महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. म. ए. सो. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे होते. यावेळी म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले आणि म. ए. सो. कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुजाता आडमुठे तसेच महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ध्वजारोहणापूर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ ‌ किशोर देसरडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले. म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या आर्मी आणि नेव्हल युनिटच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यामध्ये पारितोषिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. डॉ ‌ किशोर देसरडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

म. ए. सो. मुलांचे विद्यालयात प्रभात फेरीने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे १९५६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असलेले मेजर अरुण फाटक (निवृत्त) उपस्थित होते. शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे, उपमुख्याध्यापक श्री. चंदू गवळे, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये, आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक या वेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी ध्वजाला सलामी देऊन ध्वजप्रतिज्ञा घेतली. प्रमुख पाहुण्यांसह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) पथकांचे निरीक्षण केले. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले गेले. शासनाच्या सूचनेनुसार ‘तंबाखूमुक्त भारत अभियान’अंतर्गत तंबाखूमुक्तीसाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. प्रशालेतील एन.सी.सी.च्या विविध वार्षिक उपक्रमांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना फिरते चषक देऊन मेजर अरुण फाटक (निवृत्त) यांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, एरोबिक्स, पिरॅमिडस, देशभक्तीपर गीतावरील नृत्य, सायलेंट ड्रिल, घोष प्रात्यक्षिक, मल्लखांब प्रात्यक्षिक, लेझीम अशी विविध प्रात्यक्षिके सादर केली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे संकुलामधील मराठी माध्यमाचे पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग तसेच एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाखांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव आणि शाला समितीचे महामात्र सुधीर भोसले होते. म. ए. सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत, म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे, एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर आणि पालक संघाच्या उपाध्यक्षा सोनाली क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. म. ए. सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी घोष, सामूहिक कवायत, गट्टू मल्लखांब, देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य, मल्लखांब अशी विविध गुणवत्ता पूर्ण प्रात्यक्षिके सादर केली. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेले मल्लखांबावरील मानवी मनोरे हे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे सर्वोच्च आकर्षण ठरले.
एम.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, शिरवळमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, घोषपथक, घुंगरू काठी, देशभक्तीपर नाटक व विविध स्पर्धांतील पारितोषिके यामुळे या वर्षीचा प्रजासत्ताक दिन आगळा-वेगळा ठरला. केंद्रीय राखीव दलाचे अधिकारी श्री. विलास साखरे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी म.ए.सो. च्या आजीव सदस्य मंडळाच्या सदस्य व शाला समितीच्या महामात्रा सौ. प्रणिता जोगळेकर, मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहकार्यवाह श्री. नागेश भूतकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि ध्वजारोहण करून झाली. राष्ट्रगीत व ध्वजगीतानंतर माध्यमिक विभागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी शिस्तबद्ध संचलन केले. यानंतर संस्थेच्या क्रीडाकरंडक स्पर्धेमध्ये विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यानंतर पूर्व- प्राथमिक व प्राथमिक विभागातील तीन विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यर्थिनींनी वंदेमातरम गीतावर नृत्य सादर केले.
