महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे च्या नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाकरिता श्रीनिधी संकलनासाठी आयोजित करण्यात आलेल्या “मिले सुर मेरा तुम्हारा” या सुरेल कार्यक्रमात शाळेला सढळ हस्ते मदत करणा-या उद्योजक व प्रायोजकांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्त्रबुद्धे, संस्थेचे चिटणीस मा. डॉ. संतोष देशपांडे, विद्यालयाच्या शाला समितीचे अध्यक्ष ॲड. जयंत म्हाळगी, विद्यालयाचे महामात्र डॉ. आनंद लेले, मुख्याध्यापिका सौ. मानसी वैशंपायन, प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मा. निशा देवरे, पर्यवेक्षिका सौ. सोमण (मराठी माध्यम), सौ. सुषमा सप्रे (इंग्रजी माध्यमिक), सौ. तन्वी परुळेकर (इंग्रजी प्राथमिक) आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पनवेलमधील प्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या मा. कल्पना कोठारी, इतिहास अभ्यासक मा. विश्वनाथ गोखले, योगाचार्य मा.पु. ल. भारद्वाज व जेष्ठ समाजसेविका मा. नीलाताई पटवर्धन यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेलचे आमदार मा. प्रशांत ठाकूर यांनाही यावेळी गौरविण्यात आले. हा कार्यक्रम पनवेलच्या फडके नाट्यगृहात पार पडला. यात सुवर्णा माटेगावकर, वैभव वशिष्ठ, सोनाली कर्णिक, संदीप शाह, निलेश निरगुडकर यांनी हिंदी गाणी सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. निवेदन संदीप कोकिळ यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयातील विद्यार्थिनींनी “मिले सूर मेरा तुम्हारा” या गीतावर नृत्य सादरीकरणही केले. अतिशय रंगलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

 

“जीवनात दिशा निश्चित असेल तर कृतिशील व्यक्ती आपले ध्येय निश्चित गाठू शकतात पण त्यासाठी चांगले आणि सम्यक विचार असण्याची गरज असते. चांगले विचार, चांगले कार्य आणि चांगली माणसे आहेत म्हणूनच हे जग टिकून आहे. विचार कधीही नष्ट होत नाहीत. आपल्या ऋषिमुनींनी दिलेले विचार घेऊनच आज आपण पुढे जात आहोत. चांगला विचार मुळाशी नसेल तर चांगली कामे उभी राहात नाहीत. कार्य हे विचारांचे प्रकट रुप आहे. जेव्हा कार्य चांगले असते तेव्हाच समाजाची प्रगती होते. चांगले कार्य, चांगले विचार आणि चांगली माणसेच आपल्या संस्कृतिवरील आक्रमण रोखू शकतात. त्यासाठी समर्पणभाव खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आणि कार्य परिपूर्ण आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांच्याच स्मृती आपण जपत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन ज्यांनी समाजासाठी समर्पित केले होते अशा स्व. दामुअण्णा दाते यांचे नांव रेणावीकर प्रशालेतील या सभागृहाला देणे हे चांगले काम आहे. स्व. दामुअण्णा कर्मठ, त्यागी होते. त्यांचे नांव असलेल्या या सभागृहात लहान मुलांना चांगले विचार मिळतील आणि त्यातून त्यांच्या जीवनाला आकार मिळेल त्याबद्दल संस्थाचालकांचे मी अभिनंदन करतो,” असे प्रतिपादन पू. आदर्शऋषिजी महाराज यांनी येथे केले.
नगरमधील सावेडी येथे असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणावीकर माध्यमिक विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या वाढीव बांधकामाचे उद्घाटन आणि नूतन सभागृहाचे ‘कै. दामोदर माधव तथा दामुअण्णा दाते सभागृह’ असे नामकरण पू. आदर्शऋषिजी महाराज यांच्या हस्ते रामनवमी, मंगळवार, दि. ४ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विमुक्त भटके जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी तथा दादा इदाते, नगरमधील उद्योजक दौलतराव शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक सुरेश तथा नाना जाधव, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’चे सचिव डॉ. संतोष देशपांडे, शाला समितीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, महामात्र प्रा. सुधीर भोसले, रेणावीकर शाळेतील पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख मंजुषा कुलकर्णी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाऊ बडधे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजना गायकवाड तसेच मधुकर रेणावीकर आदी मान्यवर उपस्थित होते. नगर शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विमुक्त भटके जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी तथा दादा इदाते आपल्या भाषणात म्हणाले की, “कै. दामुअण्णा दाते हे राष्ट्रवादाची परिभाषा करणारे समाजशिक्षक होते. आपल्या समाज जीवनाचे नियोजन करणारे ते आधुनिक राष्ट्रऋषि होते. आपल्या वाटचालीतील विविध टप्पे आणि