“भारतीय सैन्य 1947-48 मध्ये पाकिस्तानविरूद्ध झालेल्या युद्धात अतिशय धाडसाने लढले त्यामुळेच काश्मीर आज भारतात आहे. लडाख आणि लेहसारख्या भागात फौजांनी केलेल्या पराक्रमाची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही” असे मत ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘पहिले भारत-पाकिस्तान युद्ध 1947-48’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी अशोक गोखले हे होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘पहिले भारत-पाकिस्तान युद्ध 1947-48’ या विषयावर व्याख्यान देताना ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

1971 साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आठवण कायम ठेवण्यासाठी 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी त्याला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतीय सैन्याच्या पराक्रमाची माहिती समाजाला व्हावी या हेतूने वर्षभर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यातील पहिले व्याख्यान आज आयोजित करण्यात आले होते.

“पाकिस्तानी फौजांनी भारतावर आक्रमण करण्यासाठी त्यांच्या प्रदेशातील पश्तून आदिवासी टोळ्यांचा वापर केला. भारतीय सीमेवर पुरेशी गस्त नसल्याने या टोळ्या थेट श्रीनगरपर्यंत घुसू शकल्या. त्यानंतर काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांनी काश्मीरच्या भारतातील विलिनीकरण करारावर स्वाक्षरी केली. याच काळात लडाखमध्ये लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या फौजांनी कोणत्याही मदतीशिवाय 6 महिने लढा दिला. परंतु त्यांच्या या पराक्रमाची फारशी दखल घेतली गेली नाही. त्याचप्रमाणे लेहमध्ये एअर कमोडोर मेहरसिंग आणि फ्लाईट लेफ्टनंट एस.डी. सिंग यांच्या सोबतीने जनरल थिमय्या स्वतः वायू दलाच्या पहिल्या विमानातून उतरले, त्यामुळे सैन्याचे मनोबल वाढले. जेव्हा पाकिस्तानातील आदिवासी टोळ्यांच्या हे लक्षात आले की आपल्याला आता भारतीय सैन्याला तोंड द्यावे लागणार आहे, तेव्हा त्यांनी काढता पाय घेतला आणि त्यानंतर पाकिस्तानी सैन्य समोर आले. विशेष म्हणजे या युद्धात स्थानिक नागरिकांचा आपल्या सैन्याला खूप पाठिंबा होता आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर माहिती सैनिकांना मिळत होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी अशोक गोखले. छायाचित्रात (डावीकडून) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त).

आपल्या अध्यक्षीय भाषणात अशोक गोखले म्हणाले, “बांगला देशचे युद्ध हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. भारतीय सैन्याचा पराक्रम, धाडस, त्याग यांची इतिहासात ठळकपणे नोंद झाली पाहिजे. 1947-48 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात घटना कशा घडत गेल्या, त्याचे सूत्रधार कोण, त्यांचे कर्तृत्व आणि कृती यांचा मागोवा घेतला जाईल. पण प्रत्यक्षात असे दिसून येत होते की, 1945 साली दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांना भारतातून बाहेर पडण्याची घाई झाली होती कारण, त्यांची आर्थिक स्थिती ढासळली होती तसेच त्यांना भारतीय सैनिकांच्या बंडाची भीति होती आणि स्वातंत्र्य लढा मजबूत होत चालला होता. ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे स्थान डळमळीत झाले नसते तर स्वातंत्र्य मिळताना भारतातील परिस्थिती चांगली राहिली असती आणि झालेली मनुष्यहानी टळली असती. भारतासंबंधातील धोरणे जोपर्यंत पाकिस्तानचे सैन्य ठरवत राहिल तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंधात सुधारणा होणार नाहीत.”

व्याख्यानानंतर मान्यवरांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातील एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सौ. अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी गुरुवार, दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी त्यांचे स्वागत केले.

या वेळी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, “आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या संस्थेत आल्याचा मला खूप आनंद वाटतो आहे. शिक्षण आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार करणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत.”

संस्थेचे सचिव मा. डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. विजय भालेराव, मा. सौ. आनंदीताई पाटील, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. डॉ. अतुल कुलकर्णी, मा. श्री. विनय चाटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री श्री. शंकर गायकर, श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानाचे प्रांत प्रमुख श्री. संजय मुद्राळे, प्रांत सहप्रमुख श्री. मिलिंद देशपांडे, पुणे महानगर प्रमुख श्री. महेश पोहनेरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. मा. सुधीर गाडे यांनी यावेळी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

 

Scroll to Top
Skip to content