महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वाढीव मजल्याचे बांधकाम आणि पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज (रविवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४) करण्यात आले. या प्रसंगी खा. मोहोळ यांनी मूल्य आणि संस्कार यांची जपणूक करणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था अधिक सक्षम आणि विकसित होण्याची आवश्यकता बोलून दाखविली. तर, राजकीय प्रभाव आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री खा. मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला आगामी पाच वर्षात मोठ्याप्रमाणावर सहकार्य करतील अशी अपेक्षा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागांच्या मुख्याध्यापिका श्रीमती आदिती कुलकर्णी, श्रीमती मंजुषा दुर्वे व श्रीमती सायली देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री खा. मोहोळ म्हणाले की, “देशभरात पुणे शहराचे महत्व आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, आयटी हब, राहण्यासाठी सर्वोत्तम शहर अशा विविध कारणांमुळे पुण्याची वेगळी ओळख आहे. त्याचबरोबर शिक्षणाचे माहेरघर असल्याने देश -विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. शिक्षण क्षेत्रामध्ये पुणे शहराला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा मोलाचा वाटा आहे. अशा या संस्थेच्या भावे स्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. १६३ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने ज्ञानदानाची अविरत परंपरा कायम ठेवली आहे. सातत्याने होणाऱ्या बदलांना प्रतिसाद देत संस्था नवीन गोष्टींचा स्वीकार करत आली आहे. अशा संस्थेशी आपण जोडले गेलेलो आहोत याचा आनंद, अभिमान वाटतो. गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या वाटचालींलदर्भात सातत्याने माहिती मिळत राहिली आहे. संस्थेच्या वाढीसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी निश्चित कृती आराखडा तयार करावा लागेल. शिक्षण क्षेत्रात मूल्य आणि संस्कार यांची जपणूक करणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था अधिक सक्षम आणि विकसित झाली पाहिजे, या संस्थेचा एक घटक म्हणून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य मी करीन.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “ मयूर कॉलनीतील मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे आवार हे आदर्श कॅम्पस आहे. संस्थेच्या प्रस्तावित इंजिनिअरिंग कॉलेजच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार असून संस्थेला लॉ कॉलेजसाठीची मान्यता मिळाली आहे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर ही ओळख निर्माण करून देण्यात संस्था अग्रस्थानी राहिली आहे. परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या पाठबळावर चालवली जाणारी संस्था आहे. त्यामुळे संस्थेच्या काही मर्यादा आहेत. सध्याच्या काळात व्यापारी दृष्टीकोनातून चालवल्या जाणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध असतो आणि त्यांची कॅम्पस प्रचंड मोठ्या आकाराची असतात. ‘मएसो’ सारख्या संस्था या बाबतीत मागे पडतात. केंद्रीय मंत्री खा. मुरलीधर मोहोळ यांनी आपला राजकीय प्रभाव आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला आगामी पाच वर्षात मोठ्याप्रमाणावर सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यातूनच भविष्यातील पन्नास वर्षे संस्था सक्षमपणे काम करू शकेल.”
शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव यांनी आपल्या भाषणात शाळेच्या कार्याची माहिती दिली. शाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून मूल्यवर्धन, उपक्रमावर आधारित शिक्षण यामाध्यमातून देशाचा सक्षम नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “संस्थेने आपल्या विस्ताराबरोबरच शिक्षण आणि संस्कार यावर कायमच भर दिला आहे. संस्थेच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटी करण्याचा उल्लेख आहे. त्यानुसार आपण आता क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या उंबरठ्यावर उभे आहोत.”
गरवारे कॉलेजमधील संगणक प्रयोगशाळेचे मा. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
खासदार निधीतून उभारणी
मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) मधील संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. ५ ऑक्टोबर २०२४) करण्यात आले. मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. मा. श्री. जावडेकर यांनी या वेळी शिक्षणातील नवीन संधी, नवीन तंत्रज्ञान, वर्तमानकाळातील घडामोडी या विषयी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.
याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, महाविद्यालयाच्या विकास समितीचे मा. अध्यक्ष सीए राहुल मिरासदार, प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, संस्थेच्या निमायक मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, महाविद्यालयातील प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. मा. श्री. जावडेकर यांचे महाविद्यालयातील १९७१ च्या बॅचचे सहाध्यायी या वेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
या वेळी बोलताना मा. श्री. जावडेकर म्हणाले, “नाविन्याला, संशोधनाला प्रोत्साहन देणारे शिक्षण आणि अभ्यासविषयांच्या निवडीतील लवचिकता ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आवडीच्या विषयांचे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, यासंबंधात होत असलेल्या नकारात्मक चर्चेत अर्थ नाही. भारतात संगणक आले तेव्हा बहुतेकांनी त्याला विरोध केला. पण आज आपण त्या क्षेत्रात खूप प्रगती केली असून मोबाईल फोनचे उत्पादन करणारा भारत हा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांच्या किंमतीपेक्षा तंत्रज्ञानातील संशोधनाचे मूल्य अधिक असते. महाविद्यालयीन शिक्षणात आपल्या आवडीचे विषय निवडण्याची परवानगी आता विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे एकाच वेळी दोन अभ्यासशाखांची पदवी मिळवणे शक्य झाले आहे. ‘स्वयं’च्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत. काही कारणाने शिक्षणात खंड पडला तरी दोन वर्षांच्या आत शिक्षण पुन्हा सुरू करता येते. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि झोकून देऊन मनासारखे शिक्षण घ्यावे.”
महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ‘बस नं. १५३२’ या पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकेतील विद्यार्थी कलाकार आणि पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘मिस पुणे’ किताब मिळालेली विद्यार्थिनी सुहानी नांदगुडे यांचा सत्कार मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी साहित्य चर्चा मंडळ, वक्तृत्व, संगीत, कलामंडळ, हस्तलिखित पाक्षिक ‘निनाद’ अशा उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा. श्री. बाबासाहेब शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही कोणाही एका व्यक्तीच्या मालकीची संस्था नसून माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शिक्षकांनी चालवलेली संस्था आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व परवडणारे शिक्षण देण्यासाठी संस्था माजी विद्यार्थी आणि संस्थेचे हितचिंतक यांच्या माध्यमातून निधी जमा करून पायाभूत सुविधा निर्माण करते. मा. श्री. प्रकाश जावडेकर हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी दिलेल्या निधीतून ही संगणक प्रयोगशाळा उभी राहिली आहे. भविष्यातदेखील ते संस्थेला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाशी जोडले जाण्याचे तसेच आर्थिक स्वरुपात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांना केले.
प्राचार्य डॉ. देसर्डा यांनी आभारप्रदर्शन केले.