महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘क्रीडावर्धिनी’ विद्यार्थ्यांची खेळाची आवड वृद्धिंगत व्हावी, त्यांच्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी या हेतूने संस्थेच्या सर्व शाखांमध्ये एप्रिल महिन्यात क्रीडा शिबीराचे आयोजन करते. त्यानुसार म.ए.सो.च्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना, पुणे ०४ या मराठी माध्यम शाळेतही क्रीडा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शाळेचे महामात्र मा. डॉ. अंकूर पटवर्धन यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १३/०४/२०१८ या दिवशी शाळेच्या क्रीडा शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम खेळासाठी शुभेच्छा दिल्या. या क्रीडा शिबीरातूनच भावी खेळाडून घडण्यास मदत होईल अशी आशा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी फाळके यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच योग्य आहार कसा असावा याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. दत्तात्रय लखे यांनी केले तर सौ. प्रमिला कांबळे यांनी आभार मानले.
विशेष म्हणजे खो-खो या खेळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते. त्यांच्या या खेळाद्वारेच क्रीडा शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.