पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थिनींनी सादर केलेली नेत्रदीपक प्रात्यक्षिके पहाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. या प्रात्यक्षिकांचे नेतृत्व दिव्या निखाडे, पलक मिठारी, वैष्णवी जोशी या विद्यार्थिनींनी केले. शनिवार पेठेतील मेहुणपुरा मित्रमंडळाच्या केळकर रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीत शाळेने सहभाग घेतला होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच रविवार, दि. २३सप्टेंबर २०१८ रोजी दु. ३.३० वाजता ही मिरवणूक निघाली होती. त्यामध्ये शाळेच्या १२ विद्यार्थिनींनी रोप मल्लखांब आणि योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांसाठी एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर आवश्यक रचना उभी करण्यात आली होती. त्याआधारे विद्यार्थिनींनी रोप मल्लखांबाची क्रॉस, पतंगी, गौराई, शवासन, साधी आढी, निद्रासन, वादी, पश्चिमोतासन इत्यादी प्रात्यक्षिके सादर केली. योगासन प्रकारात चक्रासन, वृक्षासन, गरुडासन, नटराजासन आणि एकपादशिरासन अशी अनेक आसने दाद मिळवून गेली. गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रचंड गर्दी आणि ढोल-ताशांचा गजर , डीजेंचा दणदणाट अशा वातावरणात विद्यार्थिनींची एकाग्रता, आत्मविश्वास आणि लवचिकता सर्वांनाच अचंबित करणारी होती. विद्यार्थिनींची प्रात्यक्षिके पाहून मुख्य चौकामध्ये उपस्थित असलेल्या पुण्याच्या पोलीस उपायुक्त श्रीमती भानुप्रिया सिंग (आयपीएस अधिकारी) यांनी व्यासपीठावर बोलावून फूल देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले आणि आस्थेने विचारपूस करून शाळेला आवर्जून भेट देण्याचे आश्वासन दिले.
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत प्रात्याक्षिकांचे सादरीकरण व्हावे ही संकल्पना प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी मांडली. त्यानुसार लागणाऱ्या साहित्याची जमवाजमाव व सराव करण्यात आला. अफाट जनसमुदायासमोर जाताना विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि चालत्या ट्रॅक्टरवर उभारण्यात आलेल्या रचनेवर करावे लागणारे सादरीकरण ही आव्हाने समोर होतीच, परंतु विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि सर्व टीमचा पाठिंबा यामुळे ही सर्व आव्हाने लीलया पेलता आली. प्रशालेच्या दोनही महामात्र डॉ. मानसी भाटे आणि श्रीमती चित्रा नगरकर यांनी दिलेली प्रत्यक्ष भेट टीमचा उत्साह वाढविणारी ठरली.
या प्रात्यक्षिकांसाठी प्रशालेचे कमांडट कर्नल सारंग काशीकर (निवृत्त), उपप्राचार्य अनंत कुलकर्णी यांनी बहुमोल योगदान दिले. तसेच प्राचार्या श्रीमती पूजा जोग, शाम नांगरे, संदीप पवार, गुणेश पुरंदरे, माळी सर, थोरात सर, जगदाळे सर, अद्वैत जगधने, श्रीमती महाले यांचाही सक्रिय सहभाग होता.