लष्करी वेशात शिस्तबद्ध संचलन करत मान्यवरांना दिलेली मानवंदना, रिदम योगाद्वारे झालेले एकाग्रतेचे दर्शन, कराटे आणि अश्वारोहणातून दिसलेले धाडस, धनुर्विद्या आणि रायफल शूटिंगमुळे दिसून आलेली अचूकता, रोप मल्लखांबामुळे साधलेली लवचिकता, लेझमीच्या खेळातून साधलेली सांघिक भावना, मार्शल आर्टसच्या प्रशिक्षणातून झालेली स्वसंरक्षणाची तयारी बघून अचंबित झालेले प्रेक्षक असे दृश्य आज बघायला मिळाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिना’च्या कार्यक्रमात. विद्या आणि बळाच्या आधारे आपण जग जिंकू शकतो, जगात वंदनीय ठरू शकतो हा संदेशच मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या साहसी प्रात्यक्षिकांमधून या वेळी दिला आणि स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवून दिले.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या विविध शाखांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करतात. यावर्षी मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच मने जिंकली.
मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक हे होते. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर या प्रमुख अतिथी म्हणून तर समर्थ भारत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुहास क्षीरसागर या वेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे सर्व निर्बंधांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत व बंदिस्त जागेत मैदानी प्रात्यक्षिकांशिवाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांसह अतिशय उत्साहात पार पडला.
प्रमुख वक्ते श्री. सुहास क्षीरसागर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या कार्याची महती विशद केली. ते म्हणाले की, महापुरूषांचे आयुष्य दीपस्तंभासारखे असते. एखाद्या विचाराचा ध्यास घेणे म्हणजे काय हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून शिकायला मिळते. भारतीय जीवन पद्धती ही वेदांतावर आधारित आहे हे त्यांनी जगाला सांगितले. त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे, आपली संपत्ती इतरांना उपयोगी पडली तरच जीवनात सुख आणि शांतता लाभू शकते, स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विचार करण्याची शिकवण भारतीय संस्कृती देते, हे स्वामीजींनी जगाला पटवून दिले. आपल्या देशातील जनता स्वत्व विसरली आहे, भारताची जगभर कुचेष्टा सुरू आहे, त्यामुळे आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी स्वामीजींनी देशभर प्रवास केला. मन, बुद्धी आणि मनगट बळकट असेल तरच जग जिंकता येते हे त्यांनी समजावून सांगितले. आजच्या पिढीने देखील आपल्या क्षमता ओळखण्याची गरज आहे कारण तीच यशाची गुरुकिल्ली आहे.
श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर विद्यार्थ्यांना मर्गदर्शन करताना म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कुटूंब, गुरूजन आणि शाळा-महाविद्यालय यांचा पाठिंबा असणे अनिवार्य असते. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मला टेबल टेनिस खेळाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता आले. त्याचबरोबर खेळामुळे मला काही महत्वाचे गुण शिकायला मिळाले ते म्हणजे ध्येय निश्चिती, सांघिक भावना, कठोर परिश्रम आणि अपयश पचवण्याची क्षमता. त्यामुळे सातत्याने कठोर परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी युवा चेतना दिनाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. तर श्री. विजय भालेराव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांचा परिचय प्रा. शैलेश आपटे यांनी करून दिला.
मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका श्रीमती शिरीषा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.