कृतज्ञता आणि दातृत्वाचा अद्वितीय आदर्श
एक निवृत्त शिक्षिका आपल्या आयुष्यभराच्या कमाईतील मोठा भाग आपली कारकीर्द घडलेल्या संस्थेला देण्याची घटना खरोखरच दुर्मिळ आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थिनी, माजी शिक्षिका आणि संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाच्या माजी सदस्या सौ. माणिक फुलंब्रीकर यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये जमा झालेला तब्बल १ कोटी रुपयांचा निधी आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला दिला. त्यांची ही कृती दातृत्वाचा अद्वितीय आदर्शच आहे.
मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ए.व्ही. हॉलमध्ये आज (गुरुवार, दि. १० जुलै २०२५) झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सौ. फुलंब्रीकर यांनी हा निधी मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि खासदार सौ. मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या वेळी व्यासपीठावर श्री. विलास फुलंब्रीकर, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसोचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले उपस्थित होते.
“एक विद्यार्थिनी आणि शिक्षिका म्हणून १९७३ ते २०१५ असा प्रदीर्घ काळ संस्थेशी माझा संबंध आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात माझे व्यक्तिमत्व फुलले, संस्थेने मला ओळख दिली. त्यामुळे संस्थेबद्दल वाटणारे प्रेम मनाच्या तळातून आलेले आहे. आज मी देत असलेल्या निधीपेक्षा संस्थेने मला किती तरी पटीने अधिक दिले आहे,” अशा शद्बात सौ. माणिक फुलंब्रीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी बोलताना खासदार सौ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “ कृतज्ञतेसारखा दुसरा कोणता अलंकार नाही, कारण ती माणसाला सर्वात सुंदर बनवते असे ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी म्हटले आहे. फुलंब्रीकर मॅडम माझ्या शिक्षिका आहेत. त्यांनी दिलेल्या निधीचा आकडा ऐकून कोणीही आश्चर्यचकित होईल. एका निवृत शिक्षिकेला इतका निधी देण्याची इच्छा का झाली असेल, त्यांच्या मनाची श्रीमंती किती असेल आणि त्यांच्या मनातील कृतज्ञतेचा भाव किती उच्च स्तराचा असेल असे विचार मनात येतात. फुलंब्रीकर मॅडम या आमच्या प्रेरणास्थान आहेत आणि राहतील. मी देखील माझ्या खासदार निधीतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसाठी आवश्यक निधी देईन.”
आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब शिंदे म्हणाले, “एका मध्यमवर्गीय व्यक्तीने, निवृत्त शिक्षिकेने आपल्या स्वकमाईचा इतका मोठा भाग देणगी म्हणून देण्याचा हा प्रसंग दुर्मिळ आहे. अशाच शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या आधारे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष उभा आहे. सौ. फुलंब्रीकर यांचा संस्थेशी प्रदीर्घ ऋणानुबंध आहे, त्यांनी घालून दिलेले उदाहरण कायमस्वरुपी लोकांच्या चर्चेत राहील आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकजण त्यांचे अनुकरणदेखील करतील याची मला खात्री आहे. त्यांच्या इच्छेनुसार या निधीतून महाविद्यालयातील प्रयोगशाळांचे नूतनीकरण करण्यात येणार येईल. सौ. फुलंब्रीकर यांची कोणतीही अपेक्षा नसली तरी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रयोगशाळेला त्यांचे नांव देण्यात येईल.”
मएसोचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी आभारप्रदर्शन केले.
