आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि हाडाचे शिक्षक असलेले वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या रुपाने एकत्र आलेल्या शक्ती, बुद्धी आणि युक्तीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना. ब्रिटिश सत्तेकडून देशाची आणि देशबांधवांची होणारी अवहेलना, होणारा अपमान याच्या विरोधात एकत्र येऊन शिक्षणाबरोबरच स्वावलंबन, इंग्रजी व लॅटिन भाषेबरोबर संस्कृत, भूगोलाबरोबर आपला दैदिप्यमान इतिहास, संस्कारांद्वारे संस्कृतीचा पुरस्कार करण्याच्या निश्चयाने स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेचा इतिहास आज (रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२) सर्वांसमोर भव्य-दिव्य स्वरुपात सादर झाला, वज्रमूठ या महानाट्याद्वारे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या संस्थापकांना आदरांजली वाहण्यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सादर करण्यात आलेल्या या महानाट्याला शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी साकारलेले हे महानाट्य सर्वांच्याच काळजाचा ठाव घेणारे ठरले.

ब्रिटिश सत्तेचा रोष आणि उपद्रव, आर्थिक अडचणी, समाजाकडून हेटाळणी अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा सुरू राहाव्यात म्हणून संस्थेच्या संस्थापकांनी केलेला असीम त्याग, कष्ट आणि संघर्ष यांची माहिती नव्या पिढीला या महानाट्यातून झाली. तसेच सुमारे दीडशे वर्षापूर्वीच्या काळातील घरांची रचना, माणसांचे पेहराव,  तेंव्हाच्या चालीरिती, सण साजरे करायच्या पद्धती या सर्व गोष्टी माहिती झाल्या.

संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी सदस्य भालचंद्र पुरंदरे यांनी लिहिलेली या महानाट्याची संहिता मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा माजी विद्यार्थी अभिषेक शाळू याने तितक्याच ताकदीने रंगमंचावर साकारली आहे. होनराज मावळे याचे संगीत, महेश लिमये आणि तेजस देवधर यांचे ध्वनी संयोजन व प्रकाश व्यवस्था अशा सर्वच अंगाने कसदार निर्मिती असलेल्या या महानाट्यातून इतिहासातील घटना प्रेक्षकांसमोर जीवंत झाल्या.

या महानाट्याच्या कार्यक्रमाला जागतिक किर्तीच्या नृत्यांगना व संस्थेच्या माजी विद्यार्थिनी मनिषाताई साठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील व उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने परंपरा आणि नवता यांची चांगली सांगड घातली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या मूलभूत विषयांबरोबरच संस्थेने कालसुसंगत अशा विविध विषयांचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे याचा माजी विद्यार्थिनी म्हणून खूप अभिमान वाटतो. ‘मएसो’ने दिलेल्या शिकवणुकीतून प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मभान यावे अशी माझी इच्छा आहे,” अशा शद्बात मनिषाताई साठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वंशज, कै. वामन प्रभाकर भावे यांचे पणतू मंगेश भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांचे नातू दिलीप इंदापूरकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आनंदीताई पाटील यांनी या महानाट्याच्या निर्मितीमागील भूमिका आणि प्रक्रिया विषद केली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची वाटचाल ही ध्येय, त्याग आणि बलिदानाची असून वारकऱ्यांच्या दिंडीप्रमाणेच संस्थेचे शिक्षक गेली १६२ वर्षे ‘मएसो’ची ज्ञानदिंडी वाहून नेत आहेत, असे सांगितले.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन तर इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

