पुणे, दि. १३ : “इंजिनीयर होणे म्हणजे केवळ चांगली मशिन्स बनवणे नाही तर चांगले भविष्य घडवणे आहे,  परमेश्वराने प्रत्येकाला जग बदलण्याची क्षमता दिली आहे, तुम्ही जे शिकाल त्याचा उपयोग कसा करायचा हे तुमच्या हातात आहे. आपले करियर घडवत असताना हे लक्षात ठेवा की किंमतीपेक्षा मूल्यांचे महत्व खूप अधिक आहे. प्रामाणिकपणा, सहानुभूती, विनयशीलता आणि चिकाटी या गुणांना कोणतेही सॉफ्टवेअर पर्याय ठरू शकत नाही, मशिनवर ते तयार करता येत नाहीत. बोर्डरूम आणि शॉपफ्लोअर दोन्ही ठिकाणी तुमच्या अधिकारांपेक्षा तुमची पात्रता किती तरी अधिक महत्वाची ठरते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा केवळ कौशल्यांचा विकास होणार नाही तर जीवनाच्या उद्देशाला दिशा मिळणार आहे. इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी शिकत असतानाच सामाजिक प्रकल्प, इंटर्नशीप, ओपनसोर्स कम्युनिटीज, उद्योजकता, विक्री आणि आंतरशाखीय संशोधन यामध्ये सहभागी झाले पाहिजे. कारण तिथेच खरे शिक्षण सुरू होते.,” अशा शद्बात किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी इंजिनियरीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने स्थापन केलेल्या ‘मएसो मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’चे उद्घाटन किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते आज (सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘मएसो मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष मा. श्री. संजय किर्लोस्कर. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित (छायाचित्रात डावीकडून) कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद जाधव, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मा. श्री. पुरुषोत्तम लोहिया, ‘मएसो’चे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर भोसले.

या वेळी व्यासपीठावर ‘मएसो’चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद जाधव, आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर भोसले उपस्थित होते. कोथरुडमधील मयूर कॉलनीतील एमईएस ऑडिटोरीअममध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला राजकुमार चोरडिया, देवीचंद चोरडिया, मदन जैन, शरद सारडा, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

“तंत्रज्ञान, शाश्वतता आणि सर्वसमावेशी विकासाच्या आघाडीवर आपला देश जगाचे नेतृत्व करू शकतो. देशातील केवळ अतिश्रीमंतासाठी नाही तर सर्व भारतीयांसाठी नवीन संशोधन करणारे इंजिनियर असतील तरच ते शक्य होईल. त्यामुळे भारताला इंजिनियरची गरज आहे. त्यांनी शेतकरी, छोटे व्यवसाय, दूरवर राहणारे लोकसमूह आणि पर्यावरण याच्याशी संबंधीत समस्यांवर उपाय शोधण्याची गरज आहे. कारण त्यासाठीच काम करण्याची खरी गरज आहे,” असेही किर्लोस्कर यांनी या वेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाबासाहेब शिंदे यांनी इंजिनियरिंग कॉलेज सुरू करण्यामागील भूमिका विशद केली. ते म्हणाले, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शिक्षणाकडे व्यापारी दृष्टीने न बघता विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देते. त्यासाठी संस्थेचे हितचिंतक, समाजातील सज्जनशक्ती कायमच संस्थेच्या पाठीशी उभी राहते. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम लोहिया यांनी या कॉलेजचे दीड लाख स्क्वेअर फूट बांधकाम करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. संस्थेच्या वाटचालीतील ही सर्वात मोठी देणगी आहे. आपल्या देशात चांगेल मनुष्यबळ तयार होते पण ते परदेशात स्थायिक होत असल्याने देशाला त्याचा उपयोग होत नाही. ‘मएसो’च्या इंजिनियरिंग कॉलेजमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाचा अभिमान निर्माण व्हावा आणि देशाच्या विकासात योगदान देणारे उद्यमी निर्माण व्हावेत आणि विकसनशील भारताला विकसित भारत बनवणारे मनुष्यबळ निर्माण व्हावे हा आमचा उद्देश आहे.”

