सासवड येथे होणार म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा

प्रकाशझोतात पार पडणार स्पर्धा

सासवड, दि. १८ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी म. ए. सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा सासवड येथील  म. ए. सो. वाघीरे हायस्कूलच्या मैदानावर शुक्रवार, दि. २० जानेवारी ते रविवार, दि. २२ जानेवारी २०२३ या काळात होणार आहे. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो, सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रकाशझोतात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे.

ही माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांनी आज (बुधवार, दि. १८ जानेवारी २०२३ रोजी) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे उपस्थित होते.

या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कसगावडे यांच्या हस्ते होणार असून के. जे. इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष श्री. कल्याण जाधव हे या याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू  सायली केरीपले यांच्या हस्ते होणार असून  बांधकाम व्यवसायिक शिरीष जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या स्पर्धेचे यजमानपद सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर या शाळेकडे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली आहे.

शासन स्तरावर १४ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र, प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कोणतीच स्पर्धा आयोजित केली जात नाही हे लक्षात घेऊन संस्थेने सन २०११ पासून म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली.