“देशाने मला काय दिले? असा विचार न करता मी देशासाठी काय करू शकतो? हा भाव मनात बाळगून निरपेक्षपणे देशसेवा करणे हीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या अनामवीरांना खरी श्रद्धांजली ठरेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वयंप्रेरणेतून काम करणाऱ्या या स्वातंत्र्य योद्ध्यांची कोणतीच वैयक्तिक आकांक्षा नव्हती, आपल्या नावाची कोणी दखल घ्यावी असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. त्यांच्या बलिदानात त्यांच्या परिजनांचे योगदान देखील खूप मोठे आणि न विसरता येण्यासारखे आहे. आपण आजपर्यंत त्यांची दखल घेतली नाही ही खंत या अनामवीरांचे स्मरण करताना आपण लक्षात घेतली पाहिजे, त्यांचे मोठेपण सांगत असताना या अनामवीरांबाबत असलेल्या कर्तव्यबोधाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि त्यातून आपण देशसेवेसाठी सक्रीय झाले पाहिजे, ही खरी आवश्यकता आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या या वीरांना कायमच अनाम ठेवण्यासाठी नियोजनपूर्वक कोणी काम करत आहे का? याचाही विचार आपण केला पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रचार प्रमुख मा. प्रमोद बापट यांनी आज येथे केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘स्वराज्य – ७५: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील पहिले पुष्प गुंफताना मा. प्रमोद बापट बोलत होते. ‘अनामवीरा …!’ हा आजच्या व्याख्यानाचा विषय होता.

म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते. म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’च्या अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर हे ऑनलाईन माध्यमातून या व्याख्यानाला उपस्थित होते. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आरंभीचा काळ हा विविध क्षेत्रातील उभारणीचा होता, काही क्षेत्रात आपण अपेक्षित उंची देखील गाठली. परंतू त्याचबरोबर श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाली. त्यातूनच देशासाठी आहुती देणाऱ्या वीरांची नावे पुसण्याचा प्रयत्न झाला. पारतंत्र्याच्या काळात परदेशात राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेले अनेक देशभक्त स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातील देशामधील वातावरण बघून भयापोटी मायदेशी परत आले नाहीत. कलुषित दृष्टीने बघण्याचा वारसा ब्रिटीश मागे ठेवून गेले आहेत. त्यामुळे अनामवीरांची नावे दडपण्याचा प्रयत्न हेतूतः होत असेल तर त्यांची चरित्रे वाचून, त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुरेसे होणार नाही, हे अस्वाभाविक प्रयत्न आणि त्यामागील योजना समजून घेऊन ते उद्ध्वस्त केले पाहिजेत. त्याचे माध्यम शिक्षण हेच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अशा अनामवीरांनी स्वातंत्र्यासाठी आहुती दिली. मात्र, त्यांच्या परिजनांची जी परवड झाली त्याची दखल घेतली जात नाही, त्यांचे दुष्टचक्र थांबत नाही. स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशासाठी आपण काय करू शकतो? ही भावना होती, परंतू स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता देशाने आमच्यासाठी सर्व काही करायचे आहे असा विचार रूढ झाला. असे कशामुळे घडते? तर, अनामवीरांच्या बलिदानाचे स्मरण न ठेवल्याने हे होते. ते समाजाच्या हिताचे नाही. देशासाठी मी काय करू शकतो? हा कर्तव्यबोधाचा संस्कार या भूमीतला आहे. त्यातूनच डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी यवतमाळ येथे जंगल सत्याग्रह केला होता. पण आजदेखील त्याबाबत शंका उपस्थित केली जाते. अनामवीरांना प्रमाणपत्रांची गरज आहे का? हे आपण चालू देणार आहोत का? देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने याकडे लक्ष वेधले पाहिजे. देशाच्या विविध भागात राहणाऱ्या विविध समाज घटकांनी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या भाषेतून आपल्या लोककथा, लोकगीतांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत  ठेवली. स्वातंत्र्यानंतर या समाज घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रविरोधी शक्तींनी त्यांना आपलेसे केले आहे, हा देशासमोरील फार मोठा धोका आहे,” असे मा. प्रमोद बापट यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’चे सदस्य डॉ. आनंद लेले यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा वारसा संस्थेला लाभला आहे. कालानुरूप आणि अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून देत असतानाच हा वारसा पुढे नेण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात देशबांधवांनी जी किंमत मोजली त्याची माहिती युवा वर्गाला करून देण्यासाठी संस्थेने व्याख्यानमालेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय संस्थेच्या शाखांमधून पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य यांनी केले. ‘अनामवीरा …!’ हे व्याख्यान राष्ट्रप्रेम, राष्ट्रचिंतन आणि राष्ट्रप्रेरणा निर्माण करणारे ठरेल. राष्ट्राच्या पुर्ननिर्माणात प्रत्येकाने योगदान द्यावे यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील प्रत्येक विभागाने स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि आता अमृत महोत्सव साजरा करण्याचे भाग्य मला आणि माझ्या पिढीला लाभले. परंतू स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या वेळी जो विचार मांडला गेला तोच आज पन्नास वर्षांनंतर देखील मांडला जातो आहे. याचे कारण स्वातंत्र्यानंतरच्या काळात अपेक्षित दिशेने आपल्या देशाची प्रगती झाली नाही. आपला हजारो वर्षांचा इतिहास लक्षात न घेता आपला देश ७५ वर्षांचाच आहे हे समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न होतो आहे. देशात भौतिक प्रगती होत राहिल. मात्र, स्वातंत्र्याच्या शताद्बी वर्षाकडे वाटचाल करताना आत्मिक प्रगती आणि संस्कारांच्या बाबतीत आपण कुठे आहोत? देशातील नागरिकांना मानसिक आणि वैचारिक स्वातंत्र्य मिळाले आहे का? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या भवितव्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे ही धारणा योग्य नाही. शिक्षण क्षेत्राला यापुढील काळात समाजाचे नेतृत्व करावे लागेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रणव कुलकर्णी यांनी केले.

