सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बघण्यासाठी खुला

प्राचीन भारताच्या संस्कृतीची आणि भौगोलिक व्याप्तीची माहिती देणारा त्रिमिती नकाशा मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. २२ जुलै २०२३) करण्यात आले.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बसविण्यात आलेल्या ‘प्राचीन भारत’ त्रिमिती नकाशाच्या अनावरणप्रसंगी (छायाचित्रात डावीकडून) इंजि. सुधीर गाडे, बाबासाहेब शिंदे, प्रा डॉ. शरयू साठे, आनंदीताई पाटील, प्रदीपजी नाईक, ऋषिकेश राऊत, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, आनंदराव कुलकर्णी, देवदत्त भिशीकर.

म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे आणि संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. धनंजय चंद्रात्रे यांच्या संकल्पनेतून शिल्पकार श्री. ऋषिकेश राऊत यांनी हा त्रिमिती नकाशा साकारला आहे. तो १५ फूट x १० फूट आकाराचा असून प्राचीन भारतातील विद्यापीठे, पर्वतरांगा, नद्या, ज्योतिर्लिंग, चारधाम, शक्तिपीठे, कुंभस्थान इत्यादी ठिकाणे, विविध प्रदेश व गावांची प्राचीन नावे या नकाशामध्ये दाखविण्यात आली आहे. त्यातून प्राचीन काळातील भारताच्या भौगोलिक व सांस्कृतिक वैभवाची ओळख सर्वांना होत आहे.

सर्व शिक्षण संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा नकाशा बघण्यासाठी खुला आहे.

म. ए. सो. चे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अनावरण समारंभाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदी पाटील व मा. उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. शरयू साठे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. धनंजय चंद्रात्रे आणि शिल्पकार श्री. ऋषिकेश राऊत यांच्या या वेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

समारंभाचे प्रास्ताविक करताना आर्कि. राजीव सहस्रबुद्धे म्हणाले की, महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये प्राचीन भारताचा नकाशा बसविण्याचा विचार पुढे आला आणि त्यातून साकार झालेल्या या त्रिमिती नकाशामुळे देशाच्या संपन्न सांस्कृतिक वारशाची ओळख सर्वांना होईल.

या प्रसंगी बोलताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, निसर्गाचे वरदान लाभल्याने आपला देश कृषि आणि सांस्कृतिकदृष्ट्या कायमच समृद्ध राहिला आहे. त्यामुळे आपल्या या सुजलाम सुफलाम देशावर कायमच आक्रमणे होत राहिली. तरी देखील आपण संपूर्ण जगाला संस्कृतीचे दान दिले. त्याच्या पाऊलखूणा आजदेखील जगाच्या विविध भागात आढळतात. देशातील तरूण पिढीला आपल्या देशाचा समृद्ध वारसा आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या वीरांची ओळख करून दिली पाहिजे. स्वातंत्र हे गृहित धरून चालणार नाही त्यामुळे देहाकडून देवाकडे जात असताना आपण आपल्या देशाचे देणे लागतो याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. आपला देश जितकी प्रगती करतो तितकाच मागे देखील येतो. त्यामुळे समाजमन अधिक जागृत करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्राचीन भारताचा हा नकाशा निश्चितच प्रेरणादायी आहे.

शिल्पकार श्री. ऋषिकेश राऊत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्राचीन भारताचे गतवैभव प्रदर्शित करणारा हा त्रिमिती नकाशा साकारण्यासाठी खूप संशोधन केले अनेक ग्रंथांमधून संदर्भ शोधले आणि त्यातून तपशील मिळाले. त्यातून भूगोल आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध लक्षात आला. आपल्या राज्याला महाराष्ट्र का म्हटले जाते याचा संदर्भ पुराणात सापडतो. देशातील अनेक ठिकाणांच्या बाबतीत हेच आढळून येते. काळाच्या ओघात अशा महत्वाच्या गोष्टी आपण विसरलो, परंतू प्राचीन भारत त्रिमिती नकाशातून हे आता सर्वांना समजेल.

समारंभाचे सूत्रसंचालन श्री. पांडुरंग कंद यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दशरथ वाघ यांनी केले.

 

 

पुणे, दि. १९ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (आयएमसीसी) महाविद्यालयाला राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधिस्विकृती परिषद म्हणजेच ‘नॅक’तर्फे करण्यात आलेल्या मुल्यांकनात फर्स्ट सायकलमध्ये ‘अ+’दर्जा मिळाला आहे. हे मानांकन पाच वर्षांसाठी आहे.

‘नॅक’ चा ‘अ+’ दर्जा मिळाल्यामुळे मएसो आयएमसीसीचा एक नवा प्रवास सुरू झाला असून आगामी पाच वर्षांमध्ये इन्स्टिट्यूटला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवायचे आहे अशी भावना इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

कॉम्प्युटर आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ख्यातनाम असलेल्या ‘आयएमसीसी’मध्ये एमसीए, एमबीए, पीएच.डी. आणि डीटीएल हे अभ्यासक्रम शिकवले जात असून सुमारे ६५० विद्यार्थी या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. ८० टक्के प्लेसमेंट हे इन्स्टिट्यूटचे वैशिष्ट्य असून येथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

Scroll to Top
Skip to content