पुढील मार्ग त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होता. अशा एका संन्यासाचे वर्णन आज एका ऋषिंनी आपल्यासमोर केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक या नात्याने कै. दामुअण्णांचा नगर जिल्ह्याशी दीर्घकाळ संबंध होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात अनेक विचारधारांचा संघर्ष चालू होता. साम्यवाद आणि समाजवादाचा पगडा असलेले नेतृत्व देशात होते. अशा परिस्थितीत हिंदुत्वाचा विचार मांडणे अतिशय कठीण होते. त्यातून सर्व विचारधारांना कार्यकर्ते पुरवणारा, विविध विचारधारांचा प्रयोग करणारा जिल्हा अशी नगर जिल्ह्याची ओळख होती. अशा या जिल्ह्यात संघविचारांचे सिंचन दामुअण्णांनी केले. समाजाबद्दल चिंतन, चिंता आणि कळकळ म्हणजे कै. दामुअण्णा! ते राष्ट्रीय चिंतन आणि माणूस याबाबतीत अतिशय संवेदनशील होते, या दोन्ही गोष्टी ते जिवापाड जपायचे. त्यामुळेच कार्यकर्ते उभे राहीले. त्यांच्यासारख्या समर्पित जीवनाचे, व्यक्तीचे नांव शाळेतील सभागृहाला देण्याने त्यांचा नाही तर शाळेचा आणि संस्थेचाच सन्मान झाला आहे. ज्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी हे शिक्षक परायण असतात, शिक्षक शिक्षण परायण असते, शिक्षण ज्ञान परायण आणि ज्ञान हे कर्मपरायण असते, तिथे सर्व नव्या कल्पना राबवता येतील हे राज्याचे माजी शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर यांचे सांगणे आपण लक्षात ठेवले पाहिजे.”
नगरमधील उद्योजक आणि शेती संशोधक दौलतराव शिंदे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. ते आपल्या भाषणात म्हणाले की, “ विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या शहरात स्थापन झालेल्या आणि १५० वर्षांचा इतिहास असलेल्या शिक्षण संस्थेचा परिसस्पर्श नगरच्या शिक्षण क्षेत्राला झाला आहे. हा परिसस्पर्श नगरच्या शैक्षणिक क्षेत्राला उंचीवर घेऊन जाईल याची खात्री वाटते. पुण्याशी संबंध असलेली रेणावीकर माध्यमिक विद्यालय ही नगरमधील एकमेव शाळा आहे. त्याचा फायदा शाळेला होणार आहे, त्यासाठी शाळेचे अभिनंदन आणि संस्थेची भरभराट होऊन नगरच्या शैक्षणिक उत्कर्षात हातभार लागावा यासाठी शुभेच्छा! ”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश तथा नाना जाधव प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी कै. दामुअण्णा दाते यांच्या कार्यशैलीची माहिती दिली. “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींच्या हत्येचा ठपका ठेवून १९४८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. संघाला संपविण्याचा हेतू त्यामागे होता. त्यामुळे संघाचे काम करणे धारिष्ट्याचे होते. अशा परिस्थितीत ते नगरमध्ये प्रचारक म्हणून आले. संघाचे पूर्णवेळ काम करणे हे वेगळ्या पद्धतीने आव्हानात्मक होते कारण संघबंदीच्या पूर्वी संबंधात असलेली अनेक घरे संघासाठी बंद झाली होती. अशा घरांची दारे संघासाठी पुन्हा उघडण्याचे काम कै. दामुअण्णांनी केले. प्रत्येकाला ते आपले, आपल्या घरातीलच वाटायचे. त्यामुळे वेळप्रसंगी कार्यकर्त्यांच्या एखाद्या घरगुती प्रश्नांबाबतचा अंतिम निर्णय दामुअण्णांचाच असायचा. व्यक्तीतील गुण हेरून त्याला त्यादृष्टीने प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा अनेक विषयांचा अभ्यास होता. ते अभ्यासू वक्ते होते. सामाजिक समरसतेच्या विचारांचे प्रकटीकरण कसे करायचे यामागील चिंतन दामुअण्णांचेच होते. कै. दामुअण्णांच्या नगर जिल्ह्यातील योगदानाचे स्मरण ठेवून संस्थेने शाळेतील सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दामुअण्णा कोण होते? काय होते? हे सतत सर्वांसमोर येत राहील.”
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात म्हणाले की, “आज आपण स्वतंत्र असलो तरी १९४७ सालापर्यंत कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा लागला असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. १५० वर्षांपूर्वी दूरदृष्टीने सुरू केलेल्या आपल्या शिक्षण संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आज थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभले आहेत. यापुढे आता आपल्या संस्थेला कौशल्य विकासासाठी काम केले पाहिजे.”
“शाळेतील सभागृहाला कै. दामुअण्णा दाते यांच्यासारख्या कुशल संघटकाचे नांव आपण दिले आहे याचा सार्थ अभिमान वाटत आहे तर याप्रसंगी पू. आदर्शऋषिजी महाराज यांचे आशीर्वचन लाभले हे आपले भाग्य आहे,” अशा शद्बात शाला समितीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी केले. शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Scroll to Top
Skip to content