आपल्या संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी शुक्रवार, दि. २२ जून २०१८ रोजी सकाळी भारताचे संरक्षण राज्यमंत्री मा. डॉक्टर सुभाष भामरे यांची पुण्यात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. राजीवजींनी मंत्रिमहोदयांना आपल्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. माधव भट व अॕड. धनंजय खुर्जेकर या प्रसंगी उपस्थित होते.

आपल्या शाळेच्या (पूर्वीची मुलींची भावे स्कूल) १९६९ बॅचच्या माजी विद्यार्थिनी नीलिमा पटवर्धन (सौ. नीलिमा चिंतामण दीक्षित) यांनी शाळा आणि गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज म्हणजे शनिवार, दि. १६ जून २०१८ रोजी संस्थेला भरघोस देणगी दिली. या देणगीचा विनियोग आपल्या प्रशालेत पिण्याच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी करावा अशी सूचना त्यांनी केली आहे. एस.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे हे ५० वर्ष असल्याचे औचित्य साधून सौ. दीक्षित यांनी ही देणगी दिली आहे. 

त्यांनी दिलेल्या या देणगीबद्दल संस्था त्यांची आभारी आहे.

राष्ट्रीय शिक्षणाची गंगोत्री असलेली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नव्या उमेदीने हुतात्म्यांच्या बलिदानाने पुनीत झालेल्या सोलापूर सारख्या बहुसांस्कृतिक महानगरात पदार्पण करीत आहे. संस्थेची पूर्व प्राथमिक शाळा एक 

जूलैपासून सोलापुरात सुरू होत आहे. त्याची घोषणा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी, ता. १५ जून, पत्रकार परिषदेत केली. कै. काका महाजनी ट्रस्टचे अध्यक्ष दामोदरजी दरगड, ‘मएसो’चे सचिव डॅा. संतोष देशपांडे, संस्थेचे आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. विनय चाटी, प्रशासकीय अधिकारी जगदीश मालखरे, ट्रस्टचे ट्रस्टी संतोष कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

आपल्या बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेला इ. १० वी च्या परीक्षेत मिळालेल्या यशाची दखल आज पुण्यातील वृत्तपत्रांनी घेतली आहे.

मएसो बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत सर्व शिक्षकांनी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला. यावेळी पर्यावरणाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकांनी फुलझाडे लावली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश रुजविण्यासाठी शिक्षकांनीसुद्धा प्रत्यक्षात वृक्षारोपण केले पाहिजे अशी अपेक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात शैक्षणिक सहलींना गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा पेरण्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या झाडांच्या बिया देण्यात आल्या. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे (Wildlife Photographs) प्रदर्शन भरवण्यात आले होते. जगभर फिरून जंगलातील फोटो काढताना आलेले अनुभव शाळेचे माजी विद्यार्थी प्रणव नाईक, कौस्तुभ कामत, मिहीर लिडबिडे यांनी यावेळी सांगितले. मानवी हस्तक्षेपामुळे झालेली पर्यावरणाची हानी आपणच भरून काढली पाहिजे व प्राण्यांच्या प्रजाती टिकवल्या पाहिजेत असे आवाहन या माजी विद्यार्थ्यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हितचिंतक, बारामती येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ गजानन देशपांडे यांचे रविवार, दि. ३ जून २०१८ रोजी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. संस्थेच्या बारामती येथील कै. गजानन भीवराव देशपांडे (पूर्वीचे एमईएस हायस्कूल) या शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे ते दीर्घकाळ सदस्य आणि अनेक वर्ष अध्यक्ष होते. शाला समितीचे देखील अनेक वर्ष सदस्य होते. एमईएस हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या हरिभाऊ देशपांडे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि शाळा यांच्याबद्दल असलेल्या आत्मीयतेपोटी मुक्तहस्ते देणगी दिली होती. त्यांनीच दिलेल्या भूखंडावर आज बारामतीमधील ‘एमईएस इंग्लिश मिडीयम स्कूल’ ही शाळा उभी आहे. 

कै. हरिभाऊ देशपांडे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली.

दै. महाराष्ट्र टाईम्सने पुण्यात स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित केलेले मटा एज्युफेस्ट २०१८’ हे शैक्षणिक प्रदर्शन आज,दि. २ जून रोजी सकाळी सुरु झाले. दि. २ आणि ३ जून असे दोन दिवस चालणाऱ्या या शैक्षणिक प्रदर्शनात आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ५ आणि ६ क्रमांकाचे स्टॉल आहेत. या प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.०० अशी आहे. आपल्या संस्थेच्या शाखांपैकी आयएमसीसी, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स – बी.बी.ए., आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे बायोटेक्नॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटी हे विभाग तसेच दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. आपल्या संस्थेच्या स्टॉल्सना सर्वांनी अवश्य भेट द्यावी.

 

Scroll to Top
Skip to content