला आणि लोकगीतांपैकी कीर्तन, भारुड, गवळण, पोवाडा या गायन प्रकारांद्वारे आपली कला सादर केली. यशस्वी संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
प्राथमिक गटात मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – इंग्रजी माध्यम विभागाच्या संघाने सादर केलेल्या भारुडाने प्रथम क्रमांक मिळवला. मएसो रेणावीकर विद्या मंदिर, अहिल्यानगर शाळेच्या संघाने सादर केलेल्या गवळण या लोकगीत प्रकाराला दुसरा, मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – मराठी विभागाच्या संघाने सादर केलेल्या भारुडाला तिसरा क्रमांक मिळाला. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेने गोंधळ सादर केला होता, या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
उच्च प्राथमिक विभागात मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने पोवाडा सादर केला होता, त्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – इंग्रजी माध्यम विभागाच्या संघाने सादर केलेल्या गोंधळाला दुसरा, मएसो रेणावीकर विद्या मंदिर, अहिल्यानगर शाळेच्या संघाने सादर केलेल्या गोंधळाला तिसरा क्रमांक मिळाला. मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – मराठी माध्यम विभागाच्या संघाला त्यांनी सादर केलेल्या किर्तनासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
माध्यमिक गटात मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, या संघाने भारुड सादर केले होते. मएसो रेणुका स्वरुप प्रशालेच्या संघाने भारुड सादर केले, त्यांना दुसरा; मएसो रेणावीकर विद्यालय, अहिल्यानगर शाळेच्या संघाने देखील भारुड सादर केले, त्यांना तिसरा क्रमांक मिळाला. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेने भारुड सादर केले, त्या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या वेळी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे पालक समीर धर्माधिकारी या समारंभाला आवर्जून उपस्थित होते.
समारंभाचे सूत्रसंचालन अनिल म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले.
‘स्वरवेध’ लोकगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरवेध’ लोकगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायिका आरती कुंडलकर व सुप्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर यांच्या हस्ते सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष व उद्योजिका सौ. आनंदीताई पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी ‘मएसो कलावर्धिनी’ चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
पूर्व प्राथमिक (इ. १ ली ते ४ थी), प्राथमिक (इ. ५ वी ते ७ वी) आणि माध्यमिक (इ.८ वी ते ११ वी) अशा तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये कीर्तन, भारुड, गवळण, पोवाडा या लोकगीत प्रकारांचा समावेश आहे.
या प्रसंगी बोलताना आरती कुंडलकर म्हणाल्या की, शालेय जीवनामध्ये कला शिक्षणाची नितांत गरज आहे. गायन, वादन, नृत्य इ. कला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात, त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलवतातत. कोणतेही सांगीतिक शिक्षण घेताना शास्त्रीय संगीताचे किमान ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
सुयोग कुंडलकर म्हणाले की, ‘मएसो’ विद्यार्थ्यांवर अनेक वर्षांपासून संगीताचे उत्तम संस्कार करीत आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून बालवयातच संगीताचे बाळकडू देत आहे.
सौ. आनंदीताई पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, बालवयातच विद्यार्थ्यांना ‘स्वरवेध’ हे एक उत्तम आंतरशालेय व्यासपीठ लाभले आहे. याचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी भविष्यात या व्यासपीठाची व्याप्ती वाढवून अनेक कला प्रकार समाविष्ट करावेत.
प्रास्ताविकात डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून विविध कलांचे संस्कार विद्यार्थ्यांवर घडविणे हा ‘मएसो’चा उद्देश आहे.
चित्रकलेसाठी ‘रंगवेध’, गायन कलेसाठी ‘स्वरवेध’, वादन कलेसाठी ‘तालवेध’ आणि तसेच पुढे ‘नृत्यवेध’, ‘नादवेध’ असे उपक्रम आयोजित करण्याचा मानस आहे.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ‘मएसो कलावर्धिनी’चे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन कविता चाटी यांनी केले.
स्पर्धेचे नियोजन अनिल म्हस्के यांनी केले.

“ज्ञान हे दडपून टाकण्याचे शस्त्र नाही तर सर्वांना सुखी करणारे शास्त्र”

जे. नंदकुमार : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान

‘भारतीय ज्ञान परंपरा : यशाकडे नेणारा मार्ग’ या विषयावर आपले विचार मांडताना ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार. या वेळी व्यासपीठावर उपस्थित (छायाचित्रात डावीकडून) सौ. आनंदी पाटील, बाबासाहेब शिंदे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), प्रदीप नाईक, डॉ. अतुल कुलकर्णी

पुणे, दि. १७ : “पाश्चात्य परंपरेत इतरांना दडपून टाकण्यासाठी शस्त्र म्हणून ज्ञानाचा विचार केला जातो. भारतीय परंपरेत मात्र प्रत्येक व्यक्तीला श्रेष्ठ, सुखी, संपन्न, निरामय बनवण्यासाठीचे शास्त्र म्हणून ज्ञानाकडे बघितले जाते. आपल्या परंपरेत ज्ञान लादले जात नाही तर व्यक्तीच्या ठायी असलेल्या ज्ञानाची जाणीव त्याचा करून दिली जाते,    हे भारतीय ज्ञान परंपरेचे वैशिष्ट्य आहे,” असे प्रतिपादन ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी येथे बोलताना केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीदिनी ‘भारतीय ज्ञान परंपरा : यशाकडे नेणारा मार्ग’ या विषयावर नंदकुमार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

