“१९७१ साली झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात एएन-१२ या विमानांनी केलेली कामगिरी विलक्षण होती. पाकिस्तानने केलेल्या आगळीकीनंतर १९७१ च्या ३ डिसेंबरच्या रात्री युद्धाला तोंड फुटले. त्यावेळी हवाई हल्ल्यांसाठी सर्वप्रथम एएन-१२ विमानांचाच उपयोग करण्यात आला. मुळात ही विमाने माल वाहतुकीसाठीची होती, परंतू भारतीय हवाई दलाची बॉम्ब हल्ल्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता,” अशी माहिती ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त) यांनी आज व्याख्यानात दिली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘द एअर ऑपरेशन्स’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. १९७१ च्या बांग्लादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्यांनी केलेली हवाई वाहतूक आणि हेलिकॉप्टरच्या कारवाईची माहिती ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त) आणि एअर कमोडोर आर.एम.श्रीधरन (निवृत्त) यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त),  आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त). छायाचित्रात (डावीकडून) डॉ. भरत व्हनकटे, आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त), एअर कमोडोर आर.एम.श्रीधरन (निवृत्त), मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त).

भारतीय लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवत लष्करी वर्चस्व सिद्ध केले. हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यंदा या दैदिप्यमान विजयाचे ५० वे वर्ष. त्यानिमित्ताने भारताने आजपर्यंत विविध युद्धांमध्ये मिळविलेल्या विजयांची माहिती समाजाला करून देण्यासाठी वर्षभर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील हे सहावे व्याख्यान होते.

“१९६१ सालापासून एएन-१२ विमानांच्या दोन स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलात कार्यरत होत्या. या विमानांनी ३२ वर्षे सेवा बजावली. लेह-लडाखमध्ये शस्त्रास्त्रे आणि मालवाहतूक करण्यासाठीच त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. १९६३ ते १९८६ या काळात हे विमान दर शनिवारी जोरहाट, गुवाहाटी, बडडोगरा असा प्रवास करून दिल्लीला परत येत असे. आयएल-७६ विमानांकडे ही कामगिरी सोपवण्यात येईपर्यंत एएन-१२ विमान तिथे कार्यरत होते. १९७० साली या विमानाचा वापर बॉम्ब हल्ल्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर जवळील के. के. रेंजमध्ये त्यासाठीच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर घेण्यात आल्या. तेव्हा १९७१ च्या युद्धाची कोणतीच शक्यता नव्हती. परंतू भारतीय हवाई दलाची बॉम्ब हल्ल्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. १९७१ च्या मध्यावर हवाई दलाने बॉम्बहल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वैमानिक व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. त्यासाठीची नियमावलीदेखील तयार करण्यात आली होती. याच वेळी एक कोटी शरणार्थी बांग्लादेशातून भारतात आले होते. या परिस्थितीवर एकच उपाय दिसत होता तो म्हणजे बांग्लादेशची निर्मिती! त्यासाठी थेट कारवाई आणि पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बहल्ले करणे आवश्यक होते. १९७१ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वांना युद्धाची जाणीव झाली होती. दुसरीकडे हवाई दलाने देखील प्रशिक्षणाचा वेग वाढवला होता. एएन-१२ विमाने शत्रूच्या विमानविरोधी तोफांच्या सहजपणे टप्प्यात येणारी आणि शत्रूच्या विमानांच्या नजरेत येऊ शकतील अशी होती. या विमानांमध्ये स्वसंरक्षणाची कोणतीही यंत्रणा नव्हती. दहा हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्याच्या या विमानांच्या क्षमतेचा वापर तेवढ्याच वजनाचा अतिसंवेदनशील दारुगोळा नेण्यासाठी करता येईल अशी सुधारणा त्यात करण्यात आली. याच विमानांद्वारे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील रडार शोधण्यात आली होती. १९७१ च्या ३ डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानने केलेल्या आगळीकीनंतर युद्धाला तोंड फुटले. त्यावेळी हवाई हल्ल्यांसाठी सर्वप्रथम एएन-१२ विमानांचाच उपयोग करण्यात आला. पहिल्यांदा चंगा-मंगा त्यानंतर सुलेमानकी ब्रीज आणि नंतर फोर्ट अब्बास या ठिकाणांवर या विमानांनी हवाई हल्ले केले. पीरपंजाल पर्वतरांगांमध्येदेखील या विमानांचा वापर करण्यात आला होता”, असेही ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त) यांनी या वेळी सांगितले.

एअर कमोडोर आर.एम.श्रीधरन (निवृत्त) यांनी यावेळी रात्रीच्या वेळी हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेल्या कैलाशर ते सिल्हेट या जगातील पहिल्या विशेष कारवाईची माहिती दिली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना चांदोरकर यांनी केले.

 

 

 

 

“प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्याची प्रतिष्ठा जपणे महत्वाचे आहे. महाविद्यालयातील प्रत्येक घटकाच्या वर्तनात विद्यार्थ्याबद्दल आस्था व स्नेह असणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षणाबरोबरच त्याचे आकलन, त्याचा दृष्टिकोन, त्याची पार्श्वभूमी असे सांस्कृतिक भांडवल असते. त्यामुळे विद्यार्थ्याकडे काळजीपूर्वक बघणे आवश्यक असते. त्याला महाविद्यालयाकडून मिळणारे मार्गदर्शन आणि पाठबळ अतिशय महत्वाचे असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची महाविद्यालये ही जबाबदारी निश्चितच पार पाडतील याचा विश्वास आहे,” असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. एन.एस. उमराणी यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बांधण्यात आलेल्या नवीन अमृत महोत्सवी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते.

या वेळी व्यासपीठावर ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व मा. प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. जी.आर. धनवडे उपस्थित होते.

डॉ. उमराणी पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील या नव्या इमारतीचे उद्घाटन करताना शिक्षक आणि प्रकुलगुरू अशा दोन्ही भूमिकेतून मला खूप आनंद होत आहे. ‘ऑक्स्फर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ख्याती असलेल्या पुणे शहरात ‘मएसो’ ने शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून टोलेजंग काम केले आहे. मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्राचार्य या नात्याने त्या कामात योगदान देण्याची संधी मला मिळाली याचे मला भान आहे. या प्रांगणात काम करताना जसा आनंद मिळाला तसाच आनंद आज मला होतो आहे. या नव्या प्रतिभासंपन्न वास्तूत कर्तबगार नागरीक, शिक्षक, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते घडतील. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि जागतिक दर्जाचे नागरिक घडवणे हे नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे. सर्वोत्तम महाविद्यालयाचे पारितोषिक, नॅकचे मूल्यांकन आणि स्वायत्ततेच्या दिशेने होणारा प्रवास यामुळे महाविद्यालयाची ही जबाबदारी आणखी वाढते. विद्यार्थ्याच्या  प्रवेशापासून त्याला पदवी परीक्षेची गुणपत्रिका देण्यापर्यंत महाविद्यालयाने त्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणात देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे विद्यार्थी घडवणारा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर हे देखील या धोरणाचे एक वैशिष्ट्य आहे. शिक्षणावरील खर्चाबाबत जोपर्यंत जागरूकता निर्माण होणार नाही तोपर्यंत शिक्षणाच्या दर्जाबाबतही सजगता निर्माण होणार नाही. संगीत, कला, योग, आयुर्वेद अशा आपल्या पारंपारिक विषयांचा समावेश करण्यात आल्याने आपण आता मुक्त शिक्षणाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना आपले ध्येय साधण्यासाठी आपल्या सोयीनुसार शिक्षण घेता येणार आहे.”

‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “कोरोनानंतरच्या काळातील शिक्षणाचा विचार करताना सिंहावलोकन करण्याची आवश्यकता आहे. घरांमध्ये अडकून पडल्यामुळे मुलांची मानसिक कुचंबणा झाली आहे. महाविद्यालये सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हाताळायचे याचा विचार आत्ताच केला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नागरिक घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यात प्रत्येक जण महत्वाचा आहे. नव्या कल्पना, सृजनशील दृष्टिकोन समोर ठेवून हे काम केले पाहिजे.”

मएसो आबासाहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात नव्या इमारतीच्या बांधकामाची गरज विशद करून महाविद्यालयाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन तर डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या

इमारतीची सफर घडवणारी लघुचित्रफित पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे आज (शुक्रवार, दि. २० ऑगस्ट २०२१) उद्घाटन करण्यात आले. गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मा. सी. जे. पाठक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडच्या मनुष्यबळ आणि प्रशासन विभागाचे अध्यक्ष डॉ. विहार राखुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळ सदस्य व शाला समितीच्या अध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक हे उपस्थित होते.