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कर्नल विजयकुमार (निवृत्त) यांच्या हस्ते भारतमाता पूजन व ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शाला समितीच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, म.ए.सो. सिनियर कॉलेजच्या प्रा. पूनम रावत, समुपदेशक वैशाली बोबडे, रोटरी क्लब पुणे विसडमचे नीलेश धोपटे, पालक प्रतिनिधी अपर्णा धर्माधिकारी, शाळेचे कमांडंट ए.वि.एन. विंग कमांडर एम. यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, पर्यवेक्षक शाम नांगरे व संदीप पवार हे उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर सर्व कॅडेट्सने शानदार संचलन करीत अश्वांसहित ध्वजाला व प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. महाराष्ट्र गीत, ध्वज गीत व प्रतिज्ञा झाल्यानंतर सायलेंट ड्रील, बँड, लेझीम, कराटे, मर्दानी खेळ, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, योगासन, मल्लखांब आणि घोडेस्वारी अशा चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एअर विंग एन.सी.सी. च्या सार्जंट राधिका हेमंत चव्हाण – Best Cadet, विधी वसंत वर्पे – Best in Turnout, कॅडेट अनया अनिकेत कदम – Best in Drill यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्रॉफी देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून समन्वय आणि सांघिकतेचे उदाहरण प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन यांच्या हस्ते विविध विषयात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सौ. अर्चना दिलीप पटवर्धन, विज्ञान भारतीचे पश्चिम क्षेत्राचे संघटन मंत्री श्रीप्रसाद एम.के., केंद्रीय कर्यकारी समितीच्या सदस्य डॉ. मानसी मालगांवकर, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव डॉ. कौस्तुभ साखरे, कोषाध्यक्ष प्रो. अभिषेक कुलकर्णी, श्री. चाफेकर, श्रीमती मीना मालगांवकर, शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव, ‘मएसो आयएमसीसी’चे संचालक डॉ. संतोष देशपांडे व संस्थेचे मान्यवर या वेळी उपस्थित होते. प्रत्यक्ष वापरातील व स्थिर स्वरुपाच्या वैज्ञानिक प्रतिकृती असलेले ‘स्पेस ऑन व्हील्स’ हे भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’चे फिरते प्रदर्शन हे या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. अवकाशाचा वेध या संकल्पनेवर आधारित प्रश्नमंजुषा, निबंधलेखन, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाखांमध्ये अशाप्रकारे विविध उपक्रमांसह देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन अतिशय आनंद, उत्साह आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनात म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची माजी विद्यार्थिनी आणि भारतीय वायूदलातील अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख या सुपरन्युमेररी ऑफिसर (Supernumerary officer) म्हणून फ्लाईट लेफ्टनंट नेपो मोईरांगथेम व फ्लाईंग ऑफिसर अभिनव घोष यांच्यासह सहभागी झाल्या होत्या. भारतीय वायूदलातील १४४ अधिकाऱ्यांच्या या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉडर्न लीडर महेंद्र सिंह यांनी केले.
दामिनी दिलीप देशमुख यांचे इ. ५ वी चे इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत झाले आहे. इ. १२ वी च्या परीक्षेत शाळेत त्या सर्वप्रथम आल्या होत्या. शालेय जीवनात त्यांनी धनुर्विद्या आणि किक-बॉक्सिंग या खेळांमध्ये राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करून अनेक पारितोषिके पटकावली आहेत. उच्च शिक्षणासाठी त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बी.ई. (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली.
दामिनी देशमुख यांची डिसेंबर २०१९ मध्ये भारतीय वायूसेनेत निवड झाली. सैन्यात जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना दामिनी यांनी आपल्या यशाचे श्रेय आपली शाळा आणि शिक्षकांना दिले होते. “आज आभार नाही मानणार, तुमच्या ऋणातच राहायला आवडेल” असे त्या म्हणाल्या होत्या.
सैन्यदलांमध्ये महिलांना सेवेची संधी मिळावी, शालेय वयातच त्यादृष्टीने जडणघडण व्हावी या हेतूने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने १९९५ मध्ये केवळ मुलींना सैनिकी शिक्षण देण्यासाठी पुणे जिल्हातील कासारआंबोली येथे म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा सुरु केली. महाराष्ट्राच्या सर्व भागातून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची संख्या अधिक असते. गेल्या तीस वर्षांच्या वाटचालीत शाळेतील विद्यार्थिनींनी शैक्षणिक तसेच गिर्यारोहण, अश्वारोहण, क्रीडा, कला अशा सर्वच शिक्षणेतर व शिक्षणपूरक क्षेत्रातील स्पर्धांमध्ये नेत्रदिपक यश प्राप्त केले आहे. शाळेतील अनेक विद्यार्थिनी सैन्याच्या पायदळ, वायूदल, नौदल, तटरक्षक दलात दाखल झाल्या आहेत. तसेच पोलीस दल, केंद्र सरकारी सेवांच्या माध्यमातून विविध आव्हानात्मक क्षेत्रात कार्यरत आहेत.
या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात झालेल्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख यांच्या निवडीने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. केवळ मुलींसाठी स्वतंत्र सैनिकी शाळा सुरू करण्याचा संस्थेचा उद्देश सार्थ होत असल्याचे शाळेच्याच माजी विद्यार्थिनींच्या कर्तृत्वातून दिसून येत आहे.

