म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्या नवीन इमारतीचे आणि सध्याच्या माध्यमिक शाळेच्या इमारतीवरील तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाचे भूमीपूजन श्री गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर आज (बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३) संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे पूर्वप्राथमिक विभागाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मा. भूषणजी गोखले यांच्या समवेत शाळेत सिनीअर केजीमध्ये शिकणाऱ्या अनघा दुसाने, शुभम अवचिते आणि सान्वी शिरोडे या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांची सन्मननीय उपस्थिती होती.
या प्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य देवदत्त भिशीकर, शाला समितीचे अध्यक्ष आ.वा. कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य सुधीर भोसले, डॉ. गोविंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
सासवड, दि. २० – लंगडीच्या सामन्यात एकाच दमात जास्तीत जास्त प्रतिस्पर्ध्यांना बाद करण्याची जिद्द आणि नजरेतली भेदकता, हातात न मावणारा बॉल सांभाळत नेमका वेध घेताना लावलेला जोर, पाठलाग करणाऱ्या खेळाडूला चपळाईने चकवा देत दिलेला खोs आणि क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्सुकता अशा चैतन्यमयी वातावरणात लहानग्यांनी मएसो क्रीडा करंडक स्पर्धेतील मैदाने दणाणून गेली. लहानग्या खेळाडूंच्या आवेशपूर्ण चढायांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सत्रातील सामने आज रंगले. निमित्त होते, म.ए.सो. क्रीडा करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाचे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून इ. १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो, सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश असतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून या वर्षी ही स्पर्धा सासवड येथील म.ए.सो. वाघीरे विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. आज (शुक्रवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी) या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरवातीला यशराज लांडगे या राष्ट्रीय खेळाडूच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या पथकाने धावत आणलेली क्रीडा ज्योत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्य हस्ते क्रीडांगणावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेच्या ध्वजाचे अवतरण करण्यात आले. तसेच तन्मयी कोकरे या विद्यार्थिनीने उपस्थितांना क्रीडा शपथ दिली.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील व नियामक मंडळाचे उपाध्यक्ष व शाला समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, लंगडी, खो-खो, डॉजबॉल या सारख्या सांघिक खेळांमधून संघभावना वाढीस लागते, त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची वृत्ती विकसित होत असल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. खेळांमुळे शारीरिक क्षमता विकसित होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मैदानाचा जास्तीतजास्त उपयोग करून घेतला पाहिजे. देश-विदेशातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.
बाबासाहेब शिंदे यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म.ए.सो. च्या १६२ वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा घेताना म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
दि. २२ जानेवारी २०२३ पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
विजय भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला आहेरकर यांनी केले.
.
प्रकाशझोतात पार पडणार स्पर्धा
सासवड, दि. १८ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी म. ए. सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा सासवड येथील म. ए. सो. वाघीरे हायस्कूलच्या मैदानावर शुक्रवार, दि. २० जानेवारी ते रविवार, दि. २२ जानेवारी २०२३ या काळात होणार आहे. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो, सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रकाशझोतात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे.
ही माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांनी आज (बुधवार, दि. १८ जानेवारी २०२३ रोजी) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कसगावडे यांच्या हस्ते होणार असून के. जे. इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष श्री. कल्याण जाधव हे या याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सायली केरीपले यांच्या हस्ते होणार असून बांधकाम व्यवसायिक शिरीष जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
या स्पर्धेचे यजमानपद सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर या शाळेकडे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली आहे.
शासन स्तरावर १४ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र, प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कोणतीच स्पर्धा आयोजित केली जात नाही हे लक्षात घेऊन संस्थेने सन २०११ पासून म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली.
“नरेंद्र जन्माला येतो, स्वामी विवेकानंद घडवावे लागतात. स्वामी विवेकानंदांचे जीवन निर्भयतेचे स्मरण करून देते. कुशाग्र बुद्धी, बुद्धिप्रामाण्यवाद, जगाच्या कल्याणाचा विचार, सहसंवेदना, अमोघ वक्तृत्व अशा अनेक गुणांमुळे नरेंद्र पुढे जाऊन स्वामी विवेकानंद झाले,” असे प्रतिपादन मुंबईतील सोमय्या कॉलेजचे प्राध्यापक मा. सागर म्हात्रे यांनी आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी२०२३) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कबड्डीपटू मा. शक्तीसिंग यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ, संतोष देशपांडे, ॲड. सागर नेवसे, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र श्री. सुधीर भोसले, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.
नवी मुंबईतील म.ए.सो.चे हितचिंतक, निमंत्रित, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी यावेळी मैदानी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात.या वर्षी पहिल्यांदाच पुणे येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमाबरोबरच नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, मएसो पब्लिक स्कूल, कळंबोली मएसो ज्ञान मंदिर आणि मएसो विद्या मंदिर बेलापूर या शाखांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी लेझीम, लाठीकाठी, ढोल पथक, ध्वज पथक, डंबेल्स, बटरफ्लाय ड्रील, फ्लॉवर ड्रील, रिंग ड्रील, ॲरोबिक्स असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
स्वामीजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रा. म्हात्रे यांनी स्वामीजींचे तेजस्वी जीवन उलगडले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, “स्वामीजींमधील गुण आत्मसात केले तर भविष्यातील स्वामी विवेकानंद घडतील. महान विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करा. त्यांच्या विचारांतूनच तुमचाही सामान्यापासून असामान्यत्वाकडे प्रवास सुरू होईल.”
मा. शक्तीसिंग यादव यावेळी बोलताना म्हणाले, “स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घ्या. ती पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करा. खेळ, अभ्यास किंवा जे काही कराल त्यात एकाग्रता वाढवा. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठे व्हा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा आजचा हा दिवस युवा चेतना दिन तुम्हा सर्वांबरोबर साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे.”
मा. देवदत्त भिशीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “स्वामी विवेकानंदांच्या विचारात व्यक्ती नव्हे तर समष्टीचा विचार होता. ते एक योद्धा संन्यासी, युगनायक होते.” स्वामीजींचे विचार आजच्या युवांपर्यंत
पोहोचण्यासाठी सर्व शाळांनी वर्षभरात स्वामीजींचे एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा असे आवाहनही मा. भिशीकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीचा आढावा घेतला व युवा चेतना दिन साजरा करण्यामागील म. ए. सो. ची भूमिका विषद केली. आपल्या देशातील विविध क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी क्रीडा प्रात्यक्षिके व शारीरिक कवायती दरवर्षी सादर केली जातात. त्यात मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे विद्यार्थ्यांमधील चेतना जागृत ठेवण्याचा हेतू पूर्ण होत आहे, असे त्यांनी सांगितले.
रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या फडके विद्यालयातील चि. वेदांत पाटील याने उपस्थित युवांना प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभाग-मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती निशा देवरे यांनी केले.
डॉ. संतोष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
म. ए. सो. पब्लिक स्कूल कळंबोली या शाळेतील विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् सादर केले.