प्रा. राधिका गंधे यांनी राष्ट्रगीत गायन केले.

ज्येष्ठ रंगकर्मी, प्रसिद्ध गायिका किर्ती शिलेदार यांचे आज (शनिवार, दि. २२ जानेवारी २०२२) सकाळी पुण्यात निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना तसेच सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या.
आपले आई-वडिल जयराम व जयमाला शिलेदार यांच्याकडून त्यांना संगीत आणि नाट्य कलेचा वारसा त्यांना लाभला होता. वयाच्या दहाव्या वर्षी किर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवलं आणि आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आणि गायनाने रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. तब्बल ६० वर्षे त्यांनी रंगभूमीची सेवा केली. एकच प्याला, कान्होपात्रा, द्रौपदी, मानापमान, ययाति आणि देवयानी, शाकुंतल, संशयकल्लोळ, सौभद्र अशा संगीत नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
२०१८ साली झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने संगीत, नाट्य आणि नृत्य या कलांच्या शिक्षणासाठी मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हे स्वतंत्र महाविद्यालय सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला होता. https://fb.watch/aHokpJTKtz/
तसेच विद्यार्थी दशेत शाळा आणि महाविद्यालयाने आपल्या कलेला कायमच प्रोत्साहन दिल्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली होती.

इ. ११ वी मध्ये शिकत असताना प्रशालेच्या १९७० सालच्या नियतकालिकात त्यांनी लिहिलेल्या ‘माझी आवडती भूमिका’ या लेखातून आपल्या कलेप्रती असलेला त्यांचा समर्पित भाव लक्षात येतो.

संस्थेतर्फे किर्ती शिलेदार यांनी भावपूर्ण आदरांजली!

पुणे, दि. १२ : “आपल्या देशाचा बाह्य जगाशी जेव्हा संबंध तुटला तेव्हा आपल्या देशाची अधोगती सुरू झाली. आपल्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेला वाव नाही, असा बंदिस्त समाज प्रगती कशी करू शकेल? आपल्याला जेव्हा प्रश्न पडतात, तेव्हाच बदलांना सुरवात होते. म्हणूनच आपल्या देशातील महान व्यक्तींनी व्यवस्था बदलण्यास सुरवात केली. त्यामागे देशातील माणूस जपण्याचा विचार होता. तंत्रज्ञानाने माणसांमधील विषमता दूर होते, त्यामुळे पाश्चिमात्य देशांमधील तंत्रज्ञान आपल्या देशात यावे आणि आपल्या देशातील तत्वज्ञान पाश्चात्यांना समजावे, त्यातून संपूर्ण जग एक होईल असा विचार स्वामी विवेकानंद यांनी मांडला,” असे प्रतिपादन एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रात्यक्षिकांशिवाय हा कार्यक्रम मर्यादित निमंत्रतांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

डॉ. गणेश राऊत या वेळी बोलताना पुढे म्हणाले की, “ स्वामी विवेकानंद देशविदेशात भ्रमण करत असताना ऐतिहासिक वास्तू आवर्जून बघत असत. आपली संस्कृती परकीयांना समजावी यासाठी आपल्या देशाचा इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. संन्यासी लोकांनी समाजासमोरचे प्रश्न सोडवायचे असतात हे स्वामी विवेकानंदांनीच पहिल्यांदा दाखवून दिले, त्यासाठी त्यांनी ‘शिवभावे जीवसेवा’ या धारणेतून रामकृष्ण मिशनची स्थापना केली. एकाच जन्मात एखादी व्यक्ती किती प्रकारची आयुष्ये जगू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होते.  स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या दोघांनीही ‘तूच तुझा प्रकाश हो’ हा संदेश दिला. भविष्यातील उज्ज्वल यशाची पायाभरणी लहान वयातच होत असते, म्हणूनच राजमाता जिजाऊंनी बालपणी शिवरायांच्या मनात विजयानगरचे साम्राज्य कशामुळे लयाला गेले? त्याची पुनर्स्थापना करता येईल का? असे प्रश्न निर्माण केले. त्यामुळेच शिवरायांच्या मनात आपल्या राष्ट्राचा उद्धार करण्याचा विचार रूजला.”

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे देशाचे सांस्कृतिक राजदूत होते. आपल्या देशाची संस्कृती जगाला समजावून सांगण्यासाठी त्यांनी देशविदेशात प्रवास केला. भारताला एकसंध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आपल्या देशाचा आत्मा एकच आहे याचा अनुभव आपणदेखील देशभर प्रवास करताना घेतो. स्वामी विवेकानंदांनी शरीराबरोबर बुद्धी आणि मन सक्षम करण्याची शिकवण दिली. युवा पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याने आपण त्यांच्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे. आपला इतिहास आपणच लिहीला पाहिजे हा स्वामी विवेकानंदांचा विचार अतिशय महत्वाचा आहे, कारण जेताच इतिहास लिहीत असतो. सध्याच्या काळात शस्त्रास्त्रांपेक्षा मानसिक युद्धाबाबत आपण सतर्क राहिले पाहिजे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा चेतना दिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली. आपल्या देशातील विविध क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी खेळ आणि शारिरीक प्रात्यक्षिके दरवर्षी सादर केली जातात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून मैदानावरील प्रात्यक्षिके न होता सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यात मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे विद्यार्थ्यांमधील चेतना जागृत ठेवण्याचे काम होत आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या दोघांची जयंती एकाच दिवशी आहे ही विशेष बाब आहे. या दोघांनीही ‘आधी केले आणि मग सांगितले’ हे तत्व कायम पाळले. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ब्रीदवाक्य त्यालाच अनुसरून आहे. यावर्षी संस्थेच्या शाखांमधील सर्व घटकांनी मिळून एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला आहे. सर्वजण १ जानेवारीपासून रोज नियमितपणे १२ सूर्यनमस्कार घालत असल्याने हा संकल्प निश्चितच पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली महाजन यांनी केले.

संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

राधिका गंधे यांनी सरस्वती वंदना आणि वंदेमातरम् सादर केले.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळणार तज्ञांचे मार्गदर्शन

मएसो शिक्षण प्रबोधिनी व मएसो व्यक्तिमत्व विकास केंद्र यांच्यावतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी पौड रस्त्यावरील सरस्वती भवन येथे तयार करण्यात आलेल्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’चे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते आज (बुधवार, दि. ५ जानेवारी २०२२) करण्यात आले. या व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून संस्थेच्या पुण्यातील व पुण्याबाहेरील शाखांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकाचवेळी तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पुणे महानगर पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना देखील या व्हर्चुअल क्लासरूमचा लाभ मिळणार आहे. या प्रसंगी संस्थेचे माजी सचिव प्रा. वि.ना. शुक्ल यांचे उद्धाटनपर सत्र आयोजित करण्यात आले होते.

संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रा. शुक्ल यांनी आपल्या मार्गदर्शनपर सत्रात बोलताना म्हणाले की, ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून शिकवणे हा शिक्षकांसाठी अतिशय आनंददायी अनुभव ठरेल. ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ ही विचार मंथनाचे व्यासपीठ व्हावे त्यातून, विद्यार्थ्यांबरोबरच समाजाला देखील फायदा होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात आजपर्यंत प्रश्न वेगळे होते. परंतू कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थी-पालक-शिक्षक यांची प्रत्यक्ष भेट होत नसल्याने निर्माण झालेला संवादाचा अभाव हा एक वेगळाच प्रश्न उभा राहीला.

काळाबरोबर समस्यादेखील बदलल्या, पण त्या सोडविणारे आपणच आहोत. मागील दोन-अडीच वर्षात ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू आहे. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांच्या मनातील शंका समजत नाहीत, प्रत्यक्ष वर्ग भरत नसल्याने शिकवण्यात जिवंतपणा वाटत नाही, शंकानिरसन करण्याची संधी मिळत नाही, ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा विद्यार्थ्यांकडे अभाव आहे, त्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. केवळ परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही. या सर्व समस्यांवर विचारमंथन झाले आहे का? या सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे.

क्रमिक शिक्षणाच्या पलीकडे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक भान, नीतिमूल्य रुजवणे ही शिक्षणाची उपांगे आहेत, त्यातूनच व्यक्ती आणि समाज घडतो. भाषा विषयातून विद्यार्थ्यांचा भावात्मक विकास होतो व त्यांचे मूल्यवर्धन होते. इतिहासाच्या शिक्षणातून आपला वारसा, जगातील अन्य देशांपेक्षा आपले वेगळेपण याची जाणीव होते, त्यातूनच त्याची जडणघडण आणि सांस्कृतिक विकास होतो. त्यामुळे आपण शिकवत असलेल्या विषयातून आपण कोणती मूल्ये रूजवू शकतो याचा विचार प्रत्येक शिक्षकाने केला पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. शिक्षक हा चिंतनशील, व्यासंगी आणि जाणीवा जागृत असणारा असला पाहिजे. शिक्षकाने संवेदनशीलपणे स्वतःमधील उणीवा दूर केल्या तर तो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आनंद देऊ शकतो. देशासमोरच्या समस्या सोडविण्याची पूर्वतयारी शिक्षकाने करून घेतली पाहिजे. देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणारे आपण आहोत, आपली ही जबाबदारी शिक्षकांनी झटकू नये. आपली भूमिका न सोडता विद्यार्थ्यांसाठी पथदर्शक ठरूया!

प्रा. शुक्ल यांनी यावेळी विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम घेता येतील?, पालकांनी विद्यार्थ्यांना सांगायचे उपक्रम कोणते, शिक्षकांनी स्वतःसाठी कोणते उपक्रम करावेत? याबाबात सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून ही सुविधा संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांपुरती मर्यादित न राहता त्याद्वारे मएसो शिक्षण प्रबोधिनी आणि मएसो व्यक्तिमत्व विकास केंद्राचा विस्तार व्हावा आणि शिक्षण संस्कृतीत त्यांचे स्थान निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी पुणे महानगर पालिकेच्या शाळांमधील चाळीस शिक्षकांना पहिल्या टप्प्यात मएसो शिक्षण प्रबोधिनीतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मएसो शिक्षण प्रबोधिनीचे सहाय्यक संचालक केदार तापीकर यांनी तर सूत्रसंचालन वर्षा न्यायाधीश यांनी केले.

 

 

 

 

 

 

Scroll to Top
Skip to content