पुणे, दि. ११ : स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत, राजमाता जिजाऊंना अभिवादन करत माध्यमिक शाळांमधील लहानग्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या घोषपथकांनी सादर केलेल्या वीरवृत्ती आणि चेतना जागवणाऱ्या प्रांगणीय संगीत म्हणजेच मार्शल म्युझिकमधील रचनांनी युवा चेतना दिनाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी युवा चेतना दिन साजरा करण्यात येतो. म. ए. सो. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (शनिवार, दि. ११ जानेवारी २०२५) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते बुद्धिबळपटू जयंत गोखले आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर उप आयुक्त उज्ज्वल अरुण वैद्य या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

संस्थेच्या विविध जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या १२ घोषपथकांनी विविध रचना यावेळी सादर केल्या. घोषपथकातील विविध आकारांच्या, आवाजांच्या, सूरांच्या आणि तालांच्या वाद्यांचा एकत्र मेळ घालत विद्यार्थ्यांनी केलेल्या सुरेल वादनाने प्रांगणीय संगीताची वैशिष्ट्ये उपस्थितांना अनुभवायला मिळाली. किरण तसेच भूप, केदार, शिवरंजनी रागातील पारंपारिक रचनांबरोबरच नव्याने बांधलेली ‘अयोध्या’ ही रचना सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी होती. या रचना सादर करताना काही घोषपथकांनी वर्तृळ, बाण अशा विविध आकारांच्या रचनेत उभे राहून, संचलन करत सादर केलेले वादन शिस्तीचा संस्कार सांगणारे होते. म.ए.सो. मुलांचे विद्यालयाच्या घोषपथकाने सादर केलेली ‘राम आएँगे आएँगे राम आएँगे…’ ही धून बरोबर एक वर्षापूर्वी झालेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या स्मृती जागवणारी होती.

 

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या घोषपथकाने लष्करी गणवेशात आणि अतिशय शिस्तबद्धपणे केलेले सादरीकरण उपस्थितांना प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या सैन्यदलांच्या संचलनाचा अनुभव देऊन गेले. या घोषपथकाने सादर केलेल्या ‘जयोस्तुते श्री महन्मंगले…’ या रचनेने वातावरण वीरश्री आणि देशप्रेमाने भारावून गेले. म.ए.सो. रेणुका स्वरुप प्रशालेच्या घोषपथकाने केलेले सादरीकरण ताल आणि सुरांच्या सुरेल संगमातून निर्माण होणाऱ्या नादाची अनुभूती देणारे होते. ‘अयोध्या’ ही नवीन रचना म्हणजे शौर्य आणि शांत रसाचे अभिनव मिश्रण होते.

 

संस्थेच्या विविध जिल्ह्यातील शाळांमधील घोषपथकातील साईड ड्रमर्सनी किरण आणि भूप रचनांवर आधारित एकत्रितरित्या सादर केलेले प्रात्यक्षिक म्हणजे तालसंगीतामुळे साधल्या जाणाऱ्या समन्वयाचे उत्तम उदाहरण होते. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या घोषपथकाने सादर केलेल्या ‘शिवगर्जने’ने या प्रात्यक्षिकांचा समारोप झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विजय भालेराव यांनी युवा चेतना दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली.

या प्रसंगी बोलताना जयंत गोखले यांनी, खेळ आणि अभ्यास यांच्यात समन्वय साधण्याची गरज असली तरी खेळांना प्राधान्य दिले पाहिजे याकडे लक्ष वेधले. अभ्यासाला वयाचे बंधन नसते मात्र खेळासाठी आवश्यक असलेले कठोर परिश्रम करायला वयामुळे मर्यादा येतात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या खेळाला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर खेळाडूंनी देखील आपल्या आवडीच्या खेळासाठी निश्चयपूर्व आणि झोकून देऊन सराव केला पाहिजे. देशात क्रीडा क्षेत्राला पोषक असे व्यावसायिक वातावरण निर्माण झाले आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा असे ते म्हणाले.

उज्ज्वल वैद्य यांनी आपल्या भाषणात, शिक्षणात पुस्तकी ज्ञानावर भर दिला जात असून खेळातून होणाऱ्या संस्कारांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. शालेय वय हे लक्ष्य साध्य करण्याचे वय असते, आपले लक्ष्य साधण्यासाठी विविध साधनांचा वापर करावा लागतो. मात्र आपल्या मार्गात अडथळे आणणाऱ्या स्मार्टफोनसारख्या साधनांच्या आहारी जाऊ नका, गेम खेळणे, सोशल मिडियाचा वापर करणे यासाठी तो वापरू नका. आपले आई,वडील, शिक्षक, गुरुजन यांच्याशी मनातील गोष्टी मोकळेपणाने बोला. चुकीचे भय मनात ठेवू नका कारण त्यातून अधिक चुका होतात, असा सल्ला त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. उमेश बिबवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर सुधीर भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.

Scroll to Top
Skip to content