महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत गौरव कार्यक्रमात बोलताना राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर. याप्रसंगी उपस्थित (डावीकडून) डॉ. अतुल कुलकर्णी, मा. बाबासाहेब शिंदे, मा. प्रदीप नाईक व मा. सौ. आनंदी पाटील

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पीएच्. डी. प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत संस्थेचे पदाधिकारी (छायाचित्रात डावीकडून बसलेले) डॉ. राजीव हजिरनीस, सी.ए. राहुल मिरासदार, डॉ. अतुल कुलकर्णी, मा. बाबासाहेब शिंदे, मा. प्रदीप नाईक, प्रमुख पाहुणे मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सौ. आनंदी पाटील, श्री. सुधीर भोसले, डॉ. आनंद लेले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या आपल्या देशासाठी आगामी २५ वर्षे अत्यंत महत्वाची आहेत. विकसनशील देशाचे रुपांतर विकसित देशामध्ये करायची धुरा देशातील तरूण पिढीवर आहे. देशाच्या अमृतकाळात तरूण वर्गाला उद्यमी करण्यासाठी शिक्षण व्यवस्था त्यांच्यामध्ये शिक्षणाबरोबरच कौशल्यक्षमता कशी रुजवते यावर विकसित देश निर्माण होणे अवलंबून आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा बदल घडविणारे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण भविष्यातील भारतासाठी यशस्वी करणे आवश्यक आहे, ” असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व  पीएच्.डी. प्राप्त केलेल्या ४२  गुणवंत विद्यार्थी आणि    शिक्षकांचा गौरव समारंभ आज (सोमवार, दि. ८  जानेवारी २०२४) आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी डॉ. देवळाणकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत  होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा मा. सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी होते.

डॉ. देवळाणकर पुढे म्हणाले की, दरवर्षी १२ ते १३ लाख विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामुळे सुमारे १२ अब्ज डॉलर इतका पैसा देशाबाहेर जातो. ही बाब आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी देशाबाहेर जात असल्याने आपल्या देशातील शिक्षणात दर्जात्मक सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता होती. ती पूर्ण करण्यासाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२४ – २५ वर्षात देशात लागू करण्यात येणार असून ते सक्तीचे करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना विषय निवडीत लवचिकता आणि स्वातंत्र्य मिळणार आहे. मूळ विषयाचे शिक्षण ६० टक्के आणि आवडीच्या विषयांचे शिक्षण ४० टक्के असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे वर्गातील मिळणारे शिक्षण आणि बाजारातील गरज यातील तफावत दूर होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवनात फार मोठे परिवर्तन होणार आहे. शिक्षक व प्राध्यापकांना देखील या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र, त्यांनी भविष्यातील भारतासाठी हा त्रास सहन करावा असे आवाहन डॉ. देवळाणकर यांनी या वेळी केले.

मा. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रास्ताविकात नव्या शैक्षणिक धोरणानुसार, मातृभाषेतून शिक्षण आणि कौशल्य विकसन याला संस्था प्राधान्य देत असून शाळा सक्षम करण्यात येत असल्याचे सांगितले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या वाढत्या प्रभावात देखील संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळा उत्तम प्रकारे टिकून आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संस्था अनुदानित शाळांमध्ये देखील संस्था पगारावर चांगले शिक्षक नियुक्त करत आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी घडत असल्याचे दिसून येत आहे असे ते म्हणाले.

मा. प्रदीप नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, देशात होणाऱ्या विकासामुळे देशातील लोकसंख्येची गुणवत्ता वाढत आहे आणि महासत्तेच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीसाठी  ते आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देवकी बुचे यांनी केले.

डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Scroll to Top
Skip to content