‘मएसो’चे शिक्षक जम्मू-काश्मीरमध्ये शिकवणार

शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये काम करणाऱ्या सात शिक्षिका आणि समुपदेशक मंगळवार, दि. १५ मे २०१८ रोजी जम्मू-काश्मीरला जात आहेत. संस्थेच्या मुख्य कार्यालयात आज झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संस्थेचे चिटणीस डॉ. संतोष देशपांडे, या उपक्रमाचे संयोजक व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य विनय चाटी, या उपक्रमाचे अन्य एक संयोजक डॉ. रवींद्र वैद्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आणि विवेक व्यासपीठचे कार्यवाह महेश पोहनेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील ददवारा तालुक्यात पिंतर या गावी बाल गोविंद स्कूल आहे. सध्या या शाळेत ६५० विद्यार्थी शिक्षण घेतात. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि बाल गोविंद स्कूल यांच्यादरम्यान विद्याभारतीच्या माध्यमातून सन २०१३-१४ पासून शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वर्षी ‘मएसो’च्या श्रीमती रेवा देशपांडे, श्रीमती ममता येरनूले, श्रीमती सुलभा घैसास, डॉ. गिरीजा लिखिते, श्रीमती मनिषा दोशी, श्रीमती वर्षा न्यायाधीश आणि श्रीमती वैशाली कामत अशा सात शिक्षिका व समुपदेशक या शाळेत जात आहेत. तेथील विद्यार्थ्यांना त्या इंग्रजी, विज्ञान, गणित या विषयांचे नावीन्यपूर्ण पद्धतीने आणि कार्यानुभवावर आधारित शिक्षण देणार आहेत. त्यासाठी या शिक्षकांनी बाल गोविंद स्कूलमधील अभ्यासक्रमाचा अभ्यास केला असून सोप्या पद्धतीने कसे शिकविता येईल? याचा विचार केला आहे. अभ्यासक्रमाशी निगडित कार्यानुभवांबरोबरच (Activity) विविध नावीन्यपूर्ण कार्यानुभव तयार केले आहेत. त्यामध्ये विज्ञान आणि गणित विषयांप्रमाणेच पाठ्यक्रम निरिक्षणाच्या आधारे काही कार्यानुभव तयार केले आहेत. त्यामध्ये वक्तृत्व, एखाद्या विषयावर मुद्देसूद चर्चा कशी करावी आदी कौशल्ये शिकवण्यात येणार आहेत. त्याशिवाय विद्यार्थी-पालक-शिक्षक यांना समुपदेशन करण्यात येणार आहे. या शाळेत ‘व्हर्चूअल क्लासरूम’ तयार करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे. 

विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत येत्या जून महिन्यात बाल गोविंद स्कूलमधील दहा विद्यार्थिनी ‘मएसो’च्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *