दि. १९ नोव्हेंबर २०१८ ला माझी 'मएसो' - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी एकशे साठ वर्षांच्या उंबरठ्यावर उभी राहत आहे. केवळ पुण्यातीलच नव्हे तर बहुधा महाराष्ट्रातील ही एक दीर्घायु, वडिलधारी आणि सर्वसामान्यांमध्ये आपली वाटणारी आणि महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यात ७१ हून अधिक शाखा विस्तार असलेली शिक्षणसंस्था; एवढेच मएसोचे वैशिष्ट्य नाही. ज्ञानक्षेत्र धनदांडग्या, राजकारणी लोकांच्या हातात असणाऱ्या या काळात मएसोचे वैशिष्ट्य आहे तिच्या लोकसापेक्ष, राजकारणरहित भूमिकेमध्ये. 'लोकसंस्था : रक्षणीय सर्वथा' हे ज्ञानदेवांचे वचन मएसोच्या आरंभकाळापासून तिच्या धुरिणांनी शिरोधार्य मानले. सामाजिक विकासासाठी, राष्ट्रीय ऐक्य संवर्धनासाठी, चारित्र्य निर्मितीसाठी राष्ट्रीय शिक्षणाची गरज आहे; हे जाणवून देणाऱ्या 'साहेबा'च्या काळापासून जागतिकीकरणाच्या रेट्यापर्यंत मएसोची अक्षुण्ण, वर्धिष्णू वाटचाल चालू आहे; तिचे रहस्य मएसोच्या 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' या बोधवाक्यात लपलेले आहे.
सर्वांगीण विकास - मग तो समाज-राष्ट्र वा वैयक्तिक असो - तो शिक्षणाशिवाय अपूर्ण असतो, हे ओळखणाऱ्या मएसोमुळेच स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात तळागाळातल्या, जनसामान्यांना, कनिष्ठ मध्यमवर्गीय मराठीजनांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळाली. म्हणूनच वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे तत्कालीन सासवड-बारामतीचे लोक असोत की औद्योगिकीकरणाच्या रेट्यात आपले वेगळेपण हरवलेले माथाडी कामगार, आग्री कोळी असोत, आरोग्य सुविधा-सक्षमीकरणापासून दूर असलेले कोकणचे बांधव असोत - जिथे जिथे शैक्षणिक सुविधा कमी तिथे तिथे मएसो पोहोचली. माफक दरात शैक्षणिक सुविधा देताना प्रसंगी पदरमोडही करण्याचे अनेक प्रसंग मएसोने स्वीकारले, स्वीकारत आहे. परिणामत: देश-विदेशात स्थिरावलेले, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या औद्योगिक, राजकीय, संशोधनात्मक क्षेत्रात, चित्रपट-नाट्य-संगीतादी कलाक्षेत्रात आपली नाममुद्रा उमटविणारे, खेळाची मैदाने गाजविणारे अनेक वलयांकित विद्यार्थी मएसोने घडविले. साऱ्यांचाच नव्हे तर मोजक्या विद्यार्थ्यांचाही नामनिर्देश लेखाच्या मर्यादेत करणे इथे अशक्य आहे. परंतु माझ्या लेखी या विद्यार्थ्यांइतकेच महत्त्वाचे आहेत ते आपल्या सामान्य परिस्थितीला यशस्वीतेकडे नेणारे, प्रतिकूलतेचा सामना करीत सन्मानपूर्वक जगणारे आणि आम्ही ‘एमईएस’चे सांगणारे विद्यार्थी म्हणूनच आजोबा ते नातू-पणतू अस ४-५ पिढ्यांचा विद्यार्थ्यांचा प्रवास मएसोच्या दप्तरी आहे. ‘इथे पिढी नव्हे पिढ्या घडविल्या जातात’ अशी जाहिरात मएसोने भविष्यात केली तर ती अनाठायी ठरणार नाही.
मला वाटते, मी मएसोकडे आकर्षित झाले, ते तिच्या या गुणामुळेच. माझा आणि मएसोचा दृश्य ऋणानुबंध ३५-३६ वर्षांचा. इथले शिक्षक/प्राध्यापक, आजीव मंडळ व नियामक मंडळ सदस्य ते आजीव सदस्य मंडळाची मएसोतील पहिली महिला अध्यक्ष पर्यंतचे अनेक पदरी नाते मी अनुभवले. परंतु माझे मएसो-माझ्या काळातील ‘एमईएस’चे आकर्षण अगदी कसबा पेठेसारख्या पुण्यातल्या मध्यवर्ती भागात राहात असल्यापासूनचे जुने. नदीकाठी वसलेल्या, १९६० च्या पुरात तरलेल्या, कॉलेजच्या इमारतीपलीकडे स्मशानभूमी असणाऱ्या, कमी वर्दळीचे, जेमतेम बस जाणारे आणि डेक्कनजवळ असूनही आपले वेगळेपण राखणारे, प्राचार्य जमदग्नी सरांचे गरवारे कॉलेज मला कायम कुतूहलाचे वाटायचे. जोडीलाच त्याचे संस्थापक म्हणजे मला आदरस्थानी असणारे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके- ज्यांचे चित्र मी स्वत: रेखाटलेले, ज्यांचे कार्य बी.एड्.च्या अंतिम पाठासाठी (लेसनसाठी) घेतलेले.
प्र.के.अत्रेंची सासवडची शाळा, मा.मुख्यमंत्री (माजी) शरद्चंद्र पवार साहेबांची बारामतीची शाळा, श्रध्देय समर्थ संप्रदायी श्रीधर स्वामी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पेरूगेट शाळा, एअरमार्शल (माजी) भूषणजी गोखल्यांची बाल शिक्षण शाळा असो की रोहिणीताई (हट्टंगडी), श्रीराम लागू, विक्रम गोखले, लता-कीर्ती शिलेदार असो, त्यांच्या शाळा/कॉलेजही मएसोचे नव्हे पुणेकरांच्या भाषेत एम.ई.एस.चेच आणि बहुधा त्यामुळेच स.प.महाविद्यालयात मराठी अध्यापनाची संधी मिळत असतानाही मी आबासाहेब गरवारे कॉलेज माझे कार्यक्षेत्र म्हणून निवडले. इथे आले आणि इथलीच झाले.
मएसोमध्ये भावे-इंदापूरकरांची ध्येयनिष्ठा, वासुदेव बळवंतांची तडफ, राष्ट्रनिष्ठेची बांधिलकी, समरस समाजनिर्मितीचे स्वप्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास इतका अस्सल होता की ध्येयनिष्ठेतून एका शिकवणीवर्गाचा सुरू झालेला हा प्रवास बालवर्गापासून कला-वाणिज्य व्यवस्थापनाच्या उच्च शिक्षणापर्यंत आणि ‘परशुराम’सारख्या वैद्यकीय सेवा-सुविधा आणि सेवा-संधी देणाऱ्या पदवीनिर्मितीपर्यंत जसा विकसित झाला तसाच या प्रवासात आद्यक्रांतिवीरांशी नाते सांगणारी, त्यांचा वारसा जपत, स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारी महाराष्ट्रातील पहिली मुलींची सैनिकी शाळा (राणी लक्ष्मीबाई), स्वदेशी अध्यापनाचा वारसा सक्षम करीत त्याला नवीन युगाची जोड देणारी ‘शिक्षण प्रबोधिनी’, ताण-तणावांना समर्थपणे सामोरे जायला शिकवित सुदृढ मानसिक आरोग्य घडविणारे ‘व्यक्तिमत्त्व विकास केंद्र’, महिला सक्षमीकरणाचा आर्थिक विकास विस्तृत करणारे ‘रेणुका स्वरूप करियर कोर्सेस’ केंद्र, आरोग्यपूर्ण पिढी तयार करणारी ‘क्रीडावर्धिनी’, भावी शास्त्रज्ञ घडविणारी ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजना असे एक ना अनेक मैलाचे दगड तयार करीत मएसोचा ज्ञानवृक्ष बहरत आहे. त्यासाठी आवश्यक ते बाह्यबदल (आधुनिक शैक्षणिक साधनांनी युक्त नवीन इमारती, इंग्रजी माध्यमाचा स्वीकार) होत आहेत. साहजिकच मएसो समाजाच्या उच्च वर्गांपर्यंत पोहोचत आहे. शतकोत्तर वाटचाल पूर्ण केलेल्या, त्या वाटेवर असणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळा आणि भारतीय संस्कृतीची ध्येयभावाने जपणूक करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांच्या जोडीलाच नवनवीन शैक्षणिक प्रयोगांनी मएसो जागतिक पातळीवर पोहोचत आहे. हे सारे करताना गेल्या १५८ वर्षात गुणवत्तेचा ध्यास, चारित्र्यसंवर्धनाची आस आणि प्रयोगशील शिक्षकांची मांदियाळी राखण्यात मएसोने कधीच तडजोड केलेली नाही. तशी तडजोड होऊ नये म्हणून दक्ष असणारे, आपापल्या क्षेत्रात वाकबगार असूनही मएसोला वेळ देणारे नियामक मंडळ सदस्य, त्यांना एकमुखाने साथ देत संस्थाविकासासाठी नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाला सामोरे जाणारे आजीव सदस्य मंडळ आणि या साऱ्यांच्या परिपूर्ततेसाठी तत्पर शिक्षकेतर बंधु-भगिनी ही मएसोची चैतन्य केंद्रे आहेत. ‘माँ' सारख्या माध्यमातून जगभरातले मएसोचे विद्यार्थी आणि प्रेरणा देणारे पालक यामुळे बहुअंगी, बहुआयामी असणाऱ्या या ज्ञानवृक्षाच्या शाखा ‘गगनावरी’ जात आहेत. परंतु त्याची मुळे इथल्या मातीशी, इथल्या संस्कारांशी, इथल्या जनसामान्यांशी, त्यांच्यातल्या असामान्यत्वाचा शोध घेण्यासाठी सदैव उत्सुक आहेत. त्यामुळे खात्री नव्हे तर ठाम विश्वास आहे, भावी काळातील शिक्षणक्षेत्राला माझा हा मएसोचा ज्ञानवृक्ष त्याच सामर्थ्यसंपन्नतेने सावली देत, त्याला कवेत घेणार आणि गरूडभरारीसाठी सदैव सिध्द राहणार.
डॉ. श्यामा घोणसे