मएसो बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत सर्व शिक्षकांनी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला. यावेळी पर्यावरणाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकांनी फुलझाडे लावली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश रुजविण्यासाठी शिक्षकांनीसुद्धा प्रत्यक्षात वृक्षारोपण केले पाहिजे अशी अपेक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात शैक्षणिक सहलींना गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा पेरण्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या झाडांच्या बिया देण्यात आल्या. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे (Wildlife Photographs) प्रदर्शन भरवण्यात आले होते. जगभर फिरून जंगलातील फोटो काढताना आलेले अनुभव शाळेचे माजी विद्यार्थी प्रणव नाईक, कौस्तुभ कामत, मिहीर लिडबिडे यांनी यावेळी सांगितले. मानवी हस्तक्षेपामुळे झालेली पर्यावरणाची हानी आपणच भरून काढली पाहिजे व प्राण्यांच्या प्रजाती टिकवल्या पाहिजेत असे आवाहन या माजी विद्यार्थ्यांनी केले.