“बांगलादेशाच्या मुक्ती संग्रामात भारतीय नौदलाची ताकद जगाला दिसून आली. १९७१ हे वर्ष भारतीय नौदलाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. वर्षाच्या सुरवातीला युद्धाची फारशी तयारी नसलेल्या भारतीय नौदलाने लक्षणीय कामगिरी बजावली. आपल्याकडे असलेल्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेच्या मर्यादा लक्षात घेऊन नौदलाने अपूर्व कामगिरी बजावली. आयएनएस विक्रांतवरून झेपावलेल्या सी-हॉक, एलिझे आणि चेतक या विमानांनी पूर्व पाकिस्तानातील कॉक्स बझार, चितगांव, खुलना, मोंगला, पुस्सुर अशा ठिकाणी तब्बल २८६ हवाईहल्ले करून बंदरे, हवाईतळ आणि लष्करी ठाणी उद्ध्वस्त केली. पश्चिम पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अरबी समुद्रात भारतीय नौदलाने अशीच लक्षणीय कामगिरी केली. त्यामुळे संपूर्ण दगाला भारतीय नौदलाची ताकद दिसून आली,” असे प्रतिपादन व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा (निवृत्त) यांनी मंगळवार, दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘१९७१ च्या युद्धातील नौदलाची कामगिरी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त), सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बांगला देश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलांनी गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त) यांनी या वेळी देशाच्या पश्चिम आघाडीवर नौदलाने केलेल्या पराक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, “देशाच्या पूर्वेला असलेल्या बांगला देशाचा मुक्ती संग्राम देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लढला गेला. देशाच्या पश्चिमेला असलेल्या विशाल अरबी समुद्रात उत्तरेला पाकिस्तानचा समुद्र किनारा आणि कराची हे एकमेव बंदर आहे. गुजरातमधील ओखापासून ते जवळ आहे. १९७१ सालच्या मार्च महिन्यात भारतीय नौदलाला आठ मिसाईल बोटी मिळाल्या होत्या. या बोटींवर विमानविरोधी यंत्रणा नसल्याने त्यांचा वापर युद्धासाठी केला जात नाही मात्र आपल्या नौदलाने अन्य युद्धनौकांबरोबर त्यांचा वापर केला. या आठपैकी दोन बोटींनी कराची आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर हल्ला केला. त्यावेळी चार बोटी अरबी समुद्रात नौदलाच्या ताफ्यातील लढाऊ जहाजांसमवेत तैनात होत्या तर उरलेल्या दोन बोटी मुंबईत सज्ज होत्या. भारतीय नौदलाने या कारवाईत पाकिस्तानच्या पीएनएस पीएनएस आणि पीएनएस मुहाफिज या दोन युद्धनौकांना जलसमाधी दिली. अरबी समुद्रात भारतीय नौदलाने बजावलेल्या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या कारवायांना पायबंद बसला आणि त्याचा फार मोठा परिणाम पूर्व आघाडीवर झाला.”
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर इंजिनिअर सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा बर्वे यांनी केले.