शाळेच्या सुमारे ८० वर्ष जुन्या असलेल्या इमारतीचे नूतनीकरण गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने करण्यात आले आहे. शाळेतील शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे वीजेच्या खर्चात बचत होणार आहे. मुळातच भव्य आणि प्रशस्त असलेल्या शाळेच्या या इमारतीचे नूतनीकरण केल्यामुळे तेथील हवेशीर, स्वच्छ, सुंदर वातावरणाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदात आणि उत्साहात भर पडणार आहे. शासनाने शाळेच्या इमारतीला ‘हेरिटेज वास्तू’चा दर्जा दिला आहे. नूतनीकरण झालेल्या शाळेच्या या इमारतीमुळे पुणे शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर पडली आहे.

या प्रसंगी बोलताना मा. सी. जे. पाठक म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी सर्वांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. संस्था आणि संस्थेच्या शाळांमधील शिक्षक अतिशय कष्टपूर्वक त्याच दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळेच कला, क्रीडा, वैचारिक प्रगल्भता अशा सर्व अंगांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास झालेला दिसून येतो. त्यामुळेच शाळेला नांवलौकिक मिळाला आहे. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने प्रवास करताना त्यांची गाठ पडते आणि सहजपणे आपुलकीची भावना निर्माण होते, ते आवर्जून शाळेची चौकशी करतात. अशा या गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या शाळेला आणि संस्थेला कै.आबासाहेब गरवारे आणि कै. विमलाबाई गरवारे यांनी आर्थिक सहकार्य केले होते. आबासाहेब गरवारे यांचे बालपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांनी सुरवातीला लहान-मोठी कामे केली पण त्यांचे व्हिजन मोठे होते. त्यामुळे तंत्रज्ञान, कच्चामाल आणि पैशाचा अभाव असताना देखील त्यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योग आपल्या देशात आणि पर्यायाने महाराष्ट्रात आणले. सामान्य माणसांतले असामान्यत्व पुढे आणण्यासाठी त्यांनी विविध संस्थांना मदत केली. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव मा. शशिकांत गरवारे हे देखील त्या सर्व संस्थांना मदत करत आहेत. आबासाहेब आणि विमलाबाई गरवारे यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करत गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गरवारे परिवार विविध विधायक कामे करत आहे. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या नूतनीकरणासाठी आर्थिक सहयोग करण्यात आला असून संस्थेने केलेला शाळेचा कायापालट पाहून त्यांनी संस्थेला धन्यवाद दिले आहेत.

‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शशिकांत गरवारे यांना शाळेबद्दल जी आपुलकी आहे ती, त्यांनी दिलेल्या आर्थिक सहयोगा इतकीच मोलाची आहे. हेरिटेज वास्तूसाठी असलेले सर्व निकष पाळून शाळेच्या इमारतीचे अतिशय सुंदर नूतनीकरण झाले आहे. शाळेबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेतूनच अनेक माजी विद्यार्थी शाळेला विविध प्रकारे सहकार्य करत असतात. त्यातूनच शाळेचे ‘सुबोधवाणी’ हे वेब रेडिओ केंद्र सुरु झाले आहे, शाळेत इलेक्ट्रॉनिक क्लासरुम तयार झाल्या आहेत. शाळेबरोबर असलेली नाळ जीवनात कायम राहाते. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे, ते आनंददायी व्हावे यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सक्षम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांनी अभ्यासक्रम, वर्गातील शिक्षण याच्यापलीकडे जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. आज देशात उद्योजक तयार होण्याची गरज आहे, त्यासाठी रोलमॉडेल म्हणून सर्वांनी आबासाहेब गरवारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या आणि शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणामागील भूमिका विशद केली.

शाळेतील शिक्षिका सौ. पद्मा पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र. ल.गावडे यांचे रविवार, दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी दु:खद निधन झाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, जनता सहकारी बॅंक, पुणे आणि नगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:०० वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या श्रद्धांजली सभेत ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्यासाठी लिंक …
https://zoom.us/j/93612023115?pwd=U0R1VHdFMGZ5eFBSVHdXSkpuTnBEUT09

Meeting ID: 936 1202 3115
Passcode: 425225

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इ.१२ वी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी घवघवीत यश मिळवले आहे. संस्थेच्या सर्व शाळांचा एकत्रित निकाल ९९.९२ टक्के लागला आहे.
संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

पुणे, २ ऑगस्ट : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांचे काल रात्री उशीरा पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. गावडे यांनी अनेक शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक संस्थांच्या कार्यात पदाधिकारी, मार्गदर्शक, हितचिंतक व देणगीदार म्हणून अमूल्य योगदान दिले आहे.

