पुणे – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्रातील रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह’ या ऑडिओ-व्हिज्युअल हॉलचे उद्धाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते बुधवार दि. १४ सप्टेंबर २०१६ रोजी करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे मा. संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या रेकॉर्डिंग स्टुडिओमधील अत्याधुनिक उपकरणांची माहिती डॉ. गावडे आणि उपस्थित मान्यवरांनी उत्सुकतेने जाणून घेतली.
मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या इमारतीत तळ मजल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह नव्याने तयार करण्यात आले आहे. सभागृहात लावण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून या सभागृहाचे उद्धाटन प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते आणि रा. स्व. संघाचे पुणे महानगराचे मा. संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गायलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला …’ या ध्वनिचित्रमुद्रित गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रम सुरू झाला. मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष मा. संजय इनामदार आणि उपाध्यक्ष मा. विवेक शिंदे, चिटणीस मा. डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य मा. अभयराव क्षीरसागर, साहाय्यक चिटणीस व गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी, संस्थेच्या नियामक मंडळाचे साहाय्यक चिटणीस डॉ. भरत व्हनकटे, नियामक मंडळ आणि आजीव सदस्य आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. गावडे म्हणाले, “पूर्वी ज्या गरवारे महाविद्यालयात प्राध्यापक होतो त्याच महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाच्या सभागृहाचे उद्घाटन करण्याचे भाग्य संस्थेमुळे मला मिळाले याबद्दल मी आभारी आहे. याच महाविद्यालयात सावरकरांवर व्याख्यान देण्याची संधी आपल्याला मिळेल असेही कधी वाटले नव्हते. सावरकर या विषयावर ३३ वर्ष व्याख्यानमाला चालली ही पुण्यात गौरव वाटावी अशी गोष्ट होती. या सभागृहात तशीच किंवा अन्य कोणती व्याख्यानमाला सुरू करता आली तर चांगली गोष्ट होईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटण्याची संधी १९६४ साली मला मिळाली. सावरकरांच्या साहित्यावरील प्रबंधाचे माझे काम सुरू होते. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी केसरीवाड्यात गेलो होतो. सावरकरांची शारिरीक स्थिती अतिशय कृश झालेली होती आणि ते पलंगाला खिळले होते. अशा स्थितीतही रँग्लर र.पु. परांजपे येताच सावरकरांनी वाकून त्यांच्या पायावर डोके ठेवले. असा शिष्य आणि असा गुरू पाहाण्याचे भाग्य तेव्हा मला मिळाले. त्याच भेटीत तात्यारावांनी महाराष्ट्रीय मंडळाचे शिवरामपंत दामले यांना पारंपारिक आणि जुन्या शस्त्रांपेक्षा नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी अणुबाँबचे भित्तीचित्र कोरण्याची सूचना केली होती. तात्या विज्ञाननिष्ठ होते. त्यांच्या साहित्यातला अभ्यासण्यासारखा विषय कोणता असेल तर तो त्यांची विज्ञाननिष्ठा! ‘यज्ञात भवति पर्यन्या:’ ऐवजी ‘विज्ञानात भवति पर्जन्या:’ हा मंत्र त्यांनी दिला. अभ्यासक्रमात विज्ञानकथा असल्या पाहिजेत असा त्यांचा विचार होता. त्याचप्रमाणे कोणती व्रते केली पाहिजेत याबाबतही त्यांची मते होती. मृत्यूनंतर आपला अंतिम संस्कार विद्युतदाहिनीत करायला सांगून त्यांनी आपली विज्ञाननिष्ठा आचरणात आणली होती. तत्कालिन परिस्थितीमुळे स्वा. सावरकरांच्या साहित्यावर पी. एचडी. करण्यासारखा प्रयत्न तडीला जाईल का याची शंका होती. मात्र, आपण नेटाने काम करीत गेलो की यश मिळते हे अनुभवातून मी सांगू शकतो.”
मा. वंजारवाडकर यांनी आपल्या भाषणात, स्वा. सावरकरांच्या चित्राचे अनावरण, त्यांचे नाव असलेल्या सभागृहाचे उद्धाटन आणि त्यांनीच लिहिलेल्या अजरामर गीताच्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींनी केलेल्या गायनाचा साक्षीदार होण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. ते म्हणाले, “मएसोचा अध्यक्ष असताना पाहिलेली स्वप्ने साकार होत असल्याचे बघायला मिळणे हा आनंद आणि अभिमानाचा भाग आहे. संस्थेचे व्हीजन डॉक्युमेंट आहे आणि ते केवळ कागदावर नाही तर इथल्या नेतृत्त्वाच्या मनात आहे म्हणूनच ‘नॅक’ च्या अपेक्षेप्रमाणे सर्व सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘नॅक’ चा अपेक्षेपेक्षा अधिक चांगला दर्जा मिळेल. महाविद्यालयातल्या कोणत्याही सुविधेसाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही अशा प्रकारची येथील कार्यालयाची रचना करण्यात आली आहे कारण ही संस्था विद्यार्थीकेंद्रीत आहे. ज्या स्वा. सावरकरांचे नाव या सभागृहाला देण्यात आले आहे, त्या स्वा. सावरकरांचा आणि संस्थेचा संबंध आला होता. संस्था चालवत असलेल्या ‘महाराष्ट्र कॉलेज’चे प्राचार्य आणि ‘काळ’कर्ते शि.म. परांजपे यांनी वंगभंगाच्या आंदोलनात पुण्यात परदेशी कापडांच्या होळीच्या प्रसंगी भाषण केले होते. त्याचा परिणाम म्हणजे ब्रिटीश सरकारने ‘महाराष्ट्र कॉलेज’ बंद पाडले. पण कॉलेजच्या नावातील महाराष्ट्र हे नांव टिकवून ठेवण्यासाठी संस्थेचे ‘पूना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन असोसिएशन’ हे तत्कालिन नांव बदलून ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ असे करण्यात आले, त्यामागे स्वा. सावरकरांची प्रेरणा होती.”
डॉ. उमराणी यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात, ‘नॅक’च्या निमित्ताने महाविद्यालयात सुरू असलेल्या आधुनिकीकरणाच्या अनेक कामांचा आढावा घेताना शासन व्यवस्था, विद्यापीठ, संस्थेचे मान्यवर माजी विद्यार्थी, सभासद, हितचिंतकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “संस्थेनं ‘नॅक’ ला अपेक्षित असलेल्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत याचा खूप आनंद वाटतो कारण त्याचा सकारात्मक परिणाम प्रेरणेवर होतो. हे सभागृह हा देखील त्याचाच भाग आहे. पूर्वी दुसऱ्या मजल्यावर असलेले हे सभागृह आता तळ मजल्यावर आणण्यात आले असून त्याचे स्वरूप अत्याधुनिक आणि अत्यंत दर्जेदार असे आहे. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले असल्याने विद्यार्थ्यांच्यात देशभक्ती आणि विज्ञानभाव विकसित व्हावा अशी अपेक्षा आहे.”
प्रा. डॉ. आनंद लेले यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय करून दिला. या वेळी मा. राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रा. डॉ. प्र. ल. गावडे आणि मा. रवींद्र वंजारवाडकर यांना ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मा. वंजारवाडकर, डॉ. गावडे आणि मा. राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या सभागृहाच्या बांधकामात सहयोग दिलेल्या व्यावसायिकांचा तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सहकारी कर्मचाऱ्यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
मा. अभयराव क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले.
मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गायलेल्या ध्वनिचित्रमुद्रित ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वेदांत कुलकर्णी यांनी केले.