‘आय.एम.सी.सी.’ मध्ये मिळाली करिअरला दिशा
करिअर म्हणजे केवळ आर्टस्, कॉमर्स किंवा बी.ई, एम.बी.बी.एस. नव्हे तर व्यक्तिच्या जीवनात प्रगतीच्या संधी मिळवून देणारा व्यवसाय असतो. यशस्वी करिअर घडवण्यासाठी अनेक घटक महत्वाचे असतात. यात शिक्षण, आपला दृष्टीकोन, आपली अंगभूत कौशल्ये, सवयी, क्षमता हे सारे घटक महत्वाचे असतात. केवळ दहावी, बारावीच्या मार्कवर करिअरची दिशा न ठरवता आणि कोणत्या क्षेत्रात किंवा विषयात जास्त संधी आहेत याचा विचार न करता, आपली आवड व क्षमता यानुसार करिअर निवडले तर त्यात यशस्वी होता येते. हाच विचार घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि करिअर कोर्सेस म्हणजेच ‘आय.एम.सी.सी.’ या संस्थेने बुधवार, दिनांक २३ मे २०१८ रोजी मोफत ‘करिअर गाईडन्स सेमिनार’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. रवींद्र वैद्य यांनी संस्थेच्या वतीने उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. त्यानंतर ‘आय.एम.सी.सी.’ चे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
प्राध्यापिका सौ. जयश्री पाटील यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे (वाय. सी. एम. ओ. यू.) तसेच ‘आय.एम.सी.सी.’तर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘डिजिटल मार्केटिंग’ सारख्या विविध स्वायत्त कोर्सेसची माहिती दिली.
देशपी फाऊंडेशनचे वेदार्थ देशपांडे यांनी ‘डिजिटल मार्केटिंग : काळाची गरज’ या विषयी आणि सन्मित शहा यांनी ‘प्रॅक्टिकल बी. कॉम.’ या कोर्सबाबत माहिती दिली.
या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील अनेक प्रश्नांविषयी तज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी मोरे यांनी केले.