पुणे : “ सातत्याने यश मिळत गेल्यास माणसामध्ये अहंकार निर्माण होतो पण ते टाळून आपल्यात विनम्रता निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत राहा” असा सल्ला पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त मा. श्री. सु. मु. बुक्के यांनी आज (गुरुवार, दि. २५ ऑगस्ट २०२२) येथे यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.
मार्च २०२२ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्चमाध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मएसो ज्ञानवर्धिनी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री. बुक्के यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.
या वेळी संस्थेच्या ६ जिल्ह्यांमधील २३ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४३ विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील आणि श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. बुक्के आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाले की, परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांवरील जबाबदारी वाढली आहे. या यशात आता उणीव निर्माण होऊन चालणार नाही. त्यासाठी यापुढे तुम्हाला तुमच्या स्वतःशीच स्पर्धा करावी लागणार आहे. कोरोना महामारीच्या काळात जग चिंताक्रांत असताना, आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अतुलनीय आहे. या विद्यार्थ्यांकडे ‘कोविड बॅच’ म्हणून नकारात्मक दृष्टिकोनातून बघणे योग्य नाही. कोरोना आपत्तीच्या काळात अनेक समस्यांना तोंड देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. “मोठेपणी मला शिक्षक व्हायचे आहे” असा निर्धार व्यक्त करणारे विद्यार्थी शिक्षकांनी घडविले आहेत. त्याचबरोबर आपल्या पाल्याला समर्थपणे साथ देणारी, पहिली शिक्षिका, न्यायाधीश असलेल्या प्रत्येक आईचा विद्यार्थ्यांच्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन करायला हवे.
समारंभाच्या प्रारंभी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढाव घेतला. व्यक्तीच्या विकासामुळे समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होत असतो, त्यामुळे संस्था विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
संस्थेच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील यांनी श्री. बुक्के यांचा परिचय करून दिला.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “यशस्वी विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे असते. त्यांना मिळालेले यश दिसते मात्र, त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते दिसत नाही. त्यामुळे भविष्यात कठोर परिश्रमांची तयारी ठेवा आणि आपल्या कर्तृत्वाने जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न बघा. आपली शाळा आणि संस्था यांचे नाव उज्ज्वल होईल असे काम करा.”
संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.
समारंभाचे सूत्रसंचालन वर्षदा पांढरकर यांनी केले.