पुरुषोत्तम लोहिया आपल्या भाषणात म्हणाले की, शिक्षण माणसाला केवळ रोजगार मिळवून देत नाही तर चांगले व विवेकी विचार, संस्कार, नितिमूल्य, कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी यांची जाणीव निर्माण करते. लोहिया कुटुंबियांच्या सहकार्याने सुरू झालेले हे महाविद्यालय माझ्या वडिलांच्या नावाने ओळखले जाणार आहे, याचा मला आनंद आहे. ‘मएसो’ च्या शिक्षण क्षेत्रातील इतिहासामुळे संस्थेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळेच या नवीन महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाचे सर्व प्रवेश पूर्ण क्षमतेने भरले आहेत. हे महाविद्यालय केवळ अभियंता घडवणार नाही तर जबाबदार नागरिक, नवनिर्मिती करणारे कृतीशील विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे तरुण तयार करेल.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन तर श्रीमती अमिता सोळंके यांनी सूत्रसंचालन केले.

 

‘मएसो मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष मा. श्री. संजय किर्लोस्कर. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित (छायाचित्रात डावीकडून) कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद जाधव, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मा. श्री. पुरुषोत्तम लोहिया, ‘मएसो’चे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर भोसले.

 

 

 

“आजचे पालक खूप जागरुक आहेत, जीवापाड मेहनत करून आपल्या मुलांना शिक्षणाच्या संधी आणि साधन-सुविधा उपलब्ध करून देत आहेत, त्यामुळेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूर्ण वेळ देता येतो आहे. आपल्याला मिळणाऱ्या या वेळेचा सदुपयोग करा आणि शिस्त, कठोर परिश्रम, समर्पित भावना व सातत्याने प्रयत्न करून जीवनात यशस्वी व्हा, असा सल्ला पुणे रेल्वे विभागातील पोलीस अधीक्षक मा. सौ. अश्विनी देवधर – सानप यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज (मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५) मयूर कॉलनीतील म. ए. सो. ऑडिटोरियममध्ये दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. सानप बोलत होत्या.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक यांच्या विशेष उपस्थितीत हा समारंभ झाला. मएसोच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे,  नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, मएसोचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेच्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य देखील या समारंभाला उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ६६ गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेतील २८ यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

या वेळी सौ. सानप पुढे म्हणाल्या, “शिक्षणाप्रमाणे अन्यत्र यश मिळवण्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी, तो पटवून देण्यासाठी संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास असणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी चौफेर वाचन आणि अद्ययावत माहिती असणे आवश्यक असते. आजकाल अनेकजण अतिशय आक्रमकपणे व्यक्त होतात, अशा परिस्थितीत आपण आपल्या संयमाची पातळी वाढवण्याची आज गरज आहे. पालकांनी मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली पाहिजे. त्यांना सोयी-सुविधा पुरवितानाच ती स्वावलंबी देखील होतील याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच अपयश आणि पराजय यांचा सामना करण्याची क्षमता त्यांच्या निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे.”

समारंभाच्या प्रारंभी मा. सौ. आनंदीताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, “जीवनात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांची फार मोठी परंपरा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला लाभली आहे. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसमोर त्यांचा आदर्श ठेवावा हा या  समारंभाच्या आयोजनामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा आनंद घेत शिकता येईल असा अभ्यासक्रम निवडावा. शिक्षणात आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवत असताना आपल्या महान संस्कृतीची ओळख करून घ्यावी. त्यामुळे आपल्या देशाबद्दल आदर, आत्मीयता आणि समर्पणाचा भाव जागृत होईल. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या हातून समाजाची सेवा घडेल तो संस्थेसाठी आनंदाचा दिवस असेल.”

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. प्रदीप नाईक  म्हणाले की, आपल्या संस्थेत गुणवंत विद्यार्थी घडावेत, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जीवनात यश मिळवावे अशी प्रत्येक शिक्षण संस्थेची इच्छा असते. त्यासाठी मोठ्या संख्येने नवीन शिक्षक निर्माण व्हावे लागतात. शिक्षक होणे म्हणजे घडवण्याचे सामर्थ्य असणे आणि या सृजनातूनच देशाची आणि समाजाची प्रगती होते. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये तशी गुणवत्ता आहे.

संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका सौ. उमा गोंधळेकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.

 

 

Scroll to Top
Skip to content