१७५ विद्यार्थ्यांचा सहभाग : दृक-श्राव्य माध्यमाचा वापर
पारतंत्र्याच्या काळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची उभारणी करताना संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी कोणत्या अडचणींना तोंड दिले, त्यांनी कोणत्या प्रकारे त्याग केला याची माहिती देणारे ‘वज्रमूठ’ हे महानाट्य रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळामध्ये पुण्यातील स्वारगेट जवळ असलेल्या गणेश कला क्रीडा मंच येथे सादर होणार आहे. १६२ वर्ष पूर्ण करत असताना संस्थेच्या वतीने संस्थापकांना आदरांजली म्हणून या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. दृक-श्राव्य माध्यमाच्या आधारे सादर करण्यात येणाऱ्या या महानाट्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यामधील शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, माजी विद्यार्थी असे १७५ कलाकार भूमिका साकारणार आहेत. ही माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी आज (बुधवार, दि. १६ नोव्हेबर २०२२) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे मा. उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, नियामक मंडळाचे माजी सदस्य व या महानाट्याचे सूत्रधार श्री. भालचंद्र पुरंदरे, साहाय्यक दिग्दर्शक श्री. अभिषेक शाळू उपस्थित होते.
‘वज्रमूठ’ महानाट्याच्या सादरीकरणाच्या वेळी संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नृत्यांगना श्रीमती मनिषाताई साठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून ‘मएसो’चे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. पुणे शहरातील मान्यवर या महानाट्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
महानाट्याच्या कथानकाबद्दल माहिती देताना श्री. भालचंद्र पुरंदरे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हा शिक्षणक्षेत्रातील एक वटवृक्ष आहे. त्याची गोष्ट ‘वज्रमूठ’ या महानाट्यातून सांगण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक क्रांतिकारक होते, त्यांच्या पत्नींना देखील अनेक यातना भोगाव्या लागल्या. त्याच या महानाट्याच्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत, त्याच ही गोष्ट सांगत आहेत. अतिशय पराकोटीच्या विपरित परिस्थितीत असतानादेखील नैराश्य हा शद्ब देखील त्यांच्या शद्बकोशात नव्हता. हा एक फार मोठा संस्कार या महानाट्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. ही सर्व चरित्रे समाजासमोर आली पाहिजेत यासाठी अतिशय श्रद्धेने हे महानाट्य साकारत आहोत, आमच्या भावना कलेच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. भारुड, कीर्तन, पारंपारिक नृत्य, महिलांचे पारंपारिक खेळ अशा विविध कला प्रकारांचा उपयोग करण्यात आला आहे.
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या तीन समाजधुरिणांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुण्यातल्या गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षण तसेच शास्त्रीय आणि औद्योगिक शिक्षण देण्याचा उद्देश त्यांच्यासमोर होता. या विषयांची निवड करण्यामागे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाची आणि स्वावलंबनाची दूरदृष्टी होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
एतद्देशियांनी सुरु केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपल्या १६२ वर्षांच्या वाटचालीत स्वतःमध्ये कालसुसंगत बदल करत ज्ञानदानाचे आपले पवित्र कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर ही ओळख घडवण्यात संस्थेने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. महाराष्ट्रातल्या ७ जिल्ह्यांमध्ये असलेल्या संस्थेच्या ७० हून अधिक शाखांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज संस्थेच्या कार्याचा विस्तार पूर्वप्राथमिक शिक्षणापासून संशोधनापर्यंतच्या शिक्षणापर्यंत झाला आहे. त्यामध्ये शालेय शिक्षण, मुलींचे सैनिकी शिक्षण, कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक, व्यवस्थापन, आयुर्वेद, नर्सिंग, प्रायोगिक कला या विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा समावेश आहे.
आत्तापर्यंतच्या वाटचालीत आलेल्या आव्हानांवर मात करत संस्थेचा हा प्रवास असाच पुढे सुरु राहणार आहे.

विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना प्रयोगाद्वारे होणार सोप्या

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमधील लेफ्टनंट कर्नल कै. सुहास गोगटे विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा श्रीमती गोगटे यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. १२ नोव्हेंबर २०२२) पार पडला.

११ नोव्हेंबर – राष्ट्रीय शिक्षण दिवस, १४ नोव्हेंबर – बाल दिन व १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन, या दिवसांचे औचित्य साधून म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने विज्ञान आठवडा आयोजित केला आहे, याची सुरुवात विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेच्या हस्तांतरण सोहळ्याने झाली. प्रयोगशाळेमधील ३-डी प्रिंटर च्या साह्याने तयार करण्यात आलेल्या समया मोबाईल ॲपद्वारे प्रज्वलित करून अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.  श्रीमती गोगटे यांनी पती लेफ्टनंट कर्नल कै. सुहास गोगटे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून ही प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे.

विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेचा फायदा सैनिकी शाळेतील छात्रांबरोबरच प्रशालेच्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार असून विज्ञानातील संकल्पना त्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे समजून घेता येणार आहेत.  कृतिशील सहभागातून  ही प्रयोगशाळा शैक्षणिक क्षेत्रातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मैलाचा दगड ठरेल, याच्या वापरातून विद्यार्थिनींनी मूलभूत संकलनांचा अभ्यास करावा व यशाची शिखरे सर करावीत अशी अपेक्षा प्रमुख अतिथी श्रीमती गोगटे यांनी या वेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्त्रबुद्धे, शाळा समितीच्या मा. अध्यक्षा डॉ. माधवी मेहंदळे, शाळा समितीच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुळशी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल कु़भार, सचिव श्री.सतीश शिंदे, प्रशालाचे कमांडंट म. यज्ञरामण, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे व श्री. संदीप पवार तसेच शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे सदस्य श्री. सागर दळवी, तसेच कॅ. वैद्य उपस्थित होते.

या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी सैनिकी शाळेच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती मंजिरी पाटील व संपूर्ण विज्ञान विभागाने कॅम्पस डायरेक्टर श्रीमती गीतांजली बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये यावर्षी ‘सामाजिक भोंडला’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. मुलगा-मुलगी कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्रितपणे या भोंडल्यात सहभागी व्हावे आणि शाळेशी संबंधित सर्व घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे महत्व समजावे म्हणून भोंडल्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर करण्यात आला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून  भोंडल्यासाठी हत्तीची प्रतिमा तयार केली. भोंडल्याच्या सुरवातील सर्वांना भोंडल्याची परंपरा व इतिहास सांगण्यात आला. त्यांनतर हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून सर्वांनी भोंडल्याची अनेक गाणी गायली. भोंडल्यासाठी निवडलेली ही गाणी विविध सामाजिक संदेश देणारी होती. सर्वांनी भोंडल्याचा मनसोक्त आनंद लुटून खिरापतीचा आस्वाद  घेतला.  भोंडल्याच्या कार्यक्रमामुळे शाळांची मैदाने फुलून गेली होती. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबरच शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी या सामाजिक भोंडल्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुणे, बारामती, सासवड, शिरवळ, नगर, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी असलेल्या सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम अतिशय आनंदात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक भोंडल्यामध्ये प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि विद्यमान नगरसेविका मा. माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी ‘एक झाड लावू बाई, दोन झाड लावू’ हे पर्यावरण पूरक गीत मोठ्या आनंदाने गायिले. प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व नेत्रतज्ञ डॉ. गीतांजली शर्मा या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या महाभोंडल्यात सहभागी होता आले याबद्दल प्रशालेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक भोंडल्यात माजी विद्यार्थ्यांबरोबरच सहभागी झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी देखील भोंडल्यात प्रत्यक्ष फेर धरला आणि आनंद घेतला. सामाजिक कार्य करणारे आणि शाळेला सहकार्य करणारे कर्मचारी, अधिकारी, कार्यकर्ते, यांचा यावेळी सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

म. ए. सो. रेणुका स्वरुप प्रशालेमध्ये माजी विद्यार्थिनींच्या हस्ते भोंडल्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गजराजाच्या प्रतिमेभोवती फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणत सर्वांनी भोंडला साजरा केला.  सामाजिक जाणीवांचाही जागर व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रशालेतून १९८१ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या तुकडीपासून नुकत्याच बाहेर पडलेल्या विद्यार्थिनी देखील आवर्जून सहभागी झाल्या होत्या. शाळेच्या आजी-माजी शिक्षिका, कर्मचारी देखील या भोंडल्यात सहभागी झाल्या होत्या.

म. ए. सो. मुलांचे विद्यालयातील सामाजिक भोंडल्याला २५० विद्यार्थी, माजी विद्यार्थी-शिक्षक, पालक आवर्जून  उपस्थित होते.

म. ए. सो. पूर्व-प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ या शाळेत माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा भोंडला आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थ्यांना त्यांचे बालपण परत अनुभवता यावे म्हणून शाळा विविध फुलांनी सजवण्यात आली होती. सर्वांनी गप्पा – गोष्टींमधून पूर्वस्मृतींना उजाळा दिला.

Scroll to Top
Skip to content