blank

MES Kalavardhini, Pune

Renuka Swaroop, Memorial Girls High School 1453/54 Sadashiv Peth, Pune Maharashtra - 411030
Established in

राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. देशाच्या शैक्षणिक इतिहासात आपल्या विद्यार्थी वर्गाच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमापासून आयुर्वेद महाविद्यालयापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७५ शाखांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांची शारीरिक संपत्ती जोपासण्यासाठी ‘मएसोक्रीडावर्धिनी’ कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळांचे मार्गदर्शन ‘मएसो क्रीडावर्धिनी’ करते. खासगी प्राथमिक मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘मएसो क्रीडावर्धिनी’ च्या माध्यमातून सन २०१० पासून ‘मएसो करंडक’ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. स्वतंत्र जागा असलेली आधुनिक रायफल आणि पिस्तुल शुटींगरेंज हे ‘मएसो’चे क्रीडा विषयक वेगळेपण आहे. ‘मएसो’चे क्रीडा क्षेत्रातील हे लक्षणीय योगदान आहे. व्यक्तिमत्त्वाच्या विकासात असलेले कलांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘मएसो कलावर्धिनी’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. ‘मएसो कलावर्धिनी’त शालेय विद्यार्थ्यांबरोबरच सर्व वयोगटातील व्यक्तींना शास्त्रीय गायन-वादन, अभिनय आदी विविध कलांचे प्रशिक्षण घेता येईल.

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स,पुणे येथे २२ ऑक्टोबर २०१९ पासून होणार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची कार्यशाळा….

“विद्यार्थी दशेत मिळवलेले ज्ञान व अनुभव यांच्या आधारेच आयुष्यात कर्तृत्व सिद्ध करता येते आणि अशाच व्यक्तींना जगात महत्त्व मिळते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेतलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींची संख्या फार मोठी आहे, त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, या गुणवंतांमध्ये आपली गणना व्हावी अशी जिद्द मनाशी बाळगा. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांची ख्याती आज जगभरात आहे. त्यामुळेच १६० व्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या ‘मएसो’चे ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे घोषवाक्य आजही प्रत्यक्ष अनुभवास येते. देशाच्या प्रगतीत ‘मएसो’ निश्चितच योगदान देईल. संस्थेने काळाची गरज ओळखून आता व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर द्यावा,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे प्रभारी तंत्रशिक्षण उपसंचालक मा. प्रा. चंद्रकांत कुंजीर यांनी आज येथे केले.

पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच पीएच्. डी. व एम्.फिल. प्राप्त केलेले गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा गौरव समारंभ आज (दि. ११ ऑक्टोबर) म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. कुंजीर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. यावेळी ८५ गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, “प्राध्यापक हे विद्यार्थ्यांचे आदर्श असतात, त्यामुळे प्राध्यापकच पुढील शिक्षण घेऊन स्वतःची शैक्षणिक उंची वाढवताना दिसतात तेव्हा विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते आणि त्यातून मिळालेल्या यशाचा गौरव होतानाचा क्षण कायमच लक्षात राहातो. भविष्यात जेव्हा मागे वळून बघाल तेव्हा ‘मएसो’ने आपल्याला काय दिले याचे महत्व लक्षात येईल आणि आपण या संस्थेचा एक घटक असल्याचा अभिमान वाटेल. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याबरोबरच संस्थेचे नावदेखील मोठे करण्याचा प्रयत्न करा.”

गौरवार्थींच्या वतीने मएसो नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी सपना देवडे, मएसो आयएमसीसीचा माजी विद्यार्थी आकाश मालपुरे, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पीएच.डी. केलेले डॉ. मकरंद पिंपुटकर आणि याच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अंकुर पटवर्धन यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. डॉ. अंकुर पटवर्धन यांनी महाविद्यालयाचे ७५ वे वर्ष आणि संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष (१६०) याचे औचित्य साधून संस्थेला ५० हजार रुपयांची देणगी दिली.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

Scroll to Top
Skip to content