प्रा. डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे यांचा जन्म २० जून १९२४ रोजी नेवासे येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण अहमदनगरमधील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. १९५० मध्ये ते बी.टी. झाले. पुणे विद्यापीठातून मराठी व संस्कृत हे विषय घेऊन ते १९५२ मध्ये एम.ए. आणि १९५६ मध्ये एम.एड झाले.

‘सावरकर : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर १९६८ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. संपादन केली होती. त्यासाठी त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला पुणे विद्यापीठातर्फे उत्कृष्ट प्रबंधाबद्दल ‘न. चि. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ मिळाले होते. तसेच, १९७१ – ७२ मध्ये या ग्रंथास महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला होता. ‘मराठी-वाङ्मय’ हा त्यांचा अध्यापनाचा विषय होता.  स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद तसेच ज्ञानेश्वरी हे त्यांच्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे विषय होते आणि त्यावर ते व्याख्याने देखील देत असत.

प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांनी १९४६ ते १९८२ या प्रदीर्घ कालखंडात अध्यापक, मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. १९६३ ते १९८२ या काळात त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६९ ते ८२ ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे कला व शास्त्र महाविद्यालयात आणि १९६८ ते ७२ या काळात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी अध्यापन केले.

डॉ. प्र. ल. गावडे यांचे शैक्षणिक प्रशासन सेवेतील कार्यही प्रदीर्घ आणि मौल्यवान आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये सहाय्यक सचिव, सचिव आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. संस्थेच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी मएसो मुलांचे विद्यालयातील (पूर्वीची भावे स्कूल) सभागृहाचे ‘गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृह’ असे नामकरण करण्यात आले. तसेच मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहा’ चे उद्घाटन डॉ.गावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सन २०१७ मध्ये ‘मएसो’च्या १५८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला डॉ. गावडे सर वयाच्या ९४ व्या वर्षी अंथरुणावरून न उठण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला बाजूला ठेऊन आपल्या सुहृदांना भेटण्यासाठी व्हीलचेअरवरून आले होते. त्यांच्याशी संवाद साधताना अनेकजण आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांच्यासमोर अक्षरशः नतमस्तक झाले होते.

शालेय शिक्षण, विद्यार्थ्यांसाठीच्या ‘साहित्यविहार’, ‘कथाकौस्तुभ’ या पुस्तकांचे संपादन तर ‘शालेय मराठी व्याकरण’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इ. ९ वी, ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषेच्या  पाठ्यपुस्तकांचे सहसंपादन देखील त्यांनी केले होते.

डॉ. प्र. ल. गावडे यांना विविध सन्माननीय पुरस्कार मिळालेले आहेत. ‘आदर्श शिक्षक – राज्य पुरस्कार’ (१९७६), ‘उत्कृष्ट साहित्य समीक्षेबद्दल ‘पु. भा. भावे स्मृति समितीचा’ पुरस्कार (१९९७), ‘सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल अ‍ॅड. डी. आर. नगरकर पुरस्कार’, ‘शैक्षणिक कार्याबद्दल राजा मंत्री पुरस्कार’, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे कृतज्ञता पुरस्कार’ (१९९८) आणि ‘विचार प्राथमिक शिक्षणाचा’ या पुस्तकास म. सा. परिषदेचे ‘ना. गो. चाफेकर पारितोषिक’ (१९९८) अशा विविध पुरस्कारांनी डॉ. प्र. ल. गावडे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या १३ व्या पदवीप्रदान समारंभात शनिवार, दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी डॉ. गावडे यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते  डी.लिट्. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यापीठाच्या ६९ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करून डॉ. गावडे यांचा सन्मान केला.

डॉ. प्र. ल. गावडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्या वेळी ‘अमृतसंचय’ हा ‘डॉ. प्र. ल. गावडे अमृतमहोत्सव गौरव ग्रंथ’ प्रकाशित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवर्य प्रा. डॉ. प्र.ल.गावडे यांना विनम्र श्रद्धांजली!

 

Scroll to Top
Skip to content