नंदकुमार पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय ज्ञान परंपरेप्रमाणेच जगात विविध ज्ञान पंरपरा आहेत. परंतु, त्या परंपरांनी स्थल-काल-सापेक्ष विचार केला. भारतीय ज्ञान परंपरेने मात्र संपूर्ण सृष्टीचा विचार केला हे तिचे मोठेपण आहे. त्यामुळेच भारताला गुरुस्थानी मानणारी आणि पूर्वापार चालत आलेली ज्ञान परंपरा चीनमध्ये आजही अस्तित्वात आहे. तेथील राजकीय विचारसरणीमुळे अद्याप ती विकसित झालेली नाही. स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकाचवेळी ब्रह्म तत्वापासून अस्तित्वात आल्याची धारणा असल्यामुळे भारतीय परंपरेत स्त्री-पुरुष समानता ही अंगभूत आहे. पाश्चिमात्य विचारसरणीत पुरुषापासून स्त्री ची निर्मिती आणि पुरुषासाठी स्त्रीचे अस्तित्व ही धारणा असल्याने त्यांच्याकडे स्त्रियांचे शोषण होत आले आहे. संघर्षमय जगाला शांती मिळवून देण्याची क्षमता फक्त भारतीय ज्ञान परंपरेत आहे.

ज्ञान म्हणजे काय, ते प्राप्त करण्याची व्यवस्था काय आणि त्याचे वेगळेपण कोणते हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. दर्शन, ज्ञान आणि विद्या म्हणजे ज्ञान अशी ज्ञानाची व्याख्या आहे. दर्शन किंवा दृष्टीकोन यांच्या आधारे केलेला विचार ज्ञानाकडे घेऊन जातो आणि या दर्शनाच्या आधारे सुसंघटित किंवा सुनियोजित पद्धतीने विशिष्ट विषयाचे ज्ञान मिळविल्याने विद्या प्राप्त होते. भारतीय ज्ञान हे केवळ अध्यात्मिक नाही. भारतीय ज्ञान पंरपरेत कधीही नष्ट न होणारे म्हणजे परा किंवा अ-क्षर ज्ञान आणि अपरा म्हणजेच भौतिक ज्ञान असे विद्येचे दोन प्रकार आहेत. पाश्चात्यांनी आपल्याकडील ज्ञानाची केवळ चोरीच केली नाही तर त्यावर आपला हक्क सांगितला. त्यांनी आपल्या देशातील ज्ञानी व्यक्तींचा बुद्धीभेद केला. भारतीय ज्ञान हे भौतिक नाही, ते वास्तववादी नाही असा भ्रम पसरवला. संस्कृत भाषा असो की आपली ग्रंथसंपदा पाश्चात्यांनी सर्वकाही विद्रुप केले, भारतीय समाजाला आत्मविस्मृतीत  ढकलले. १८ विद्या, ६४ कला आणि उपकला अशी समृद्ध ज्ञान परंपरा असलेल्या भारताबद्दल कोणतीही माहिती नसताना पाश्चात्यांनी आपल्यावर त्यांचे ज्ञान लादले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतकेंद्री शिक्षण व्यवस्थेचा आग्रह धरण्यात आला आहे, मात्र ते अद्याप पूर्णपणे लागू झालेले नाही.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना बाबासाहेब शिंदे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून असलेला राष्ट्रीय शिक्षण देण्याचा हेतू आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय ज्ञान परंपरेचे एक नाते असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आप्या देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली पण भारतीय ज्ञान परंपरेशी फारकत घेतली. केवळ अध्यात्मच नाही तर गणित, विज्ञान, खगोलशास्त्र अशी विविध शास्त्रे यांचा शिक्षणात समावेश होता, ते शिकविणारी नालंदा, तक्षशीला यासारखी जगद्विख्यात विद्यापीठे आपल्या देशात होती, आपल्या देशात मोठ-मोठे शोध लागत होते, जगभर होणाऱ्या व्यापारामुळे देशात समृद्धी नांदत होती. भारताने लावलेला शून्याचा शोध, देशातील मंदिरे, लेण्यांचे स्थापत्य हे सर्वकाही अचंबित करणारे आहे. त्यांचा विसर पडू नये म्हणून नव्या शैक्षणिक धोरणाचा उपयोग होणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात अतिशय जलद गतीने होणारे बदल, पाश्चात्यांचा भांडवलवादी दृष्टीकोन, अपयशी ठरलेला साम्यवादी विचार या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय विचार अतिशय महत्वाचा आहे. भारतीय ज्ञान परंपरा शिक्षणाशी जोडली जात असताना तिचा नव्याने उहापोह व्हावा या हेतूने आजचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नेहा देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले.

 

Scroll to Top
Skip to content