जग्वार, मिराज – २०००, सुखोई – ३०, तेजस, राफेल अशी नावं ऐकली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. सैन्यदलांची प्रात्यक्षिके आणि त्यांचे विविध माध्यमातून होणारे प्रसारण, चित्रपट आणि व्हिडीओ गेम्स, क्वचित प्रसंगी दूरवर आकाशात होणारे दर्शन एवढाच तो काय आपला या लढाऊ विमानांशी येणारा संबंध. त्याचा प्रत्यक्ष थरार अनुभवण्याची संधी फारच दुर्मिळ. या लढाऊ विमानांच्या मॉडेलची प्रात्यक्षिके आपल्याला काही प्रमाणात का होईना त्या थराराचा अनुभव देऊन जातात, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ‘दुधाची तहान ताकावर …’ अशी भावना निर्माण करत ही प्रात्यक्षिके आपल्या मनात लढाऊ विमानांबद्दलची उत्सुकता ताणून जातात. ड्रोनच्या रुपाने झालेल्या क्रांतीमुळे आता तर वैमानिकाशिवाय विमान ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे.
सैन्यदलात दाखल होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी तर असा ‘एरो मॉडेलिंग शो’ म्हणजे त्यांच्या आकांक्षांना मिळणारे खतपाणीच! त्यासाठीच पिरंगुटनजिक कासारआंबोली येथे असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत अलिकडेच ‘एरो मॉडेलिंग शो’ आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते. पिरंगुट परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना देखील या वेळी मुद्दामहून बोलविण्यात आले होते.
सदानंद काळे व अथर्व काळे यांनी विविध विमानांच्या मॉडेलच्या माध्यमातून ही प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये भारतीय वायुदलाकडे असलेल्या सुखोई – ३०, तेजस, राफेल इत्यादी विविध लढाऊ विमानांच्या मॉडेलबरोबरच उडणारा गरुड, मासा, उडती तबकडी, बॅनरसह पुष्पवृष्टी करणारे विमान यांचा देखील समावेश होता.
देशाच्या राजधानीत या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्यदलातील महिलांच्या लक्षणीय सहभागामुळे “हाय जोश” मध्ये असलेल्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींना ही रोमहर्षक प्रात्यक्षिके बघून “गगन ठेंगणेच” वाटायला लागले होते. अशा वातावरणात “इच्छाशक्ती पुढे सर्व अडथळे हार मानतात, त्यामुळे आयुष्यात कधीही हार मानू नका.” हा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि पॅराऑलिंपियन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी दिलेला संदेश विद्यार्थिनींसाठी मोलाचा ठरला.
“युद्धामध्ये पायलट विरहित विमानांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एरो मॉडेलिंगचे शिक्षण घेऊन आजच्या पिढीने सैन्यातील ही नवीन संधी ओळखावी आणि आपल्या भारत देशाच्या सेवेसाठी आपले योगदान द्यावे,” अशा शद्बात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थिनींच्या मनावर कोरले गेले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, नाटककार, कथाकार, कांदबरीकार आणि समिक्षक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कुसुमाग्रज यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. त्यामुळे मातृभाषेचा गौरव करण्यासाठी व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिनवादन करण्यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, स्त्री साक्षरतेचे महत्व पटवून देणारे सावित्रीबाई फुले आणि म. ज्योतिबा फुले, ताराबाई मोडक तसेच मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक वि. वा.शिरवाडकर तथा कवि कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, कवयित्री शांता शेळके यांच्या व्यक्तीरेखा विद्यार्थ्यांनी या प्रसंगी सादर केल्या. या कार्यक्रमाला म.ए. सो. भावे प्राथमिक शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. वृषाली ठकार आणि आदर्श शिक्षिका मा. सौ. दीपाली कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. सौ. दीपाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना खूप छान गोष्ट सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन नृत्यगीते सादर केली. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
कळंबोली येथील एम. ई. एस. पब्लिक स्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिना’चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सांगितले. ह्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी समुहगीते सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मराठी दिवसाचे महत्त्व सांगितले. अशाप्रकारे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ अनुवादिका श्रीमती उमा कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘माझा प्रवास’ (भाषांतर ते अनुवाद) हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
*****************************************************************************************************
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाराव्या ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या बेसबॉल खेळाडू कु. रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. १९ जानेवारी २०२४) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे होते.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, संस्थेचे सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी आणि मा. राजीव देशपांडे , मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्था समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे या देखील या वेळी उपस्थित होत्या. ही स्पर्धा दि. १९ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या क्रीडा ज्योतीचे स्वागत प्रमुख पाहुण्या रेश्मा पुणेकर यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
“विद्यार्थ्यांनी स्वतःचे आरोग्य व्यवस्थित ठेवले पाहिजे. बंद खोलीतील खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा. खेळातून आरोग्य तर सुधारतेच पण मन, मेंदू आणि मनगटाचा विकास होतो. खेळाच्या माध्यमातून देखील चांगले करीअर करण्याच्या संधी असतात,” असे विचार मा. कु. रेश्मा पुणेकर यांनी मांडले.
“इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणात ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धा भरवून ‘मएसो’ ने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात वेळ वाया न घालवता त्याकडे पाठ फिरवून मैदानावर यावे,” असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना केले.
या स्पर्धेत सात जिल्ह्यांतील ‘मएसो’ च्या प्राथमिक शाळा तसेच बारामती शहर व परिसरातील सतरा प्राथमिक शाळांमधील बाराशे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सूर्यनमस्कार, डॉजबॉल, गोल खो-खो, लंगडी या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. प्रतिस्पर्ध्यांना बाद करण्याची जिद्द आणि नजरेतली भेदकता, हातात न मावणारा बॉल सांभाळत नेमका वेध घेताना लावलेला जोर, पाठलाग करणाऱ्या खेळाडूला चपळाईने चकवा देत दिलेला खोs आणि क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्सुकता अशा चैतन्यमयी वातावरणात लहानग्यांनी ‘मएसो क्रीडा करंडक स्पर्धे’तील मैदाने दणाणून गेली. लहानग्या खेळाडूंच्या आवेशपूर्ण चढायांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सत्रातील सामने आज रंगले. अनेक सामने अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचेही झाले.
स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, मएसो क्रीडावर्धिनीचे सदस्य, शाला समितीचे सदस्य, शाळेच्या सल्लागार समितीचे सदस्य, माजी शिक्षक, पालकवृंद, सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विजय भालेराव यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शंकर घोडे यांनी तर आभार प्रदर्शन मा. सुधीर भोसले यांनी केले.