MES Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala, Junior College, Kasaramboli Gut No.80 K, Kasaramboli,Post-Pirangut, Mulshi, Pune – 412115 Maharashtra, India Established in 2003
MES Hostel for Girls, Sainiki Shala, Kasar Amboli, Pune Gut No.80 K, Kasaramboli,Post-Pirangut, Mulshi, Pune – 412115 Maharashtra, India Established in 1997
MES Bal Vikas Mandir, Saswad सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२ ३०१ Established in 1986
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मा. बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी मा. सौ. आनंदी पाटील यांची आज ( मंगळवार, दि. १२ सप्टेंबर २०२३) निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या सचिवपदी मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांची तर सहाय्यक सचिवपदी मा. सुधीर भोसले यांची निवड करण्यात आली.
मा. बाबासाहेब शिंदे हे व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते असून सौ. आनंदी पाटील या उद्योजिका आहेत. मा. डॉ. अतुल कुलकर्णी आणि मा. सुधीर भोसले मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कार्यरत असून अनुक्रमे शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स हे त्यांचे विषय आहेत.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष म्हणून एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची तर उपाध्यक्ष म्हणून मा. प्रदीप नाईक यांची संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फेरनिवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून मा. देवदत्त भिशीकर, मा. विजय भालेराव, मा. अॅड. सागर नेवसे, मा. डॉ. विवेक कानडे, सीए मा. राहुल मिरासदार, मा. डॉ. राजीव हजरनीस, मा. अजय पुरोहित यांची निवड झाली आहे.
वर्ष २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी ही निवड आहे.
“आपल्या देशात प्राचीन काळापासून माणूस हा शिक्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. एक चांगला माणूस म्हणून जगाने मला ओळखले पाहिजे अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे यापुढे आपल्याला मूल्यांविषयी तडजोड करून चालणार नाही, वेळप्रसंगी ती विद्यार्थ्यांच्या गळी उतरवावी लागतील. व्यक्तिगत विकास कसा साधायचा हे आपल्याला चांगले समजते परंतू सामुहिक पातळीवर हित कसे साधायचे ते शिकविण्याची गरज आहे. त्याचा अभाव असल्याने आज समुहाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारी माणसे समाजात दिसत नाहीत. शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शहाणपणाचे महत्व यापुढील काळात महत्वाचे ठरणार आहे. ज्ञान मिळविण्याचे अनेक मार्ग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असताना शिक्षकाचे महत्त्व काय आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षक हा समाजाचा कणा आहे कारण चांगली व्यक्ती घडविणारे अदृश्य हात हे शिक्षकाचे असतात. विद्यार्थी निरिक्षणातून शिकत असतात, त्यामुळे शिक्षकांनी आत्मपरिक्षण करणे आणि आपल्यामध्ये अपेक्षित बदल घडवून आणणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे विभागाच्या सचिव मा. डॉ. अनुराधा ओक यांनी आज (सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३) येथे केले.
मार्च २०२३ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये पार पडला, या प्रसंगी त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि म.ए.सो. चे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यापीठावर उपस्थित होते.
इ. १० वी च्या परीक्षेत संस्थेच्या शाळांमध्ये प्रथम आलेल्या १७, एखाद्या विषयात शंभर टक्के गुण णिळवलेल्या ४६ विद्यार्थ्यांचा तसेच इ. १२ वी च्या परीक्षेत संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रथम आलेल्या २०, एखाद्या विषयात शंभर टक्के गुण मिळवलेल्या ६ आणि मएसो ज्ञानवर्धिनी परीक्षेत यशस्वी ठरलेले १२ अशा एकूण १०१ विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रथमेश कडलग, सौम्या दंडगव्हार, प्रतिक्षा पवार, रमा इटकीकर आणि प्रशांत सावंत या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, जीवनात यशाची शिखरे गाठण्यासाठी सातत्याने परिश्रम करावे लागतात. एखादा विषय समजून घेतला तर त्याविषयाची गोडी लागते त्याचप्रमाणे स्वतःला ओळखता आले, तर आपल्यात सुधारणा घडवून आणणे सहज शक्य होते.
म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन तर शिक्षिका दिपाली बधे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
“आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना करताना आखलेल्या ध्येयधोरणांनुसार शाळा वाटचाल करीत आहे. संस्थेच्या सर्वच शाखांप्रमाणे फडके विद्यालयात देखील विद्यार्थी घडवण्याचे कार्य समर्थपणे सुरू आहे. विद्यालयाच्या या कामात संस्थेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांना आज केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आज (शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३) विद्यालयाच्या कै. पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मा. आनंदी पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाला सनोफी हेल्थकेअर या कंपनीत सिनिअर सायंटिफिक राईटर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मानसी कुलकर्णी – दाते व मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मृण्मयी खांबेटे या माजी विद्यार्थिनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या शालासमितीचे अध्यक्ष मा. श्री. देवदत्त भिशीकर, शालासमितीचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी, माध्यमिक विभाग – मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण, माध्यमिक विभाग – इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, प्राथमिक विभाग – मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मानसी कुलकर्णी या प्रसंगी बोलता म्हणाल्या की मराठी माध्यमात शिकल्याचा अभिमान वाटतो आणि संशोधन कार्यात कधीही त्यामुळे अडसर आला नाही. ॲड. मृण्मयी खांबेटे यांनी आपल्या मनोगतातून, आत्मविश्वासाने भविष्यात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत केले.
“१८६० साली सुरू झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा कार्यविस्तार फडके विद्यालयाच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात उत्तमपणे होत आहे. विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध विद्यालयाशी अधिक दृढ होतील यासाठी विद्यालयाने प्रयत्न करावेत,” असे आवाहन मा. देवदत्त भिशीकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संवाद साधताना मा. डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले, “ २५ वर्षांपूर्वी विद्यालयाने सुरू केलेला हा प्रवास अनेक अनुभवांनी समृद्ध आहे, असंख्य व्यक्तींचे त्यात योगदान आहे. भविष्यात देखील ज्ञानदानाचे हे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहील.”
या कार्यक्रमात विद्यालयाचे ध्येय अधोरेखित करणाऱ्या ‘लोगो’ चे प्रकाशन करण्यात आले. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून मुष्टीधान्य उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी संकलित केलेले १ हजार ५०० किलो तांदूळ वनवासी कल्याण आश्रमाला देण्यात आले.
विद्यालयाच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी विद्यालयाचे हितचिंतक, स्नेही, पालक , माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समिता सोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बापट यांनी केले.
पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची सूत्रे डॉ. विलास उगले यांनी आज (शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३) स्वीकारली. या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. ए. पी. कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शरयू साठे, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.
डॉ. उगले तीन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी ते सर परशुराम भाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ. उगले यांचे एम. ए., एम. एड., पीएच. डी. असे शिक्षण झाले असून ‘आर्थिक भूगोल’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. “ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील महादेव कोळी समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासाच्या समस्या आणि संभावना” हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांनी अनेक पेपर्स सादर केले आहेत.
डॉ. उगले यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समितींवर कार्यरत असून यापूर्वी ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व अधिसभेचे सदस्य होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी या नात्याने त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला असून त्याबद्दल विद्यापीठाकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
पाणी, नदी स्वच्छता आणि लहान धरणांचे महत्व या विषयांमध्ये ते काम करतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन स्वयंसेवी संस्था आणि केंद्र सरकार यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.